डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चौकातील विद्वानाची चौकटबाह्य कथा - सूर्य पाहिलेला माणूस

‘चौकातील विद्वान’ अशी सॉक्रेटिसची प्रतिमा होती. स्वतःला उमगलेले ‘सत्य’ तो सोप्या भाषेत सांगत असे. आजच्या दडपशाहीच्या काळात त्याची नितांत गरज आहे. सत्य सांगणाऱ्या सॉक्रेटिसची कथा कशी साकारली त्याचा हा वृत्तांत.

आजची स्थिती ही सर्वच पातळ्यांवर गोंधळात टाकणारी आहे. जीवनविषयक सर्वच मानवी मूल्ये, श्रद्धा आणि विविध तत्त्वप्रणाली यांच्याबाबत एक विलक्षण भांबावून टाकणारी आणि घुसमट करणारी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जगाच्या इतिहासाकडे डोळसपणे पाहिले तर मानवी विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अशी परिस्थिती निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे आढळून येतात. यात तपशिलाचा भाग वेगळा असला... ठिकाण वेगळे असले तरी न्याय-अन्याय, नैतिक-अनैतिक, सत्य-असत्य इत्यादी बद्दलचे त्रिकालाबाधित द्वंद्व कायम असते.

गोंधळाची परिस्थिती

सुमारे सव्वादोन हजार वर्षांपूर्वी, ग्रीक समाजात असाच गोंधळाचा कालखंड अस्तित्वात होता. जुलमी राज्यकर्ते सत्तेवर होते. या राज्यकर्त्यांच्या हो ला हो मिळवून निमूटपणाने जगणाऱ्यांना काही त्रास नव्हता. मात्र वेगळे मत नोंदवणाऱ्यांना जबर शिक्षा ठोठावली जायची. अशा परिस्थितीत ‘सॉक्रेटिस’ नावाच्या महान तत्त्वज्ञाने सत्य काय आहे याचा शोध घेतला. ते सर्वसामान्य जनतेला सांगितले. सदाचरण, न्यायनिष्ठा, नैतिक वर्तन इत्यादी गोष्टी त्याने जगण्यासाठी गरजेच्या मानल्या. 

काही विशिष्ट तत्त्व पाळून, चौकातील विद्वानांची भूमिका स्वीकारून सॉक्रेटिस निरलसपणाने जीवन व्यतीत करत लोकांना समजेल अशा रीतीने सांगत होता. दडपशाहीने राज्य चालवणाऱ्या कोणालाही सत्य सहन होत नाही. त्याचप्रमाणे त्यावेळच्या ग्रीक राजवटीला सॉक्रेटिसचे सत्य सांगणे सहन झाले नाही. त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. शिक्षेतून वाचण्यासाठी त्याने स्वतःचा बचाव केला नाही. तसेच सत्य सांगण्याच्या भूमिकेत बदल करण्यास नकार दिला. त्याला देहदंडाची शिक्षा फर्मावण्यात आली. सॉक्रेटिसच्या शिष्यांनी त्याच्या पळून जाण्याची योजना आखली. त्याने त्यालाही नम्र नकार दिला. विषप्राशन करून शांतपणाने देहत्याग केला. 

अशी ही सत्य सांगणाऱ्या सॅाक्रेटिसची कथा आहे. दडपशाही करणाऱ्या शासन व्यवस्थेला. मग ती कोणत्याही काळातली असो अशी सत्य सांगणारी माणसे नेहमीच अडचणीची वाटतात त्यांचा अडथळा नेहमीच ‘दूर’ केला जातो. या ‘सूर्य पाहिलेल्या’ माणसांना बाजूला केले जाते. त्यांचा सत्तेच्या जोरावर अंत केला तरी त्यांचे विचार गाडून टाकता येत नाहीत. उलट गोंधळलेल्या परिस्थितीत सामान्य माणसांना या विचारांचा आधार वाटतो . हे विचार स्फूर्तिदायक ठरतात. अन्याय्य व्यवस्थेला नाकारण्यात मदत करतात. सॉक्रेटिसचा हा सत्याग्रह आणि त्यानुसार त्याने खुषीने, तडजोड न करता स्वीकारलेले मरण हे आजच्या परिस्थितीतही, महत्त्वाचे, मार्गदर्शक आहे.

नव्या पिढीतील आघाडीचे नाटककार मकरंद साठे यांच्या ‘सूर्य पाहिलेला माणूस’ या नव्या नाटकाचे कथासूत्र हे वरीलप्रमाणे आहे. तत्त्वज्ञान हा साठे यांचा आवडीचा विषय. त्याबद्दलचे त्यांचे वाचनही दांडगे आहे. सॅाक्रेटिसवरचे नाटक लिहायचे ठरवले तेव्हा त्यांनी सगळे संदर्भ पुन्हा वाचून काढले. या विषयावरचे हे मराठीतले पहिलेच नाटक असल्याने त्या जबाबदारीचे भान ठेवून साठे यांनी लिखाण केले ते म्हणतात. 
‘नाटक सॅाक्रेटिसच्या जीवनावरील असले तरी तेवढेच वाचून चालत नाही. बाकी इतरांचेही तत्त्वज्ञान जाणून घ्यावे लागते. मुळात मला या विषयाची गोडी असल्याने मी ते संपूर्ण पुन्हा एकदा वाचले.’ 

सर्वांना समजेल अशी भाषा 

सॉक्रेटिसने कोणत्याही विद्वत्तेचा आव न आणता सर्वांना समजेल अशा भाषेत त्याचे तत्त्वज्ञान मांडले. त्याचे सगळे शिष्य त्याचा एकेरी उल्लेख करतात ही या नाटकातील बाब ‘उल्लेखनीय’ म्हणायला हवी! गुरु-शिष्यांमधील समतेचे नाते त्यातून ध्वनित होते. साठे यांनी आधी ठरवून भाषेवर बंधने घालून घेतली आहेत. एकतर ती त्या काळाशी सुसंगत अशी भाषा असायला हवी आणि सॉक्रेटिसच्या तत्वज्ञानाचा आशय नेमकेपणाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे . अशी एकूण कसरत लेखकाने योग्य रीतीने सांभाळली आहे. 

भाषा सोपी असली तरी तिची रंगमंचावरील अभिव्यक्ती तितकीच महत्त्वाची असते. दिग्दर्शक अतुल पेठे यांनी ही जबाबदारी नेहमीच्या कौशल्याने पार पाडली असल्याचे रंगीत तालीम पाहाताना लक्षात आले. मकरंद साठे आणि अतुल पेठे ही लेखक-दिग्दर्शक जोडी गेल्या दशकात चांगली जमली आहे. पेठे यांना स्वतःला व्यक्त करण्याची रंगमंच ही उबदार जागा वाटते. बुद्धीला त्रास देणारे असे नाटक करायला त्यांना नेहमीच आवडते. 

‘वेटिंग फॉर गोदो’ या नाटकाने प्रकाशझोतात आलेल्या अतुल पेठे यांनी पुण्यातील हौशी नाट्यसंस्थांमधील गुणी कलावंतांना एकत्र करून हे नाटक बसविले. सहा-सात महिने एकत्र काम करण्यातून कलाकारांमध्ये एकजिनसीपणा निर्माण झाला. सत्य सांगणारा सॉक्रेटिस आणि सत्याग्रहाचा प्रयोग भारतीय भूमीत यशस्वीपणाने रुजवणारे महात्मा गांधी. या दोघांच्या जीवनात काही साम्यस्थळे असली तरी नाटकात एकास एक अशी मांडणी केलेली नाही हे साठे आणि पेठे यांनी आवर्जून निदर्शनास आणून दिले. 

‘हे नाटक सॉक्रेटिसच्या जीवनावरील असले तरी ते सॉक्रेटिसचे नाटक नाही’ हे पेठे यांनी स्पष्ट केले आहे. सॅाक्रेटिसच्या काळात सत्य सांगणे जेवढे कठीण होते तेवढेच आज कठीण आहे. मध्यंतरी महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारताना ‘लोकशाहीच्या मार्गाने सत्तेवर येणारे ठोकशाहीची भाषा करतात तेव्हा मनाला वेदना होतात’ असे ‘सत्य’ पु. ल. देशपांडे यांनी सांगितले तेव्हा येथील ‘शिवशाही’ च्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. हे अगदी अलीकडचे उदाहरण स्वाभिमानी मराठी माणसांच्या आठवणीत असेलच.

याप्रमाणे सॉक्रेटिसच्या सत्य सांगण्याच्या वृत्तीला आणि त्याप्रमाणे वागण्याच्या प्रवृत्तीला रंगमंचावरून सलाम करण्याचा जो प्रयत्न साठे-पेठे द्वयीने केला त्याला जाणकारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वप्रथम डॉ. श्रीराम लागू यांनी त्यांच्या अगदी अलीकडच्या अमेरिका दौऱ्यात ‘सूर्य पाहिलेला माणूस’ या नाटकाचे वाचन केले. नाटक रंगमंचावर आणण्यासाठी ‘कॅप कलेक्शन’ केले. त्याचा बराच उपयोग झाला. हल्ली डॉक्टर फारसे नाटकात काम करीत नाहीत. असे असले तरी एखाद्या नाटकाने झपाटून टाकल्यावर ‘हे नाटक रंगभूमीवर आलेच पाहिजे’ या ‘भूमिके’ तून ते कामाला लागतात. 

डॉ. सांगतात. ‘एखादे नाटक रंगमंचावर आणणे ही फार खर्चिक बाब असते. खर्च एवढे वाढलेत की ते परवडत नाहीत. परंतु आजच्या दडपशाहीच्या काळात अशी नाटके होणे हे गरजेचे आहे.’ डॉ लागू यांची रंगभूमीवर अविचल निष्ठा आहेच याहीपेक्षा दडपेगिरीला न घाबरता सत्य सांगितले पाहिजे, ते आचरणात आणले पाहिजे हा विचार त्यांना आणखी महत्त्वाचा वाटतो. 

मुंबईचे ‘स्फूर्ती थिएटर्स’ आणि पुण्याचे ‘मनोरंजन’ या संस्थेच्या पाठिंब्याने सत्य सांगणाऱ्या सॉक्रेटिसचे नाटक रंगमंचावर आणण्याचे ‘स्वप्न’ साकार होत आहे. सुधीर मुंगी, गजानन परांजपे, दिलीप जोगळेकर, अभय गोडसे आणि सॉक्रेटिसच्या भूमिकेत डॉ श्रीराम लागू असा संपन्न संच नाटकात असल्याने ‘हे नवे सत्याचे प्रयोग’ निश्चितच मार्गदर्शक होतील असा विश्वास वाटतो!

Tags: अतुल पेठे मकरंद साठे सूर्य पाहिलेला माणूस चौकातील विद्वान सॅाक्रेटीस Atul Pethe Makarand Sathe The Man Who Saw Sun Scolar in the Square Socrates weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके