डिजिटल अर्काईव्ह

7 सप्टेंबरपासून सुरू झालेली ‘भारत जोडो’ ही यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात आली आणि दोन आठवडे विविध जिल्ह्यांतून प्रवास करीत मध्य प्रदेशात गेली. 12 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या काळात ही यात्रा हिंगोली ते वाशिम यादरम्यान मार्गक्रमण करीत होती. तेव्हा पूर्ण वेळ यात्रेसोबत राहता आले. भारत जोडो यात्रेची दरदिवसाची सांगता राहुल गांधींच्या भाषणानं होते. त्यात ते एक मुद्दा आवर्जून सांगतात, ‘मी रोज 25-30 कि.मी. चालतो. पण थकत नाही. का? कारण तुमची उर्जा मला चालवते. मी माझी एनर्जी वापरत नाही. तुमच्या एनर्जीनं चालतो...’ राहुल या मुद्याची पुनरावृत्ती का करतात? त्यांच्या सोबत चालणारांना ‘जनशक्तीचा रेटा-ताकद-सुप्त शक्ती’ याची कितपत जाणीव आहे, याचा यात्रेसोबत चालून घेतलेला कानोसा...

(डावीकडून तुकाराम, रितेश, सरस्वतीबाई, भाग्यश्री आणि रुपेश)

एक जवळपास नागवं पोर गर्दीत दिसलं. सात-आठ वर्षाचं. डोईला गुंडाळलेला पांढरा रूमाल. कमरेला रूमालाएवढंच पांढरं लंगोट. हातात तीरकमान. अनवाणी चालणाऱ्या त्या पोरासोबत एक बाई दिसल्या. पोराला विचारलं, ‘तुझं नाव काय रे?’ गर्दीत माझा आवाज पोचला नसेल, किंवा पोरगं गोंधळलं असेल. डांबरी सडकेवर खडे चुकवत, ते भराभरा पुढं चालत राहिलं. मी मागं मागं येतोय, पोराशी बोलू पाहतोय हे पाहून ती बाई पुढं आली. म्हणाली, ‘रितेश हाय त्याचं नाव.’ मी विचारलं, ‘असं का आणलंय ह्याला?’ बाई म्हणाल्या, ‘हामच्या लोकांकडं कुनाचं लक्षच जात नाय. म्हून ह्याला असा डिरेस केला.’ ‘गरिबाची स्थिती दाखवेल असा ड्रेस’ म्हणजे लेकराचं नागवंपण! पण पोराच्या हातात तीरकमानही होतं. संघर्षाचं प्रतीक. कुतुहल वाढलं.

चालता चालता बाईंशी बोलल्यावर समजलं ते असं - त्यांचं नाव - भाग्यश्री पवार. वय साधारण पंचविशीच्या आसपास. त्यांच्या सोबत एक वयोवृद्ध बाईही होत्या. ती यांची मावशी. नाव - सरस्वतीबाई. शिवाय आणखी तीन मुलं- रूपेश (वय 10), वैष्णवी (वय 7) नि तुकाराम( वय 5). हा ताफा घेवून चालत भाग्यश्रीताई म्हणाल्या, ‘आम्ही परभणीवरून आलोय. साकला प्लॉटवर वस्ती हाय आमची.’ मनात विचार आला परभणी-कळमणुरी जवळपास 100 कि.मी. चं अंतर. कुणा काँग्रेसच्या पुढाऱ्यानं यांना गाडीत घालून इथं आणलं असावं. पण तसं नव्हतं. भाग्यश्रीताई म्हणाल्या, ‘आम्ही टिव्हीवर बघितलं, ऱ्हाऊल गांधी येणार म्हून, आमी आलो. आम्हाला घर नाही. आम्ही पारधी. मी बारावी शिकलेय. पण नोकरी मिळत नाही. तुम्ही चोरी करता, तुम्हाला नोकरी कशी द्यायची असं लोक इचारत्यात. आमची समस्या ऱ्हाऊल गांधीला सांगायला मी निवेदन ल्हिवलंय...’ बाईंनी पिशवीतून वहीच्या पानावर लिहिलेली चिठ्ठी दाखवली.

‘साप्ताहिक साधना’कडून यात्रेचं रिपोर्टींग करायचं ठरलं, तेव्हा मनात कुतुहल होतं - राजकारण हा प्रकारच माणसांत भेद पाडणारा. एका गटाच्या विरोधात दुसरा उभा केल्याशिवाय राजकारण कसं शक्य आहे? मग हे भारत जोडोचं प्रकरण नेमकं आहे तरी काय? मी पोहोचलो तोवर तीन राज्यांचा प्रवास करून यात्रा कळमनुरीत पोहोचलेली. ऊन्हानं तापलेली सडक. राहूल गांधी चालायला सुरूवात करतील, तिथे पोलिसांनी दोन्ही बाजूला पिवळा जाडजुड दोरखंड धरून कडं केलेलं. दुतर्फा गर्दी. सगळयांच्या नजरा राहूल गांधींच्या आगमनाकडे. मनात जॉली एल.एल.बी. सिनेमातला डायलॉग आला - कौन है ये लोग? कहाँसे आते है?’ घर नसल्यानं फुटपाथवर झोपलेले नि श्रीमंतांच्या गाडीखाली चिरडून मेलेल्या नागरिकांसाठी उच्चारलेला तो संवाद. भाग्यश्री पवारांनी माझ्या मनात अर्शद वारसीच्या त्या सिनचं एक्सटेन्शन केलं. भाग्यश्रीताई म्हणाल्या, ‘आम्हाला कुणी आणलं नाही. पदरचा खर्च करून आलोय.’ खर्च किती झाला? विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘आधी बस पकडली मग डुगडुगीत बसून आलो. हजार रुपय गेलंच की!’

भाग्यश्रीताईंशी चालता चालता बोलणं कठीण जात होतं. कारण वातावरणात घोषणांचे आवाज होते. शिवाय लाऊडस्पीकरवरूनही आवाज येत होते. मी त्या आवाजांकडे लक्ष केंद्रीत केलं- ‘धनगर समाजाचे प्रश्न आपण राहुल गांधींपुढे मांडणार होतो. पण आपल्या लोकांना शिस्तच नाही. सुरक्षेच्या कारणांमुळे राहुल गांधींचा कॉनवॉय पुढं गेलाय. आपण तिथे त्यांचं स्वागत करणार आहोत.’ गर्दीत एक मोठ्ठा पिवळ्या झेंड्यांचा जथाच जमलेला. त्या समुदायासाठी लाऊडस्पीकरवरून सुचना दिल्या जात होत्या. ते झेंडे माणसांसह उठले नि गर्दीतून पुढं निघाले. 

यात्रेत कुणा आमदाराने दिलेले टी-शर्ट घालून चालणारांचीही मोठी गर्दी होती. त्यात साठी ओलांडलेले म्हातारेही होते. तरूणांच्या डोक्यावर पक्षाचं चिन्ह असलेली टोपी. टी-शर्ट नि टोप्यांवर नेत्याची छबी. जणू हे कुणी आजीमाजी नेतेच माणसामाणसातून आपलं घोडं पुढं दामटताहेत. ही प्रतिमा खरी असली तरी ती या चित्राची एक बाजू आहे. भारत जोडो यात्रेत सर्वसामान्यांच्या आकांक्षांचे अनेक प्रवाह चालताहेत हे चालताना लक्षात येत गेलं.

रस्त्याकडेला राहुल गांधींचं मोठ्ठं कटआऊट दिसलं. मुठ वळवून हात उंचावलेल्या त्या प्रतिमेसमोर दोन तरुण त्याच पोजमध्ये ऐकमेकांची सेल्फी काढण्यात मग्न होते. त्यांच्याशी बोलावं वाटलं. त्यातला एक 15-16 वयातला. दुसरा तिशीतला त्याचं नाव - कृष्णा राठोड, राहणार - परभणी. रस्त्याकडेला तंबू लावून केळी नि पाण्याची पाकिटं वाटली जात होती. कोवळा तरूण त्या तंबूकडे गेला. तिथे झुंबड उडालेली. लोक केळ्यांचे घडच्या घड गर्दीतून घेऊन विजयी मुद्रेनं पुन्हा यात्रेत सामील होत होते. मगाशी लाऊडस्पीकरहून चाललेला संवाद माझ्या मनात रेंगाळत असावा, मी केळी घेण्यासाठीची झुंबड पाहत नि बोलायचं निमित्त काढत कृष्णा राठोडना म्हणालो, ‘आपल्या लोकांना शिस्तच नाही.’ माझ्या बोलण्याकडं दुर्लक्ष करत कृष्णा म्हणाले, ‘काहीही करून राहुल गांधीला भेटायचंच. काय करू ओ, कसं भेटू?’ मी विचारलं, ‘भेटून तुम्ही त्यांना सांगणार काय? कशासाठी भेटायचंय तुम्हाला त्यांना?’ आधी ते म्हणाले, भेटायचंय. बस्स. काहीही करून भेटायचंच. मी म्हंटलं, ‘काही प्रश्न तर तुम्ही त्यांना सांगायला हवेत...’ मग ते खुलले. म्हणाले, ‘भाजपनी बंजारा समाजाला काय दिलंय? काँग्रेसने दोन मुख्यमंत्री दिलेत. आमचा समाज नेहमी काँग्रेसबरोबर राहिलाय. पण आरएसएसची लोकं लय फिल्डींग लावत्यात. त्यांच्याकडं माणसं फोडायची टीम वेगळी असती, उमेदवार तयार करायची टीम वेगळी. घराघरांचा सर्वे करणाऱ्यांची टीम वेगळी असतीय. असं काम काँग्रेसनी करायला पायजे. हे मला सांगायचंय राहुल गांधीला. मी म्हणालो, ‘पण एवढ्या गर्दीत इतकं सांगणं मुश्कील होईल!’ त्यावर हिरमुसलेले राठोड म्हणाले, ‘मला फेटा बांधायचाय राहूल गांधींना. मी फेटे बांधायचंच काम करतो. तीन-चार मंत्र्यांना फेटे बांधलेत मी.’ राठोडांनी त्यांचं कार्ड दिलं. त्यावर लाल अक्षरात लिहिलेलं - राठोड फेटेवाले. मनात विचार आला - हा तरूण उच्चशिक्षित आहे. त्याला राजकारण व समाजाच्या प्रश्नांचीही जाण आहे. वैशिष्ट्यपूर्ण कौशल्याचा वापर करत त्यानं राजकारण्यांशी ओळखही केलीय. विविध राजकीय पक्षांच्या कार्यक्रमात हा फेटे बांधतो. पण हाडाचा काँग्रेसी वाटला. अशा तरूणांसाठी राहुल गांधींकडे काय कार्यक्रम आहे? 

कळमनुरी ते हिंगोली हे 18 कि.मी. चं अंतर. वाटेत राहुल गांधींच्या स्वागताला विविध कलापथकं थांबलेली. आंध या आदिवासी जमातीचं एक नाचपथक. उघड्या अंगाची तरूण पोरं. कमरेला लिंबाच्या डहाळ्या बांधलेल्या. डोईवर मोरपिसांच्या टोप्या. हातात काठ्या. डफाच्या लयीवर ही पोरं नाच करत होती. बंजारा समाजाच्या स्त्रियांचं मोठं कलापथक. लाल ड्रेसवर विणून बनवलेल्या आरशांच्या तुकड्यात काही प्रतिमा अशा वातावरणात दिसणं मुश्कील. या स्त्रियांचा मोठा जथा नाचतगात यात्रेचं स्वागत करत होता.  यात्रा जसजशी दाटीवाटीच्या वस्त्यात येत होती, तसतसे ठरावीक अंतरावर चौकाचौकात लाऊड स्पीकरहून वाजणारी देशभक्तीची गाणी, भव्य रांगोळ्या, हारफुलं घेवून थांबलेले लोक दिसू लागले. स्थानिक बँड पथकंही वाद्य वाजवत उभी. अत्यंत उत्साही वातावरण. मनात शब्द आला - कार्निव्हल! जणू एक सण साजरा होतोय. त्याचं नाव ‘भारत जोडो’. खरंच असं शक्य आहे? असा सण ज्यात जाती-धर्मांच्या भींती मोडून सर्वजण आपापली सांस्कृतिक कला-वैशिष्ट्य घेऊन नाचतागाताहेत. यात्रेच्या निमित्ताने तसं जाणवत मात्र होतं.

रस्त्यांतून जाताना मुस्लिम वस्त्यांचं अस्तित्त्व ठळक जाणवतं. पण सहसा शहरी परिसरात ही वस्ती दलितांची असं ठाम कळत नाही. पण यात्रा जशजशी पुढं सरकते - मुख्यत: दलित व मुस्लिम वस्त्या ठळक दिसू लागतात. या वस्त्यांतली माणसं आपली ओळख घेऊन यात्रेला सामोरे येताना दिसतात. बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलाही वाटेवर उभ्या दिसतात. एक मुस्लिम मुलगी राहुल गांधींचं पेन्सिलनं केलेलं स्केच घेवून उभी दिसली. 16-17 वयाची असावी. स्केचवर तिची सही दिसत होती. मी चालता-चालता तिला मुद्दाम अंगठा व तर्जनी जुळवून ‘झकास चित्र काढलंस!’ अशी दाद दिली. तर ती म्हणाली, ‘शुक्रीया सर...’  दलित वस्त्यांमधील मुलं आंबेडकरांची तसबीर घेऊन उभी दिसली. पुढे हमखास दलित वस्ती आली की हे चित्र दिसायचं. निळे झेंडे नाचवत या वस्त्या यात्रेचं स्वागत करू पाहतात. मनात विचार येतो - हे लोक आरपीआयच्या कुठल्या गटातील असतील?

एका चौकात लेजर दिव्यांचे चकचकीत प्रकाश चमकत होते. दोन्ही पायाने अधू असलेला एकजण पाय दुमडून फळीला लावलेल्या चाकांवर चौकभर गरगरा फिरत होता. मला यात्रेतून चालताना पाहताच त्यानं हात पुढे केला. रस्तावर विकलांग सहसा भीक मागताना आढळतात. मला क्षणभर तो भिकारीच वाटला. त्यामुळं अनवधानानं मी हस्तांदोलन केलं नाही. पुढं आल्यावर लक्षात आलं, तो स्वागतासाठी हात पुढं करतोय. पण माझ्या पूर्वग्रहांमुळं, यात्रेत चालणारा एक माणूस म्हणून मी त्याला नाराज केलं. मनाला हुरहुर लागली. असे कित्येक जण या ‘भारत जोडो’कडे अपेक्षेनं पाहत असतील. स्पर्शाची एक भाषा असते. पण यात्रेचं केंद्र राहुल गांधी आहेत. राहुल गांधींचा स्पर्श या माणसाच्या नशीबी असेल का? त्याहूनही कळीचा प्रश्न आहे - किती लोकांच्या मनाला प्रेमाचा स्पर्श या यात्रेतून होऊ शकेल?

हिंगोलीतील सभेची सांगता करताना राहुल गांधींचं भाषण झालं. त्या भाषणात पत्रकारांवरील दडपणाचा उल्लेख झाला. संसदेत विरोधी पक्षांचा आवाज ऐकला जात नाही, यासाठी माईक बंद केले जातात याचं मेटाफर त्यांनी वापरलं. त्या भाषणातला एक निसटता क्षण मला कदाचित जाणवला. काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्याबाबत राहुल बोलत होते. त्यांची आठवण काढताना वाक्य अर्धवट सोडून ते क्षणभर थांबले. आधीच्या वाक्याशी संबंध नसणारा पॉज घेत अचानक त्यांनी ‘अमर रहे..’ असे शब्द उच्चारले. मग ‘राजीव सातव अमर रहे’ असं म्हणाले. मनात आलं, हा माणूस त्या क्षणाला भावूक झाला असेल का? याला तो भावूक क्षण एनकॅश करण्याची संधी होती. दोन टिपं गाळून यानं गर्दीचं मन जिंकलं असतं. पण राहुल गांधी आपल्या दिवंगत सहकाऱ्याला अभिवादन करून पुढील मुद्‌द्यांकडे वळले.

राहुल गांधी हा एक मख्ख माणूस आहे, त्याला धड कशातलं काही कळत नाही. अशी प्रतिमा गेली अनेक दिवस उभी केली गेलीय. पण यात्रेतील प्रत्येक सभेला थेट सामोरं जात, रोज त्या त्या क्षणाला मनात असेल ते बोलताना दिसतात. हल्ली नेत्यांच्या सभास्थानांवर मोठ्ठा एलईडी स्क्रिन लावला जातो. त्या स्क्रिनवर नेत्यांच्या चेहऱ्यावरचा मेकअप स्पष्ट दिसतो. पुरुष नेतेही चेहऱ्यावर नि ओठांवर लाली लावतात हे सहज दिसतं. यात्रेत राहुल गांधी 15-20 कि.मी. चालून आलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही. पण माणूस आहे तसा- विनामेकअपचा पाहणं हे या सभांमधलं एक वैशिष्ट्‌य जाणवलं.

यात्रेला दूरून पाहणारांच्या मनातही काही अपेक्षा आहेत. ते लांबूनच राहुल गांधी व यात्रेला जोखताहेत असं जाणवलं. यात्रेसोबतच्या पत्रकारांसाठी विशेष निवास व्यवस्था केली जाते. अशा एका हॉटेलमध्ये मी आधी उतरलो. पत्रकारांच्या जथ्यात पूर्वनोंदणी न झाल्याने मला रूम मिळत नव्हती. म्हणून लॉबीत मी तिथल्या रॅकवरचं मासिक चाळत बसलेलो. मला पाहून एक जण कोचात येऊन बसले. त्यांना पत्रकारांकडून यात्रेचा अंदाज घ्यायचा असावा.

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी कशी यात्रेची उत्तम सोय केली, याबाबत ते बोलले. तसंच अजून एक टर्म मोदी येतीलच यावरही त्यांनी माझ्याकडून दुजोरा मिळवायचा प्रयत्न केला. मग ते म्हणाले, ‘‘राहुल गांधींना अजून लोकांशी काय बोलावं हे कळत नाही. नांदेडच्या सभेत ‘तरुणांना काही संदेश द्या’ असं त्यांना सांगितल्यावर हा माणूस म्हणतो - डरो मत... आता तरूणांना काय कळणार डरो मतचा अर्थ? काहीतरी तरूणांच्या प्रश्नांबद्दल बोलावं. हे काय डरो मत?...’’ दूरून यात्रेचं आकलन करणारे त्यांच्या परिनं यात्रेकडं कसं पाहतात, याचं हे एक उदाहरण. नंतर मी पत्रकारांची सोयसुविधा सोडून थेट यात्रेतच फिरलो. त्यामुळे काठावरून पाहणारांचा दृष्टीकोन, मतमतांतरे यांचा फारसा अंदाज घेता आला नाही.

भारत जोडो यात्रेच्या प्रत्येक टप्प्या-पडावात कोणकोणत्या जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाकडून माणसं येतील, याचं पूर्वनियोजन जाणवतं. सांगली-सातारा-कोल्हापूर मधून मोठ्या प्रमाणात माणसं आली होती. या लोकांना बसनं आणण्याची जबाबदारी अर्थातच त्या त्या जिल्ह्यातील काँग्रेसच्या पुढाऱ्यांची असणार. जिल्ह्या-तालुक्यातून निघणाऱ्या बसगाड्या रात्रभर प्रवास करून भल्या पहाटे निश्चित स्थळावर पोचतात. त्यामुळे स्थानिक पोलिसांची यंत्रणा रात्रभर रस्त्यांवर दिसते. चौकाचौकात बंदोबस्त जाणवतो. सकाळी सहाला राहुल गांधी चालायला सुरूवात करतात. पण कार्यकर्त्यांच्या झुंडी चार-पाच पासूनच जमायला सुरूवात होते. सुरक्षेचा विचार करता यात्रेच्या वाटेवर कुठलंही वाहन थांबू दिलं जात नाही. त्यामुळं दूरहून आलेल्या वाहनांना वाटेवर रेंगाळू न देणं, गाड्या वाटेला लावताना कार्यकर्त्यांशी बाचाबाचीचे प्रसंग टाळणं याचा ताण पोलिसांवर स्पष्ट जाणवतो. यात्रा ज्या मार्गाने जाणार तो सर्व रस्ता दिवसभर इतर वाहनांसाठी बंद केला जातो. स्थानिक टू व्हिलरवाल्यांनाही प्रवेश बंद. त्यामुळं एकप्रकारे ही यात्रा पुणे-मुंबई-कोल्हापूर-नाशिक सारख्या शहरांत आली नाही हे बरंच झालं. अशा विचारात मी यात्रा प्रारंभ होण्याच्या एका ठिकाणी पोचलो.

इथं पोहोचण्यासाठी मला एका तरुणींच्या गटातील गाडीत यायला मिळालं. या तरुण मुली राज्यातील वेगवेगळ्या भागांतून आलेल्या. वयोगट पंचवीसच्या आतला. त्यामुळं त्यांच्यातील गप्पाही तारुण्यसुलभ असणं स्वाभाविक. या गटासोबत काही तरूणही होते. त्यांच्यात कुणा एकाचं नाव राहुल होतं. एकजण म्हणाली, ‘ए काय गं त्याला राहुल गांधी, राहुल गांधी म्हणणं चालवलंय? त्याच्या गालावर काय खळी पडते का? यापुढे कुणीही त्याला राहुल गांधी म्हणायचं नाही.’ तिनं थट्टेत इतर मुलींना ताकीद दिली. मग दुसरी म्हणाली, ‘मला मिळेल का गं राहुल गांधीला भेटायची संधी?’ राहुल गांधी यात्रेत चालणारांना हाताने इशारा करून बोलावतात. तो धागा पकडत तिसरी म्हणाली, ‘मला जर राहुल गांधींनी बोलवलं, तर मी तर चक्कर येऊन खालीच पडेल.’ मग सगळ्या हसू लागल्या. राहुल गांधीवर ‘कुणाचा किती क्रश’ आहे, याबाबत या मुली चेष्टा-मस्करी करत राहिल्या. 

मुलींचा हा संवाद कुणाला धीट-अश्लील वाटू शकेल. पण तुम्ही तारूण्याला कसं पाहता त्यावर ते अवलंबून आहे. तरूणांमध्ये आजकालच्या राजकीय नेत्यांबाबत क्रेझ आहे का? त्यांना ते सिनेमातल्या हिरोंइतके आकर्षक वाटतात का? विशेषत: ही क्रेझ मस्कुलर-पुरूषी-अरेरावीची वाटते की सौम्य? हे महत्त्वाचं. या अर्थानं मुलींची ही चेष्टा मजेदार वाटली. मुली राहुल गांधींकडे शाहरूख खानने निभावलेल्या सिनेमातील ‘राहुल’ या कॅरेक्टरवर प्रेम करतात, तसं पाहत असतील का?

ठीक सहा वाजता राहुल गांधीचा कॉनव्हॉय निश्चित स्थळावर येतो. तोवर पहाटे पाचपासून जमलेली गर्दी अधिकच उत्साहात घोषणा द्यायला सज्ज असते. या गर्दीत बळजबरीनं आणलेले लोक जाणवत नाहीत. गावोगावचे निष्ठावंत काँग्रेसी दिसतात. पण त्यातही तरूणांची संख्या 60 टक्क्‌यांहून जास्त दिसते. हे अनुमान किमान अर्थाचं. प्रत्यक्षात तरूण जास्तच असावेत. हे तरूण झेंडे घेऊन रस्त्याला दुतर्फा उभे राहतात. राहुल गांधी गाडीतून उतरताच झपाझप चालू लागतात. त्यांच्या भोवती आधीच पोलिसांनी दोरखंडानं मोठ्ठं वर्तुळ केलेलं असतं. या वर्तुळात जाण्यासाठी विशेषत: स्थानिक काँग्रेस पुढाऱ्यांची धडपड स्पष्ट जाणवते. यातले अनेक पुढारी मॉर्निंग वॉक करत नसावेत. राहूल गांधींइतका चालण्याचा झपाटा तर त्यांच्यात अजिबातच नाही. त्यांची भलती दमछाक होते. एकतर काळ्या सफारी सूटमधील दणकट कमांडोंचा हात किंवा कोपरा गर्दीतील कुणा ना कुणाला बसतच असतो. पोलिसही झिडकारत असतात. अगदी राहुल गांधींनाही हे धक्के बसतात. मनात आलं, रेल्वे स्टेशनवर गर्दीत चालताना अनवधानाने लोकांचे धक्के बसतात. त्यावेळी समोरच्याची चुक नाही, गर्दीत असं व्हायचंच, हे माहित असूनही आपल्याला धक्का बसल्यावर किती चटकन राग येतो. या राहुल गांधी नामक आसामीला येत नसेल का राग? पण तसं दिसत नाही.

राहुल गांधी नावाचा इसम हसत, हातांनी गर्दीला अभिवादन करत चालत राहतो. त्याचा स्पर्श मिळावा, एक सेल्फी काढता यावी यासाठी सोबत चालणारांचा जीव अगदी उतावीळ दिसतो. माझ्यापुढे एक कुणी काँग्रेस पुढारी त्या वर्तुळात घुसला. सुटलेलं पोट घेऊन चालणं त्यांना आधीच मुश्कील झालेलं. बहुधा त्यांच्या मुलालाही वर्तुळात प्रवेश मिळावा याची काळजी त्यांना दिसत होती. त्यांचा मुलगा की कोण असलेला तरूण हातात झेंडा घेऊन मागेमागे चाललेला. पोलिस त्याला आत येऊ देईनात. मग कुणीतरी म्हणालं, ‘व्हीआयपी पास आहे माझ्याकडे.’ नि ती व्यक्ती आत घुसली. पाठोपाठ हे पोरगंही घुसलं. आता ते बापासोबत चालू लागलं. पण या बापलेकाला राहुल गांधीच्या चालण्याचा वेग पकडता येईना. मिळेल का यांना सेल्फी? या विचारात असतानाच राहुल गांधींची झलक पहायला अक्षरश: ताफ्यासह धावणारांची लगबग-धडपड दिसू लागली. मनात आलं -  नेत्यांना पाहून लोकांमध्ये उन्माद का येतो? हा उन्माद राजकारणातील लाचारीतून येतो की आशा-आकांक्षातून? महत्त्वाकांक्षेतून की निव्वळ मॉब सायकॉलॉजीतून?

रस्त्यावरील उड्डाणपुलावर थांबलेल्या गर्दीतून राहुलजी... राहुल गांधी... असं म्हणत किंचाळणारे अनेक दिसतात. आपल्या लहान लेकरांना खांद्यांवर घेऊन कित्येक उभे असतात. आपल्या लेकरांना पाहुन राहुल गांधी जवळ बोलवतील अशी आशा त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. पण गरीब वस्त्या लागल्या की तिथं थांबलेले लोक वेगळे जाणवतात. त्यातलं क्वचितच कुणी राहुल गांधींच्या जवळ जायला भेटेल अशा आशेनं आतुर दिसत नाही. अनेक वृद्ध गरीबासारखे हात जोडून उभे राहिलेले दिसतात. त्यांना कदाचित नेत्यांचं दर्शनच अप्राप्य वाटत असावं. अनेक मुलं-स्त्रिया पारोशा चेहऱ्यानं यात्रेची वाट पाहताना दिसतात. यांच्यातीलच कुणा एकाकडे पाहून राहुल गांधी त्यांना जवळ बोलावतात. अशावेळी त्यांचे उजळलेले चेहरे अधिक खुलतात. कुणा प्रसिद्ध व्यक्तीनं आपल्याला बोलावलं, हात मिळवला, ही जणू त्यांना लॉटरी वाटते. पण तशी आशा बाळगून यात्रेची वाट पाहणारे कमीच दिसतात.

यात्रेतील कुणी कार्यकर्ते वस्त्यांच्या जवळ थांबलेल्या गरीबांच्या घोळक्यांकडे जावून पत्रकं देतात. ‘जोडो जोडो- भारत जोडो... नफरत छोडो... भारत जोडो... महिलाओके बंधन तोडो’ या घोषणा सुरू झाल्या की गर्दीतील पारोशा चेहऱ्यांवर उत्साह येतो. छोटी छोटी मुलं आनंदानं घोषणा देवू लागतात. वाटतं, या घोषणा- हे सर्वसमावेशक देशप्रेम -खरंच का मनं जोडण्याचं-प्रेमाचं बीज ही यात्रा त्या लेकरांच्या मनात पेरत असेल?

विशेषत: जिल्हा-तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना राहुल गांधींसोबत फोटो मिळवणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं. अशी आस बाळगणारांसाठी खास फोटोग्राफर्स राहुल गांधींच्या ताफ्यासोबत दिसतात. राहुल गांधी कुणालातरी अचानक हाताने इशारा करून बोलावतात. ती व्यक्ती चटकन राहुल गांधीपाशी पोचते. शब्द-दोन शब्द संवाद घडतो. फोटोग्राफर फोटो घेतात. क्युआर कोड दिला जातो. तो कोड स्कॅन केला की संबंधितांना फोटो मिळतो. या फोटोसह ‘आज सोनेरी दिवस...भाग्याचा दिवस’ असं कॅप्शन देवून काँग्रेसचे कार्यकर्ते फेसबुकवर फोटो टाकतात. व्हाट्‌ॲपवर डिपी लावला जातो. पुढे या फोटोंची एनलार्ज कॉपी सतत या माणसाच्या कार्यालयात टांगली जाईल, फ्लेक्सवर दिसेल हे तिथल्या तिथे जाणवतं.

फोटो मिळवण्यासाठीची ही धडपड-अजिजी आतताई वाटली मला. पण क्षम्यही. रस्ताभर लोक आपापला मोबाईल उंचावून राहुल गांधींची छबी आपल्या पर्सनल हँडसेटमध्ये कैद करण्यासाठी आसुसलेले दिसतात. अशावेळी समोर आलेला नेता, आपले प्रश्न यांचा विसर लोकांना पडलेला दिसतो. सेल्फीतून लोक काय जपू पाहतात? आपण कुणी तरी आहोत, ही भावना सोशल मिडियावरून शेअर करण्यापलीकडे सेल्फीतून काय साधतं? ’डरो मत’, ‘निर्भय बना’ या संदेशाचं या सेल्फींच्या उठाठेवीत काय होतं? कुणास ठावूक, निर्भय बननं ही एक प्रक्रिया असेल...ही यात्रा त्या प्रवासाचं प्रतिकही ठरू शकेल. 

यात्रेच्या वाटेवर असेही अनेक लोक दिसतात, ज्यांना प्रश्न पटलावर आणायचेत. हायवेवर एकेठिकाणी आठ-दहा महिला दिसल्या. मळकी लुगडी नेसलेल्या. त्या स्त्रिया वाटेत बसून बिब्वा कुटत होत्या. जवळ जाऊन चौकशी केली. त्यांच्यासोबत त्या गावातील तरूण उभा होता. तो सांगत होता- ‘आम्ही सगळे एस्सीएनटी समाजातले.’ मी विचारलं, ‘म्हणजे?’ तो म्हणाला, ‘जयभीम व आदिवासी.’ ‘कोणते आदिवासी?’ असं विचारल्यावर तो म्हणाला, ‘आंध आदिवासी. आम्ही जंगलातून बिब्व्याच्या बिया जमवतो. त्या कुटून टरफलं काढतो. मग त्या बाजारात विकतो. या औषधी बिया आहेत. टरफलं काढताना तेल अंगावर उततं. पण रोजगारच नाही, त्यामुळं ह्या बिया विकून आमचे लोक थोडेफार पैसे मिळवू शकतात. या बायांसाठी उद्योग उभा करायचाय. त्यासाठी मला राहुलजींची भेट हवीय.’

पुढे रस्त्यात एक पन्नाशी पार शेतकरी दिसले. त्यांच्या जख्ख म्हाताऱ्या आईला सोबत घेऊन ते रस्त्याकडेला थांबलेले. हातात राज्यघटनेची प्रत. एक बॅनर. हे कुठल्यातरी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असावेत. जमीन अधिग्रहण कायद्याची अंमलबजावणी होत नाही, शेतकरी आत्महत्या करताहेत, पण सरकार दखल घेत नाही; याबाबतचं अभ्यासपूर्ण निवेदन त्यांनी लिहिलेलं. त्यांच्या अंगावर फक्त धोतर होतं. महात्मा फुले किंवा महात्मा गांधींचा प्रश्न मांडण्याचा मार्ग ते अवलंबत असावेत. राहुल गांधी विरोधी पक्षात. या मंडळींचे प्रश्न ते ऐकून घेतील. कदाचित काँग्रेस पक्षाच्या पुढील निवडणूक जाहीरनाम्यात निवडक प्रश्नांची दखल घेतलीही जाईल. पण ही माणसं निराश तर होणार नाहीत ना? असं मनात आलं.

सामाजिक चळवळीतीलही कार्यकर्ते या यात्रेच्या निमित्ताने वेगळ्या अर्थाने सक्रीय होताना जाणवले. भारत जोडो या घोषणेला व्यापक आयाम जोडण्याचा प्रयत्न अशा कार्यकर्त्यांकडून होताना दिसला. दलित चळवळीतील लेखक कार्यकर्ते केशव वाघमारे यांनी आनंद तेलतुंबडे यांचं ‘रिपब्लिक ऑफ कास्ट’ हे पुस्तक राहुल गांधींना यात्रेदरम्यान भेटून दिलं. जयराम रमेश यांच्या हातात ‘जाती तोडो-भारत जोडो’ ही घोषणा असलेला फलक दिला. सोशल मिडीयावर अशा फोटोंचं जाणं महत्त्वाचं वाटलं. भारत जोडो या घोषणेचे विविध कंगोरे ही यात्रा लोकमनावर उमटवेल-ठसवेल का?  

एकुणच भारत जोडो यात्रेचा माहौल आशावाद जागवणारा आहे. विशेषत: मरगळ आलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये  उत्साह संचारल्याचं दिसलं. आमदार-खासदार सर्वसामान्यांच्या कोंडाळ्यात दिसले. नेत्यांचं एक प्रकारचं अभेद्य वलय असतं. ते या यात्रेमुळं भेदल्याचं जाणवत होतं. नामदार नेते जिल्हा-तालुका-ग्रामपंचायत पातळीवरील कार्यकर्त्यांच्या गराड्यात दिसले. हे झालं काँग्रेस पक्षापुरतं.

व्हाट्‌सॲप वगैरेवरून सातत्याने द्वेष पसरवला जातोय. त्याला काऊंटर करणाऱ्याही अनेक प्रतिमा-मिम्स ही यात्रा पुरवत आहे, असंही प्रकर्षानं जाणवलं. जे काँग्रेसी नाहीत, पण समाजात बंधुभाव नांदावा, असे मानणारे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक समक्ष बसू-बोलू शकतात ही आशा यात्रेसोबत चालताना जाणवत राहिली.

(या रिपोर्ताजचा उत्तरार्ध पुढील अंकात)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी