डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

एस्. एम्. - एक धगधगतं अग्नीकुंड

पाहाता पाहाता एस्. एम्. ना जाऊन आज वर्षही झालं. काळ कोणासाठी थांबत नाही हेच खरं. मग ती व्यक्ती सामान्य असो वा असामान्य, फरक इतकाच असतो, असामान्य व्यक्ती पार्थिवरूपानं जरी या जगात नसल्या तरी त्यांनी केलेल्या कार्याच्या रूपानं त्या अमर होतात. एस्. एम्. अशाच असामान्य व्यक्तींपैकी.

आज माझ्या मनात एस्. एम्. च्या अनेक आठवणी रेंगाळत आहेत. त्यांच्या सार्वजनिक कुटुंबात ते अण्णा म्हणून संबोधले जात. अण्णा म्हणजे एक पुरातन वटवृक्ष होते. या वटवृक्षाच्या पारंब्यांतून अनेक छोटे वृक्ष निर्माण झाले. याच वटवृक्षाच्या उंच शेंड्यावर अनेकांनी भविष्याची स्वप्ने पाहिली व याच वटवृक्षाच्या अंगाखांद्यावर एक सुसंस्कारित पिढी जोपासली गेली. अण्णांची अनेक रूपे जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. ती सर्वच रूपे विलोभनीय होती. पण मला त्यातलं सर्वाधिक भावलं ते त्यांचं वत्सल स्वरूप. सानेगुरूजींचं वर्णन ‘आई’ म्हणून करतात. अण्णांच्या ठायी मला पित्याची कर्तव्यदक्ष कठोरता व मातेची वत्सल क्षमाशीलता या दोहोंचा संगम जाणवला. 

राष्ट्रसेवा दलामध्ये मी अण्णांना प्रथम पाहिलं तेव्हा मी 14-15 वर्षांची असेन. नुकत्याच संपलेल्या 1942 च्या आंदोलनातील अण्णांच्या तेजस्वी क्रांतीकार्याची रोमांचक कहाणी सेवादल संघटकांनी आम्हाला सांगितली होती. त्यामुळे पिस्तुल चालविणारा, पठाणाच्या वेषांत, पोलीसाच्या हातावर तुरी देऊन थेट सरहद्द प्रांतापर्यंत झेप घेणारा हा क्रांतिकारक पाहण्याची उत्सुकता मनात मावत नव्हती. मग एकदा अण्णांचं मुंबई सेवादलात बौद्धिक असल्याचं कळल्यानं आम्ही साऱ्या मैत्रिणी धावतच गेलो. अण्णांना पाहिलं आणि मनात त्यांच्याबद्दल दरारा निर्माण झाला. त्यांची तेजस्वी नजर आपल्या मनाचा थांग पाहते आहे असं वाटलं. तेव्हापासूनच अण्णांचा ठसा माझ्या मनावर कायम उठला. 

प्रभुभाईंचा अण्णांशी 1942 पासूनच संपर्क आला व त्यांच्या प्रेरणेनेच ते राष्ट्रसेवा दलाचे पूर्णवेळ सेवक झाले. मी मात्र अण्णांना दुरूनच पाहत होते व ऐकत होते. परंतु प्रभुभाईंच्या व माझ्या विवाहामुळे मला त्यांच्या अधिक जवळ जाण्याचा योग आला. त्या काळात भाऊसाहेब रानडे व अण्णा अशा आंतरजातीय, आंतरप्रांतीय वा आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देत होते. परंतु त्यांचे निकष मात्र अत्यंत कडक असत. अर्थात त्यामुळेच हे विवाह यशस्वी तर झालेच, पण ती घरेही समाजपरिवर्तनाची केंद्रे बनली.

स्वातंत्र्य मिळाल्यावर सुरूवातीला अण्णा जेव्हा मुंबईला येत, तेव्हा निरनिराळ्या ठिकाणी उतरत. त्यावेळी समाजवाद्यांची कम्युन्स होती. अण्णा त्यापैकी कधी मेघा भुवनवर, तर कधी आमच्याकडे व पुष्कळदा डॉ. मंडलिकांकडे उतरत. डॉक्टरांच्या व त्यांच्या भगिनी मावशी यांच्या शिस्तबद्ध व आखीव जीवनक्रमामुळे व शुश्रुषेमुळे अण्णांची ढासळती प्रकृती सुधारली. (अण्णांचं 85 वर्षांचं दीर्घायुष्य हे डॉक्टरांनी व मावशींनी त्यांना दिलेली बहुमोल देणगी आहे.) गेली वीस वर्षं मात्र आमचं घर हे अण्णांचं मुंबईतलं कायम निवासस्थान बनलं. अण्णा आमच्याकडे राहू लागले व त्यांच्यातले अनेक पैलू मला दिसू लागले. पूर्वी माझा असा भ्रम होता की, राजकीय पुढारी हा गंभीर, नेहमी राजकारणाचीच चर्चा करणारा निरस माणूस असतो. पण अण्णा आमच्या कुटुंबातलेच एक झाल्यावर, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे एक एक पदर माझ्या समोर उलगडू लागले. माझ्या लक्षात आलं की, 1942 साली सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारा हा माणूस सच्चा गांधीवादी आहे आणि त्याचं हे तत्त्व आत्मक्लेश पत्करून व प्रसंगी प्राण पणाला लावून तो जपतो आहे. कारण इन्स्पेक्टर अडवाणींना वाचविण्याचा तो प्रसंग घडला, तेव्हा अण्णा दादरला आमच्याच घरी राहत होते.

अण्णांना गाण्याची उत्तम जाण होती. जुन्या नाटकांतील पदं ते चालीवर गाऊन दाखवायचे. जुन्या गाण्यांइतकीच त्यांना चित्रपटातील गाणीही आवडत; मला आठवतं, टीव्हीवर एक चित्रपट पाहण्याच्या नादात एकदा त्यांची धुळ्याची गाडी चुकली होती. नाटकातले वा चित्रपटातले संवादही पाठ असत. ते गंमतीत स्मिता पाटीलला म्हणाले होते, “एकदा मला सिनेमात तुझ्या आजोबांचं काम करायचं आहे.” नियती अशी कठोर की जब्बार पटेल अण्णांवर जी डॉक्युमेंटरी करत होते, ती अण्णांच्या आजारामुळे अर्धवट राहिली. 

अण्णांना स्वच्छतेची आवड होती. त्यांना रोज घोटून दाढी करायला व आपले जरा लांब केस तेल लावून व्यवस्थित ठेवायला आवडत. खादीचा साधाच पण धुतलेला व इस्त्री केलेला पायजमा शर्ट व कोट हा त्यांचा कायमचा वेश असे. हे कपडेही पुण्याला ताराबाई व मुंबईला प्रभुभाई आणत. त्यांना सुगंधाची आवड होती. त्यामुळे आम्ही बाहेर जायला निघालो की, ते मला म्हणत, “आण तुझा तो सुवास थोडा”. 

अण्णा कोणाशीही चटकन् संवाद साधू शकत. टॅक्सीत बसले की, टॅक्सी ड्रायव्हरशी गप्पा सुरू होत. हिंदी व उर्दू दोन्ही चांगलं बोलता येत असल्याने भाषेची अडचण नसायचीच. तरुण मंडळींनाही त्यांचा सहवास आवडे, कारण ते मिष्कीलपणे त्यांना मध्येच विचारत, “काय लाईन मारली की नाही?” त्यांचं क्रिकेट प्रेम तर जाहीर होतं. शेवटच्या आजारात अतिदक्षता विभागात असताना अर्धवट शुद्धीवर आल्यावर पहिला प्रश्न विचारला होता, "काय, गावस्करच्या किती धावा झाल्या?" कारण ते बेशुद्धावस्थेत जाण्यापूर्वी क्रिकेट मॅच चालू होती व त्यावेळी गावस्कर खेळत होता. एखाद्याने सोपा झेल सोडला तर त्यांची प्रतिक्रिया असे, “काय रडीचा डाव खेळताहेत!” लहान मुलेही अण्णा आजोबांवर खूष असत, कारण ते त्यांना खिशातून खाऊ काढून देत. त्यांच्या बालसुलभ जिज्ञासांना न कंटाळता उत्तरं देत. मला आठवतं, ते एकदा ईला दलवाईबरोबर डिस्कोच्या चालीवर 2 मिनिटं नाचलेही होते. 

कोकण हा अण्णांच्या मनातील नाजूक कोपरा. कधी वेळ मिळाला की, आमच्या घरातील तानूशी त्यांच्या कोकणच्या गप्पा चालत व दोघेही मनाने त्यांचं दूर राहिलेलं जन्मस्थान, तेथील निसर्ग, माणसं यांच्याशी मनोमन समरस होत. आमच्या जनाबाईच्या फाटक्या संसारावर सहानुभूतीची फुंकर घालताना त्यांचं मन गहिवरून जाई. त्यांचं रुची ज्ञान वेचक होतं. ते खात थोडं, पण चवीने खात व पदार्थांची पाककृतीही सांगत. अण्णांची एकूणच पंचेंद्रिये फार तीक्ष्ण होती. त्यांच्या शेवटच्या आजारात ते पलंगावर पडून असले तरी रस्त्यावरच्या चाहुलीवरून, वासावरून ते वस्तु वा व्यक्ती ओळखत. 

एकदा बेळगाव एकीकरण समितीची मंडळी त्यांना भेटायला आली होती. अण्णा आतल्या खोलीत पडले होते. बाहेरच्या हॉलमध्ये काही लोक आले. कोणी तरी हळू आवाजात बोलले. अण्णांजवळ बसलेल्या ओकेंना अण्णांनी “कोण आलं आहे”, असं विचारलं. ओकेंना कोणाचाही आवाज ऐकू आला नव्हता पण अण्णा म्हणाले, “आता राजाभाऊ माने बोलले.” ओकेंनी बाहेर जाऊन पाहिलं, तर खरंच राजाभाऊ माने आले होते. 

अण्णांची ही अनेक रूपं जरी मी गेल्या वीस वर्षात पाहिली असली तरी त्या सर्वात मला एक वैशिष्ट्य जाणवलं. अण्णा सर्वात असत पण ते चटकन् यापासून अलिप्तही होत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मूळ गाभा होता- पिडीतांबद्दल कणव व अन्यायाविरुद्ध क्रोध. दुसऱ्याच्या दुःखाने अण्णा व्यथित होत. त्यावेळी त्यांचे डोळे हे करूणेचा डोह वाटत. पण त्यांना विवेकाच्या पापणीचा बांध असे. अशा वेळी त्यांचा गोरा गुलाबी चेहराच पाहणाऱ्याच्या मनाची तार छेडून जाई. अन्याय दिसला की, अण्णा खवळून उठत. त्यांच्या क्रोधाची धग पाहणाऱ्याला स्पर्शून जाई. पण हा क्रोध समाजातील दुष्ट प्रवृत्तींबद्दलचा असल्याने अशा वेळी अण्णांच्या ठायी भासमान होई संघर्षाला उभा ठाकलेला योद्धा. 

अण्णांचा एकूण जीवनपट पाहिला तर त्यांच्या या दोन स्वभावविशेषांचाच चढता आलेख आपल्याला दिसेल. दारिद्रय व कष्ट यांचे चटके लहानपणीच सोसल्याने त्यांचा समाजवाद केवळ पुस्तकीच न राहता त्यांनी दबलेल्यांच्या बाजूने सतत झुंज केली. प्रखर बुद्धीमतेमुळे ते राजकीय चळवळीकडे ओढले गेले. तेथेही त्यांच्या वाट्याला सश्रम कारावास व ‘क’ वर्ग आला. पण त्याचा फायदा त्यांची स्वातंत्र्यनिष्ठा बळावण्यासाठी झाला. स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी तुरुंग-फावडं-मतपेटी या त्रिशुळाचा अंगीकार केला. त्यांनी कामगार चळवळीचं नेतृत्व करून तुरुंगवास भोगला. साने गुरुजी सेवापथकासाठी एक वर्ष दिलं व नंतरही अनेकदा खेड्यांसाठी रस्ता बांधणं, तलावाला बांध घालणं, विहिरी खणणं व गावकऱ्यांना साक्षरतेचं, स्वच्छतेचं, गावाच्या सुधारणेचं शिक्षण देणं हे काम केलं. राष्ट्र सेवा दल हे तर त्यांचं आवडतं क्षेत्र होतं. कारण त्यांचा युवाशक्तीवर ठाम विश्वास होता व ही शक्तीच समाजपरिवर्तन करू शकेल अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांनी अटीतटीच्या निवडणुका जिंकून विधानसभा व लोकसभेतही लोकप्रतिनिधित्व केलं. पण त्यांचं मन गुंतलं ते संघर्षांत. जेव्हा जेव्हा कोणताही लढा उभा राहिला तेव्हा ते त्याच्या अग्रभागी राहिले.

गोवा मुक्तिसंग्रामाच्या वेळी नानासाहेब गोरे, मधु लिमये गजाआड अडकल्यावर अण्णा पुढे सरसावले. गोव्याच्या सामूहिक सत्याग्रहाच्या वेळी अनेक सत्याग्रही गोळीबारात वा लाठीहल्ल्यात जखमी झाले. अण्णा त्यावेळी बांधाच्या सीमेवर त्यांना मार्गदर्शन करीत होते. पाऊस पडत होता. पोर्तुगीजांनी जखमी सत्याग्रहींना भारतीय सीमेवर फेकून दिलं होतं. अण्णा त्या सर्वांना बांधात व सावंतवाडीत आणण्याची व्यवस्था करीत होते. मधु दंडवते, कॉ. चितळे यांना स्वयंसेवक स्ट्रेचरवरून आणत होते व बरोबर होते अण्णा - कपडे फाटलेल्या, चपला हरवलेल्या, खरचटलेल्या अवस्थेत. ते सारं दृश्यच रोमांचकारी होतं.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या भारतभराच्या संपाचं नेतृत्व बॅ. नाथ पैं बरोबर अण्णांनी केलं होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळचं व सीमा समितीच्या वेळचं त्यांचं काम तर सर्वश्रुतच आहे. या संदर्भात एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. सीमा समितीच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसावं असा एक प्रस्ताव होता. कोणा तरी मतलबी पुढाऱ्याने अण्णांनी उपोषण करावं असं सुचवलं व अण्णांनीही ते मान्य केलं: (यावेळी अण्णांचा आजार बळावला होता व डॉक्टरांचा सल्ला तर होता की, आता अण्णांनी संपूर्ण विश्रांती घेणं आवश्यक आहे. परंतु आपल्या आयुष्यातील हे शेवटचं कार्य आहे, त्यामुळे मला ते केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं.) आम्हाला हे कळल्यावर प्रभुभाईंनी अण्णांना निक्षून सांगितलं, “तुमची अवस्था आता यापुढे उपोषण करण्याची नाही. तेव्हा तुम्ही ते करता कामा नये”. शेवटी अण्णांनी ते मान्य केलं. ‘लड़ने कु तुम’ या प्रवृत्तीच्या अशा या पुढाऱ्याची चीड येणं स्वाभाविक होतं.

आणीबाणीत अण्णांनी काँग्रेस सरकारच्या दडपशाहीविरुद्ध महाराष्ट्रात व उत्तर भारतात विशेषतः बिहारमध्ये गावोगाव फिरून जनमत संघटीत केलं. बिहारचा उल्लेख मी मुद्दाम केला, कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अण्णांनी बिहारमध्येच कारावासही भोगला होता व तेथील शेतमजूरांचं आंदोलनही चालवलं होतं.

आव्हानाला पाठ दाखवायची नाही तर त्याच्याशी चार हात करायचे, हा तर अण्णांचा बाणा. त्यामुळे जी झुंज त्यांनी ब्रिटीश सत्तेशी दिली, कामगारलढ्यासाठी दिली, अन्यायाच्या प्रतिकारार्थ दिली, तीच झुंज त्यांनी आपल्या व्याधीशीही दिली. त्यांचा आत्मविश्वास, त्यांची जिद्द व त्यांची आनंदी वृत्ती पाहून डॉक्टर्सही चकित झाले. शेवटी गेल्या वर्षी एक एप्रिलला हे धगधगतं अग्नीकुंड विझलं. पण विझलं असं तरी कसं म्हणायचं? कारण या अग्नीकुंडाने आयुष्यभर अनेक चिंगाऱ्या फुलवल्या आहेत आणि त्या चिंगाऱ्या या अग्नीकुंडाचं काम पुढे चालू ठेवणार आहेत.

Tags: प्रमिला संघवी  स्वातंत्र्यलढा समाजवाद गोवा मुक्तिसंग्राम एस एम जोशी freedom movement socialism goa muktisangram s m joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके