डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्वातंत्र्याचा श्वास घेणारं ‘शेवटचं’ गाव

बोलता बोलता रशीदभाई मशिदीच्या बाहेर आले. आजूबाजूला अनेक गोरीपान, निरागस मुलं जमली होती. मुख्यत: त्या मुलांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा निर्भयपणा होता. ‘ये बच्चे अब स्कूल जाते है, ये सब अल्लाह की रेहेम है!’ रशीदभाई व गफूरभाई यांनी आकाशाकडे एकदमच बोट दाखवले. नव्या पिढीच्या पाठीवर भूतकाळाचं ओझं नाहीय, त्यांना लेहला जाऊन खूप शिकण्याची इच्छा आहे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ या गावाला आता कळला आहे.

उतिउंच असलेले महाकाय पर्वत, त्यातून अक्षरश: खोदून काढलेले रस्ते, सततची चढण, समोरून शिस्तबद्धपणे येणारी मंदगतीतल्या लष्करी ट्रक्सची रांग. हळूहळू या पर्वतरांगांना आपलंसं करत आम्ही जगातल्या सर्वांत उंच अशा वाहतुकीच्या रस्त्यावर केव्हा आलो ते समजलंच नाही. ठाम उभे ठाकलेले कडे, असंख्य ठिसूळ अवजड दगडांना कसेबसे सावरून धरलेल्या पर्वतांची तणावपूर्ण भौगोलिक तिरपी रचना, विराट दर्शन देणाऱ्या दऱ्या, प्रचंड जोराचा वारा, त्यासोबत आलेले हिमकण आणि शून्याच्या बरंच खाली असलेलं तापमान.

प्राणवायूची कमतरता असल्याने शरीराला ॲडजेस्ट व्हायला वेळ देण्यासाठी आम्ही तिथे न थांबता तसेच पुढे निघालो. दोन्ही बाजूंच्या ग्लेशिअर्समधून सावकाश वाट काढत आमची गाडी तातडीने पलीकडच्या बाजूला उतरू लागली. 18,365 फुटांवरचा तो लडाखमधील ‘खारदुंग पास’ ओलांडून पुढे जाणं हा एक अनुभवच होता. ‘येताना थांबू’ असं म्हणून आम्ही झपाट्याने पुढे जाऊन पुरेशा प्राणवायूसाठी थोडं खालच्या पातळीवर येऊन विश्रांतीसाठी थांबलो.

खरं तर आम्हांला पोहोचायचं होतं ‘टुरटुक’ या गावी. लेहपासून अंदाजे 240 कि.मी.वर हे भारतीय हद्दीतलं शेवटचं गाव आहे. त्यापुढे सारा लष्करी प्रदेश. त्यामुळे टुरटुकला जाण्यासाठीसुद्धा खास परवानगी लागते. ती घेऊन आम्ही निघालो होतो. गवताचं पातंही नसलेले विविध रंगाचे, आकारांचे अवाढव्य पर्वत, चढणीचा किंवा उतरणीचा रस्ता, शेजारून प्रचंड वेगाने खळखळत जाणारी मातीमिश्रित रंगाची ‘श्योक’ नदी.

मध्येच राजस्थानातच शोभणारं मैलोन्‌मैल पसरलेलं वाळवंट आणि अत्यंत विरळ लोकवस्ती ही लडाखी प्रदेशाची वैशिष्ट्यं न्याहाळत आमचा प्रवास सुरू होता. वाटेत एक लष्करी ठाणं लागलं. त्या भयाण एकांतात ताठ उभ्या असलेल्या त्या सैनिकाला पाहून आम्ही अक्षरश: नतमस्तक झालो. राखीपौर्णिमेच्या निमित्ताने त्याला राखी बांधून, आमचा खरा रक्षणकर्ता तूच आहेस असं सांगून आम्ही पुढे निघालो.

अखेरीस टुरटुक आलं. तिथे एका खाजगी गेस्ट हाऊसच्या तंबूमध्ये आम्ही एका रात्रीसाठी विसावलो. आमचे टूर लीडर्स महेश बाड आणि नितीन तावडे यांनी त्या गेस्ट हाऊसच्या तरुण मालकाशी गप्पा मारायला सुरुवात केली आणि आम्हांला जाणवलं की सगळं नेहमीपेक्षा खूप वेगळं आहे.

1971 पूर्वी टुरटुक हे गाव पाकिस्तानात होतं. 71च्या युद्धात भारताने पुढे मुसंडी मारून स्ट्रॅटेजिक पोझिशन मिळवण्याच्या दृष्टीने या प्रदेशातील काही गावं जिंकून घेतली व शत्रूला पाठीमागे रेटलं. टुरटुक हे गाव त्यापैकीच एक.

गेस्ट हाऊसचा मालक सलमान याचा जन्म 1971 नंतरचा. चारपाच भाऊ. बारावीपर्यंतचं शिक्षण सर्वांनी लेहमध्ये जाऊन घेतलं. सगळे आता स्थिरस्थावर झाले आहेत. पाकिस्तानातून अचानक भारतात आल्याबद्दल काय वाटतं असं विचारल्यावर सलमान म्हणाला, मला काहीच वाटत नाही. कारण माझा जन्म भारतातलाच आहे, पण माझ्या आईवडिलांना मात्र सुरुवातीच्या काळात बराच मानसिक त्रास झाला. अक्षरश: दोन तासांच्या अंतरावर माझ्या मामाचं गाव आहे, पण 1971 नंतर आई आपल्या भावाला भेटू शकली नाही. नंतर अनेक वर्षांनी हजच्या यात्रेत दोघे बहीण-भाऊ पंचवीस तीस वर्षांनी भेटले तेवढेच.

तुला कधी तिकडे जावंसं वाटत नाही का?

या प्रश्नावर सलमान म्हणतो, ‘पूर्वी खूप प्रयत्न केले, पण आम्हांला जायचं असेल तर वाघा बॉर्डरवरून जावं लागतं. त्याशिवाय इतर खूप अडचणी येतात, खूप प्रश्न विचारतात. सतत संशयाने पाहतात म्हणून मग तो नाद आम्ही आता सोडून दिलाय. मात्र वडिलांनी एक सांगितलं, मी तीन ‘हुकूमत’ पाहिल्या आहेत. ब्रिटिश, पाकिस्तानी आणि आता हिंदुस्थानी! या सर्वांत उत्तम हुकूमत हिंदुस्थानची आहे. तेव्हा त्याचा फायदा करून द्या, शिक्षण घ्या आणि इमानेइतबारे रहा!’. म्हणून तर आम्ही सर्व भाऊ थोडेतरी शिकलो आणि स्वत:च्या पायावर उभे राहिलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लष्करी तळापर्यंत गेलो. वाटेत एक स्मारक लागलं. दोन वर्षांपूर्वी तिथे ढगफुटी झाली आणि लष्कराचं एक इस्पितळ, दहा जवान आणि काही पेशंटस्‌ यांना त्याचा तडाखा बसला. काही मिनिटांतच सारे श्योक नदीत गडप झाले. ही अक्राळविक्राळ नदी सतत चिखलमिश्रित पाणी घेऊन जोरात वाहत असते आणि पुढे पाकिस्तानात जाते. या दुर्घटनेतील अनेक मृतदेह पुढे पाकिस्तानात सापडले.

हिमालयातील वातावरणात केव्हाही, काहीही होऊ शकतं. इतकं ते बेभरवशाचं असतं याचा प्रत्यय हे स्मारक पाहताना आला. लष्करी तळाच्या प्रवेशद्वाराचं नाव होतं, रज्जब अली द्वार. योगायोगाने तिथे पहाऱ्यावर असलेल्या जवानाचं नाव होतं ‘झिया उल हक.’ इतक्या दूरवरून आम्ही आलो आहोत असं म्हटल्यावर आणखी काही जवान आले व थोड्या मोकळ्या गप्पा सुरू झाल्या.

‘पाठीमागचा तो डोंगर दिसतोय ना, तो पाकिस्तानात आहे. आता आपण भेटतोय हे सगळं ते दुर्बिणीतून पाहताहेत. त्याच्यासमोर आपलंही एक ठाणं आहे. तिथलं तापमान थंडीत उणे 35 ते उणे 50 पर्यंत असतं, पण आधुनिक तंबूंमुळे आता हे सारं सुसह्य झालंय. म्हणून त्या थंडीतही आपण तग धरू शकतो व संरक्षण करू शकतो.’ जवान सांगत होते.

‘त्यागशी’ हे गाव लष्करी तळाला लागून आहे. आम्ही गेलो तेव्हा गावात लगबग सुरू होती. गॅस सिलेंडर घेऊन गाडी आली होती. त्यामुळे रेशन कार्ड घेऊन लोक रांगेत उभे होते. लष्करी तळाच्या आतही एक शेवटचं गाव आहे. त्याचं नाव थांग. लष्करी हद्दीत असल्याने आपण तिथे जाऊ शकत नाही. थांगमध्ये एकूण बारा घरं आहेत. लोकसंख्या आहे बेचाळीस.

पाकिस्तानच्या बाजूने शेवटचं गाव आहे ‘फ्रनू.’ मग फ्रनू आणि थांग यांधले लोक येता-जातात का? या आमच्या बाळबोध प्रश्नावर गावकरी म्हणाले, ‘ते कसं शक्य आहे? दोन वेगळे देश आहेत ते!’ आणि मध्ये भूसुरुंग पेरले असतील तर? म्हणून गरजच असेल तर लोक ओरडून बोलतात, तेवढंच!

युद्धाची किंवा तोफगोळ्यांची भीती नाही वाटत? या प्रश्नावर सलमान म्हणाला, ‘फक्त आवाज ऐकू येतात, पण पाकिस्तानने मारलेल्या तोफगोळ्यांच्या मार्गाच्या आत आमचं गाव येत असल्याने आम्ही सुरक्षित आहोत. गोळे कुठेतरी भलतीकडेच जाऊन पडतात.’

आम्ही पुन्हा टुरटुक गावात आलो. तिथे सतराव्या शतकातील एका मशिदीचं नूतनीकरण सुरू होतं. तिथे असलेल्या अब्दुल गफूर या वृद्ध गृहस्थांनी आम्हा सर्वांना, स्त्रियांसकट ही मशीद आतून दाखवली. आता ही मशीद अधिक प्रशस्त होतेय. मुख्य म्हणजे जुन्या लाकडी वास्तूचं सौंदर्य कायम ठेवून नूतनीकरण करण्यात येतंय हेही आमच्या लक्षात आले.

सरकारने आम्हांला मदत केली, काही श्रीमंत गावकऱ्यांनी मदत केली म्हणून हे शक्य झालं असं ते आनंदाने सांगतात. 1971 च्या युद्धाच्या वेळेस गफूरभाई जेमतेम 15 वर्षांचे होते. त्यांना पूर्वीपेक्षा आताच्या स्थितीबद्दलच बोलायला जास्त आवडत होतं. गावात सर्व सोयी आहेत हे ते आवर्जून सांगतात. वीज, पाणी, शाळा, गॅसजोडणी ग्रामपंचायत हे सगळं व्यवस्थित सुरू आहे, याकडे ते लक्ष वेधतात.

अब्दुल रशीद हे 1971 साली पंचवीस वर्षांचे होते. त्यांना त्या काळाबद्दल विचारलं तर ते मोठ्याने हसले, म्हणाले, ‘त्या वेळी आमच्याकडे काय होतं? गावात शाळाच नव्हती म्हणून तर मी निरक्षर राहिलो. दिवसभर मेंढ्यांमागे हिंडणं, मिळेल ते काम करणं, क्वचित भीक मागणं हेही केलंय. युद्धानंतर बऱ्याच काळानंतर आम्हांला कळलं की आपण आता हिंदुस्थानात आहोत. सुरुवातीचे दिवस खूप कमाईचे होते. कारण लष्करात मालाची ने-आण करण्यासाठी गाढवं लागायची, ती आम्ही पुरवायचो. हळूहळू स्थैर्य आलं व सुधारणा झाल्या. आता गावात शाळा आली. इतकंच नव्हे तर आमच्या तरुण मुलांना सरकारी, खाजगी नोकऱ्या मिळू लागल्या, यापेक्षा आणखी काय हवं? पूर्वी आमच्याकडे यापैकी काहीही नव्हतं. आता कुणी आजारी असेल तर लष्कराचं इस्पितळ आहे. कुणी खूपच गंभीर आजारी असेल तर लष्कराच्या हेलिकॉप्टरने लेहपर्यंत जाता येतं.

रशीदभार्इंनी आणखी एक किस्सा सांगितला. तोही हसत हसत. ते म्हणाले, ‘1971 च्या युद्धाच्या सुमारास, जवळच एक गाव आहे, त्या गावातल्या लोकांनी अचानक निर्णय घेतला की, आपण पाकिस्तानात आणखी आत सुरक्षित ठिकाणी जायचं. अक्षरश: एका रात्रीत सर्व सामान गाढवांवर लादून ते गाव रिकामं झालं. आता त्यांचं तिकडे काय सुरू आहे माहीत नाही.

बोलता बोलता रशीदभाई मशिदीच्या बाहेर आले. आजूबाजूला अनेक गोरीपान, निरागस मुलं जमली होती. मुख्यत: त्या मुलांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा निर्भयपणा होता. ‘ये बच्चे अब स्कूल जाते है, ये सब अल्लाह की रेहेम है!’

रशीदभाई व गफूरभाई यांनी आकाशाकडे एकदमच बोट दाखवले. नव्या पिढीच्या पाठीवर भूतकाळाचं ओझं नाहीय, त्यांना लेहला जाऊन खूप शिकण्याची इच्छा आहे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ या गावाला आता कळला आहे.

Tags: खारदुंग पास लडाख हिंदुस्थान हिमालय Khardung Pass पाकिस्तान Ladakh Hindustan Himalayas Pakistan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके