डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आदिवासी सहज शिक्षण परिवार केंद्रातील 24 डिसेंबरचा बालक मेळावा

या कार्यक्रमासाठी आदिवासी परिवारातील सर्व कार्यकर्ते, सर्व शिक्षिका व मुले तळमळीने काम करीत होती. श्री. इप्ते सुरेश, हरेश, नाना यांना हाताशी घेऊन मनापासून स्टेज व स्टेजसमोरील जागा सजवत होते. मीराताई भागवत यांनी युनियन जॅक स्वतः तयार केला होता. कमा, कुंता, रेणुका सर्वांना मस्त जेवण करून घालत होत्या होस्टेलची प्रमुख रोहिणी सर्वच कामांत मनापासून मदत करीत होती.

मासवण येथील आदिवासी सहज शिक्षण परिवारातील सर्व बालवाडीतील मुले आणि होस्टेलच्या मुलींनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास साने गुरुजी जयंती निमित्ताने 24 डिसेंबरला सादर केला. याच दिवशी दर वर्षी बालक मेळावा भरवला जातो. दर वर्षी निरनिराळे कार्यक्रम होतात पण यंदा स्वातंत्र्याची 50 वर्षे साजरी होत असताना स्वातंत्र्याचा इतिहास आपल्या मुलांपुढे नाट्यमयरीतीने बोलका व्हावा ही अनुताईंची इच्छा. त्यासाठी त्यांनी मसुदा तयार केला. त्यात शुभदा कर्णिक यांनी आपल्या विचारांची भर घातली, इंदूताई नवले व वर्षा गुप्ते यांनी मासवणला जाऊन सर्व केंद्रांना वेगवेगळे प्रसंग ठरवून दिले. दरी-डोंगरातील मुले काय वाक्ये बोलू शकतील हा प्रश्नच होता. पण त्यांचे बोबडे बोल त्यांच्या आदिवासी भाषेला छान समृद्ध करून गेले. 

वेवूर केंद्रातून इंग्रजांनी भारताचे ग्रामोद्योग मोडले हे दृश्य पहिले होते. त्यासाठी एका छोटा मुलगा शर्ट काढून स्टेजवर आला. 'बघा हो पाटील, गोल्या साहेबांनी मला मालं.' पाठीवर ओरखडे निळया लाल शाईने काढले होते. नंतर झाशीची राणी जोरात आली. इंग्रजांचा खलिता बघून त्वेषाने म्हणाली, 'मेरी झांसी मैं नहीं दूंगी.' जोतिबा फुले व सावित्री, आगरकर, लोकमान्य टिळक, सुभाषबाबू, साने गुरुजी, पंडित गांधी आणि कस्तुरबा, अरुणा असफअली, शिरीषकुमार व त्याचे सोबती, उषा  महेता अशा स्वातंत्र्यवीरांच्या भूमिका या आदिवासी मुलांनी सहज केल्या होत्या. 

जोतिबा शिकवीत असताना सावित्रीचे लाजणे. 'शेटणी' शब्द लिहिताना त्यांना झालेला आनंद, दगड लागला तरी न घाबरलेली सावित्री; एक स्त्री शिकली तर सारे कुटुंब शिकते - म्हणून मी मुलींना शिकवणारच असा निर्धार करून समाजात वावरणाऱ्या सावित्रीच्या संदर्भातील मुलींनी म्हटलेल्या ओव्या मनाला स्पर्षुन गेल्या. आगरकर ठामपणे बोलले. टिळकांची 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक आहे.' ही घोषणा डोक्यावर पगडी व मिशा सावरत मुली निर्धाराने बोलून गेल्या. त्यानंतर आले स्वातंत्र्यवीर सावरकर. पोलीस सावरकरांना बेडी घालून नेताना म्हणतो, 'तू आणखी 50 वर्षे शिक्षा भोगाया तयार आहेस का?' काळी टोपी, कोट, धोतर घातलेले सावरकर म्हणतात, अजून 50 वर्षे गोऱ्या साहेबांचे राज्य राहणार तरी आहे का?' हे वाक्य मुलगी त्वेषाने बोलून जाते. सावरकरांना पोलीस घेऊन जातात आणि 'ने मजसी ने परत मातृभूमीला' ह्या ओळी म्हटल्या जातात. 

मुलामुलींना गोष्ट सांगणाऱ्या साने गुरुजींचाही एक प्रवेश होतो. गांधीजींनी सुरू केलेली चळवळ, गांधींचे भाषण आणि कस्तुरबांचा चंपारण्यातील करुण अनुभव- कस्तुरबा आणि इतर महिला एका झोपडीत पाणी मागावयास जातात. दाराच्या आतूनच पाण्याचा पेला बाहेर येतो. 'बाई तुम्ही पाणी दिलं पण तुम्ही बाहेर का येत नाही ?' हा कस्तुरबांचा प्रश्न. उत्तर येतं, आमच्या घरामंदी आमी तीन बायका आमच्या तिघींत एक लुगडं आहे. ते नेसून एकजण बाहेर बाजाराला गेली. आम्हांला नेसायला कपडे नाहीत, आमी बाहेर भायर कसं येणार?' कस्तुरबांच्या तोंडून 'अरेरे, केवढी ही गरिबी? आपण हे बापूजींना सांगितलेच पाहिजे' असे उद्गार निघतात. चिमुकल्या कस्तुरबा आपली साडी सावरीत पडद्याआड निघून जातात. 

मग उगवते 1942 साल. 9 ऑगस्टचा दिवस. लहानसे गांधीजी सांगत होते. 'इंग्रजांनो चालते व्हा, चले जाव, भारत छोडो, 'करेंगे या मरेंगे', सगळेच लहानसे पुढारी घोषणा देऊ लागले. अरुणा असफअली झेंडा लावून निघून जातात. आपल्या कोवळ्या आवाजात खणखणीतपणे अजिबात न घाबरता गांधीजी माईकसमोर बोलत होते. हे काम केलेला मुलगा एक बाळगीच होता. 10/15 वर्षापूर्वी तोंडातून एक शब्दसुद्धा निघण्याची मुश्किल असलेली ही बालके आज हावभावासहित धडाधड संवाद म्हणत होती. शिरीषकुमार झेंडा हातात घेऊन मिरवणुकीने स्टेजवर आला. आपण झेंडा लावणारच म्हणून मित्रांना सांगत होता. पोलीस पण बोबडा व सर्वच बोबडे. शिरीषकुमार पडला पण झेंडा हातातला सोडला नाही. पाणी पाणी करत केविलवाणा शिरीषकुमार डोळे मिटतो.

सुभाष बाबू ची पलटण येते. 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा' सुभाषबाबू गरजतात. मागून के. लक्ष्मी. तालात 'कदम कदम बढाये जा' अशा ओळीत म्हणतात. पलटण पडद्याआड निघून जाते. शेवटी गांधी नीखालीला निघून गेले हे दृश्य सादर केल्यावर सर्व पुढाऱ्यांची सुटका झाली आणि पं. जवाहरलाल नेहरूंबरोबर लाल किल्ल्यावर सर्व पुढारी जमले. युनियन जॅक काढून तिरंगा फडकवला जातो. या दृश्याच्या वेळी अनुताई, माई, शुभदाताई आणि अनेक कार्यकर्ते स्टेजवर मुलींबरोबर गेले. स्वातंत्र्य मिळाल्याचे हे दृश्य अनेक घोषणांनी दुमदुमून गेले. 

'भारत माता की जय हम सब एक है, हिंदू मुस्लिम एक है वंदे मातरम्' अशा घोषणा सर्वजण देत होते. या सर्व कार्यक्रमात प्रसंगानुरूप वेळोवेळी अँटमबॉब बाहेरच्या बाजूला लावले जात होते. त्यामुळे एक वेगळेच वातावरण निर्माण झाले. असा हा स्वातंत्र्य संग्राम जल्लोषामध्ये भाबड्या लाजाळू आदिवासी बालकांनी उत्स्फूर्तपणे सादर केला. 

या कार्यक्रमासाठी आदिवासी परिवारातील सर्व कार्यकर्ते, सर्व शिक्षिका व मुले तळमळीने काम करीत होती. श्री. इप्ते सुरेश, हरेश, नाना यांना हाताशी घेऊन मनापासून स्टेज व स्टेजसमोरील जागा सजवत होते. मीराताई भागवत यांनी युनियन जॅक स्वतः तयार केला होता. कमा, कुंता, रेणुका सर्वांना मस्त जेवण करून घालत होत्या होस्टेलची प्रमुख रोहिणी सर्वच कामांत मनापासून मदत करीत होती. 

सर्व शिक्षिका आपल्या केंद्राचे कार्यक्रम चांगले झाले पाहिजे म्हणून दक्ष होत्या. या सर्वावर सुमनताई, डॉ. सुधाताई, डॉ. रुपणे हे सर्वजण बारकाईने नजर ठेवून कोठे काही कमी पडत नाही ना याची काळजी घेत होते. इंदूताई नवले, शुभदा कर्णिक, वर्षा लहानात लहान होऊन मुलांकडून उत्तम अभिनय करून घेत होत्या. जोडीला माया होतीच. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मुंबईच्या सुनंदा सहकारच्या अध्यक्षा श्रीमती लीलाताई मोरे होत्या. ठाणे, मुंबई पालघर पुणे येथुन हितचिंतक आले होते. एकूण सर्वच आदिवासी परिवार स्वातंत्र्यसंग्राम यशस्वी करण्यात गुंतून गेला होता.पण.. सर्वाच्या मनातले दुःख होते, आमच्या संग्रामातील एक शूर नेत्या शुभांगीताई नाहीत, आणि त्यांच्या चेहेऱ्यांवर ते दिसत होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती वर्षा गुप्ते यांनी केले.

Tags: बालक मेळावा नाट्यमय आदिवासी आदिवासी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके