डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

हॉकर्स युनियनने मोर्चा काढून लाठीमार सोसला व आपले गाऱ्हाणे वेशीवर टांगले हे योग्यच होय. हॉकर्ससाठी महापालिकेने वेगळा विभाग करणे योग्य होईल. पण याचा अर्थ असा नव्हे की, असा विभाग निर्माण होईपर्यंत हॉकर्सनी फूटपाथ आणि दोन्ही बाजूनी रस्त्यांचा अर्धाअधिक भाग वापरून पायी चालणाऱ्यांना जीव मुठीत धरून चालण्यास भाग पाडावे! पश्चिम रेल्वेच्या दादर स्टेशन बाहेर पडताना लिंबूसरबताची तीन पातेली गाड्यांवर मांडून हॉकर्स उभे असतात. त्यांची तेथे आवश्यकता काय?

एप्रिलचा पहिला आठवडा जवळ येत चालला की मुंबईच्या महापालिकेत महापौर पदासाठी व वैधानिक समित्यांच्या अध्यक्ष पदासाठी हालचाली सुरू होतात. मावळते महापौर डॉ. प्रभाकर पै यांनी महापौरपद तीन वर्षांसाठी असावे, असे आपले मत व्यक्त केले आहे. आपण कापड कामगारांचा संप मिटविण्यात यशस्वी होऊ शकलो नाही याबद्दल खंत व्यक्त केली आहे तसे करण्याची वस्तुतः आवश्यकता नव्हती. जी गोष्ट ज्येष्ठ नेत्यांना जमली नाही अथवा जमवू दिली नाही, ती महापौरांना जमली नाही म्हणून खंत कशासाठी करायची? डॉ. पै दूरदर्शनवरील मराठी कार्यक्रमांच्या प्रमाणाबाबत आता गतार्थ झालेल्या बिहारप्रेसबिलाबाबत या शहराचे पहिले नागरिक म्हणून लढण्यात आघाडीवर होते याबद्दल त्यांना धन्यवाद!

हॉकर्स युनियनने मोर्चा काढून लाठीमार सोसला व आपले गाऱ्हाणे वेशीवर टांगले हे योग्यच होय. हॉकर्ससाठी महापालिकेने वेगळा विभाग करणे योग्य होईल. पण याचा अर्थ असा नव्हे की, असा विभाग निर्माण होईपर्यंत हॉकर्सनी फूटपाथ आणि दोन्ही बाजूनी रस्त्यांचा अर्धाअधिक भाग वापरून पायी चालणाऱ्यांना जीव मुठीत धरून चालण्यास भाग पाडावे! पश्चिम रेल्वेच्या दादर स्टेशन बाहेर पडताना लिंबूसरबताची तीन पातेली गाड्यांवर मांडून हॉकर्स उभे असतात. त्यांची तेथे आवश्यकता काय? या हॉकर्सना तेथून कायमचे घालविण्यात अथवा त्यांनी केलेली लिंबाच्या सालीची घाण आणि चिखल निस्तरण्यात कोणीही यशस्वी झालेला नाही. फार फार तर तीन दिवस ते अदृश्य होतात. पुनः पहिले पाढे पंचावन्न! पोलिस खात्याशी 'सरबती गोडवा' किंवा 'सँकरिन ओलावा' असल्यावाचून हे घडणे अशक्य आहे. असा ओलावा असेल तर त्यांना दुसऱ्या जागा द्या. लक्षावधी प्रवाश्यांची अडचण करता? जे तृषार्त असतील त्यांच्यासाठी फलाटावर लिंबू पाण्याचे स्टॉल्स आहेत. त्या स्टॉल्सवर किमान स्वच्छता राखण्याचे बंधन तरी असते. पाव-भाजीवाले, सरबतवाले यांच्यावर तेही बंधन नसते. सगळ्या रस्त्याला घाणीने ते उदास अवकळा निर्माण करून ठेवतात. त्यांच्या जोडीला सुई-दोरा, बॉलपेने, फिलर्स यांचा थाळा मांड मांडून बसतो. स्टेशनमधून बाहेर पडताच या गोष्टी प्रवाश्यांना आवश्यक असतात काय? महापालिका आणि पोलिस यांनी फुटपाथ पदातींना चालण्यायोग्य करण्याचे कडक धोरण तूर्त अवलंबिले आहे याचे मुंबईकर नागरिक स्वागत करत आहे. केवळ युनियनचे सभासद म्हणून हॉकर्सवाल्यांची बाजू श्री. शरदराव यांनी घेऊ नये. हॉकर्सवाले बंधनातीत आहेत अथवा 'स्वच्छ' आहेत असे समजू नये. श्री. शरदराव भ्रष्टाचाराविरुद्ध महापालिका बैठकीत जो गौप्यस्फोट करतात त्याबद्दल त्यांचे जरूर अभिनंदन! 1लाख 65 हजार रु. किमतीचा सोन्याचा तराजू भेट म्हणून कंत्राटदाराकडून स्वीकारणारा आणि आता सेवानिवृत्त होणारा जो कोणी महापालिका अधिकारी असेल त्याला लख्ख प्रकाशात आणावा. मुंबईकर त्याबद्दल त्यांना जरूर धन्यवाद देतील. महापालिकेची अवास्तव अनुदान प्रकरणे हीसुद्धा नगरसेवकांच्या टीकेचा विषय झाली पाहिजेत. ज्यांची मानवतावादी दृष्टिकोनातून फार महत्त्वाची कामे झीज सोसून मुंबईत चालतात त्यांची अनुदाने दरवर्षी क्रमशः कापली जातात आणि ज्यांचे खरोखरी महापालिकेच्या अनुदानावाचून काहीही अडलेले नाही, त्यांना अनुदाने मिळतात! हा खेळ काही नियमांनी बांधून घेऊन चालला पाहिजे. भ्रष्टाचाराने किडलेली व थकबाक्या वसूल करण्यात चुकारपणा करणारी महापालिका लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग निर्मूलन ट्रस्टचे अनुदान सपासप काटीत सुटते याचा अर्थ काय? मुंबईत कुष्ठरोग निर्मूलनाचे काम चांगल्या प्रकारे व्हावे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी नाही काय? या कामाची प्रशंसा आयुक्त दिलखुलासपणे करतात आणि 1 लक्ष 62 हजार रु. ट्रस्टचा औषधांचाच खर्च असता महापालिकेचे अनुदान फक्त 25 हजारांवर आणून ठेवतात याचा अन्वयार्थ कसा लावायचा हेच समजत नाही!

माजी राष्ट्रपती श्री. संजीव रेड्डी मुंबईत येऊन 'अभ्यासपूर्ण' व्याख्यान ठोकून गेले. गेले आठ महिने ते देशाच्या एकात्मतेचा अभ्यास करीत होते, असे त्यांनी सांगितले आहे. 'करून करून भागली व देवपूजेस लागली!' अशातलाच हा प्रकार म्हणावयाचा. ज्यावेळी ते राष्ट्रपतिपदावर होते, त्यावेळी राष्ट्रीय एकात्मतेचा अभ्यास करते तर देशाला काही प्रमाणात तरी त्याचा फायदा झाला असता. शस्त्र व सैन्य बळावर देशाची एकता तुम्ही टिकवू शकणार नाही, हे त्यांनी इंदिराजींना आता सांगितले. आसाम व पंजाबच्या संदर्भात व दक्षिणेतील चार मुख्यमंत्र्यांच्या मंडळ निर्मितीच्या संदर्भात ते बोलले. या मतप्रदर्शनात तसे काही गैर नाही. पण इंदिराजींवर रेड्डींच्या शब्दांचे वजन किती? त्यांचे पाणी इंदिराजींनी 1979 आणि त्याआधी 1969 सालीच जोखलेले. स्व.जयप्रकाशजींच्या कल्पनेतील बाग उद्ध्वस्त करण्यात श्री रेड्डींचा केवढातरी वाटा. श्री.फक्रुद्दिन अली यांच्यापासून राष्ट्रपतिपदाचे जे अवमूल्यन झाले ते अजून कायम आहे. असे राष्ट्रपती त्या पदावर असताही देशाचे भले करीत नाहीत. सेवानिवृत्तीत ते काय कपाळ करणार?

Tags: फक्रुद्दिन अली. भ्रष्टाचार शरद पवार कचरा दादर हॉकर्स युनियन प्रभाकर पै बीएमसी Fakruddin Ali. #मुंबई वार्ता Corruption Sharad Pawar Filth Dadar Hawkers Union Prabhakar Pai BMC #Mumbai news weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके