डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मार्च महिन्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे होत आहे. ‘पुण्यात जे निर्मिते ते जगात प्रचलित होते’ असे म्हणतात.  नव्या संमेलनाध्यक्षांनी जर त्यांच्या अध्यक्षीय भाषणात ब्लॉग माध्यमाबाबतीत काही आवाहन केले, तर त्याला मोठा प्रतिसाद मिळेल. किंबहुना, त्यांनी आधी स्वत: आपला ब्लॉग सुरू करून ‘ब्लॉग असणारे पहिले संमेलनाध्यक्ष’ ही मुहूर्तमेढ रोवावी. यासाठी हवी ती मदत करण्यास आम्ही ब्लॉगर्स पुढे येऊ.

जाहीरनामा, भुंगा, अब्द, अक्षरधूळ, नेटभेट. ही नावं ना कुठल्या पुस्तकांची आहेत, ना शब्दकोड्यातल्या उभ्या- आडव्या रकान्यांकरिताच्या पर्यायांची. ही नावं ब्लॉग्जची आहेत. ब्लॉग्जबद्दल आपण कुठे- कुठे, काही- काही वाचलं असेलच. सध्या तर वृत्तपत्रंही ब्लॉग्ज चालवतात. इंटरनेटवरील ब्लॉग्जची दखल घेतात. त्यांच्या बातम्याही देतात. वृत्तवाहिन्याही आपल्या संकेतस्थळावर स्वत:चे आणि वाचकांच्या मतप्रदर्शनासाठीचे ब्लॉग्ज चालवितात. अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत ओबामा ब्लॉग्जचा वापर प्रचारासाठी करतात. अमिताभ बच्चन, अमीर खान यांच्या ब्लॉग्जवरच्या लिखाणाच्या बातम्याही होतात; पण म्हणून ब्लॉग म्हणजे काहीतरी फॅशन, मिरवायची गोष्ट नाही. ज्या प्रमाणे कधीकाळी उगाचंच उघडलं जाणारं ई-मेल अकाउंट आज गरज बनलंय, तसंच ब्लॉगचंही आहे. संपर्कासाठी ई-मेल आणि अभिव्यक्तीसाठी ब्लॉग किंवा वेबसाईट हे भविष्य आहे. हे ब्लॉगमाध्यम सध्या आपला दहावा वाढदिवस साजरा करतंय.

ब्लॉग म्हणजे काय?

ब्लॉग म्हणजे वेबसाईटच. ज्याप्रमाणे www.weeklysadhana.com ही वेबसाईटची लिंक आहे, त्याप्रमाणेच www.quintessential.blogspot.com अशी ब्लॉगची लिंक असते. पण ब्लॉग जरी वेबसाईट स्वरूपाचा असला तरी वेबसाईट ही ब्लॉग असतेच असे नाही. उलट ब्लॉग हा वेबसाईटमधला एक घटक असू शकतो. वेबसाईट तयार करणं हा तसा खर्चिक प्रकार असतो. डोमेन नेम (वेबसाईटचा पत्ता) नोंदवणं, वेबसाईट डिझाईन करणं याला खर्च येतो. उलट तुम्ही तुमचा ब्लॉग विनामूल्य तयार करू शकता. Blogger, wordpress, blog अशा अनेक वेबसाईट तुम्हांला विनामोबदला ब्लॉग देऊ शकतात. वेबसाईट हे प्रामुख्याने समूहाचं, सामूहिक माध्यम असतं. ब्लॉग मात्र वैयक्तिक माध्यम म्हणून लोकप्रिय आहे.  आज जरी ‘ब्लॉग’ हा शब्द वापरला जात असला तरी, प्रामुख्याने वेबवरील ब्लॉग (म्हणजेच नोंदी) या अर्थानं जॉन बर्जर यांनी ‘वेबलॉग’ हा शब्द 1997 मध्ये वापरला. पुढे (1999) सॉफ्टवेअर तंत्रज्ञ पीटर मरहोल्ज यांनी ‘ब्लॉग’ हा सुटसुटीत शब्द दिला.

ब्लॉगचं महत्त्व

आज जगभरात जी बहुमाध्यमं आहेत (Mass Media), ती जरी लोकांसाठी असली आणि लोकांबाबत असली तरी त्यात लोकांना थेट सहभाग कमी प्रमाणात मिळतो. अगदी तुम्ही पुस्तक लिहिलं, जाहिरात दिली, भाषण केलं तरी तुम्ही काही वेळेपुरतं काही लोकांपर्यंतच पोहोचू शकता; पण ब्लॉगचं तसं नाहीए. ब्लॉग कुणीही, कुठेही, कधीही प्रसिद्ध करू शकतो आणि तो कुणीही, कधीही, कुठेही वाचू शकतो. (तुम्ही जर ब्लॉगवर व्हिडिओ- ऑडिओ क्लिप, फोटो टाकले तर या वाक्यात  ‘पाहू’ आणि ‘ऐकू’ हे शब्दसुद्धा समाविष्ट होतील.) अशा या शक्तिवान माध्यमाचा वापर करून साध्या साध्या लोकांनी वृत्तपत्रांना, कंपन्यांना घाम फोडला. अमेरिकेची अध्यक्षपदाची निवडणूक तर ब्लॉग्जवरही लढली गेली असं म्हणतात. www.blogcatalogue.com या वेबसाईटवर ब्लॉगच्या माध्यमातून चाललेल्या चळवळींची माहिती मिळू शकते. सध्या जगभरात 1कोटी लाख ब्लॉग्ज असल्याचा अंदाज आहे. (संदर्भ : technorati.com), भारतात 10 लाखांपेक्षा अधिक ब्लॉगर्स असून, यांत तरुणांची संख्या (15 ते 45 वर्षे) 60 टक्क्यांहून अधिक आहे.  (संदर्भ : MSN LIVE सर्व्हे).

मराठी, ब्लॉग आणि युवक

मराठीची गळचेपी, मराठी भाषेची दुरवस्था हा महाराष्ट्रराज्य निर्मितीपासून चर्चेत असणारा विषय आहे.  मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, साहित्यनिर्मिती आणि प्रसारासाठी भाषा संवर्धन महामंडळ, साहित्य परिषद, विश्वकोष मंडळ असे अनेक उपक्रम सुरू आहेत.  आज अर्धा डझन मनोरंजन वाहिन्या आणि तितक्याच वृत्तवाहिन्याही मराठीत आहेत. अनेक साप्ताहिकं, मासिकं, दैनिकं, दिवाळी अंक यांची रेलचेल आहे. पण त्यांच्या वाढीला, आवाक्याला मर्यादा आहेत. कुठल्याही भाषेचं संवर्धन हे त्या भाषेच्या लिहिण्यात, बोलण्यात, वाचण्यात, ऐकण्यात अशा सर्व बाजूंनी, सर्व विषयांत आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांकडून वापर होण्यावर अवलंबून असतं आणि हेच काम ब्लॉग करू शकतो. एखादा मराठी ब्लॉग ज्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील कुणी तयार करू शकतो, तसाच वॉशिंग्टनमध्येही एखादा महाराष्ट्रावर प्रेम करणारा करू शकतो. जरा विचार करा... धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी नागपूरमधल्या दीक्षा भूमीवरचा अनुभव ते अगदी कोपनहेगन मधल्या वातावरणविषयक परिषदेचा वृत्तांत, शेअरबाजाराची मराठीत माहिती, औरंगाबाद जवळच्या अजिंठालेण्यांविषयी सचित्र लेखन, खवैय्यागिरीची ठिकाणं, विविध भाषांमधील लेखांचा अनुवाद, आपलेच स्वैर अनुभव, फोटो, कार्यक्रमाचं शूटींग असं सगळं तुम्हांला लिहिता, अनुभवता येतं. आपल्याच भाषेत! कुठेही आणि कधीही! आज मराठीत सुमारे दहा हजार कार्यरत ब्लॉग्ज आहेत. www.marathiblogs.net  या वेबसाईटवर मराठी ब्लॉग्जची यादी आहे. ब्लॉग कसा तयार करावा व मराठीत लेखन, ब्लॉगची आकर्षकता वाढवणं, ब्लॉगर्सशी संपर्क यासाठी ही वेबसाईट तुम्हांला मदत करू शकते.

मराठी ब्लॉगोस्फिअरची स्थिती

जसं Atmosphere तसंच Blogosphere ! चांगली गोष्ट ही आहे, की मराठी ब्लॉगर्समध्ये तरुणांची संख्या मोठी आहे; पण प्रॉब्लेम आहे तो सकस विषयांवरच्या लेखनाचा (लेखन, फोटो,व्हिडिओ, ऑडिओ) दुष्काळ, ब्लॉग लिहिण्यातली अनियमितता; याशिवाय मराठीत लिहिण्याच्या अडचणी, इंटरनेटची सुविधा दर्जेदार नसणं (विशेषत: ग्रामीण भागात) या काही अस्सल अडचणीही आहेतच. ‘स्टार माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ या स्पर्धेसाठी काम करीत असताना, मला मोठ्या प्रमाणात स्वान्त सुखाय ब्लॉग्ज आढळले. साहित्याबद्दल चर्चा करणारे ब्लॉग्जही अपवाद वगळता, पु.ल., जी.ए., ऐतिहासिक कादंबऱ्या, लोकप्रिय कविता यापुढे जात नाहीत. अर्थात चालू घडामोडी, पर्यटन, ज्योतिष, शास्त्र, संगीत, कला, तंत्रज्ञान यांना वाहिलेले उत्तम ब्लॉगही खूप आहेत. एक जाणवलं; ग्रामीण असो की शहरी लेखनाची शैली, त्यातली ओढ उत्तम आणि अस्सल आहे. गरज आहे ती चांगल्या ब्लागॅर्सना प्रकाशात आणण्याची, तसंच ब्लॉगर्सना एकत्र आणून नियमित संवाद साधण्याची. यातून भविष्यातले लेखक, साहित्यिक तयार होतील अशी आशा आहे. पुण्यात असा प्रयत्न ‘माध्यमाईट्‌स’ या माध्यम क्षेत्रातील, आम्ही काही तरुणांच्या ग्रुपनं केला आहे व पुढेही करायची इच्छा आहे. मी इथे मराठी ब्लॉगच्या लिंक्स मुद्दाम देत नाहीए; कारण, तुम्ही मराठी ब्लॉग्ज नेट वेबसाईटवर जाऊन ते ब्लॉग्ज पाहावेत, अशी अपेक्षा आहे. (गुगल ब्लॉगसर्चमार्फत तुम्ही दर्जेदार इंग्रजी ब्लॉग्ज पाहू शकता.)

ब्लॉगिंगचे फायदे

तुम्ही ब्लॉगिंग मराठीत करा किंवा अन्य कुठल्याही भाषेत, तुम्हांला स्वत:ला ओळख मिळाल्याचा आनंद गवसेल. तुमच्या लेखनाला जेव्हा कुणी दाद देतं, तो आनंदच न्यारा, ज्या विषयावर तुम्ही लिहीत जाता, तसतसा तुमचा फोकस स्पष्ट होत जातो. तुमचं भाषेवरील प्रभुत्व वाढतं. तुमच्या ब्लॉगचा वापर तुम्ही स्वत:च्या प्रसिद्धीसाठी,बायोडेटा म्हणूनही करू शकता. ब्लॉगच्या माध्यमातून अर्थार्जनही शक्य आहे. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींनी ब्लॉगवर लेखन केल्यास, ते ज्ञान सर्वांना उपलब्ध होऊ शकतं. विशिष्ट विषयावरील ब्लॉगर्स एकत्र येऊन चळवळ उभारू शकतात. एकेकाळी मराठीत अनियतकालिकांची चळवळ गाजली.  आज ब्लॉगच्या माध्यमातून दर्जेदार ई-नियतकालिकं विनाखर्च तयार होऊ शकतील. लोकचळवळींनाही ब्लॉग हे सशक्त माध्यम म्हणून उपलब्ध आहे. हे सर्व मराठीत झाल्यास आपली मराठी भाषा समृद्ध होईल, हे नक्की.

ब्लॉगरची जबाबदारी

एवढं ताकदवान माध्यम हाती येतंय, म्हटल्यावर जबाबदारीही आहेच. काही जबाबदारी नैतिक आहे तर काही कायदेशीर. ब्लॉगवरील मजकूर स्वत:चा असावा, अन्य संदर्भ घेतला असल्यास स्रोताचा उल्लेख करावा. बदनामीकारक मजकूर असू नये. ब्लॉग हे सार्वजनिक माध्यम आहे, याचं भान असावं. नियमित ब्लॉगिंग करावे. वैयक्तिक ब्लॉग असावाच; पण एखाद्या सामाजिक कार्यासाठीही ब्लॉग सुरू करावा. उदा. गावाकडील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थी-शिक्षक मराठी ब्लॉगच्या माध्यमातून नोट्‌स देऊ शकतील. भाषांतराची जबाबदारी कुणी स्वीकारल्यास उत्तमोत्तम लेखन आपल्या भाषेत ब्लॉगवर येईल. आपल्या शहराची ताजी आणि सूक्ष्म माहिती देणारा ब्लॉग सर्वांनाच उपयोगी ठरेल.

यांना आवाहन :

‘साधना’ने हा लेख लिहिण्याची दिलेली संधी साधून साहित्यिक, संस्था, नियतकालिकं, मान्यवर, चळवळी यांना एक आवाहन करायचंय.  आपण कृपया ब्लॉगचा नियमित वापर सुरू करा. तुम्ही तो केल्यानं बाकीचेही ब्लॉगिंग करतील. विशेषत: मराठी वाचक वाढण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनीच ब्लॉगिंग केले पाहिजे आणि ब्लॉगचा प्रसार केला पाहिजे. यात तोटा कुठलाही नाही. साहित्यविषयक संस्था, व्यक्तींनी तर यात पुढाकार घ्यायला हवा. मराठीतील मान्यवर लेखक, साहित्यिक, कवी, कलाकार,उद्योजक, व्यावसायिक, तंत्रज्ञ, कार्यकर्ते, राजकारणी यांचे ब्लॉग्ज अभावानेच आहेत. ते मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची गरज आहे. मार्च महिन्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे होत आहे. पुण्यात जे निर्मित होतं ते जगात प्रचलित होतं असं म्हणतात. नव्या संमेलनाध्यक्षांनी जर त्यांच्या अध्यक्षीय भाषणात ब्लॉग माध्यमाबाबतीत काही आवाहन केलं तर त्याला मोठा प्रतिसाद मिळेल. किंबहुना, त्यांनी आधी स्वत: आपला ब्लॉग सुरू करून ‘ब्लॉग असणारे पहिले संमेलनाध्यक्ष’ ही मुहूर्तमेढ रोवावी. यासाठी हवी ती मदत करण्यास आम्ही ब्लॉगर्स पुढे येऊ.

(पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविभागातून शिक्षण पूर्ण केल्यावर प्रसन्न जोशीने काही काळ वृत्तपत्रात काम केले, सध्या तो मुंबई येथे ‘एबीपी माझा(पुर्वीचे स्टार माझा)’वर सिनिअर प्रोड्यूसर आहे.)

Tags: साहित्यिक ब्लॉग स्वओळख वैचारिक अवकाश अर्थाजन साधना अक्षऱधूळ जाहिरनामा वर्डप्रेस ब्लॉगर मराठी ब्लॉगर अवकाश मराठी ब्लॉग ब्लॉग प्रसन्न जोशी Journalist prasann joshi blogoshere emagazine responcibility Marathiblogs Marathiblogger Marathilanguage Videoblog audioblog blogcatalogue Akshardhul. Sadhana Jahirnama Media Blogger Marathi Blog Blog weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रसन्न जोशी
prasann.joshi@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके