डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

'रास्ता रोको’ चे आंदोलनहीं अनाठायी आहे. अनेक प्रवासी वाहने थांबल्यामुळे अडकून पडतात. तसेच प्रक्षुब्ध जमावाकडून वाहनांची नासधुसही होते. एखाद्या घटनेचा निषेध करावयाचा असेल तेव्हा लोकशाहीच्या संकेतानुसार शांततेच्या मार्गांनी तो केला पाहिजे.

निश्चित काय घडले? 

साधना साप्ताहिकाचा 'स्वातंत्र्य सुवर्णमहोत्सव विशेषांक’, 15 ऑगस्ट 1997' वाचला. अंक फारच उत्तम झालेला आहे. 'मी पाहिलेला स्वातंत्र्यदिन' या मालेतील सर्वच लेख खूप अंतर्मुख करून जातात. माझ्यासारख्या स्वातंत्र्यानंतर बऱ्याच वर्षांनी जन्मलेल्या मुलामुलींना त्या दिवसांची कल्पनाही नीटशी करता येत नाही. तो दिवस लोकांनी किती उत्स्फूर्तपणे आणि विलक्षण आनंदात साजरा केला असेल याची कल्पना या लेखांवरून येते. याच अंकातील रोहिणी गवाणकरांचा लेख भारतीय महिला व स्वातंत्र्याचा लढा : 1857 ते 1947' खूपच माहिती पुरवणारा आहे. आजपर्यंत अंधारात असलेल्या / राहिलेल्या अनेक रणरागिणांची ओळख करून देणारा हा लेख आहे. परंतु यातील पान 23, 'सत्यभामाबाईंचे साहस मधील काही वाक्ये मी खाली देत आहे. सत्यभामाबाई कुवळेकर नावाची एक बालविधवा, 1920 ला तिने गांधीजींचे भाषण ऐकले आणि ती जणू संमोहित झाली. 

आपल्या अंगावरचे सर्व दागिने उतरवून तिने गांधीजींकडे राष्ट्रीय कामासाठी म्हणून दिले व आजन्म सोने न वापरण्याची शपथ घेऊन ती पुढे पाळलीही. ही वाक्ये काहीशी खटकतात, कारण जर सत्यभामाबाई बालविधवा होत्या तर त्यांच्या अंगावर दागिने कसे? व जरी ते असले तरी ते गांधीजींना देऊन टाकायचा अधिकार त्यांना दिला कुणी? आपणास 1920 सालची ब्राह्मण विधवा व त्यातून बालविधवांची परिस्थिती चांगलीच परिचित असणार. ती विचारी सर्व कुटुंबीयांचा छळ सोसीत आपले दुर्दैवी आयुष्य कंठीत असणार. तसेच मधु दंडवते यांचा लेख "न्यायपालिका, संसद आणि कार्यपालिका पान 34 ‘संसदेचे  लोकशाहीवरील आक्रमण' यातील काही वाक्ये खाली उद्धृत करत आहे -

1] एक भयावह घटनादुरुस्ती राज्यसभेत मंजूर झाली. पण ही घटनादुरुस्ती इतकी लज्जास्पद होती की ती राज्यसभेत आलीच नाही.  

2]  अनेक जागरूक संसद सदस्य आणीबाणीच्या काळात तुरुंगात बंदिस्त असल्याने राज्यसभेत ही घटना दुरुस्ती मंजूर करू शकली होती.  

3] परंतु सुदैवाने ही घटना दुरुस्ती शेवटी लोकसभेत पोहोचलीच नाही.

वरील तीनही वाक्ये परस्परविरोधी वाटतात. याबाबतीत आपण खुलासा केल्यास निश्चित काय घडले ते कळू शकेल

अपर्णा राजवाडे (साधनेची नियमित वाचक)

----------

बंद रास्तारोको नकोच!

साधने चा 19 जुलैचा अंक वाचला. अंकातील 'महाराष्ट्र बंद आणि असहाय शासन' हा अग्रलेख मननीय, चिंतनीय असा आहे. मुंबईत घाटकोपर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. ही घटना निंद्य व निषेधार्ह अशीच आहे. या घटनेचा सर्वानीच निषेध केला पाहिजे. बंद पाळताना (त्या दिवशी) ठिकठिकाणी जी दगडफेक, जाळपोळ यातून जमावाने जी नासधूस केली याचे समर्थन कोणीही सूज्ञ माणूस करणार नाही. म्हणून असे 'बंद' बंदच झाले पाहिजेत. जे लोक रोजंदारी करून आपली उपजिविका करतात त्यांची बंदमुळे उपासमार होते. गुंड आणि हूल्लडबाजांना लुटालूट करण्यास संधी मिळते! तसेच 'रास्ता रोको’ चे आंदोलनहीं अनाठायी आहे. अनेक प्रवासी वाहने थांबल्यामुळे अडकून पडतात. तसेच प्रक्षुब्ध जमावाकडून वाहनांची नासधुसही होते. एखाद्या घटनेचा निषेध करावयाचा असेल तेव्हा लोकशाहीच्या संकेतानुसार शांततेच्या मार्गांनी तो केला पाहिजे. फार तर मूक मोर्चा, जाहीर सभा, प्रक्षुब्ध भावनांना आवरण्यासाठी शांततेचे आवाहन आदी मार्गांचा अवलंब करण्यास हरकत नाही.

विधान परिषद आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते छगन भुजबळ व मधुकर पिचड यांच्यावरील हल्ल्याचा  आपण धिक्कार केलात व रि.पा ई.चे नेते रामदास आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निमित्ताने रिपब्लिकन नेत्यांना जे सुनावले ते योग्यच आहे. लोकशाहीत नागरिक-स्वातंत्र्य असते. ते स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे! लोकशाहीत नागरिकांनी आपल्या हक्कांबरोबरच कर्तव्याचेही भान ठेवले पाहिजे. कुठल्याही निंद्य घटनेचा निषेध करताना शांततामय मार्गाचा अवलंब केला पाहिजे. शासन आणि समाज यांच्यात समन्वय असला पाहिजे. लोकमताची कदर शासनाने केली पाहिजे. असे घडत राहिल्यास शासन आणि समाजावर नैतिक अंकुश ठेवणारे 'अहिंसक मती' निर्माण होतील अशी आशा वाटते!

ज.का. सनगर: गुरुजी, दालगाय, जि. सांगली.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके