डिजिटल अर्काईव्ह

ढोंगी प्रवचनकारांना दूरदर्शनसारख्या प्रभावी माध्यमातूनही भरपूर प्रसिद्धी मिळते. महात्मा फुले, आगरकर वगैरे विचारवंतांचा आज तरी पूर्ण पराभव झाला आहे असे वाटते. समाजपरिवर्तनाच्या चळवळीबद्दल आज कोणालाही आस्था नाही. अंधश्रद्धा, बुवाबाजी व क्षेत्रबाजी यांतच आपली सामान्य जनता बुडून गेली आहे असे म्हटल्यास फारसे चूक नाही.

मी 'साधना' साप्ताहिक नियमितपणे वाचत असतो. 'साधना’ मध्ये येणारे बहुतेक सर्व लेख विचारांना चालना देणारे असतात. 17  मे च्या अंकात पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याबद्दल अनिरुद्ध यांचा लेख वाचला. थोडे आश्चर्यही वाटले सर्व वृत्तपत्रसृष्टी व इतर प्रसारमाध्यमे यांनी पांडुरंग शास्त्री आठवले हे कुणी अवतारी पुरुष असून समाज परिवर्तनाचे महान् कार्य ते करीत आहेत अशी त्यांची प्रतिमा निर्माण केली आहे. अनिरुद्ध यांनी पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या विचारास जी प्रसिद्धी दिली आहे, त्यावरून श्री. पांडुरंगशास्त्री आठवले हे बुरसटलेल्या सनातनी विचाराचेच निष्ठावंत अनुयायी आहेत हे दिसून येते. सुमारे 60 वर्षांपूर्वी आपल्या समाजात बुवाबाजीचे फार प्रश्न निर्माण झाले होते. या बुवामहाराजांच्या ढोंगावर प्रहार करणारे लेख कै. महादेवशास्त्री दिवेकर यांनी किर्लोस्कर मासिकात लिहून त्यांच्या ढोंगबाजीचा बुरखा फाडला होता. 

आज आपल्या समाजात धार्मिक प्रचनकारांचा मोठा उदोउदो केला जातो. अत्यंत चलाख परंतु सामान्य लोकांना न समजणाऱ्या भाषेत गुंगवत ठेवण्याची कला या प्रवचनकारांनी आत्मसात केली आहे. संस्थानी थाटात राहणारे एक प्रवचनकार प्रवचनासाठी 10 हजार रुपये बिदागी घेतात असे ऐकिवात आहे. या ढोंगी प्रवचनकारांना दूरदर्शनसारख्या प्रभावी माध्यमातूनही भरपूर प्रसिद्धी मिळते. महात्मा फुले, आगरकर वगैरे विचारवंतांचा आज तरी पूर्ण पराभव झाला आहे असे वाटते. समाजपरिवर्तनाच्या चळवळीबद्दल आज कोणालाही आस्था नाही. अंधश्रद्धा, बुवाबाजी व क्षेत्रबाजी यांतच आपली सामान्य जनता बुडून गेली आहे असे म्हटल्यास फारसे चूक नाही. श्री. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या विचारांचा परिचय करून देणारा लेख प्रसिद्ध केल्याबद्दल आपले अभिनंदन.

भास्कर हरी गोगटे, वाई

---------- 

10  मे 97  'साधना चा अंक वाचन. पु. साने गुरुजी यांचे सामाजिक धार्मिक, आध्यात्मिक समतेचे कार्य उमगले. सामाजिक समतेचा झेंडा अनेकांनी उंच धरून वाणी-लेखणीने परिवर्तन प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात हा विचार कालपरत्वे संत-महंत -विचारवंत यांनी केला, तसा आचारही केला हे नाकारता येत नाही. म. फुले, आगरकर, लोकहितवादी, न्या. रानडे, राजर्षी शाहू महाराज, संत गाडगे महाराज, कर्मवीर, स्वा. सावरकर, डॉ. आंबेडकर यांनी हे सामाजिक समतेचे, ममतेचे कार्य व्यक्तिपरत्वे वेगवेगळ्या स्वरूपात केले. तेच कार्य पू. साने गुरुजींनी पूर्णत्वास नेले असे म्हणता येईल. गुरुजींचे विशाल हृदय, मातृत्व, प्रेम आणि क्रांतिकारकत्वच या अंकातील लेखांतून स्पष्ट झाले आहे. आपला हा अंक संग्राह्य असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यापर्यंत तो पोहोचला पाहिजे.

प्रा. शाम सोनाबले, रायगड

----------

मा. कृष्णराव स्मृतिअंक आणि मंदिरप्रवेश सुवर्णजयंती विशेषांक वाचले आणि असे वाटले की गुरुजींची जीवनमूल्ये आजही जिवंत आहेत. ही खरोखर फार समाधानाची गोष्ट आहे. मी लहानपणी अमळनेरला गुरुजींच्या सहवासात होतो. त्यांचा सफाई करतानाचा फोटो साधनेच्या मागील पृष्ठावर पाहून आजसुद्धा मी सफाईच्या कामात त्यांच्याबरोबर आहे असा भास झाला. गुरुजीचे सर्व धर्मावर प्रेम होते. आमचा  समाज जैन किंवा हिंदू किंवा मुसलमान असा भेदभाव त्यांनी कधी जाणवू दिला नाही. अमळनेरच्या रथाची प्रथम मोगरी मुसलमान देत असे, त्याचा दाखला गुरुजी आपल्या भाषणांतून नेहमी देत. त्या वेळी त्यांचे डोळे भरून येत. महारवाड्यात जाऊन ते हरिजनांसमवेत भोजनही घेत असत. गुरुजींच्या संबंधीच्या अगणित आठवणी आपल्या अंकामुळे जाग्या झाल्या.

कांतिलाल जव्हेरी, मुंबई

----------

10  मेचा अंक साधनेचा अंक मिळाला पत्राची दाद मिळाली याचा विशेष आनंद. अंकातील सर्वच लेख उत्तम आहेत. वाचकांना अशी शिदोरी देताना मन सुखावतं. कृतज्ञ आहे. वाचकांतर्फे आभार!

कमल कुलकर्णी, कागबाड

----------

मा. कृष्णराव विशेषांक, पाठोपाठ मंदिरप्रवेश सुवर्णजयंती विशेषांक- खरे सांगायचे तर अलीकडचे अनेक नित्याचे अंकदेखील विचारविमर्श आणि समाजजीवनाचे विविध अंगांनी घडणारे मार्मिक दर्शन यांमुळे बुद्धीची कक्षा आणि भावनेची श्रीमंती दोहोंतही भर घालणारे वाटले. आम्ही साधनेची उत्सुकतेने वाट पाहतो ती या तिच्या वहुमोल उद्देशांमुळेच!

सोपान नाना सालुंके, मुलुंड

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक ( 1331 लेख )

साधना साप्ताहिकाचे वाचक 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी