डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दरम्यान, संस्थेने अपंगांच्या समस्यांसाठी कामांना सुरुवात केली. संगीताने या कामात आघाडी घेतली. अपंगांना समाजाकडून मिळणारी वागणूक ती पाहत होती. त्याच प्रकारच्या अवहेलनेचा तिलाही अनुभव होता. त्यामुळे सहवेदनेतून तिने असंख्य अपंगांच्या भेटी घेतल्या. खेडी पिंजून काढली. या प्रयत्नांमधून चार जिल्ह्यांमध्ये संघटनेचं जाळं विणलं गेलं. अंध, अस्थिव्यंग, मतिमंद, कुष्ठरुग्ण अशा जीवनाला कंटाळलेल्यांना संघटनेचा आधार मिळाला. घरकुले, चाकाची गाडी, कुबड्या अशी मदत संघटनेद्वारे मिळवून देण्यात संगीताने खूप कष्ट घेतले. आज लोक तिला ‘संगीता मॅडम’ या नावाने ओळखतात. गरीब विकलांगांसोबत या संगीताला नेहमीच पाहणाऱ्या सरकारी कचेरीतील लोकांना वाटतं, ‘या बाई अपंगांकडून योजना मिळवून देण्याचं कमिशन घेत असतील.’ एका शासकीय कर्मचाऱ्याने अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.   

‘‘चकणी, लंगडी, थोट्या, पांगळ्या या शब्दांचा कधी कधी राग येतो; पण या रागाला चांगलं वळण कसं द्यायचं, हे मला आता कळलंय.’’ संगीता सांगतात.

‘‘अपंगांवरचा अन्याय पाहून माझ्यावरच अन्याय होतोय, असं मला वाटतं. पूर्वी मी अशी नव्हते. पूर्वी वाटायचं- कुणी अपमान केला, टोमणा मारला तर गप्प बसावं. सहन करावं. स्वत:ला कोंडून घ्यावं. पण आता तसं होत नाही...’’ गडचिरोलीतल्या शासकीय अधिकाऱ्यांना विकलांगांच्या समस्यांची जाण करून देता-देता संगीतामध्ये एक प्रकारचा धीटपणा आला. संगीता रूढार्थाने अपंग नाही, पण त्वचेवरील कोडामुळे अपंगांना जशा अवहेलना सहन कराव्या लागतात, तसेच अपमान तिनेही सहन केलेत. त्यामुळे पूर्वी ही मुलगी अत्यंत बुजरी होती. आरशात स्वत:शी बोलणंही तिला जमत नसे. पण ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेचे डॉ.सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख यांनी तिच्यावर अपंग संघटनेची जबाबदारी टाकली नि न्यूनगंड, संकोच व भीतीची वल्कलं गळून वेगळीच संगीता जन्माला आली... आता संगीताकडे स्वत:मध्ये झालेल्या आरपार बदलांचे अनेक किस्से आहेत.

 ‘जनकल्याण अपंग संघटना’ सदस्यांच्या वर्गणीवर कार्यरत आहे. सदस्य 51 रुपये सभासद फी आणि 20 रुपये वार्षिक वर्गणी देतात. या रक्कमेतून संघटना विविध कार्यक्रमांचं आयोजन करते. संघटनेने प्रत्येक तालुक्यात ‘अपंग व्यक्ती मार्गदर्शन केंद्रं’ही उभारलीत. या केंद्रांची जबाबदारी अपंगांनी स्वत:च घेतलीय. संघटनेमार्फत अपंगांचे बचतगट स्थापन झालेत. बचतगटांच्या फेडरेशनही कार्यरत आहेत. संघटनेचे सदस्य जुन्या साड्यांपासून सुंदर डोअर मॅट्‌सही विणतात. त्यातून उदरनिर्वाहाचं एक साधनही उपलब्ध झालंय.

संघटनेचा हा व्यापक जनतळ संगीताच्या लोकसंग्रहामुळे उभा राहिलाय. संस्थेने 2001 मध्ये एक सर्वेक्षण केलेलं. तेव्हा 25 गावांत केवळ 121 विकलांगांच्या मुलाखती शक्य झाल्या होत्या. पण सर्वेक्षणातून हाती आलेली आकडेवारी धक्कादायक होती. सर्वेक्षण झालेल्या 121 पैकी केवळ पाच जणांकडे अपंगत्वाचं प्रमाणपत्र व दोघांनाच बसपास सवलत मिळत होती. याचा अर्थ नव्वद टक्क्यांहून जास्त विकलांगांची ना शासनाकडे नोंद होती, ना त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळत होता. याचसाठी विकलांग प्रमाणपत्र मिळवण्यातील अडथळे दूर करणे, पेन्शन योजना व बसपास मिळवून देता- देता संगीताने अनेक विकलांगांना त्यांच्या हक्कांसाठी उभं केलं. त्यांचे प्रश्न त्यांना मांडू व सोडवू दिले. म्हणूनच चार जिल्ह्यांमध्ये संघटनेचा विस्तार होऊन हजारो विकलांग स्वावलंबनाकडे वळले. हे संगीता तुमडेंचं योगदान किंवा उलट या संघटनेनं संगीतालाही स्वयंस्फूर्त बनवलं, हे या संघटनेचं तिच्या आयुष्याला मिळालेलं योगदान असंही म्हणता येईल...

अलीकडेच वडसा भागातील शंकरपूर ग्रामपंचायतीत घटना आहे. बीडीओ, ग्रामसेवक आणि सरपंच यांना अपंग संघटनेच्या महिला सदस्याने विचारलं, ‘‘ग्रामपंचायतीने गावातल्या अपंगांसाठी 5 टक्के निधी खर्च करायला हवा. तुम्ही तो कुठं खर्च केलात?’’ उत्तर मिळालं, ‘‘आम्ही दोन-तीनचाकी सायकली आणल्या, अपंग मतदारांना मतदान केंद्रावर सोडायला!’’ पुन्हा प्रतिप्रश्न, ‘‘तुम्ही आमची गरज विचारली का? आमच्या परवानगीशिवाय कसा काय खर्च केलात?’’ एक अपंग बाई प्रश्न विचारते म्हणजे काय? बीडीओ काही बोलेचनात. मग त्या सदस्य महिलेने संगीतांना फोन लावला. आता बीडीओंशी संगीता बोलल्या, ‘‘सर, तुम्ही दोन सायकली सोळा हजारांत विकत घेतल्या, असं समजलंय. बाजारात तीनचाकी सायकलींची किंमत काय आहे?’’ हा प्रश्न अगदीच अनपेक्षित होता. त्यानंतर इतर ग्रामपंचायतींनी अपंग कल्याण निधीचं नियोजन कसं केलं, याचा वृत्तांत सांगितला गेला.

सरपंच व अधिकाऱ्यांसाठी हा अनुभव नवा होता. आतापर्यंत हे प्रश्न कुणी विचारलेच नव्हते. आणखी एक प्रसंग नोंदवण्यासारखा आहे. संघटनेने सुरू केलेल्या अपंग साह्य केंद्रात एकदा एक समस्या पटलावर आली. अपंगांना शासनाकडून पेन्शन मिळते. या योजनेतून मिळणारी रक्कम दर तिमाहीत बँक खात्यात जमा होते. ही रक्कम तुटपुंजी असली, तरी निराधार अपंगांकरिता तो बहुमूल्य आधार असतो. त्यामुळे अनेक अपंग या रकमेसाठी बँकेत रांगा लावतात. त्यांची असहायता बँक कर्मचाऱ्यांना कळतेच असं नाही. कढोली येथील बँकेत असेच एक उर्मट बँक कर्मचारी होते. कुणी विकलांग पेन्शनच्या पैशांसाठी दिसला की, का कोण जाणे- त्यांचा पारा चढायचा. हा माणूस अपंगांना वाट्टेल ते सुनवायचा. खेटे घालायला लावायचा. संघटनेसमोर हा प्रश्न आल्यानंतर संगीताने त्या कर्मचाऱ्याच्या वागणुकीचा निषेध नोंदवणारं निवेदन तयार केलं. सहा गावांतील 42 अपंगांनी या निवेदनावर सह्या केल्या. ते निवेदन घेऊन संगीता तहसील कार्यालयात गेल्या. सोबत संघटनेचे सदस्यही होते. सर्वांनी त्या बँक कर्मचाऱ्याने दिलेल्या वागणुकीचे अनुभव सांगितले. एक-दोन नाही, तर अनेक अनुभव ऐकून तहसीलदारही अवाक्‌ झाले. तहसीलदारांनी तातडीने त्या कर्मचाऱ्याला बोलावलं. संघटनेच्या सदस्यांचा गराडा नि संगीतातार्इंचा चेहरा पाहून तो गृहस्थ एकदम नरम झाला. ‘‘कामाच्या व्यापात एखादा शब्द बोललो असेल, तर माफ करा!’’ अशी विनवणी करू लागला. ‘‘पुन्हा असं घडणार नाही!’’ अशी कबुली त्याने दिली. संगीता त्या गृहस्थाला म्हणाल्या, ‘‘ज्यांच्याशी तुम्ही वाईट वागलात, त्यांनाच हे सांगा!’’ त्या माणसाने सर्वांची जाहीर माफी मागितली. त्यानंतर कढोलीच्या बँकेत विकलांगांना अगत्याने सेवा मिळू लागल्या.

अन्य एका प्रसंगात जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जनकडून विनयशीलतेचा अनुभव संघटनेने कमावला, तोही संगीताने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे! अपंगत्वाचं प्रमाणपत्र सिव्हिल सर्जनमार्फत मिळतं. त्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या होतात. त्या करायला विविध तज्ज्ञ हॉस्पिटलमध्ये असणं अपेक्षित आहे. या प्रमाण-पत्राशिवाय अपंगांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या प्रमाणपत्राला खूपच महत्त्व आहे. पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेकदा तज्ज्ञ भेटत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी चकरा माराव्या लागतात. एकेकट्या विकलांगांना तपासणं, आवश्यक चाचण्या करणं हे काम डॉक्टरांनाही इतर रुग्णसेवेत काहीसं तसदीचं वाटतं. हल्ली ऑनलाईन प्रमाणपत्रं काढतात. त्यामुळे प्रक्रिया थोडी सोपी झाली असली, तरी डॉक्टरमंडळींचा उत्साह या कामात जेमतेमच असतो. या समस्येवर मार्ग काढत संघटनेने ठरावीक दिवशी विकलांगांना एकत्र करून हॉस्पिटलमध्ये नेण्याची प्रथा पाडली, ज्यामुळे डॉक्टर व विकलांग दोघांचाही वेळ वाचतो.

एके दिवशी चार गावांतील 13 विकलांगांना घेऊन संगीता सिव्हिल रुग्णालयात गेल्या. हॉस्पिटलचं अंतर या विकलांगांच्या गावांपासून साधारणत: 70 किमी आहे.  त्यामुळे गाडीभाडे वाचवण्यासाठी सामाईक गाडी केलेली. त्यासाठी सर्वांनी वर्गणी काढलेली. या तेरा व्यक्तींमध्ये दोन मतिमंद- म्हणजे पूर्णत: बेरोजगार होते. बाकी अंध व अस्थिव्यंगांची आर्थिक परिस्थितीही हलाखीची होती. प्रमाणपत्र मिळाल्यास यांना पेन्शन व अन्य योजनांचा लाभ मिळणं शक्य होतं. मोठ्या आशेने ही मंडळी सिव्हिल हॉस्पिटलला आली. पण तिथे तज्ज्ञ डॉक्टरच नव्हते. जे डॉक्टर होते, ते म्हणाले, ‘‘उद्या पुन्हा या!’’ डॉक्टरांच्या या उत्तरावर संगीताने थोडा विचार केला. खरे तर या प्रसंगात सगळे संतापलेले, निराश झालेले. मोठ्या जिकिरीने गाडी-भाड्यासाठी केलेला खर्च वाया जाणार होता. डॉक्टरांच्या उत्तरापुढे सर्व जण हताश झालेले. पण संगीताने शांतपणे एक युक्ती सांगितली. सगळे तेरा विकलांग त्या डॉक्टरांकडे गेले. मंडळींनी डॉक्टरांना छोटासा घेराव घातला आणि सांगितलं, ‘‘आज रात्री आम्ही इथंच मुक्काम करतो; तुमच्या घराबाहेर!’’ डॉक्टर गोंधळले. त्यांना उशिरा का होईना, या मंडळींची परिस्थिती लक्षात आली. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी येण्यासाठी वाहन द्यायचं कबूल केलं. डॉक्टरांच्या विनंतीनुसार सर्व जण परतले. रात्र संस्थेच्या कार्यालयात काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी पाठवलेली उपजिल्हा रुग्णालयाची गाडी या मंडळींसाठी हजर होती. एरवी कुणी विकलांगांच्या अशा समस्येची दखल घेतली असती?

असे प्रसंग विकलांगांच्या आयुष्यात क्वचितच घडतात. एरवी समाजाकडे या मंडळींना देण्यासाठी दया व उपहासाशिवाय फारसं काही नाही. संगीताच्या वाट्यालाही हेच आलं होतं. संगीताचा मूळ स्वभाव खेळकर, धीट. पण वयाच्या दहाव्या वर्षी तिच्या ओठांवर नि चेहऱ्यावर सफेद डाग उमटू लागले. या डागांनी तिचं अवघं अस्तित्वच काळवंडून टाकलं. संगीता लहान होती, तेव्हा तिने आजीकडे आग्रह धरून गोंदवून घेतलेलं. आजीकडे गोंदवणाराला द्यायला पैसे नव्हते. पण नातीचा हट्ट पुरवण्यासाठी तिने गोंदवणाराला तांदूळ दिले. त्या मोबदल्यात त्याने संगीताच्या कपाळावर नि हातांवर छोटंसं नक्षीकाम केलं. संगीताला मात्र आदिवासी महिलांसारखं मोठ्ठं मोठ्ठं गोंदवून हवं होतं. गोंदताना होणारी आग, नंतर येणारी सूज, दु:ख याचीही त्या वेळी तिला तमा नव्हती. या हट्टापायी तिने वडिलांची बोलणीही खाल्ली. शाळेतही हिनं स्वत:चं आपलं नाव नोंदवून घेतलेलं. संगीता म्हणते, ‘‘त्या काळी शिक्षक पोरं गोळा करायला येत. पण शाळेच्या भीतीमुळं पालक व मुलं जात नसत. माझं वय कमी होतं, पण मला शाळेची हौस. म्हणून मी हट्ट धरला. मग चौथ्या वर्षातच मला शाळेत घातलं गेलं.’’ संगीताचा एक चुलतभाऊ तिच्या वर्गात होता. तो अभ्यासात कच्चा होता. त्यामुळे त्याला नेहमीच छड्या बसत. तेव्हा ही छोटी मुलगी शिक्षकांना सांगायची, ‘‘गुरुजी, त्याच्यावरच्या छड्या मला द्या, त्याचा अभ्यास मी करते...’’

एवढी ही धीट मुलगी, पण त्वचेवरील पांढऱ्या डागांनी मात्र नंतर झाकोळून गेली. त्वचेखालील पापुद्र्यात मेलॅनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे पांढरे डाग येतात. हळूहळू ते सर्वांगावर पसरतात. विशेषत: गडद कांतीवर हे डाग खूप विरूप दिसतात. सूर्यप्रकाशाने अंगावर चट्टे उठणं किंवा शरीराची लाही होणं हा त्रास पीडितांना सोसावा लागतो. पण त्याहीपेक्षा भयानक त्रास म्हणजे लोकांच्या नजरा, शेरे- ताशेरे नि तुसडी वागणूक.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, लोकसंख्येतील किमान 5 टक्के लोक या समस्येने ग्रस्त असतात. अलीकडे या समस्येवर मोठ्या प्रमाणात जनजागृतीही झालीय. कोड समस्याग्रस्तांचे स्वमदत गटही शहरांमध्ये आहेत, पण गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात अजूनही तितकीशी जागृती नाही. संगीताचं ‘राखी’ हे एक छोटंसं खेडं. तिथे तर डॉक्टरांचीही सुविधा नव्हती. सुरुवातीला डाग दिसू लागल्यावर कुटुंबीयांनी या मुलीलाच दटावलं. ‘‘अंगणवाडीतल्या गोड खाऊमुळं डाग येतात, ते खायचं बंद कर’’ अशी ताकीद दिली गेली. अर्थात तो गैरसमज होता. वडिलांनी वैदूंचे उपचारही केले. छोट्या संगीताने आठवड्यातले चार वार चार देवतांचे उपास केले. पण सगळं निष्फळ! डाग वाढू लागले तसतसं ‘तुझ्याशी कोण लग्न करणार?’ हे वाक्य या लहान मुलीच्या कानांवर वरचेवर पडू लागलं. त्याच काळात मनावर कायमचा चरा उमटवणारी घटना घडली. संगीताच्या थोरल्या भावाला बाळ झालं. बारशाला आत्याच्या हातात लेकरू देण्याची पद्धत आहे. या छोट्या मुलीला त्या घटनेचं खूप कुतूहल होतं. ‘छोट्या बाळाची, मी छोटी आत्या’ अशी बालसुलभ भावना तिच्या मनात असावी. तिला छोट्या मुलांशी खेळायला आवडतही होतं. पण भावाने तिला स्पष्टच सांगितलं, ‘‘तू बाळाला हात लावायचा नाहीस! तुझा आजार त्याला होईल!!’’  

बारशासाठी दहा किमी. दूरच्या गावी पायी जायचं होतं, तरीही ही मुलगी उत्साहात होती. पण भावाच्या सूचनेमुळं ती खचून गेली. हिरमुसली. खूप रडली. नंतर नाखुशीने बारशाला गेली. पण तिने त्या बाळाला स्पर्श मात्र केला नाही. तिची नाराजी लपली नाही. तिचा रडवेला चेहरा पाहून नंतर सगळे भावावर चिडले, पण त्या घटनेचा व्हायचा तो परिणाम होऊन गेला होता.

नंतरच्या काळात इतरही थोरल्या भावंडांची लग्नं झाली. घरात आई-वडिलांच्या सोबतीला उरले संगीता व तिचा एक धाकटा भाऊ माणिक. हा माणिक थोडा ‘मंद’ होता. गार्इंना रवंथ करताना पाहून तो म्हणायचा, ‘‘गाय मला चिडवण्यासाठी तोंड वाकडं करते.’’ बैलांना लघवी करताना पाहून म्हणायचा, ‘‘बैलाचं पोट फुटलं, बैल मरणार!’’ मग तो रडायचा. विकलांग माणसाचं जगणं संगीता तेव्हा पाहत होती. पण तिला ते नीटसं कळतही नव्हतं. माणिक शाळेत जात नसे. गावभर फिरून चित्रं असलेले कागद तो गोळा करायचा. गावात एका कुटुंबाकडे टीव्ही होता. टीव्ही पाहायला मिळावा म्हणून तो त्या कुटुंबाचं सरपण फोडून द्यायचा. पाणी भरायचा. भांडी घासायचा. माणिकच्या मंदबुद्धीचा लोक असा गैरफायदा घेत. पण हे शोषण त्या काळात संगीताला कळत नव्हतं कारण टीव्ही पाहायला मिळावा म्हणून संगीता व तिच्या मैत्रिणीही अशीच कामं करायच्या. त्यामुळे माणिकचं वागणं सामान्यच वाटत होतं. अशा या माणिकचं लग्न पायाने अधू असलेल्या एका मुलीशी लावून दिलं गेलं. यथावकाश माणिकला अपत्य झालं. त्यानंतर ती मुलगी बाळाला घेऊन माहेरी गेली, ती पुन्हा यायचं नाव घेईना. तिला आणण्यासाठी माणिकला पाठवलं गेलं. पण सासुरवाडीत त्याला खूपच वाईट वागणूक मिळत होती. तो काही दिवस तिकडे राहिला. तिथेच त्याला काही तरी आजार झाला. अत्यंत खंगलेल्या अवस्थेत एकदा माणिक परतला. आता त्याचा जगण्यातला रस संपला होता. एकदा तो ‘थोरल्या बहिणीला भेटून येतो’ असं सांगून गेला. तिकडून परतताना तो नदीच्या घोटाभर पाण्यात पडलेला आढळला. लोकांना वाटलं, ‘दारूडा आहे!’ नंतर कुणी तरी त्याला ओळखलं. तोवर त्याची प्राणज्योत मालवली होती. माणिकचा हा करुण मृत्यू संगीताच्या मनावर ठसा उमटवून गेला असावा. लोक आपल्यालाही अशीच दुय्यम वागणूक देतात, हा अनुभव तिला होताच. त्यामुळे कदाचित तिने शिक्षणाचा ध्यास घेतला. या काळात संगीता स्वत:ला कोंडून घेऊन रडत राहायची. ‘आपलं कसं होणार?’ ही चिंता तेव्हा या चिमुरड्या जिवाला सतावत होती. कातडीवरचे डाग दिवसेंदिवस पाय पसरत होते. ‘अशी कातडी सोलून तरी ठेवता येईल का?’ असे प्रश्न तिला पडत. त्यांची उत्तरे नसल्याने ती गुमसुम होऊन केवळ शाळेची एक-एक पायरी चढत राहिली. 

संगीताचं नववीपर्यंतचं शिक्षण वसतिगृहात झालं. तिथे सडलेली भाजी मिळायची. छत गळायचं. पण सगळे त्रास सहन करून ती शिकली. पर्यायच नव्हता. कारण गरिबी आणि ‘आपलं कसं होणार?’ या प्रश्नाची कातडीखाली चाललेली सरपट सतत सोबतीला होती. ‘आपण शिकलो तरच धडगत आहे’ असं नकळत मनावर बिंबलं असावं. त्यामुळे संगीता 49 टक्के गुण मिळवून एसएसएसी झाली. राखी गावातून दहावी उत्तीर्ण झालेली ही पहिली मुलगी. सर्वांना अप्रूप वाटलं. ‘पोरगी हुशार आहे!’ असं सगळे म्हणू लागले. नंतर संगीताने कॉलेजला प्रवेश घेतला. कॉलेजात जायला तिच्याकडे धड कपडेही नव्हते. इतर मुली तिच्या गरिबीची चेष्टा करत. त्यामुळे वडिलांनी मोलमजुरी करून तिला सलवार शिवायला पैसे दिले. गावात सलवार घालणारीही ही पहिलीच मुलगी.

संगीता सांगते, ‘‘तेव्हा खेड्यातल्या लोकांना वाटायचं की, सलवार फक्त मुसलमान मुलीच घालतात.’’ पण शिक्षण घ्यायचं तर स्वस्तातले का असेना, धड कपडे वापरणं अत्यंत गरजेचं होतं. या दोन सलवारींच्या सोबतीनं संगीताने बी.ए. केलं. पण पुढे काय, हा यक्षप्रश्न होता. तेव्हा एम.ए. केल्यावर शिक्षक होता येईल, या आशेवर संगीता पोस्ट ग्रॅज्युएट झाली. एम.ए. करून ती गावी परतली. आता आई-वडील अधिकच थकले होते. त्यांना शेतीची कामं होत नव्हती. त्यामुळे संगीताने गावात मोलमजुरी करायचं ठरवलं. एका शेतकऱ्याकडे ती मोलमजुरीला गेलीही, पण तिची त्वचा सूर्यप्रकाशाला संवेदनशील असल्याने उलटाच परिणाम झाला. उन्हाच्या तापाने तिची कातडी लाल झाली आणि ती भोवळ येऊन पडली. शेतमालक संगीताच्या वडिलांवरच संतापला. लोक तसंही तिच्या वडिलांना नावं ठेवू लागलेच होते. ‘मुलीचं लग्न न करता तिच्या पैशांवर जगायचा यांचा बेत आहे!’ असे टोमणे लोक देत.  संगीताला वडिलांचं दु:ख कळत होतं. ते नको म्हणत असतानाही संगीता मोलमजुरीचा प्रयत्न करतच होती. एकदा ती रोजगार हमीच्या कामावरही गेली. तिथे संगीताचे वर्गमित्रही होते, पण ते शाळेतले. संगीता कॉलेज शिकून आलेली. त्यामुळे गावातल्या या शाळादोस्तांनी तिला ते काम करू दिलं नाही. दरम्यानच्या काळात तिने सरकारी नोकरी मिळवण्याचेही प्रयत्न केले. ते अनुभवही खच्चीकरणात भर घालणारेच होते. राखी गावातच पोस्टमास्तरची जागा निघाली. संगीताला मुलाखतीचं पत्रही आलेलं. पण मुलाखतीच्या वेळी, ‘मुलींना नोकरी दिली, तर त्या लग्न करून जातील,’ असं मुलाखत घेणाऱ्यानेच सुनावलं. लग्नाचा प्रश्न आधीच संगीताच्या डोक्याचा भुगा करत होता, त्या प्रश्नाला बगल देण्यासाठीच तर नोकरीचे प्रयत्न ती करत होती; आणि चांगल्या गावातल्या सरकारी नोकरीची संधी ‘ही मुलगी लग्न करून जाईल’ या सबबीखालीच नाकारली गेली. वाईट्ट गोष्ट!

नोकरीसाठी आणखीही एक-दोन प्रयत्न करून झाले होते. पण जिथे जाईल तिथे अंगावरचे डाग आणि एवढी मोठी झाली तरी अविवाहित असल्याने रोखलेल्या नजरा संगीताला सतावत. वडील संगीताला ‘तू लग्न कर!’ असं सारखं सुचवत होते. सफेद डाग या समस्येला अपंगत्व मानलं जात नाही. पण विकलांगांना रोजगारात मिळणारा दुजाभाव संगीतालाही तिच्या पांढऱ्या रंगामुळे सहन करावा लागला, असं म्हणता येईल. कायद्यानुसार शासकीय व खासगी नोकऱ्यांमध्ये विकलांगांना 5 टक्के आरक्षण आहे. पण इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (आयएलओ)च्या आकडेवारीनुसार 73 टक्क्यांहून अधिक विकलांग अजूनही रोजगारांच्या कक्षेत नाहीत. विशिष्ट शारीरिक लक्षणांमुळे रोजगारांच्या बाहेर फेकलं जाण्याचा अनुभव संगीताच्याही अनुभवाला येत होता. एक तर मुलगी, त्यात कोड असलेली! तिला नोकरी कशी द्यायची?- असा प्रश्न मुलाखत घेणाऱ्यांना पडला नि त्यांनी संगीताला नोकरीतून बाद ठरवलं.

आता लग्नाचा विचार करून पाहण्याशिवाय तिला गत्यंतरच नव्हतं. संगीताने कुठे कुठे मोलमजुरी करून थोडी बचत केली होती, त्यातले दोन हजार रुपये तिने वडिलांना दिले. स्थळं पाहायला गावोगावी जावं लागतं. त्यासाठीची ही खर्ची होती. वडिलांनी सहा स्थळं पाहिली. त्यातल्या तिघांनी उत्तरच दिलं नाही. दोघांनी ‘मुलीला कोड आहे’ असं स्पष्ट सांगून नकार दिला. एक मुलगा पाहायला आला. हा सहावी शिकलेला, संगीता डबल ग्रॅज्युएट. अगदीच विजोड स्थळ. या मुलग्याने घरी येऊन पाहुणचार घेतला आणि वर तोंड करून म्हणाला, ‘‘आम्ही पाहायला आलो म्हणजे मुलगी पसंत आहे, असं नाही!’’ बाकी स्थळांच्या तुलनेत याचं वर्तन उद्धटपणाचा कळस गाठणारं. हा पाचवी पास पुरुषोत्तम कोडामुळे दगड झालेल्या अहल्येला जणू पावन करायला आलेला, नि पदस्पर्श न करताच गेला!

लग्नाच्या सौद्यांमध्ये ही अवहेलना तथाकथित ‘व्यंग’पीडित मुलींच्या सर्रास वाट्याला येते. अशा अनुभवांमुळे संगीता सातत्याने खचत होती. आयुष्याला दिशाच सापडत नव्हती. अशा सैरभैर काळात संगीता ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेच्या कार्यकर्त्यांना दिसली. संस्थेच्या एक कार्यकर्त्या गावात आलेल्या. त्यांनी संगीताला नोकरीची ऑफर दिली. संगीताने लगेच होकार दिला. गाव सोडून ती कुरखेड्याला आली. त्या काळातला एक अनुभव आहे. संगीता सांगते, ‘‘शुभदातार्इंनी माझ्यावर वैरागड तालुक्यातल्या गावांची जबाबदारी दिली. मी एकटी पहिल्यांदाच त्या भागातल्या गावात गेले. आठ दिवस एका कार्यकर्तीच्या घरी राहिले. गावबैठकीत माझी ओळख लोकांना करून देण्यात आली. मला नवी ओळख मिळाली. त्या आनंदात आता मी दुसऱ्या गावी जायला तयार झाले. एकटीच नाक्यावरच्या बसस्टॉपवर आले. बराच वेळ तिथं कुणीही नव्हतं. गाडीही येईना. कंटाळले. मला भाकरोंडीला जायचं होतं. खूप उशिरा एक भाकरोंडीची पाटी असलेली एसटी आली. मी गाडीत बसले. गाडीत ड्रायव्हर- कंडक्टरशिवाय कुणीच नव्हतं. खूप वेळ गाडीत मी उलट- सुलट विचार करत बसलेले. नंतर पाहिलं, मला जायचंय त्याच्या भलत्याच दिशेला गाडी चाललीय. रडायलाच आलं. ‘मला भाकरोंडीला जायचंय गाडी कुठं चाललीय?’ असं विचारल्यावर कंडक्टरने सांगितलं, ‘ही रांगी भाकरोंडीची गाडी आहे, तुला भान्सी भाकरोंडीला जायचंय वाटतं...?’ नंतर त्या एसटी कर्मचाऱ्यांनी मला जायचं होतं, त्या वाटेवर चांगुलपणानं सोडलं.’’

गडचिरोली हा नक्षलप्रभावित भाग. अशा संवेदनशील कार्यक्षेत्रातील लोकांचा चांगुलपणा न्याहाळत संगीता निडर कार्यकर्ती बनत गेली. संस्थेत सुरुवातीचे काही दिवस ती गोंधळलेल्या  अवस्थेत होती. पण या वळणावर संगीताला तिच्यातलं स्वत्व गवसायला सुरुवात झाली. संस्थेचं पहिलंच शिबिर मेंढालेखा या देवाजी तोफा यांच्या गावात होतं. तिथे पुण्यातून आलेल्या कार्यकर्त्या संगीताने पाहिल्या. त्यांचा आत्मविश्वास तिला भावला. घर पती-पत्नीच्या नावावर करण्याची मोहीम, ग्रामसभेत महिलांचा सहभाग, शाळेतील दाखल्यावर आईचंही नाव नोंदवणे या नवीनच कल्पना या कार्यशाळेत संगीताने ऐकल्या. पुढे या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दोन-तीन वर्षे संगीताने जीवतोड मेहनत घेतली. खेड्यापाड्यात, फिरली. गावसभा घेतल्या. सरकारी अधिकाऱ्यांशी बोलायचं धाडस मिळवलं. या प्रक्रियेत संगीताला तिच्यातली बालपणातली धाडसी, बोलकी मुलगी पुन्हा भेटली.

या काळातलाही एक मासलेवाईक प्रसंग आहे. संगीता एका गावातून जात होती. पानठेल्यावर उनाड पोरांचं टोळकं थांबलेलं. त्यातल्या कुणी तरी संगीताकडे पाहून शीळ घातली. एकाने शेरा मारला, ‘‘आमच्यासाठी नाही का काही योजना?’’ अशी छेडछाड सहन करून मुली खालमानेनं निघून जातात, असाच या मुलांचा अनुभव असावा. पण संगीता थांबली. वळून त्या मुलाला तिने बोलावलं. ‘‘तुला योजनेची माहिती हवीय? मग गावसभेत ये.’’ असं सांगितल्यावर ते पोरगं थंडच झालं. पण तो मुलगा सभेला आला. नंतर तो संगीताला नेहमीच आदराने नमस्कार वगैरे करू लागला. दरम्यान, संस्थेने अपंगांच्या समस्यांसाठी कामांना सुरुवात केली.

संगीताने या कामात आघाडी घेतली. अपंगांना समाजाकडून मिळणारी वागणूक ती पाहत होती. त्याच प्रकारच्या अवहेलनेचा तिलाही अनुभव होता. त्यामुळे सहवेदनेतून तिने असंख्य अपंगांच्या भेटी घेतल्या. खेडी पिंजून काढली. या प्रयत्नांमधून चार जिल्ह्यांमध्ये संघटनेचं जाळं विणलं गेलं. अंध, अस्थिव्यंग, मतिमंद, कुष्ठरुग्ण अशा जीवनाला कंटाळलेल्यांना संघटनेचा आधार मिळाला. कुणाला घरकुल मिळवून दे, कुणाला चाकाची गाडी, कुणाला कुबड्या अशी अनेक प्रकारची मदत संघटनेद्वारे मिळवून देण्यात संगीताने खूप कष्ट घेतले. आज लोक तिला ‘संगीता मॅडम’ या नावाने ओळखतात. गरीब विकलांगांसोबत या संगीताला नेहमीच पाहणाऱ्या सरकारी कचेरीतील लोकांना वाटतं, ‘या बाई अपंगांकडून योजना मिळवून देण्याचं कमिशन घेत असतील.’ एका शासकीय कर्मचाऱ्याने अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. तो विकलांगांच्या गराड्यात येऊन म्हणाला, ‘‘मॅडम, या ना- चहा घेऊ!’’ संगीता त्याला म्हणाल्या, ‘‘या सगळ्यांना चहा पाजणार का? मी यांच्यासोबत आहे.’’ तो मनुष्य निमूट गेला. संघटनेकडे आलेला समस्याग्रस्त विकलांग असो, की अन्य कुणी- कुणाकडून चहादेखील न घेण्याचं व्रत संगीता पाळते. अशा लहानसहान प्रसंगांतूनच तिने लोकांचा विश्वास कमावलाय. त्यामुळेच राष्ट्रीय विकलांगदिन, ब्रेल जयंती अशा कार्यक्रमांना संगीताच्या आमंत्रणाला मान देत बीडीओ, आमदार-खासदार वगैरे मान्यवरही आवर्जून येतात. फोनवर तिच्या समस्या सुटतात.

आता संगीता चाळिशीत आहे. जनकल्याण अपंग संघटनेतच तिला तिचे जीवलग मिळालेत. संगीता म्हणते, ‘‘कधी कधी आजारपणात आपल्याला हवं-नको विचारणारं कुणी असावं, असं वाटतं. पण तसे तर किती तरी माझे लोक गावोगाव आहेत! ते करतात माझी विचारपूस, तेवढी पुरे!’’ वडिलांनी मृत्यूपूर्वी आपल्या हिश्श्याची जमीन संगीताच्या नावे केली. संगीताने स्वत:च्या हिमतीवर गावात एक घर बांधलय. वडील हयात होते, तोवर मुलगा करणार नाही अशी तिने त्यांची सेवा केली. म्हाताऱ्या आईचं हवं-नकोही तीच पाहते. संगीता म्हणते, ‘‘मला शाळेत असताना एक कविता आवडायची- ‘असे कसे सुने, सुने मला उदास वाटे, ही उडूनी फुलपाखरे नभात चालली कुठे...?’ दु:ख-निराशा घेऊन संघटनेकडे आलेले विकलांग आनंदाने उड्या मारत घरी जात असतील, तेव्हा या काव्यपंक्तीतला उत्तरार्ध संगीताच्या नजरेपुढे तरळत असेल काय?

Tags: handicapped shubhada deshmukh Satish gogulvar Prashant khunte sangita tumade शुभदा देशमुख डॉ.सतीश गोगुलवार अपंग-विकलांग प्रशांत खुंटे संगीता तुमडे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके