'संघर्ष व रचना यांच्यावर आधारलेली मतपेटी' ह्या ऐवजी 'संघर्ष व रचना यांच्यावर आधारित नसलेली मतपेटी' असे हवे असे वाटते.
1) 'साधना'च्या 11 मे अंकाच्या मुखपृष्ठावर डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या समयोचित विचाराची आपण वाचकांना आठवण करून दिलीत याबद्दल आपले अभिनंदन. पॅंडोराची पेटी उघडताच जशी काही अरिष्टे बाहेर पडली तशी, या लोकसभेच्या निवडणुकीची मतपेटी उघडल्यावर बाहेर न पड़ता, ही आपली अपेक्षा रास्त आहे. प्रत्यक्षात काय घडते हे लवकरच प्रत्ययास येईल.
आपली ही अपेक्षा व्यक्त करायच्या आधी आपण जे वाक्य लिहिले आहे ते डॉ. लोहियांच्या विचाराशी सुसंगत वाटत नाही. 'संघर्ष व रचना यांच्यावर आधारलेली मतपेटी' ह्या ऐवजी 'संघर्ष व रचना यांच्यावर आधारित नसलेली मतपेटी' असे हवे असे वाटते. संघर्ष व रचना यांच्यावर आधारलेल्या मतपेटीतून अरिष्टे बाहेर न पड़ता त्याद्वारेच समाजपरिवर्तन होऊ शकेल असा विश्वास डॉ. लोहिया यांनी व्यक्त केला होता.
2) ह्या अंकातल्या अग्रलेखात महात्मा जोतिराव फुले यांची सार्वजनिक सत्यधर्माविषयीची कल्पना लोकांच्या नजरेस आणून राजकारणात सार्वजनिक सत्यधर्म येणे आवश्यक आहे ह्या मुद्यावर आपण रास्त भर दिला आहे. दुर्दैवाने वस्तुस्थिती अशी आहे की ईशोपनिषदातील एका वचनाचा अर्थ थोडा निराळा करून असे म्हणता येईल की ह्या सत्यधर्माचे मुख हिरण्मय पात्राने झाकले आहे. त्या सुवर्णाचा मोह कुणाला सोडवत नसल्याने ते दूर व्हावे आणि सत्यधर्माचा लोकांना प्रत्यय यावा अशी त्या श्लोककर्त्त्यासारखी प्रार्थना आज कुणी करत नाही.
3) श्री. श्रीनिवास कुलकर्णी यांच्या लेखात उद्धृत केलेली (पू. 9) "जिस देश का बचपन भूखा हो...." ही रचना कुणाची आहे?
4) 'बैंडिट क्वीन फुलन ते भंवरीदेवी....'ह्या श्रीमती प्रतिभा शिंदे यांच्या लेखात त्यांनी पुरुषप्रधान संस्कृतींचे वाभाडे काढले आहेत, ते वस्तुस्थितीस अगदी धरून आहेत. अत्यंत पोटतिडिकीने त्यांनी लेख लिहिला आहे. त्यांच्या आवाहनाला योग्य प्रतिसाद मिळायला हवा. ह्या पुरुषप्रधान संस्कृतीला त्यांनी 'अहंकारी' हे सुयोग्य विशेषण दिले आहे. परंतु तिला जातीयवादी म्हणायचे कारण दिसत नाही. अहंकारी पुरुषी संस्कृती जातपात मानत नाही असे वाटते. जातीयवादी पुरुष असो, अगर स्वतःला जातीयवादी न म्हणविणारा पुरुष असो. सामान्यतः कोणीही ह्या अहंकारी संस्कृतीपासून मुक्त नाही.
डॉ. म. अ. मेहेंदळे, पुणे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या