मग संग्रहालयाकडे वळून पु. ल. म्हणाले, "आजच भाई जीवनजी लेनमधील मराठी ग्रंथ संग्रहालयाची मूळ वास्तू बघून मी इकडे आलो. ही वाटचाल प्रशंसनीयच आहे, कारण ज्ञान हे गिरगावातून गिरणगावात येणे हीच त्याच्या प्रगतीची योग्य दिशा होय." मग मराठी भाषेच्या दुःस्थितीकडे वळून ते म्हणाले, "महाराष्ट्र राज्य मराठी भाषेला दासीच्या भूमिकेत पाहण्याची कल्पना मला सहनच होत नाही! संस्कृतप्रचुर शब्दांची पेरणी करून ज्ञानाची संपूर्ण मक्तेदारी आपल्या हाती ठेवण्याचा एका ठरावीक वर्गाचा खटाटोप चालू आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे.
श्री मधु लिमये इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या बाराव्या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून हजर होते. त्यांच्या या भाषणावर मुंबईतील प्रतिक्रिया काय, यापेक्षा इंडो- सोव्हिएत कल्चरल सोसायटीने या वेळी मधु लिमये यांना उद्घाटक म्हणून बोलावले यावरच प्रतिक्रिया व्यक्त झाली. श्री मधु लिमये यांच्या भाषणात एकही विधान टीकास्पद नव्हते. चीनने भारताच्या उत्तर व ईशान्य सीमांवरील बळकावलेला प्रदेश परत केल्याखेरीज या दोन देशांमध्ये मैत्री प्रस्थापित होणे शक्य नाही, या विधानाला कोणता भारतीय सुपुत्र आक्षेप घेईल?
रशिया-भारत मैत्री कराराचेही महत्त्व कोण दुर्लक्षील ? तेव्हा या प्रश्नावर श्री लिमये यांच्याशी कोणाचा मतभेद नाहीच. रशियन लॉबीने लिमयांचा योग्य वेळी आपल्या कामासाठी उपयोग करून घेतला, अशी प्रतिक्रिया मात्र व्यक्त होत आहे. ती लक्षात घेण्याजोगी आहे, एवढे मान्य करावे लागेल. परराष्ट्रमंत्री श्री अटल बिहारी यांनी चीनला भेट देण्यास सध्याची वेळ सोयीची नाही; असे श्री लिमये जाहीरपणे म्हणाले आणि नंतर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे का असेना पण अटलजींची चीनभेट रद्द झाली, हा घटनाक्रम लोकांच्या पुढे आहे. त्यातून या प्रतिक्रिया व्यक्त होतात. श्री मधु लिमये चरणसिंगांचे बळ तेवढे लक्षात घेऊन त्यांचे दोष दुर्लक्षित करतात आणि त्यांच्या समर्थनार्थ बोलताना व वागताना अप्रत्यक्षपणे आपण इंदिराजींच्या समर्थकांच्या शक्ती पुष्ट करत आहोत, हे त्यांच्या कसे ध्यानात येत नाही, अशीही प्रतिक्रिया ऐकू येते.
जनता केंद्रात राजाभाऊ
ताडदेवचे जनता केंद्र ज्या अनेकांच्या चिवट परिश्रमांमुळे उभे राहिले त्यांत सध्याचे महापौर श्री राजाभाऊ चिंबुलकर यांचा वाटा मोठा आहे. मगरीने गिळलेले माणीक तिच्या पोटातून परत मिळवण्याच्या पराक्रमासारखा तो पराक्रम होता! कचरापट्टीची ही जागा जनता केंद्रास देऊ नये, असा महापालिका सुधार समितीने प्रस्ताव केला होता. ही जागा समाजकंटकांच्या हाती जाण्याचा निखालस धोका निर्माण झाला होता. सुधार समितीचे सर्व आक्षेप तिला परत घ्यावयास लावण्यासाठी पुरावा उभा करण्याचे काम प्रामुख्याने राजाभाऊंनी केले आणि जनता केंद्र अस्तित्वात आले! अजूनही या इमारतीचे सर्व कर्ज फिटलेले आहे असे नाही. पण समाजवाद्यांना हक्काची अशी ही जागा झाली. हा ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी राजाभाऊंचा सत्कार केंद्रातर्फे गेल्या आठवड्यायात झाला. अध्यक्षस्थानी श्री एसेम जोशी होते. आणीबाणीत या जागेचा केवढा उपयोग झाला, हे एसेमनी सांगितले. कसोटीच्या वेळी साधना प्रेस, जनवाणी प्रेस, जनता केंद्र याच जागा उपयोगी पडल्या, त्यामुळे शील राखून काम करता आले, अशी कृतार्थतेची भावना त्यांनी व्यक्त केली. एक प्रकारे राजाभाऊंचा हा सरकार म्हणजे घरेलू मामला होता. त्यामुळे त्यात अगत्य ओतप्रोत होते.
पु. ल. देशपांडे
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या 80व्या वर्धापनदिनी श्री पु. ल. देशपांडे अध्यक्षीय भाषण करणार म्हटल्यावर नायगावमधील ग्रंथ संग्रहालयाच्या इमारतीतील हॉल अपुरा डणार, हे ओघानेच आले. त्यासाठी मग शारदा थिएटरची योजना झाली. तीही अखेरीस अपुरीच ठरली. अनेकांनी उभे राहून पु. लं.च्या भाषणाचा आस्वाद घेतला. आपल्याकडे विदुषकी टोपी घालणारे विनोदी लेखक व कानटोपी घालणारे विचारवंत लेखक, अशी एक दुटोकी विभागणी लोकांनी करून टाकली आहे ती चुकीची आहे. पु. ल. गंभीर विषयही प्रकट चिंतनात्मक पद्धतीने उत्तम हाताळतात आणि त्यांच्या विनोदातील ध्वन्यर्थाने माणूस जेवढा अंतर्मुख होतो तेवढाच त्यांच्या चितनशील गंभीर लेखानेही होतो. या वर्धापनदिनी विनोदाची पखरण भरपूर होती तरी पु. लं. चा रोख, हसवण्याचा धंदा ही भूमिका बजावण्याचा नव्हता. मराठी वाचक; शासन आणि विशेषत: शासनातील राज्यव्यवहार कोशकर्ते यांना अंतर्मुख बनवण्याचा होता हे शब्दाशब्दांतून जाणवत होते. अपुरी प्रकाशयोजना असल्याने पु.ल. आकृतीने झगमगीतपणे आमच्यापुढे उभे आहेत असे दिसत नव्हते, पण त्यांच्या भाषणाचा ओघ प्रकृतिअस्वास्थ्यामुळे नेहमीचा नाही, एवढे मात्र जाणवत होते.
संचित ज्ञानाचा आरसा
प्रा. गं. बा. सरदार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यास दाते सूचिग्रंथ समिती 1800 ते 1950 या दीडशे वर्षांच्या काळातील मराठीतील नियतकालिकांतील लेखांची सूची-खंड प्रसिद्ध करण्याचे काम शिकस्ती करीत आहे. 74 वर्षांपासून क्रमश: दरवर्षी एकेक खंड- या प्रकारे यंदा पाचवा खंड प्रकाशित झाला. पु. लं.च्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले. हे काम मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने अंगावर घेतलेले आणि सरदारांच्या समितीकडे सोपवले. दाते यांचा पहिला सूचिग्रंथ म्हणजे मराठीतील संचित ज्ञानाचा आरसा. दात्यांनी या कामाला जी पद्धती लावून दिली ती मूळ कोणत्या काळात कोणत्या विषयावरील पहिला लेख प्रसिद्ध झाला हे जसे समजते त्याप्रमाणे कोणत्या कालखंडात कोणत्या वाड्मयीन वा सामाजिक चळवळी झाल्या तेही समजते. नव्या पिढीतील ज्यांना अभ्यासू लेखक म्हणून पुढे यावयाचे आहे त्यांना या सूचिग्रंथाचा अभ्यास फारच उपयोगी पडेल. कोकणी-मराठीचा वाद आपण अगदी अलीकडील असे मानतो, पण या वादावरील पहिला लेख 1850 मध्ये ज्ञानोदयात येऊन गेला आहे! विधवांनी कुंकू लावावे की लावू नये, या वादाला तीस ते चाळीसच्या दरम्यान तोंड फुटले असे वाटत असले तरी त्यावरील पहिला लेख असाच 1861च्या ज्ञानोदयात येऊन गेला. दात्यांनी सूचिग्रंथ करून एक प्रकारे आक्रोडाची बागच लावली, असे प्रा. मालशे म्हणाले ते अगदी खरे आहे. या बागेतील आक्रोड खाऊन आपण विद्वान झालो अशी स्पष्ट कबुली तर त्यांनी दिलीच, पण प्रियोळकरांनी प्रथम दिलेल्या या सूचिग्रंथाचे महत्त्व न कळल्याने आपण तो 25 रु. स विकला व महत्त्व लक्षात आल्यावर आपणाला तो पुन्हा 800 रुपयांस खरेदी करावा लागला, हे त्यांनी सांगताच अविद्वानांनाही सूचिग्रंथाचे 'खरे मूल्य' समजले. अशा या महत्त्वपूर्ण ग्रंथाचा पाचवा खंड दात्यांच्या पुण्यतिथीस व ग्रंथ संग्रहालयाच्या ऐंशीव्या वर्धापन दिनास प्रकाशित झाला ही नामी गोष्ट झाली.
पु. लं. चे. गृहच्छिद्र
पु. लं. नी आपल्या भाषणात प्रथमच सांगून टाकले की जीवनात अलौकिक असे वेड, मग ते कोणत्याही विषयातील असो, लागलेला माणूस पाहिला की मला त्याच्याबद्दल आदर वाटतो. ते पुढे म्हणाले, "सूचीकार दाते या माणसाने अनेक वर्षांपासून माझ्या मनात घर केले आहे. पार्ल्याच्या टिळक मंदिरात मी त्यांचा सूचिग्रंथ प्रथम चाळला त्या वेळी माझे बालपण संपले होते तरी बालपणा संपलेला नव्हता, आमचे आजोबा ऋग्वेदी हे मोठमोठ्या ग्रंथांचे कर्ते. पण सुशिक्षित विद्वानांनी एकतरी नाटक लिहिलेच पाहिजे व सुशिक्षित स्त्रीने एकतरी मंगलाष्टक रचलेले पाहिजे, हे शिष्टसंगत मानले जात असण्याच्या त्या काळात आमच्या आजोबांनीही ‘प्रेमनिराशी’ आणि ‘समाजोन्नती’ नावाची दोन नाटके लिहिली होती, छापूनही प्रसिद्ध केली होती. माझ्या फावल्या वेळात मला ती वाचावयास देऊन माझी नाटकांविषयीची आवड नष्ट करण्याचा त्यांनी त्यांच्याकडून प्रयत्न करून बघितला होता! ती नाटके या सूचीत आहेत की नाहीत, हे बघण्याचा मी प्रयत्न केला. खरे तर एक गृहच्छिद्र म्हणून आम्हीच ती लपवून ठेवली होती, पण दात्यांच्या सूचिग्रंथात ती मला आढळली आणि दात्यांसंबंधीचा आदर द्विगुणित झाला. या दात्यांचा मुंबईच्या ब्राह्मण समेत महामहोपाध्याय पां. वा. काणे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार झाला होता. ब्राह्मणसभेत गाण्यासाठी म्हणजे गाणे ऐकण्यासाठी जायचे असेल तर ब्राह्मण असावे लागते! व्याख्यानाला ती अडचण नाही, म्हणून मी गेलो, दात्यांचे पुणेरी विद्वानाचे देखणेपण पाहून विलक्षण आनंदात घरी परतलो. ती भावना व्यक्त करण्याची संधी आज हे अध्यक्षस्थान देऊन आपण दिलीत हा मी माझा मोठाच गौरव समजतो.’’
गुरुदक्षिणा दिली पाहिजे
‘‘या सूचिग्रंथातून जे लोक रस्ते शोधून काढतात त्यांनी खरोखर या ग्रंथाला गुरुदक्षिणा दिली पाहिजे. थोर माणसे संस्था आणि कार्यपद्धती निर्माण करून ठेवतात आणि मग मिरवणारी माणसे त्या संस्थेच्या निवडणुका, हरकतीचे मुद्दे इत्यादी घटपटात मश्गूल होतात. हे मी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाबद्दल म्हणत नाही (असे पु. ल. म्हणाले तेव्हा जाणती मंडळी मिश्किलपणे हसली.). पण दात्यांनी सूचिग्रंथ कसे तयार करावेत याची पद्धती घालून दिली आणि ते काम पुण्याला अक्षरश: एका बिऱ्हाडी टिचभर खोलीत चालते. वृद्ध बर्वे, वृद्ध काळे, वृद्ध केळकर आपापले म्हातारपण विसरून कार्यरत असतात. दात्यांनी एक शिस्त घालून दिली. उदाहरणार्थ, धर्म चिकित्सेवरील लेख निवडताना आक्रमक धर्मप्रसारकांच्या लेखाची सूचीकारांनी दखल घेऊ नये, असे सांगितले. नियतकालिकांची सूची करणे ही काय सोपी गोष्ट आहे? आपल्याकडे जुने सांभाळून ठेवणे कुणाला जमलेलेच नाही. शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर मिळत नाही, पण तिकडे नेपोलियनची साठ हजार पत्रे उपलब्ध आहेत! म्हणून ज्यांना ज्यांना अगत्य आहे त्यांनी या मंडळावर आपल्याकडील पत्रांचा पाऊस पाडला पाहिजे!"
रवीन्द्रनाथांची विकृत बंगाली
मग संग्रहालयाकडे वळून पु. ल. म्हणाले, "आजच भाई जीवनजी लेनमधील मराठी ग्रंथ संग्रहालयाची मूळ वास्तू बघून मी इकडे आलो. ही वाटचाल प्रशंसनीयच आहे, कारण ज्ञान हे गिरगावातून गिरणगावात येणे हीच त्याच्या प्रगतीची योग्य दिशा होय." मग मराठी भाषेच्या दुःस्थितीकडे वळून ते म्हणाले, "महाराष्ट्र राज्य मराठी भाषेला दासीच्या भूमिकेत पाहण्याची कल्पना मला सहनच होत नाही! संस्कृतप्रचुर शब्दांची पेरणी करून ज्ञानाची संपूर्ण मक्तेदारी आपल्या हाती ठेवण्याचा एका ठरावीक वर्गाचा खटाटोप चालू आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. संस्कृतप्रचुर मराठीला नाहीतर फर्ड्या इंग्रजीला मान आहे; पण सर्वांना समजणाऱ्या साध्या-सोप्या मराठीला तो नाही. बंगालमध्येही हीच प्रवृत्ती बघितली. तेथेही साधुभाषा म्हणजे संस्कृत प्रचुरभाषा ही आदरणीय आणि चली म्हणजे ‘चालू चहा’प्रमाणे सर्वसामान्यांसाठी असलेली भाषा उपेक्षणीय मानली जाते. एकदा रवीन्द्रनाथांनी चली भाषेत लिहिलेला एक परिच्छेद मॅट्रिकच्या परीक्षेला प्रश्नपत्रिकेत दिला होता व हे विकृत बंगाली सुधारून लिहा असे विद्यार्थ्यांना फर्मावले होते! आपल्याकडे आपल्या प्राकृत बोलीने क्षणभरात लाखोंच्या ह्रदयाला हात घालणाऱ्या गाडगे महाराजांच्या भाषेला मान नाही. त्यांना खरे शब्दप्रभू समजायला हवे. विंदा करंदीकरांचे शिशुगीत आपल्याकडे उच्चभ्रूंना आवडत नाही, त्यांना हवा 'जॅक अॅन्ड जिल'! सोपी भाषा म्हणजे काय ते अभ्यासण्यासाठी लक्ष्मीबाई टिळकांनी लिहिलेल्या ‘स्मृतिचित्रां’कडे जाण्याऐवजी आपण मार्गदर्शन करतो वामन पंडितांकडे जाण्याचे!
शासनकर्त्यांच्या अट्टाहास
शासनकर्ते अट्टाहासाने काही शब्द पेरीत सुटले आहेत त्याची उदाहरणे देताना पु. ल. म्हणाले, ‘‘कोणता शेतकरी कोंबड्याला कुक्कुट म्हणतो? मग कुक्कुटपालन केंद्र कशासाठी? घाणीत लोळणाऱ्या डुकराला ‘वराह' का बनवता? राज्य परिवहनाच्या स्थानकावर ! ‘मला भेट' या भाषेत कोणी बोलतो का? निवडणुकीत ‘निर्वाचन क्षेत्र' हा शब्दप्रयोग कशाला? तो हवाच असेल तर जेथे मोर्चे, मिरवणुका, घेराव, विद्यापीठाचा ताबा घेणे या गडबडीत प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना वाचायलाच वेळ नसतो त्या विद्यापीठास लावा. मंत्रालय हा शब्द ऐकून विंचू चावलेल्या आपल्या पत्नीला घेऊन एखादा शेतकरी तिकडे धावायचा आणि नंतर त्याला आढळायचे की तेथे दुसरेच विष चढलेले असते! बियाणे विकसित करणाऱ्या केंद्रावर पाटी असते 'बीजगुणन क्षेत्र' धरणावर गेलो तर 'ऊर्ध्व जलनिस्सारण द्वार' आणि 'अधर जलनिस्सारण द्वार'! पाणी सोडण्याची वरली झापड आणि खालची झापड. पण इथे पाटी वाचता वाचताच ‘ऊर्ध्व' लागतो. मग ‘अधरा'कडे कोण कशाला जातोय?
हल्ली बातम्या सांगतात, 'पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की...’ मी म्हणतो ‘रिसोर्सेस'चे ‘सूत्र’ असेच भाषांतर का? ‘पोलिस अधिकाऱ्याकडून म्हणा की!’ उद्या घरातून मला काही समजले तर मी ‘मंगळसूत्राकडून समजते की...’ असे म्हणायचे का? लोकशाहीत रयतेची रयतेला समजणारी भाषा हवी. पण हल्ली घोटाळ्यावर घोटाळे. मराठीत शासन म्हणजे शिक्षा आणि हिंदीत शिक्षेचा अर्थ शिक्षण, यामुळे गमतीदार घोटाळे होण्याचा संभव आहे. 'रामशास्त्र्यांनी राघोबास देहान्त शासन दिले' याचा अर्थ! रामशास्त्र्यांनी राघोबाला मरेपर्यंत राज्य करण्याचे शिक्षण दिले असाही व्हायचा! मुद्दाम अवघड शब्द योजण्यामागे एक प्रवृत्ती मनात दबा धरून असते. तिचा स्फोट करताना पु. लं. नी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘‘अलीकडेच एका उच्च स्त्रीने आपल्या मुलाचे नाव 'हृषिकेश' असल्याचे सांगितले! हे बहुधा ऋषीकेश मुखर्जी या सिनेदिग्दर्शकाच्या प्रेमामुळे असावे, असे पु. लं. नी म्हणताच बाई म्हणाल्या की, छे: हो, अलीकडे मोलकरणीदेखील आपल्या मुलांची नावे रजनी, विवेक अशी ठेवू लागल्यात. त्यांना पटकन उच्चारताच येऊ नये म्हणून हृषिकेश हे नाव ठेवले! जी वृत्ती या स्त्रीच्या मनात दबा धरून आहे तीच शासनातील राज्यव्यवहार कोशकर्त्यांच्या मनात! ज्ञानाचा मक्ता काही थोड्यांकडे असला पाहिजे, ही ती वृत्ती!’’ पु. लं. नी भाषणातील अर्धा तास या वृत्तीचा उपहास करण्यासाठी वापरला. शासन यामुळे किती अंतर्मुख होते कोणास ठाऊक, पण हसण्यासाठी जमलेले श्रोते हसत हसत एक विचार घेऊन गेले हे निश्चित!
Tags: सांस्कृतिक सामाजिक व राजकीय मुंबई वार्ता Cultural Social and Political Mumbai News weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या