डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

6 डिसेंबर 92 च्या दुर्दैवी घटनेनंतर सर्व पुरोगामी विचारवंतांनी सजग व संवेदनशील होणे अपेक्षित आहे. 'साने गुरुजींच्या जन्मशताब्दी' वर्षात त्यांच्या विधारधनावर खुली चर्चा व्हावी. कालबाह्य ते टाकून द्यावे. उपयुक्त व पुरोगामी मुद्दे पुढे न्यावेत.

गुरुजींच्या विचारधनावर खुली चर्चा हवी

26 डिसेंबरचा साने गुरुजी जन्मशताब्दी अंक वाचण्यात आला. साने गुरुजींबाबत नितांत आदर वाटूनही हे विचार मांडावेसे वाटतात. ‘अलगपणा शिकवणे हा भयंकर गुन्हा : राष्ट्राचा व मानवतेचा’ या मथळ्याखाली पान दोनवरील मजकूर वाचताना हे वाक्य खटकले. 'आमच्या धर्माला हात घालता', तर त्यांना नम्रपणे सांगावे की, ‘कृपा करून पाकिस्तानात जा.’ साने गुरुजी म्हणतात, ‘‘मानवतेला धरून कायदे करताना धर्म आड येता कामा नये.’’

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांना खुले नव्हते. ही गोष्ट घटनेला धरून नव्हती. बडव्यांचे मनःपरिवर्तन करण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. त्या वेळी हिंदू कोड बिलाला विरोध होता. तो एवढा तीव्र होता की बिल तुकड्यातुकड्यातच संमत झाले. तो विरोधही घटनेला डावलणाराच होता. अशी अनेक उदाहरणे देता येतील, जेव्हा कायदे करताना धर्म आड आला, त्या वेळी विरोधकांना भारत देश सोडून जा असे सांगितले गेले नव्हते. त्यानंतरही रूपकंवरच्या खुनाला सती म्हणणे, सतीसारख्या अमानवी प्रथेचे माहात्म्य वाढविण्यासाठी चुनरी महोत्सव करणे, मेरी रॉय या ख्रिश्चन महिलेचा व लता मित्तलचा वारसा हक्क नाकारणे, सरतेशेवटी बाबरी मशीद पाडणे, देशाला दंगलीच्या आगीत लोटणे, आता चर्चेस पाडणे अशा गोष्टी घडत आहेत. याला जबाबदार असणाऱ्या सर्वांना देश सोडून जाण्याचा सल्ला द्यायला हवा. पण तसे होत नाही.

सल्ला फक्त मुस्लिमांनाच दिला जातो. हा अलगतावादही राष्ट्राचा व मानवतेचा गुन्हाच नाही का? 6 डिसेंबर 92 च्या दुर्दैवी घटनेनंतर सर्व पुरोगामी विचारवंतांनी सजग व संवेदनशील होणे अपेक्षित आहे. 'साने गुरुजींच्या जन्मशताब्दी' वर्षात त्यांच्या विधारधनावर खुली चर्चा व्हावी. कालबाह्य ते टाकून द्यावे. उपयुक्त व पुरोगामी मुद्दे पुढे न्यावेत. यासाठी हा मजकूर छापत आहोत अशी तळटीप नसणे, ही गोष्ट खटकली. ‘अलगपणा’ कोण कोणाला शिकवत आहे ? राष्ट्राचा व मानवतेचा भयंकर गुन्हा आपण किती काळ करीत राहणार आहोत?

अरुणा बुरटे, मुंबई

----------

निरागस प्रतिक्रिया

'साधना' अंक आमच्या घरी खूप वर्षे येतो. पण मी नुसता बघून ठेवून द्यायची. मी आता आठवीमध्ये भारती विद्यापीठ कन्या प्रशाला येथे शिकते. 26 डिसेंबरचा साधनेचा अंक आला. आदरणीय गुरुजींचे चित्र पाहून खूप आनंद वाटला. शेवटच्या पानावरील ‘बाळ्याची खोली’ ही गुरुजींची कविता वाचत असताना मला खूप हसू आले व आम्हां मुलांच्या कपाट, टेबल व अस्ताव्यस्तपणाची जाणीव झाली. यातून आम्ही व्यवस्थित राहायला हवे हे गुरुजींचे सांगणे हसत सांगितले आहे.

कु. धनश्री देशपांडे, कात्रज, पुणे

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके