डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

विंदांनी केले ज्योतप्रज्वलन... आणि काव्यवाचनही!

ध्येयवादी पत्रकारितेच्या ज्योतीचे प्रज्वलन करण्यासाठी त्याच तोलामोलाच्या व्यक्तीचा शोध गेले काही दिवस चालू होता. दहा-बारा दिवसांपूर्वी साधनाच्या संपादकांनी व अपना परिवारातील सहकाऱ्यांनी विंदा करंदीकरांना विनंती केली, तेव्हा ते म्हणाले, "माझ्या हृदयात तीन व्यक्तींना विशेष स्थान आहे, त्यातले एक आहेत साने गुरुजी. त्यामुळे मी ज्योत प्रज्वलन तर करीनच, पण महोत्सवाच्या समारोपाला येऊन काव्यवाचनही करीन. '

ध्येयवादी पत्रकारितेच्या ज्योतीचे प्रज्वलन करण्यासाठी त्याच तोलामोलाच्या व्यक्तीचा शोध गेले काही दिवस चालू होता. दहा-बारा दिवसांपूर्वी साधनाच्या संपादकांनी व अपना परिवारातील सहकाऱ्यांनी विंदा करंदीकरांना विनंती केली, तेव्हा ते म्हणाले, "माझ्या हृदयात तीन व्यक्तींना विशेष स्थान आहे, त्यातले एक आहेत साने गुरुजी. त्यामुळे मी ज्योत प्रज्वलन तर करीनच, पण महोत्सवाच्या समारोपाला येऊन काव्यवाचनही करीन. '

त्याप्रमाणे 22 डिसेंबर 217 रोजी दुपारी 3 वाजता वांद्रे येथील साहित्य सहवासात वास्तव्य करीत असलेल्या विंदा करंदीकरांच्या घरी त्यांच्या हस्ते ध्येयवादी पत्रकारितेच्या ज्योतीचे प्रज्वलन केले गेले. त्यावेळी आश्चर्य म्हणजे विंदांनी साधनाच्या वाटचालीवर स्वत: केलेली कविता वाचून दाखविली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ती कविता प्रसिद्ध करण्यासाठी मागितली असता विंदा म्हणाले, "अगोदर ही कविता साधना साप्ताहिकात प्रसिद्ध होईल आणि नंतर इतरत्र..." त्यावेळी मराठीतील ज्येष्ठ लेखक-संशोधक डॉ. य.दि.फडके उपस्थित होते.

23 डिसेंबरला समारोपासाठी बरोबर सायंकाळी 7 वाजता विंदा करंदीकर व्यासपीठावर यायला निघाले तेव्हा, संपूर्ण सभागृहाने जागेवर उभे राहून टाळ्यांचा गजर करून त्यांना मानवंदना दिली. विंदा व्यासपीठावर स्थानापन्न झाले, तेव्हा व्यासपीठावर कोणीही बसले नव्हते, सभागृहातील सर्वांचे कान गोळा झाले होते. 9० वर्षांचे विंदा आता काय बोलणार, कोणत्या कवितांचे वाचन करणार, त्यांचा आवाज कसा असेल, त्यांचे उच्चार कसे असतील, याबाबत उपस्थितांच्या मनात अपार कुतूहल होते... आणि 'साने गुरुजींच्या साधना ध्येयवादी पत्रकारितेची ज्योत माझ्या हस्ते प्रज्वलित केली, हा मी माझा मोठा सन्मान समजतो' असे म्हणून विंदांनी 22 डिसेंबर 2007 रोजी केलेली 'साधना'वरील कविता खड्या आवाजात, स्पष्ट उच्चारात म्हणायला सुरुवात केली. सभागृह थरारून गेले.

त्यानंतर विंदांनी स्वत:च्या आठ कविता वाचून दाखवल्या, त्या त्याच सुरात... त्याच जोषात. जवळपास पाऊस तास त्यांचे काव्यवाचन चालू होते आणि 'पिनड्रॉप सायलेन्स' मध्ये असलेले सभागृहातील श्रोते आनंदात न्हाऊन निघत होते, आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत याचा अनुभव घेत होते.

विंदांनी स्वत:ची पहिली कविता वाचली ती 'कसा मी कळेना.' ही कविता म्हणत असताना श्रोते माना डोलावून, टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते. त्यानंतर त्यांनी 'पछाडलेला' ही कविता वाचली आणि तिचा संदर्भही सांगितला. एकदा बा.भ.बोरकर विंदांना म्हणाले, "अरे, कशाला सांगतोस 'असा मी कसा मी, कसा मी कळेना.' तू तर 'पछाडलेला' आहेस. साम्यवादाने पछाडलेला आहेस." त्यातून पछाडलेला या कवितेचा जन्म झाला.

विंदांनी तिसरी कविता वाचली ती 'धोंड्या न्हावी'. त्याचा संदर्भ सांगताना ते म्हणाले, "ही कविता मी नागपूर आकाशवाणीसाठी लिहिली. त्यावेळी प्रभाकर माचवे आकाशवाणीचे संचालक होते. त्या कवितेत धोंड्या न्हाव्याच्या तोंडी 'आपल्या हातून गांधींची सेवा (हजामत) व्हावी' या आशयाचा संवाद होता. वस्तुत: कोकणातील एका अशिक्षित माणसाचे ते उद्गार गांधींचा फार मोठा गौरव करणारे होते. पण नुकतीच गांधीहत्या झाली होती, त्या पार्श्वभूमीवर ती कविता वाचायला मला परवानगी मिळाली नाही. त्यांना ती कळलीच नाही.

विंदांनी चौथी कविता वाचली 'घेता'. कविता वाचण्यापूर्वी विंदा म्हणाले, 'ही कविता पु.ल.देशपांडेंना फार आवडत होती. त्यांनी एका हाताने लाखो रुपये घेतले आणि दुसर्या हाताने दिले'. देणाच्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे, या ओळींवर सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

त्यानंतर पाचवी कविता वाचली 'लागेल जन्मावे पुन्हा'. ती वाचण्यापूर्वी विंदा मिश्किलपणे म्हणाले, 'येथे बरेच तरुण आले आहेत. त्यांना वाटत असेल, हा कवी फक्त गंभीर कविता वाचतोय. पण मी त्यांना सांगतो, आज जरी मी 9० वर्षांचा असलो तरी कधी काळी 19वर्षांचा होतो. आजकाल सर्वात 15० विद्यार्थी असतील तर त्यात निम्म्या मुली असतात. आमच्या वर्गात मात्र 145 तरुण आणि चार-पाच मुली असे प्रमाण होते. पण आम्ही कधी आशा सोडली नाही. कारण आमचा पुनर्जन्मावर विश्वास होता. त्यामुळे या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात ती निश्चित भेटेल, आशावादातून कविता जन्माला आली लागेल जन्मावे पुन्हा.'

विंदांनी सहावी कविता वाचली ती 'साठीचा गझल'. तिचा संदर्भ सांगताना ते म्हणाले, "रामूभय्या दाते हा आमचा मित्र सर्वांवर प्रेम करणारा होता. प्रेमाबद्दल नोबेल असतं तर ते रामूभय्याला मिळालं असतं, असं आम्ही गंमतीने म्हणायचो. रामूभय्या प्रेमाबद्दल अतिशयोक्तीच तितकी करायचा. तो म्हणायचा 'बालगंधर्व हा कृष्णाचा संगीतावतार आहे.' त्या रामूभय्याच्या साठीच्या निमित्ताने श्री.ना.पेंडसेंच्या घरी मैफल जमबली होती. त्यावेळी रामूभय्याची थट्टा करण्यासाठी मी 'साठीचा गझल' लिहिली होती.

विंदांनी सातवी कविता वाचली ती 'यंत्रावतार'. तिची पार्श्वभूमी सांगताना ते म्हणाले, "मी कवी असलो तरी काव्यापेक्षा विज्ञान अधिक महत्त्वाचे आहे असे मानतो इहलोकातील दु:खांपासून मुक्ती विज्ञानामुळेच मिळू शकते असा माझा विश्वास आहे. पण 'विज्ञान शब्द वापरला तर सामान्य माणसाला काही कळत नाही, म्हणून मी 'विज्ञानावतार 'ऐवजी 'यंत्रावतार' हा शब्द वापरला. मानवाच्या मुक्तीसाठी परमेश्वराने जो अकरावा अवतार धारण केला आहे, त्याचे नाव 'यंत्रावतार' असे मला त्यातून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवायचे होते. या कवितेच्या शेवटी मी यजुर्वेदातील एक श्लोक वापरला आहे, पण त्यात 'शांती'गाथा ऐवजी 'क्रांती'गाथा असा बदल केला होता. ज्ञानपीठ स्वीकारायला मी गेलो, तेव्हा विज्ञानभवनात झालेल्या समारंभात त्यावेळचे राष्ट्रपती डॉ.कलाम म्हणाले, "तुम्ही विज्ञानावर एखादी कविता लिहिली आहे काय?" मी चार-पाच कविता विज्ञानावर केल्या असल्या, तरी त्यावेळी राष्ट्रपतींना 'यंत्रावतार' ही कविता ऐकवली.

विंदांनी शेवटची (आठवी) कविता वाचली तिचे शीर्षक होते, 'तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला'. त्याबाबत विंदा म्हणाले, इंग्रजीतील सर्वश्रेष्ठ कवी शेक्सपियर मराठीतला सर्वश्रेष्ठ कवी तुकोबाच्या भेटीला आला. ती भेट तुकोबाच्या किराणा मालाच्या दुकानात झाली. त्यावेळी तुकोबा व शेक्सपियर यांची (वारकरी घेतात तशी) 'उराउरी' भेट झाली. तेव्हा तुकोबा म्हणाले,

विल्या, तुझे कर्म थोर

अवघाचि संसार उभा केला.

(जगातील सर्व प्रकारच्या सुख-दुःखांचे, भाव-भावनांचे चित्रण शेक्सपियरने केले आहे. )

त्यावर शेक्सपियर म्हणाला,

अरे बाबा, एक ते राहिले 

तुवा जे पाहिले विटेवरी

(तुकोबा, तू विटेवरचा जो विठोबा पाहिलास, तो मला पाहता आला नाही.)

या आठ कवितांचे वाचन झाले, तेव्हा दादरच्या बी. एन.वैद्य सभागृहातील श्रोत्यांनी पुन्हा एकदा जागेवर उभे राहून, टाळ्या वाजवून विंदांना मानवंदना दिली आणि त्याचवेळी साधनावरील स्वतःच्या हस्ताक्षरातील कविता विंदांनी साधना संपादकांच्या हाती सुपूर्द केली. या अंकाच्या मुखपृष्ठावर ती छापली आहे.

-----------

तीन वैशिष्ट्ये

1. सर्वच प्रसारमाध्यमांनी उचित नोंद घेतली, कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध होते, साधे पण भारदस्त होते, वेळेचे नियोजनही चोख साधले गेले.

2. 'साधना समकालीन 2००7' ही कल्पना सर्वांनाच भावली. भीमराव यांचे गझल गायन, सेझवरचे अभिरूप न्यायालय यामुळे महोत्सव आगळा-वेगळा झाला. विंदांच्या काव्यवाचनाने तो सर्वार्थाने उंचीवर गेला.

3. साधना परिवारातील संस्था व व्यक्ती दोन्ही दिवशी उत्साहाने उपस्थित होत्या, मात्र तरुणांच्या सहभागाची गरज सर्वांनीच बोलून दाखवली.

----------------

कृतज्ञता...

'साधना समकालीन 2००7' या महोत्सवाचे यशस्वी संयोजन मुंबईत शक्य झाले ते साने गुरुजींच्या प्रेरणेनेच काम करणाऱ्या अपना परिवाराच्या सक्रिय योगदानामुळे. या परिवारातील सर्व संस्था, व्यक्ती हे कार्य घरचेच आहे या भावनेने राबल्या. त्यांच्याबद्दल साधना साप्ताहिक कृतज्ञ आहे.
 

Tags: 'धोंड्या न्हावी'. श्रोते नागपूर आकाशवाणी ज्योतीचे प्रज्वलन विंदा करंदीकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके