डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दिवसातले नऊ ते बारा तास या महिला नाचतात. पायांत पाच किलोंचे चाळ बांधलेले असतात. अंगावर भरजरी मेकअप व काष्टा सावरत नाचणं खूप कष्टाचं असतं. पण चेहऱ्यावर वेदनेचा लवलेशही दाखवता येत नाही. या बायकांचे तळपाय पाहिले तर, ते लाकडासारखे कडक झालेले असतात. या बायांनाही लेकरं होतात, पण त्यांना बापाचं नाव नसतं. ही पोरं आपली आई नाचताना, प्रेक्षकांना रिझवताना तिथंच घुटमळत असतात. मग त्यांना सिगारेट आणायला पिटाळ, गुटखा आणायला पाठव- अशी कामं सांगितली जातात. या पोरांना अंगात घालायला धड कपडेही अनेकदा मिळत नाहीत. शिक्षणाचीही खूप आबाळ होते.’’ अशा ‘अनाथ’ मुलांसाठी अरुणभाऊंनी निवारा प्रकल्प सुरू केलाय. 

शन्नो काळे ही गरीब पारधी महिला. ती निघोज या गावात भीक मागायला गेली. त्याच दिवशी गावात चोरी झाली. गावकऱ्यांनी या बाईवर चोरीचा आळ घेतला. बाईला अटक झाली. पोलिसांनी गुन्हा कबूल करवून घेण्यासाठी बाईला जबर मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला... लिंपणगाव या गावात भटक्या-विमुक्त समाजाची ५९ घरं होती. या कुटुंबांनी भटकी जिंदगी सोडून गायरानावर अतिक्रमण केलं. ते शेती करू लागले. याचा राग मनात धरून गावकऱ्यांनी सगळी वस्तीच जाळून टाकली... अळकुटी या गावात तीन पारधी तरुणांना जमावाने संशयित चोर म्हणून पकडलं. शिक्षा म्हणून जमावाने या मुलांच्या पायात खिळे ठोकले. या क्रूर मारहाणीत तिघाही तरुणांचा मृत्यू झाला... तांदळी दुमाला या खेड्यात दलित जातीतील एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला... कोल्हाटी समाजातील किरण लता जाधव हा तरुण वैद्यकीय शिक्षण घेत होता. त्याला बिनबापाचा म्हणून इतकं डिवचलं गेलं की, त्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केली... या सर्व घटनांमधील जातीय मानसिकतेच्या गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे किंवा प्रकरण न्यायालयात आहे नि पीडितांना न्याय मिळेल, अशीच दाट शक्यता आहे.

सन २००५ ते २०१६ दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या अशा अनेक जातीय अत्याचारांना ‘लोक अधिकार आंदोलन’ व ‘जातीय अत्याचारविरोधी कृती समिती’ या संघटनांनी वाचा फोडली आहे. अगदी अलीकडील खर्डा व सोनई हत्याकांडांचा पाठपुरावा करण्यातही याच संघटना आघाडीवर होत्या. कोपर्डीमधील मराठा समाजातील मुलीवरील अत्याचार नि खुनातील आरोपींना पकडून देण्यातही लोक अधिकार आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

‘पण अहमदनगर जिल्ह्यातच जातीय अत्याचाराच्या घटनांचं एवढं पेव का फुटलंय?’ या प्रश्नावर लोक अधिकार आंदोलनाचे संस्थापक-अध्यक्ष ॲड.अरुण जाधव म्हणतात, ‘‘जातीय अन्याय-अत्याचार आपल्या समाजात रोजच सर्वत्र घडतात. मंदिरप्रवेशाला बंदी, वेगवेगळे पाणवठे, जातिवाचक शिव्या अशा प्रथा देशभर आहेत. एक तर हा अन्याय अंगवळणी पडल्याने अत्याचारांना वाचा फुटत नाही. दुसरे म्हणजे, अशा घटनांमध्ये पीडितांना न्याय मिळेल यासाठी पाठपुरावा करणारा दबावगटही समाजात नाही. अहमदनगर जिल्ह्यात आम्ही असा दबावगट निर्माण केलाय. अत्याचाराची कुणकुण लागली रे लागली की, आमचे कार्यकर्ते त्या गावात पोचतात. मीडिया, पोलीस, न्यायालय प्रत्येक ठिकाणी आम्ही पाठपुरावा करतो. त्यामुळेच अहमदनगर जिल्ह्यात जातीय अत्याचाराच्या घटना जास्त प्रमाणात उघड होत आहेत...’’

अरुण जाधव हे काही अभ्यासक-विचारवंत नाहीत. चळवळीत घडलेला हा एक रांगडा कार्यकर्ता. जातिव्यवस्थेने जन्मजात दिलेल्या ओंगळ अवकाशात या माणसाने सन्मानाने जगायचा आपला एक मार्ग शोधला. आपल्या ओबड-धोबड जगण्याचा विस्तार करत अरुणभाऊंनी गेल्या दहा वर्षांत अहमदनगरमध्ये एका व्हायब्रंट संघटनेचं बीज रोवलंय. त्यांचं वरील मत काहीसं अतिशयोक्त वाटेलही. पण जामखेडमध्ये त्यांच्या कार्यालयाला भेट दिली, अन्याय-अत्याचाराच्या केसेसचं तेथील व्यवस्थित डॉक्युमेंटेशन पाहिलं, त्यांनी तयार केलेल्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांची तयारी अनुभवली की त्यांच्या मतातील तथ्यांश पटतो.

कोल्हाट्यांच्या तमाशासोबत बालपणी वणवण फिरलेलं हे लेकरू. ओठांवर मिसरूड फुटायच्या वयात त्याला फुले-शाहू-आंबेडकरांची ओळख झाली. मग सुरू झाली त्याच्या आत्मशोधाची तगमग. त्यातून हा तरुण शिकला. वकील झाला. पण शिक्षणानं दिलं नाही एवढं शहाणपण त्याला वेदनेतून-अवहेलनेतून मिळालं. ‘पावला-पावलावर झालेले अपमान हीच माझी परिवर्तनाची प्रेरणा’, असं अरुणभाऊंचं मत आहे.

‘‘आम्ही चार भावंडं. दोन भाऊ, दोन बहिणी. आम्हा चौघांचे बाप मात्र वेगवेगळे. माझ्या आईला लोक नायकीण म्हणत. त्यामुळे लहाणपणी मला खूप अपमानित वाटायचं. पण समज आली तसं जाणवलं- समाजाने आमच्या नशिबी जे जगणं दिलं, त्याची कुणालाही लाज-शरम वाटत नाही; मग मी का तोंड लपवू? मला बारबाप्या ही शिवी देता... मग मीही दाखवतो तुम्हाला आंबेडकरी विचाराची औलाद काय असते ते... मी दहावी-बारावीत शिकत असतानाच ठरवलं, या ढोंगी समाजाचा जातीयवादी बुरखा फाडणं, हेच माझं काम...’’ अरुणभाऊ स्वत:बद्दल सांगतात. ‘‘मी अगदी लहान होतो. माझा मामा, मामी, मामाच्या मुली, माझी आई असे सगळे जण आम्ही बैलगाडीतून गावोगाव भटकायचो. सामानाची गठुडी लादलेली गाढवं, कुत्री, कोंबड्या असं सगळं लाटांबर असायचं. कुठल्या तरी गावाच्या हागणदारीत आमची पालं पडायची. गावातल्या पाटलाकडं हजेरीला जावं लागायचं. पाटलाची मर्जी सांभाळली, तर त्या गावात दोन-चार दिवस निभाव लागायचा. मर्जी सांभाळायची म्हणजे बारीतल्या बायांनी पाटलाशी शैय्यासोबत करायची. नकार द्यायची हिंमत व रीतही नव्हती. आमच्या प्रत्येक गरजेचं मोल बाईच्या इज्जतीत केलं जायचं- अगदी साधी गरज का असेना... आमच्या जनावरांसाठी वैरण कशी मिळणार? वैरणीसाठी कुणाच्या बांधाला गेलो नि कुणी पाहिलं तर ‘चोर-चोर’ म्हणून बोंब उठायची. हे टाळण्यासाठी शेतकऱ्याला वैरणीसाठी विनंती केली, तर तो चक्क बाईची मागणी करायचा... आमचे पुरुष लाकडी वस्तू बनवून त्या विकायचा व्यवसाय करायचे. पण त्यातून फारशी मिळकत होत नसे. पोटाची भूक भागवायला मग शिकार केली जायची. ही शिकार असायची गावाच्या हागणदारीत फिरणाऱ्या डुकरांची! डुकरं गावभर चीत्कारत पळायची नि आमचे लोक त्यांचा पाठलाग करायचे. दिवसा आमच्या पुरुषांचा हा तमाशा, तर रात्री बारीचा खेळ बाया रंगवायच्या... दिवसा उजेडीदेखील आम्ही गाण्या- नाचण्याचे खेळ करून दाखवायचो. कोलांटउड्या मारायच्या, तारेवर चालायचं, छातीवर दगड फोडायचा- अशी आमची जिंदगी. असं जगणाऱ्यांना परिवर्तनाची आशा ती काय असणार? पण माझा मामा हुशार इसम होता. त्याची तहसीलदार, पोलीस, शिक्षक यांच्यासारख्यांत ऊठ-बस होती. मामाला वाटलं, ‘हे पोरगं सरकारी अंमलदार झालं तर सगळ्यांचं नशीब पालटेल.’ म्हणून मामाने शाळेत माझं नाव नोंदवलं- अरुण हिराबाई जाधव...!’’

शाळेत नाव नोंदवलं ते एका पीराच्या दर्ग्यासाठी प्रसिद्ध असलेलं गाव होतं. गावात मुस्लिमांची घरं जास्त. कोल्हाटी डुकराचं मांस खातात, हे जगजाहीर. मुस्लिमांना डुक्कर वर्ज्य. त्यामुळं शाळेतल्या मुस्लिम सहविद्यार्थ्यांनी या पोराला अस्पृश्य ठरवलं. शाळेचा पहिलाच लवलेश हा असा अपमानित करणारा. त्यात रोज हजेरीच्या वेळी गुरुजींनी याचं नाव उच्चारलं की, वर्गात खसखस पिकायची. बापाच्या नावाऐवजी आईचं नाव लावणारा हा एकच विद्यार्थी. कुणाला या नावाचं कुतूहल, तर कुणाला त्यामागील ‘गुपित’ माहीत असल्याची गंमत! दहावीपर्यंत या मुलाने दोन-तीन शाळा बदलल्या, पण सगळीकडे थोड्याबहुत फरकाने अनुभव सारखाच- अपमानजनक!

‘बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर’ ही म्हण अथवा वाक्प्रचार आपण अनेकदा वापरतो. तसं हे वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य. पण या वक्रोक्तीमधील दाहकता  काय असते, ती अरुणभाऊंनी शाळकरी वयातच अनुभवली. लग्नाच्या वरातीत कोल्हाटी स्त्रियांचा नाच हे त्या काळातलं एक सर्वसाधारण चित्र होतं. वरातीत नाचणाऱ्या या बायांना पुरुषमंडळी पैसे सोडत. अशाच एका वरातीत आपली आई नाचत आहे नि शाळेतले गुरुजी तिला पैसे देताहेत, हे चित्र या मुलाच्या स्मृतिपटलावर कायमचं उमटलंय. कळस म्हणजे, हा प्रसंग घडला तेव्हा अरुणभाऊ अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी गुरुजींकडे पाहात होता नि गुरुजी त्याला सांगत होते- ‘ए पोरा, तुझ्या आईला मी पैशे सोडले ते शाळेत कुणाला सांगू नकोस!’ नंतरच्या काळात या गुरुजींनी अरुणला धारेवरच धरायला सुरुवात केली. वर्गात ते ‘तुला बापाचं नाव का नाही?’ असं सर्वांदेखत मुद्दाम विचारायचे. एकदा तर अरुणने बापाच्या मृत्यूचा दाखला आणावा, असाही हट्ट या शिक्षकांनी धरला. कोल्हाटी समाजातील महिलांमध्ये एक अलिखित संकेत आहे. बाई कधीच तिच्या संततीच्या बापाचं नाव उघड करत नाही. अरुणभाऊ म्हणतात, ‘‘कोल्हाटी स्त्रीने वारसाचा दावा केला, इस्टेटीत हिस्सा मागितला- अशी एकही केस आढळत नाही. ती मरेल, पण आपल्या मालकावर आच येऊ द्यायची नाही. या बायांची ही अजब नैतिकता आहे!’’

पण अडाणी कोल्हाटी बाईच्या नैतिकतेची जाण गुरुजींना कुठं होती? ते आपले नेहमी अरुणला बापाच्या नावावरून हटकत. अशा प्रसंगी सगळा वर्ग कुचूकुचू हसायचा. या पोराचा चिमुरडा जीव अगदी नकोसा होत असे. कानशिलं तापत. हाता-पायांना घाम सुटे. पोटात मणामणाचा गोळा फिरू लागे. पण गुरुजींना त्याचं काही वाटत नव्हतं. त्यांच्यासाठी वर्गाला हसवण्याचा तो एक विरंगुळाभर होता. वर्गातली सर्व मुलंही अरुणसोबत बोलत नसत. कारण ‘आमच्या वर्गात एका पोराला बापाचं नाव नाही’, ही गोष्ट त्यांनी घरी सांगितल्यावर अशा मुलासोबत संबंध न ठेवण्याच्या सूचना त्यांना घरून मिळत असत. अशा वातावरणात शिकूनही या मुलाने दहावीला ५७% गुण मिळवले.

अकरावीला प्रवेश घेताना मात्र अरुणभाऊंनी आपलं नाव बदलायचं ठरवलं. त्या प्रसंगाबद्दल ते म्हणतात, ‘‘त्या वेळी मी पहिल्यांदा चोरी केली. मी एक नाव चोरलं. शाळेत होणारी कुचंबणा मी एका माणसाला बोलून दाखवली. जयसिंग मैसाडे नावाचा तो माणूस भामटा जातीचा होता. तो तहसील कचेरीत नोकरीला होता. तोही भटक्या समाजातलाच असल्यामुळे मी माझी अडचण त्याला सांगितली. त्याने मार्ग सुचवला. तो म्हणाला, ‘गॅझेटियर प्रसिद्ध करून नाव बदल.’ पण वडील म्हणून नाव लावणार  तरी कोणाचं? त्या काळात माझ्या मामाच्या मुलीचा एक मालक होता. हौसराव त्याचं नाव. मी हौसरावचं नाव घेतलं. ॲफिडेव्हिट करून मी ‘अरुण हौसराव जाधव’ झालो. त्या वेळी मी एका जाचातून सुटलो, असं मला वाटलं. मी आनंदात होतो. पण मी कुणाचं तरी नाव चोरलं, ही अपराधीपणाची भावना माझ्या मनातून कधीच गेली नाही...’’

 दरम्यानच्या काळात शाळेनिमित्त अरुणभाऊने वसतिगृहात राहायला सुरुवात केली होती. कुटुंबाची भटकंतीदेखील आता थांबली होती. यांचं मूळ गाव पाटोदा तालुक्यातलं मुगाव. या कुटुंबाने ते गाव कायमचं सोडलं नि ते जामखेडमध्ये आले. येथे कोल्हाटी समाजाच्या स्थित्यंतराची नोंद करायला हरकत नाही. अरुणभाऊंच्या जीवनातलं स्थिंत्यतरही या घडामोडीचं साक्षीदार आहे. जामखेडमध्ये स्थायिक होण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबाची बीड, अहमदनगर, उस्मानाबाद अशी भटकंती चालायची. सहकार चळवळीच्या उत्कर्षानंतरच्या काळात जामखेड हे कोल्हाटी समाजाचं एक केंद्र म्हणून विकसित झालं, असं म्हणता येईल.

महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, अहमदनगर, बीड, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये कोल्हाटी समाज प्रामुख्याने आढळतो. पेशवा व निजामाच्या राजवटीत तमाशा आणि खासगी बैठकीच्या नृत्यकलेला आसरा मिळाला असावा. कोल्हाटी समाजातील महिला तमाशात कला सादर करत त्याप्रमाणेच खासगी बैठकांमध्येही नाचत. तमाशाकलेला ओहोटी लागल्यानंतर मुख्यत: मराठवाड्यात लग्नाच्या वरातींमध्ये कोल्हाटी महिलांच्या नृत्याची मागणी वाढली असावी. बँडपथके, बँजो पार्टी नि अलीकडे डीज्जेचं चलन सुरू झाल्यावर कोल्हाटी महिलांचा वरातीतील नाच जवळपास लोप पावला. पण दिवाणखान्यातील संगीतबारी मात्र सुरू राहिली. जामखेडमध्ये असे अनेक दिवाणखाने होते. या दिवाणखान्यांमध्ये महिला पायांत घुंगरू बांधून नाचत. अदाकारी पेश करत. सिनेमातल्याप्रमाणे या कलेचे शौकीन मनगटाला गजरा गुंडाळून नृत्याचा आस्वाद घेत. हा शौक मातब्बर लोकांमध्ये प्रिय होता, आहे.

कोल्हाटी समाजात स्त्रियाच कुटुंबाच्या कर्त्या-धर्त्या असतात. देखणी स्त्री हीच या समाजाची संपत्ती. या समाजात आजही चिरा उतरवणे ही प्रथा रूढ आहे. चिरा उतरवण्यासाठी वयात आलेल्या मुलीची बोली लावली जाते. जो पुरुष जादा रक्कम द्यायला तयार होईल, त्याच्यासोबत मुलीच्या कौमार्यभंगाचा सौदा होतो. पूर्वी ही रक्कम शेकड्यात होती, आता ती एका रात्रीला काही लाखांमध्ये असते. चिरा उतरवणारा पुरुष अनेकदा ‘मालक’ही होतो. या मालकाने त्या बाईची सर्व जबाबदारी घ्यायची. तिची हौसमौज पुरवायची. अर्थात, गडगंज ऐपत असलेले लोकच हा शौक करू शकतात. काही मातब्बर पुरुष अशा बाईला घरही बांधून देतात. जमीनजुमलाही नावावर केला जातो. पण मुख्य कुटुंब या बाईचा कधी काटा काढेल याचा नेम नसतो. बऱ्याचदा ‘मालका’च्या मृत्यूनंतर या बाईचं आयुष्य उघड्यावर पडतं. संगीतबारीत त्या मानाने भरवशाचं उत्पन्न मिळतं.

त्यामुळं या स्त्रिया संगीतबारीवर नाचायला अधिक प्राधान्य देतात. संगीतबारीवर सिनेमाची गाणी अथवा लावण्या सादर होतात. श्रोत्यांच्या फर्माईशींवर हे कार्यक्रम रंगतात. एकाची फर्माईश मोडून दुसरं गाणं सुरू करण्यासाठी प्रेक्षकांमध्ये चढाओढ लागते. गाणं मोडण्यासाठी नोटा सोडल्या जातात. या नोटा बाईने ओठांत घ्याव्यात- डोळे मिचकावून, ओझरता स्पर्श देऊन घ्याव्यात- नोटा घेताना छातीची झलक दाखवावी, अशीही अपेक्षा असते. तर अशा संगीतबारीसाठी पुण्याजवळील चौफुला, जामखेडची कलाकेंद्रंही प्रसिद्ध आहेत. पूर्वीच्या दिवाणखान्यांना कायदेशीर मान्यता नव्हती, आता कलाकेंद्रांना शासकीय मान्यता आहे. जामखेड तालुका कलाकेंद्रांसाठीच प्रसिद्ध आहे. येथील नागपंचमीची यात्रा पंधरा दिवस चालते. या यात्रेदरम्यान कलावंतीणींचा नाच हे मुख्य आकर्षण असते.

जामखेड हा व्यापारउदिमाच्या दृष्टीने एक मोक्याचा तालुका, असं म्हणतात. मराठवाड्यातील साखर कारखान्यांचे आर्थिक व्यवहार जामखेडमधून होतात. ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांचे सौदे इथंच होतात. तीन जिल्ह्यांची हद्द या तालुक्याला स्पर्शून जाते. त्यामुळे या तालुक्याला व्यावसायिक महत्त्व आलं. कदाचित यामुळेच कोल्हाटी समाजाच्या कलेलाही येथे आश्रय मिळाला. जामखेडमध्ये कोल्हाटी गल्ली, कान्होपात्रा नगर, कुंभार तळे, रसाळ नगर या परिसरात कोल्हाटी समाज एकवटला आहे. अरुणभाऊंची आई व बहिणी, मामा, मामी व त्यांच्या मुली यांनीही गाव सोडलं नि ते जामखेडमध्ये स्थायिक झाले. तोपर्यंत अरुणभाऊने अकरावीत प्रवेश घेतला होता. वसतिगृहात राहिल्यामुळे कोल्हाटी वस्तीतील वातावरणापासून अरुणभाऊ अलिप्त होता. आपण शिक्षण घेऊन पोलीस इन्सपेक्टर व्हावं, अशी स्वप्नं तो पाहायचा.  आई व मामाही या पोराची काळजी घेत होते. ‘पोराने शिकावं’ असं त्यांनाही मनापासून वाटत होतं. एकूण बरं चाललं होतं. पण एके दिवशी अचानक अरुणभाऊचं सगळं भावविश्वच कोलमडून पडलं.

त्या घटनेबद्दल अरुणभाऊ सांगतात, ‘‘मी नुकतीच मोटरसायकल चालवायला शिकलो होतो. कुणाची गाडी चालवायला मिळाली की, मी खूश व्हायचो. अशीच त्या दिवशी माझ्या हातात गाडी आली नि मी फेरी मारायला निघालो. गोरोबा टॉकीजजवळ अचानक माझा तोल सुटला. गाडी एका बाईला धडकली. त्या बाईच्या कडेवर लहान लेकरू होतं. ते लेकरूही रस्त्यात पडलं. लोक जमले. मी घाबरून तिथून पळून आलो. पोलीसकेस झाली. पोलीस मला शोधत दारावर आले. माझ्या आईची व मामाची पाचावर धारण बसली. पोलीसकेस झाली तर माझी जिंदगी बरबाद होईल, याची त्यांना काळजी वाटत होती. त्यामुळे ते फौजदारापुढे गयावया करू लागले. ‘तुमचंच लेकरू हाय, एक डाव माफ करा!’ म्हणू लागले. तो पोलीस हलकट होता. त्याची नजर माझ्या बहिणीवर गेली. तो सरळ म्हणाला, ‘मी केस दाबतो; या मुलीला माझ्याकडे पाठवा!’ हे सांगून तो निघून गेला. घरात मात्र त्याच्या मागणीबद्दल चर्चा सुरू झाली. ती ऐकून मला भयंकर चीड आली. पोलीसकेस काढण्यासाठी आलेला तो किळसवाणा प्रस्ताव, त्यावरची चर्चा... मला सगळं असह्य झालं. मी म्हणालो, ‘असलं काही कराल तर मी आत्महत्या करीन. मी मेलो तरी चालेल, पण हे सर्व थांबवा.’ माझी रडारड, संताप सारं पाहून मामाने मला समजावलं. शांत केलं. नंतर मामाने पोलिसाला पैसे परस्पर चारून ते प्रकरण मिटवलं. पण झाल्या प्रकारामुळे मी हबकलो होतो. पोलीस या पेशाबद्दलच मला तिटकारा वाटायला लागला. इन्स्पेक्टर व्हायचं माझं स्वप्न पूर्णपणे विरून गेलं, उलट पोलिसांचा बदला घ्यावा असं वाटायला लागलं. माझ्या कुटुंबाचाही मला राग यायला लागला...’’

या काळात अरुणभाऊंना प्रश्न पडू लागले. पोलीस पारधी वस्तीवर धाड टाकतात. पारधी दारू गाळायचा व्यवसाय करतात, म्हणून त्यांना अटक होते. मग दुसरीकडे देशी दारूची दुकानं कायदेशीर कशी काय ठरतात? पोलिसांचा कायदा भारी की जातपंचायतींचा? अशा प्रश्नांनी या मुलाला हैराण केलं होतं. मनाच्या अशा सैरभैर अवस्थेत अरुणभाऊंना सुनील जावळे व अरविंद पाटील हे मित्र मिळाले. हे तरुण अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत सक्रिय होते. अरुणभाऊ म्हणतात, ‘‘या मित्रांकडे मन मोकळं केल्यावर मला बरं वाटलं. माझ्या दु:खाला कारणीभूत तो पोलीस अथवा माझं कुटुंब नाही; जातव्यवस्था हेच खरं दु:ख आहे, हे सत्य मला कळलं... याच काळात भूतवाडा या गावात एक घटना घडली. या गावात पोळ्याच्या दिवशी बंटी सदाफुले या दलित तरुणाने मंदिरप्रवेशाचं आंदोलन केलं. या घटनेमुळे गावकरी खवळले. बंटीच्या कुटुंबावर गावाने बहिष्कार टाकला. त्या घटनेचा निषेध म्हणून वाल्मिक निकाळजे यांनी मोर्चा काढला होता. मला ही माहिती कळताच मीही मोर्चात जायचं ठरवलं. वाल्मिक निकाळजे त्या काळात मानवी हक्क अभियान या संघटनेचं काम करीत होते. ही संघटना जातीय अत्याचारांच्या विरोधात लढत होती. आमच्याकडे पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या मागणीबद्दल वाल्मिकभाऊंना सांगितले. वाल्मिकभाऊ म्हणाले, ‘हा जातीय अत्याचाराचाच प्रकार आहे. इतर जातीतल्या माणसाकडे अशी मागणी फौजदाराने केली असती का? त्याच्या मागणीत त्याची जातीय मानसिकता दिसते. तुझी तयारी असेल, तर आपण त्या फौजदाराच्या विरोधात तक्रार करू या...’ वाल्मिकभाऊंकडून मिळालेला हा दिलासा मला दहा हत्तींचं बळ देऊन गेला...’’

आता गुपचूप तक्रार करण्यापेक्षा मोर्चा काढला तर?, असा विचार या चळवळ्या मित्रांमध्ये सुरू झाला. पण कोल्हाटी जातीतलं कुणीही या मोर्चात येणार नाही याचीही जाणीव यांना होती. तरीही गुलामांना गुलामीची जाणीव करून देण्यासाठी मोर्चा काढायचं ठरलं. कोल्हाटी समाजाचा प्रश्न घेऊन निघालेला हा बहुधा पहिलाच मोर्चा असावा. या मोर्चात फक्त पाच लोक सहभागी झाले होते. कोल्हाटी जातीतले अरुणभाऊ स्वत:, वडार जातीतला महादेव पांढरे आणि नवबौद्धांपैकी वाल्मिकभाऊ, बंटी सदाफुले व सुनील जावळे हे तिघे तरुण. विशेष म्हणजे, हा मोर्चा भलताच परिणामकारक ठरला. वर्तमानपत्रात मोर्चाच्या बातम्या झळकल्या. परिणामी, त्या फौजदाराची बदली झाली.

या घडामोडींमध्ये रमलेले अरुणभाऊ कधी कार्यकर्ता झाले, ते त्यांचं त्यांनाही समजलं नाही. अगदी स्वाभाविकपणे ते ‘जय भीम!’ हे अभिवादन म्हणू लागले. घरात खंडोबा, मोहाटादेवी, येडाई यांचं प्रस्थ होतं. या देवांसाठी आई, बहिणी उपासतापास करायच्या. त्यांना अरुणभाऊ विरोध करू लागले. अंगात देव येणाऱ्यांची टर  उडवू लागले. हे पोरगं बिथरलंय की काय, अशी शंका जातबांधवांना येऊ लागली. ते लोक विचाराचचे, ‘जय भीम म्हणायला तू काय मांगा-म्हाराचा हाईस व्हय रे?’ जाती- धर्माचा जबरदस्त पगडा असणाऱ्यांच्या अशा प्रश्नांवर उत्तर काय देणार? हा तरुण अधिकच चिडायचा. मग वादावादी रोजच होऊ लागली. दुसरीकडे मानवी हक्क अभियानाची कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरं सुरू झाली. ठाणे जिल्ह्यात विवेक पंडित, एकनाथ आवाड यांच्या मार्गदर्शनात ही शिबिरं व्हायची. या शिबिरांमध्ये बाँबे पोलीस ॲक्ट, सीआरपीसी, नागरी संरक्षण कायदा, रोजगार हमी कायदा यांचं प्रशिक्षण दिलं जायचं. त्यातून न्याय-अन्यायाची माहिती मिळू लागली. दरम्यान, अरुणभाऊंनी कॉलेजात प्रवेश घेतला होता. पढाई नि लढाई दोन्ही जोमात सुरू झालं होतं.

कार्यकर्ता प्रशिक्षणात मिळवलेलं ज्ञान अरुणभाऊंना प्रत्यक्ष अमलात आणायची खुमखुमी वाटू लागली. या खुमखुमीतून त्यांनी पहिल्यांदाच एक संघर्ष अंगावर घेतला. भुताडा या गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना काम करूनही पैसे मिळाले नव्हते. अरुणभाऊ व मित्रमंडळींनी हा प्रश्न हातात घेतला. मोर्चा-धरणे आंदोलन सुरू झालं. स्थानिक कंत्राटदारांच्या विरोधात पहिल्यांदाच कुणी तरी अशा तक्रारी केल्या होत्या. कंत्राटदार चिडले. घरी येऊन धमक्या देऊ लागले. अरुणभाऊंची आई व मामा आता जास्तच घाबरले. ‘वतनदारांपुढे बोलणं हे काही आपलं काम नाही. ताबडतोब हे प्रकार थांबव’- असा दबाव घरातून येऊ लागला. ‘चळवळ किंवा घर दोन्हींपैकी एकाची निवड कर’ अशी तंबी मिळाली. अरुणभाऊने चळवळीची निवड केली. घर सोडलं. या काळात सुभाष निंबाळकर या मराठा जातीच्या तरुणाने अरुणभाऊला आसरा दिला. बापू ओव्हळ व राजेश वाव्हळ या बौद्ध मित्रांनी दोन वेळच्या जेवणाची सोय केली.

या कालखंडात भटके-विमुक्त संघटनाही जोशात होती. लक्ष्मण माने, मोतीराम राठोड, बाळकृष्ण रेणके व लक्ष्मण गायकवाड हे सर्व धडाडीचे कार्यकर्ते एकाच संघटनेत सक्रिय होते. जामखेडमध्ये डवरी गोसावी समाजाची मोठी वस्ती आहे. त्या वस्तीवर या संघटनेची बैठक झाली. या बैठकीच्या निमित्ताने अरुणभाऊ भटके-विमुक्तांच्या चळवळीत सामील झाले. या संघटनेमार्फत कोल्हाटी समाजातला पहिला संघर्ष मंदा चंदन या महिलेच्या नेतृत्वात झाला. स्वजातीय विरोधातल्या या संघर्षात अरुणभाऊंनीही पुढाकार घेतला. हिरामण जाधव नावाच्या कोल्हाटी पुरुषाने एका पारधी मुलीबरोबर लग्न केलं होतं. हा मनुष्य वारला. त्याने जातीबाहेर लग्न केलं म्हणून जातपंचायतीने त्याला बहिष्कृत केलं होतं. त्याच्या प्रेताला जातबांधवांपैकी कुणीही हात लावायला तयार नव्हतं. जातपंचायतीच्या या दादागिरीला मंदा चंदन यांनी आव्हान दिलं. अरुणभाऊंनी मंदा चंदन यांच्यासह हिरामण जाधवचे अंत्यविधी पार पाडले. ही साधी घटना नव्हती. पंचवीस वर्षांपूर्वी तर हे वेगळंच होतं. जातपंचायतींचे अन्याय हा विषय त्या काळात भटके-विमुक्त चळवळीच्या अजेंड्यावरही नव्हता.

भटके-विमुक्त चळवळीत आंबेडकरी विचाराने अरुणभाऊ सक्रिय झाले. राजेंद्र काळे या पारधी समाजातील कार्यकर्त्याशी त्यांची घट्ट मैत्री झाली. पारधी समाज अहमदनगर जिल्ह्यात लक्षणीय संख्येने आहे. त्यामुळे पारधी समाजाला संघटित करण्याचे प्रयत्न या मित्रांनी सुरू केले. या काळात एका पारधी महिलेच्या खुनाची घटना घडली. ढोकराई या गावातील सवर्ण जातीतील माणसाने हा खून केला होता, पण पोलीस गुन्हा नोंदवायला टाळाटाळ करत होते. अरुणभाऊंना घटनेची माहिती मिळताच ते पोलीस चौकीवर गेले. पोलिसांना प्रश्न विचारू लागले. पोलिसांना कुणा सामान्य तरुणाने प्रश्न विचारलेले कसे खपणार? फौजदाराने विचारलं, ‘कोण आहेस रे तू? लय पुढचं बोलायला लागलास? गुन्हा कसा नोंदवायचा, ते आम्हाला शिकवतोस व्हय?’ असे प्रश्न सुरू झाल्यावर वादाला तोंड फुटलं. बाचाबाचीत पोलिसाने अरुणभाऊंना शिवी दिली. मग यांचाही तोल सुटला. भांडण विकोपाला गेलं. पोलिसांनी अरुणभाऊंना ३५३ कलमांतर्गत शासकीय कामात ढवळाढवळ या गुन्ह्यात अटक केली. हा अरुणभाऊंचा पहिला तुरुंगवास. वाल्मिकभाऊंना या अटकेची खबर मिळाल्यावर मोर्चा निघाला. पारधी बांधवांनीच अरुणभाऊंना जामीन दिला व सोडवलं. अशा अनेक प्रसंगांत पारधी समाजबांधव अरुणभाऊंच्या पाठीशी उभे राहिले.

त्या काळात मानवी हक्क अभियानाने गायरान अतिक्रमण चळवळ सुरू केली होती. दलित चळवळीत दादासाहेब गायकवाडांनतर भूमिहीनांच्या प्रश्नावर फारसे काम झालेले नाही. अपवाद फक्त १९९१मध्ये प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाचा आणि त्यानंतर एकनाथ आवाड यांनी उभारलेल्या जमीन अधिकार आंदोलनाचा. या आंदोलनाचा भाग म्हणून अरुणभाऊंसारख्या कार्यकर्त्यांनी  भटक्या-भूमिहीन लोकांना गायरानांवर अतिक्रमण करायला प्रवृत्त केलं. गावकरी हे अतिक्रमण खपवून घेत नाहीत. हा संघर्ष केवळ मोर्चे नि सभांचा नसतो, तर प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन दोन हात करण्याचे प्रसंग वारंवार येतात. असे संघर्ष करून अरुणभाऊंनी जवळपास २५० कुटुंबांना गायरान कसायचं बळ दिलं आहे. यातला एक संघर्ष उदाहरणादाखल नोंदवता येईल. श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ या गावालगत पारधी समाजाची एक वस्ती आहे. या वस्तीतल्या लोकांना उदरनिर्वाहासाठी भीक मागणे किंवा चोऱ्या करणे हेच पर्याय होते. गावाला भरपूर गायरान होतं. शिवाय जवळूनच पाटाचं पाणी वाहत होतं. या वस्तीला अरुणभाऊंनी गायरान कसायला प्रवृत्त केलं. गाव अर्थातच खवळला. पण गायरान अतिक्रमणाच्या कारणाने वाद झाला व त्याची नोंद पोलिसात झाली तर तो एक गायरान अतिक्रमणाचा पुरावा ठरतो. भविष्यात ती जमीन नावे होण्याला हा पुरावा कारणीभूत ठरू शकतो. ही पट्टी अरुणभाऊंनी पारधी वस्तीला शिकवली होती. त्यामुळे एरवी खालमानेने जगणारी वस्ती एकदम ‘अरेला का रे’ करू लागली. गावातल्या तालेवार पुढाऱ्याने हे ओळखलं. एकदा अरुणभाऊला गावात पाहताच त्याने दमदाटी करून यांना गाडीत कोंबलं. पारध्यांना गावाच्या विरोधात भडकावतो म्हणून तक्रार दाखल केली गेली. या प्रसंगातही पारधी बांधवांनीच अरुणभाऊंसाठी जामीन दिला.

अरुणभाऊंमधील कार्यकर्त्याचा कस लागला बबन मिसाळ हत्याकांडाच्या पाठपुराव्यात. ही केस जातीय अत्याचाराचा एक वैशिष्ट्यपूर्ण नमुना आहे. जातीय अत्याचार ही केवळ खैरलांजीसारखी एखादी घटना नसते, तर सातत्याच्या अन्यायानं गाठलेलं ते एक टोक असतं. याचं प्रतिबिंब बबन मिसाळ हत्याकांडातही दिसतं. जामखेडमधील सोनेगावमधील २००८ मधील ही हकिगत.

मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून गायरान अतिक्रमण चळवळीची माहिती बबनला समजली. बबनचं शिक्षण केवळ सातवीपर्यंत झालं होतं. त्याचे वडील कुप्रसिद्ध चोर होते. उदरनिर्वाहाचं साधनच नसल्याने हा मुलगाही गुन्हेगारच झाला असता. पण चळवळीच्या निमित्ताने त्याला सन्मानाने जगण्याचा मार्ग गवसला. बबनने आपल्या गावातील मातंग कुटुंबांना गायरान अतिक्रमण करायला प्रवृत्त केलं. या घटनेमुळे अर्थातच गाव खवळला. ‘गावाच्या भाकर-तुकड्यावर जगणारे मांग शेतकरी होणार!’ ही कल्पना गावकऱ्यांना झेपली नाही. त्यांनी मातंग वस्तीवर हल्ला केला. वस्तीतल्या बाया-बापड्यांची डोकी फोडली. घरं पाडली. बबननेही या हल्ल्याविरोधात प्रतिहल्ला केला. क्रॉस कंप्लेट झाली. बबनला अटक झाली. या कालावधीत गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते. काही निमित्ताने गृहमंत्री जामखेडहून जाणार होते. सोनेगावमधील घटनेकडे लक्ष वेधण्यासाठी त्या वेळी अरुणभाऊंनी गृहमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. त्यामुळे यांना अटक झाली होती.

बबनची तुरुंगातून सुटका झाल्यावरही तो गप्प बसला नाही. त्याने गायरानावर पुन्हा अतिक्रमण केलं. या वेळी पोलीसकेस झालेली असल्याने गावकरी चडफडत शांत राहिले. मातंग शेतकरी झाले. सन्मानाने जगू लागले. यथावकाश बबनचं नेतृत्व बळकट झालं. इतकं की, तो पंचायत समितीवर निवडूनही आला. आता त्याने गावाजवळच्या तलावात मच्छीमारीसाठी सोसायटी सुरू केली. त्यातून तो आर्थिक दृष्ट्याही मजबूत झाला. बबनचा हा उत्कर्ष जातीयवादी पुढाऱ्यांना खुपत होता. छोटे-मोठे संघर्ष नेहमीच होत होते. त्यात बबनने गावातल्या तलावाचं पाणी गायरान कसणाऱ्या शेतकऱ्यांना सोडायचा आग्रह धरला. गावकऱ्यांचा विरोध धुडकावून त्याने तलावाचं पाणी शेतीला सोडलं. या घटनेचा राग मनात धरून गावातल्या पुढाऱ्यांनी बबनला एकटं गाठलं. त्याच्यावर मरेपर्यंत चॉपरने वार केले गेले. या संपूर्ण घटनाक्रमात अखेरपर्यंत जातीय तणाव होता. बबन जातसंघर्षातला शहीद होता.

बबनच्या मारेकऱ्यांना तुरुंगात पाठवणं सोपं नव्हतं. प्रस्थापित गुंडांपुढं साक्षीदार कसे उभे करणार? पण ही जिकिरीची जबाबदारी अरुणभाऊंनी स्वीकारली. सहा वर्षे हा खटला सुरू होता. या काळात साक्षीदारांना फुटू न देणे, सबळ पुराव्यांनिशी पाठपुरावा करणे हे सुरू होतंच; पण त्यापेक्षा रोजच्या धमक्यांचा सामना करणं कठीण होतं. अरुणभाऊंच्या घरी धमक्यांची पत्रं वरचेवर यायची. बबनप्रमाणेच आणखी एक खून मारेकऱ्यांना सहज शक्य होता. या भीतीचं सावट मनात असूनही अरुणभाऊ डगमगले नाहीत. प्रसंग आलाच तर तयारी असावी म्हणून त्यांनी लायसेन्सचं रिव्हॉल्वर बाळगायला सुरुवात केली. अखेर मारेकऱ्यांना जन्मठेप झाली. हा अरुणभाऊंच्या आयुष्यातला सर्वांत जास्त तणावाचा काळ होता. ॲट्रॉसिटी ॲक्टमधून न्याय मिळणं सोपं नसतं. हा न्याय मिळवण्यासाठी काय जिगर लागते, ते अरुणभाऊच जाणोत.  

अशा अनेक संघर्षांच्या पाठशाळेत अरुण जाधव हा कार्यकर्ता घडला आहे. जातीय अन्याय-अत्याचारांना वाचा फोडताना काय खबरदारी घ्यायची, याचं एक खास तंत्र त्यांनी विकसित केलंय. ते विकसित करताना अरुणभाऊंना ‘कोरो’ या संस्थेच्या माध्यमातून सुजाता खांडेकर व महेंद्र रोकडे यांची मदत झाली आहे. खर्डा येथील नितीन आगे या मुलाचा जातीय विद्वेषातून झालेला खून असो वा सोनईमधील मेहतर मुलांचे खून; या प्रकरणांमध्ये अत्यंत पद्धतशीरपणे गुन्ह्यांचा पाठपुरावा त्यांनी केलाय. पोलीस गुन्हा नोंदवताना कुठे हलगर्जीपणा करतात, उत्तरीय चाचणीतील कोणते दुवे कळीचे असतात, घटनास्थळाला कोणी कोणी भेट दिल्यास मीडिया व राज्यकर्त्यांवर दबाव येऊ शकतो, याचं एक अनुभवसंपन्न शास्त्रच अरुणभाऊंनी विकसित केलंय. हे काम अर्थातच सोपं नाही.

 संघर्षाबरोबरच राजकीय व रचनात्मक कार्यातही अरुणभाऊंनी स्वत:ला अजमावलं आहे. पन्नास हजार लोकवस्ती व भरपूर महसूल असलेल्या जामखेड ग्रामपंचायतीचं सरपंचपद त्यांनी भूषवलं आहे. या काळातही त्यांना सवर्णांचा खूप त्रास सहन करावा लागला. तरीही त्यांनी आपल्या भटक्या-विमुक्त बांधवांसाठी अनेक विकासकामे करून घेतली. भारिप बहुजन महासंघातर्फे ते राजकारणात सक्रिय राहिले आहेत.

अरुणभाऊंनी अलीकडे ‘निवारा’ हा एक वेगळाच प्रकल्प सुरू केलाय. त्याबद्दल ते म्हणतात, ‘‘जामखेडमधील कलाकेंद्रांध्ये अनेक महिला नाचतात. यातल्या पन्नास टक्के महिला कोल्हाटी समाजाच्या आहेत. बाकीच्या बौद्ध, मातंग, भिल्ल व मुस्लिम समाजातून आलेल्या आहेत. कुणावर बालपणी अत्याचार झाला. कुणी परित्यक्ता, कुणी निराधार अशा या महिला कलाकेंद्रांमध्ये नाचायचा व्यवसाय स्वीकारतात. हे काम सोपं नसतं. दिवसातले नऊ ते बारा तास या महिला नाचतात. पायांत पाच किलोंचे चाळ बांधलेले असतात. अंगावर भरजरी मेकअप व काष्टा सावरत नाचणं खूप कष्टाचं असतं. पण चेहऱ्यावर वेदनेचा लवलेशही दाखवता येत नाही. या बायकांचे तळपाय पाहिले तर, ते लाकडासारखे कडक झालेले असतात. या बायांनाही लेकरं होतात, पण त्यांना बापाचं नाव नसतं. ही पोरं आपली आई नाचताना, प्रेक्षकांना रिझवताना तिथंच घुटमळत असतात. मग त्यांना सिगारेट आणायला पिटाळ, गुटखा आणायला पाठव- अशी कामं सांगितली जातात. या पोरांना अंगात घालायला धड कपडेही अनेकदा मिळत नाहीत. शिक्षणाचीही खूप आबाळ होते.’’ अशा ‘अनाथ’ मुलांसाठी अरुणभाऊंनी निवारा प्रकल्प सुरू केलाय. सध्या वीस मुलांची जबाबदारी त्यांनी या प्रकल्पातून स्वीकारली आहे. पण जामखेडमध्ये अशी शेकडो मुलं आहेत. त्यांना वर्षातून किमान दोनदा कपडे व वह्या-पुस्तके देण्यासाठी अरुणभाऊ प्रयत्नशील असतात.

अरुणभाऊंच्या बहिणीच्या मालकीचं एक कलाकेंद्र जामखेडमध्ये आहे. या बहिणीच्या पाठिंब्यामुळेच अरुणभाऊ समाजात-चळवळीत खंबीरपणे उभे राहू शकले. अरुणभाऊंच्या काही टीकाकारांना वाटतं, ‘बाईने नाचणं हे एक शोषण आहे. ते चालू देऊन इतर समाजकार्य काय कामाचं?’ आपले छिद्रान्वेशी बांधव कशातही खोट काढू शकतात. जातिव्यवस्थेचे हजारो वर्षांचे संस्कार घालवण्यासाठी आपण सबुरी दाखवायला हवी. अरुणभाऊंसारखा तयारी असलेला एक माणूस अंतर्बाह्य आंबेडकरी विचाराने लढतोय, हेच खूप दिलासादायक आहे. अरुणभाऊंच्या आवडीचं एक भीमगीत आहे- ‘भीमा तुझ्या मताचे जर चार लोक असते, तुझ्या तलवारीचे न्यारेच टोक असते...’ शोषणाचे दाहक दशावतार ज्याने अत्यंत जवळून पाहिलेत, अशा या कार्यकर्त्यांची एक आंतरिक- वैयक्तिक गरज या ओळींमधून व्यक्त होते, असं मला वाटतं. या लेखनानिमित्त बोलताना आपली आई व बहीण यांचे संदर्भ आले की, अरुणभाऊंचे डोळे वारंवार भरून यायचे. कंठ दाटायचा. ते पाहून मला वाटलं, वयाने पंचेचाळिशीला आलेला हा माणूस मनाने अजूनही कोवळाच आहे नि तरीही तो जातीय अत्याचारांसारख्या कर्मकठीण समस्येला भिडतोय. विशेषत: ‘ॲट्रॉसिटी ॲक्ट रद्द करा’ या मागणीसह निघणाऱ्या मोर्चांच्या पार्श्वभूमीवर तर मला अरुणभाऊंचा हात हातात घेऊन त्यांना मन:पूर्वक थँक्यू म्हणावसं वाटलं. तुम्ही नाही म्हणणार का त्यांना- थँक्यू!

Tags: पारधी कार्यकर्ता लोक अधिकार आंदोलन प्रशांत खुंटे अरुण जाधव निवारा गायरान पारधी समाज भटके-विमुक्त संघटना मानवी हक्क अभियान वाल्मिक निकाळजे जामखेड दबावगट सोनई हत्याकांड खर्डा हत्याकांड जातीय अत्याचारविरोधी कृती समिती nivara Gaayraan paaradhi samaj bhatake vimukt sanghatana manavi hakk abhiyaan valmik nikajale jamkhed dabavgat sonai hatyakand kharda hatyakand Jatiy atyachar virodhi kruti samiti Arun Jadhav Lok adhikar aandolan Karykarata weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके