डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

3 जूनच्या अंकातील प्रा. निशिकांत व डॉ. वृषाली यांची पत्रे छान व नव्या वाटेची आहेत. प्राध्यापक अथवा आसपासच्या माध्यमांवर फार टीका करण्यात अर्थ नाही. पूर्वीही अशीच स्थिती होती. डॉ. वृषाली यांचे अनेक मुद्दे आश्वासक आहेत; त्यातून लेखकांसाठी एखादे छोटे शिबिर तीन तासांचे अवश्य करता येईल.

वेगळा लेख

20 मेच्या 'साधना' अंकातील साहित्य समीक्षा या सदरातील प्रा. इसादास भडके यांच्या चर्चित 'बाप्तिस्मा ते धर्मांतर' या स्व - कथनावरील प्रसिद्ध विचारवंत व व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांची समीक्षा अंतर्मनाला स्पर्शन गेली. हे पुस्तक मी वाचलेच होते. डॉ. मुल्कराज आनंद यांच्या साहित्याचा गांधीवादी दृष्टिकोणातून मी अभ्यास केल्यामुळे या पुस्तकाची मीदेखील समीक्षा लोकसत्तात लेख लिहून केली. त्यात मी या पुस्तकाची तुलना आनंद ह्यांची जगप्रसिद्ध कादंबरी 'अनटचेबल' सोबत केली. अस्पृश्यतेविरुद्ध महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लढ्याचा परामर्श संदर्भांसह मी घेतला. 

सप्रेसरांचा लेख एकंदरीतच वेगळा आहे. मानवी जीवनात धर्म-संकल्पनांचा त्यांनी घेतलेला परामर्श बुद्धिजीवी पण रूढ धर्म संकल्पना जगणान्या मेंदूला खडबडीत जागे करणारा आहे, यात शंका नाही. लेखातील आशयाला न्याय देणारे व्यंगचित्र समाविष्ट करून पुस्तकाची सार्थकता सिद्ध केली आहे. 

जागतिक तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक सप्रेसर व सृजनशील समाजमन घडविणारे 'साधना'चे हार्दिक अभिनंदन. 

प्रा. डॉ. एम. डी. देशमुख, चंद्रपूर

----------

व्यासपीठ सुरू करावे

'साधना'चे सर्वच अंक मला वेळेवर मिळतात आणि कामाच्या व्यापातून जेवढा वेळ काढता येईल तेवढा मी 'साधनाच्या संगतीत असतो. 29 एप्रिल व 6 मेचा 'वाचन संस्कृती अभियान' अंक आवडला. 'साधना'चे वाचनवेड असलेले लोक प्रतिसाद सदरातून आपले मत मांडण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाच्या विचाराला चालनाही दिली जाते. यापेक्षाही खोलात जाऊन ते वाचतात. त्या त्या लेखकाविषयी दुसरीकडेही मार्मिक लेखन पाहतात. त्यामुळे ज्ञानातही भर पडते. शिवाय आपल्या मताला कुणीतरी प्रेरणा देतंय, त्यामुळे आणखी चांगल्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करतात. 'व्यासपीठ' हे सदर सुरू व्हावे. जे महान झाले, त्यांचे चित्र मांडले जावे. ते कसे घडले, त्यांचा जीवनप्रवास वाचावयास मिळावा, त्यामुळे नवोदित लेखक/ कवी/विचारवंत/अभ्यासक यांना प्रेरणा मिळेल. त्या त्या लेखातून त्यांना वेगळे अनुभव वाचावयास मिळतील. त्याप्रमाणे घडण्याचा प्रयत्न करतील कारण घडविणे (घडणे) त्यांच्यावर संस्कार करणे हे 'साधना'चे आद्य कर्तव्य आहे. शिवाय अशा सदराद्वारे अनेक चांगल्या माणसांचे आत्मकथन, कष्ट, धाडस आपणास पहावयास मिळेल. 

'साधना' अतिशय डोळसपणे सर्वांना न्याय देते प्रत्येक अंकात बेगळेपणा, बोलकेपणा आढळतो. 29 एप्रिलच्या अंकातील ज्युलिएस सीझर हा ग. प्र. प्रधान यांचा लेख समीक्षात्मक आहे. असेच प्रयोग व्हावेत. थोडीफार परदेशी साहित्याची ओळखही रहावी. त्यामुळे खेडोपाडी नवीन परकीय साहित्य कसं आहे, हे लक्षात येते. ज्योती सुभाषही अनुभव- वाचन यांच्या जोरावर चांगले लिहितात. रिमिक्सच्या जमान्यात हल्ली नष्ट होणाऱ्या मराठीला वाचवावे. 'वाचन-संस्कृती अभियान' अंकामुळे यात काही फरक पडेल असे वाटते. 

संतोष देसाई, जि. सातारा. 

----------

अभिनंदन

आपल्या साप्ताहिकात छान बदल होत आहेत, त्याबद्दल अभिनंदन! मुखपृष्ठाचं स्वरूप आकर्षक असतं, 'वाचन-संस्कृती अभियान' सुरू झालं हीसुद्धा चांगली गोष्ट आहे. 6 मेचा अंक खूप आवडला. 

प्रेरणा सुभाष खरे, जि. ठाणे

---------

शुभेच्छा!

8 एप्रिलचा 'साधना' अंक वाचला. वाचताना तो खाली ठेवावा असे वाटले नाही. अंक दर्जेदार लेखनाने भरलेला आहे. संपादकीय मनाला भिडणारे आहे, प्रत्येक लेखात नवाच आविष्कार दिसतो. ही अक्षरलेणी मराठी भाषेचे भूषण आहे म्हणूनच हीरकमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. मराठी माणसाच्या मनातील मरगळ दूर करणारे लेख यात आहेत. साप्ताहिकाचे भविष्य उज्वल आहे. वाचनीय अंक काढल्याबद्दल संपादक व संपादन मंडळाचे हार्दिक अभिनंदन. 

अंक वाचल्यावर वाटले आपणही 'साधना'चे वर्गणीदार व्हावे, इतके हे साप्ताहिक वाचकाच्या मनात घर करणारे आहे. यशस्वी वाटचालीला शुभेच्छा. 

वि. वि. देवगावकर चैतन्यनगर, वारजे, पुणे 58. 

----------

प्रामाणिक वाट मिळावी

3 जूनच्या अंकातील प्रा. निशिकांत व डॉ. वृषाली यांची पत्रे छान व नव्या वाटेची आहेत. प्राध्यापक अथवा आसपासच्या माध्यमांवर फार टीका करण्यात अर्थ नाही. पूर्वीही अशीच स्थिती होती. डॉ. वृषाली यांचे अनेक मुद्दे आश्वासक आहेत; त्यातून लेखकांसाठी एखादे छोटे शिबिर तीन तासांचे अवश्य करता येईल. यदुनाथजीदेखील लेखन इतके छान सुधारून देत व सोबत शास्त्रीय मार्गदर्शन करीत. लिहिणे म्हणजे काही नुसते दुःख उगाळणे नसते.

लिहिणे म्हणजे वेदना, प्रचाराचे फलक नव्हेत, की शिलालेख कोरत बसायचे नाही! यदुनाथजी म्हणत, राहवत नाही ना, मग लेखणी हातात घ्या. लिहिणे ही गोष्ट अशी आहे की आनंद तर होतोच. नव्या भूमीवरचा भावप्रवास, इतरही अनेक नव्या माणसांचे दर्शन घेऊन मला सांगायचे तेच तुम्ही सांगून टाकलेत, माझ्या सुरांशी सूर जुळला आहे, असे वाचकांना वाटावे. नवे क्षेत्र, नवे नक्षत्र, माझ्या सुरांचे चित्र! असे काही कोणी लिहीत असेल तर त्याला सांगावं, तुझा कागद इकडे दे बघू, मलाही ते वाचायचे आहे! एक अक्षर रानातले, दुसरे जनातले, तिसरे उन्हा-पावसातले, एक सूर गाण्याचा, दुसरा सहयोगाचा- आनंदाचा. तिसरा समतोलाचा- समर्पणाचा... डॉ. वृषाली यांचे पत्र आणखीही खूप गोष्टी नव्याने

लिहिणाऱ्यांविषयी सांगत आहेत, त्यातून काही प्रामाणिक वाट मिळावी. पूर्वी अशी लेखन-वाचन शिबिरे समाजप्रबोधन संस्थेतर्फे आयोजित होत. लेखनातून आपण भोगवादाच्या लालसेने लेखनकलेचेच शोषण करीत आहोत, हा त्यांनी मांडलेला विचार नव्या पिढीने विचारात घेण्यासारखा आहे. 

गो. पु. शहा
बारडोली

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके