डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आजकाल सर्वत्र तंत्रज्ञानाधारित शिक्षणव्यवस्थेचे वारे वाहू लागले आहे. पण जिथे तंत्रज्ञानाधारित सोयीसुविधा उपलब्ध नाहीत तिथे शिक्षणात अनंत अडचणी येत आहेत. असेही आपल्याकडील एकूणच शिक्षण व्यवस्थेबाबत पालक आणि सरकार या दोनही पातळींवर प्रचंड प्रमाणात विरोधाभास आहे. शिक्षणाबाबतचे मूलभूत निकषदेखील आपण धडपणे राबवू शकलेलो नाही, तिथे आता ऑनलाइन शिक्षणाचा आग्रह धरला जात आहे. शिक्षणासाठी नवीन तंत्र वापरायचे, मात्र शिकवण्याच्या पद्धतीचा जुनाच मंत्र वापरायचा, हे विरोधाभासी तर आहेच पण कालसुसंगतदेखील ठरणार नाही. केवळ वक्ते आणि श्रोते निर्माण न करता कृतिशील विद्यार्थी घडवायचे आहेत आणि तेच खरे तर शिक्षणाचेदेखील प्रयोजन आहे.

चिकित्सा करणारी पिढी उभी करायला हवी?
‘जीवनासाठी शिक्षण कसे निर्माण करावे?’ हा डॉ. अभय बंग यांचा सर्वांगसुंदर आणि विचारप्रवण लेख वाचला. या अनुषंगाने आजच्या एकूणच शिक्षणव्यवस्थेचे मूल्यमापन होणे गरजेचे वाटते. कशासाठी शिक्षण? याचे उत्तर ‘पोट भरायच्या साधनासाठी’ असेच मिळेल. खरे तर याचे उत्तर ‘समाधानानं जगण्यासाठी’ किंवा ‘भविष्यातही चांगलं जग असण्यासाठी’ तसेच ‘वैचारिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी’ असेच असायला हवे. मात्र आपली झेप केवळ रोजीरोटी यापलीकडे कधी जात नाही. आजचे शिक्षण ‘पोटार्थी’ झाले आहे.

सर्व प्राचीन मानव संस्कृतींमध्ये ज्ञानसाधना ही अविरत चालणारी सर्वमान्य अशी प्रक्रिया होती. भारतीयांनी शोधलेली कौशल्ये, ग्रहमानावरून काढलेली दिशा-परिचय, शिल्पकलेतील कलाकौशल्य संपूर्ण जगाला थक्क करतात. शेती, सुतारकाम, संगीत, नृत्यादी कलाकौशल्ये ही मात्र जातीजमातींत वंशपरंपरेने कैद होती. त्या गोष्टी ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे बंद पाडल्या. परंतु जुन्या व्यवस्थेत जात, धर्म, जमात, लिंगभेद भावाची पाचर मारलेली होती. व्यवसाय निवडीत काहीही वाव नव्हता आणि आपल्या जातीच्या परंपरागत कामापेक्षा वेगळ्या विद्येत कितीही कल, जिज्ञासा, गती असणाऱ्याला जातीच्या बंधनातून मुक्त व्हायची मुभा नव्हती.

त्यामुळे ब्रिटिशकाळात शिक्षणाची दारं उघडणं हेच मोकळा श्वास मिळण्याइतपण मोलाचं ठरलं. भारतात आज गरज आहे ती इथल्या लोकांना उपयुक्त ठरेल, त्यांच्यातला न्यूनगंड पुसून काढेल, त्यांची उपजत संपूर्ण सर्जनशीलता पणाला लावायची संधी देईल, अशा  शिक्षणाची. कौशल्ये तर भारतीयांकडे पूर्वीपासून होतीच. आजही ‘जुगाड’ म्हणवल्या जाणाऱ्या प्रकारानं सर्जनशीलतेचा वापर करून स्थानिक ज्ञानाची जोड देऊन किती तरी दुर्लक्षित युवक-युवती नवे शोध, नवी अवजारं, नवी तंत्रे पुढे आणत आहेत. परंतु सत्या नाडेला असोत की सुंदर पिचई, यांसारखे बड्या जागतिक कंपन्यांचे प्रमुख ‘मूळ भारतीय’ असले तरी आज ‘भारतात’ नाहीत हे वास्तव नजरेआड कसे करणार? अमेरिका असो की ब्रिटन-जर्मनी ज्ञानाला महत्त्व देतात. केवळ औपचारिक शिक्षणाला किंवा कौशल्यास नाही. 

शिक्षण ही मुलांचे भावविश्व ढवळून टाकणारी, त्यांच्या शैक्षणिक-वैचारिक प्रगतीच्या जडणघडणीतील अत्यंत महत्त्वाची अशी पायरी. तसेच हा विषय जेवढा संवेदनशील तेवढाच गंभीरदेखील. पण आपल्या धोरणकर्त्यांना आणि काही अंशी पालकांना याचे काहीही गांभीर्य नसल्याचे ‘मुलांचे शिक्षण’ या विषयाकडे बघण्याच्या त्यांच्या एकंदरीतच ‘इनपुट-आउटपुट’ या दृष्टिकोनाने जाणवते. कोणत्याही गंभीर आणि अवघड प्रश्नांवर तितकीच सोपी उत्तरे शोधण्याची असलेली आपली एकंदरीतच सामाजिक समज आणि कोणत्याही विषयात राजकारण आणण्याचा असलेला आपला आवडता राष्ट्रीय खेळ, यांमुळे शिक्षणाचे बाजारीकरण आणि शाळांचे राजकीय आखाडे कसे झाले हे कोणाच्याही लक्षातदेखील आले नाही. 

आजकाल सर्वत्र तंत्रज्ञानाधारित शिक्षणव्यवस्थेचे वारे वाहू लागले आहे. पण जिथे तंत्रज्ञानाधारित सोयीसुविधा उपलब्ध नाहीत तिथे शिक्षणात अनंत अडचणी येत आहेत. असेही आपल्याकडील एकूणच शिक्षण व्यवस्थेबाबत पालक आणि सरकार या दोनही पातळींवर प्रचंड प्रमाणात विरोधाभास आहे. शिक्षणाबाबतचे मूलभूत निकषदेखील आपण धडपणे राबवू शकलेलो नाही, तिथे आता ऑनलाइन शिक्षणाचा आग्रह धरला जात आहे. शिक्षणासाठी नवीन तंत्र वापरायचे, मात्र शिकवण्याच्या पद्धतीचा जुनाच मंत्र वापरायचा, हे विरोधाभासी तर आहेच पण कालसुसंगतदेखील ठरणार नाही. केवळ वक्ते आणि श्रोते निर्माण न करता कृतिशील विद्यार्थी घडवायचे आहेत आणि तेच खरे तर शिक्षणाचेदेखील प्रयोजन आहे.

प्रयोग, अनुभव आणि चिंतनाच्या पायावर उभे असलेले शिक्षण देणाऱ्या ‘आनंदशाळा’ निर्माण करणे हेच आपले प्रथम उद्दिष्ट असले पाहिजे. मग शिक्षण घेणे हीच एक आनंदयात्रा होऊन त्यातून जीवनाभिमुख ज्ञानाचा झरा अविरत वाहून पुढच्या पिढ्यांची ज्ञानतृष्णा भागवत राहील. शिक्षणातून आपल्याला प्रश्नांची उत्तरे ‘पाठ करणारी पिढी’ नाही तर ‘प्रश्न विचारणारी-चिकित्सा करणारी पिढी’ उभी करायची आहे आणि आपले शिक्षण धोरणही याच पद्धतीचे असावयास हवे, असे वाटते.

जगप्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन यांचे शिक्षणासंदर्भात एक वाक्य दखल घेण्याजोगे आणि विचार करण्यास उद्युक्त करणारे आहे आणि ते म्हणजे, ‘मी शाळा सोडली, कारण माझ्या असे अनुभवास आले की शाळा ही माझ्या शिक्षणाच्या आणि ज्ञानसाधनेच्या फारच आड येते आहे.’ 
बाळकृष्ण शिंदे, बिबवेवाडी, पुणे

चीनने भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचे विवेचन...
दि.2 ऑक्टोबरच्या अंकातील सतीश बागल यांचा ‘भविष्यातील चीन : एक चिंतन’ हा लेख वाचण्यात आला. चीनबद्दल भारतीयांच्या मनांत कायमच कुतूहल आहे, संशय आहे व सर्वसामान्य जनतेचे मत फारसे काही चांगले नाही. चीन अधूनमधून कुरापती काढतच असतो, पाकिस्तान त्यास साथ देतो. अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीमुळे  आपले संकट आणखीच गहिरे झाले आहे. या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार केल्यास बागल यांनी केलेले विवेचन अनेक दृष्टीने विचार करायला लावणारे आहे. सन 2012 पर्यंत चीनला जागतिक महासत्ता होण्याचे काही संकेत दिसत नव्हते. 2013 पासून क्षी जिनपिंग सत्तेवर आले, त्यांनी एक हाती सत्ता घेण्याचा खूप प्रयत्न केला, त्यात त्यांना सुरुवातीला फारसे यश आले नाही. कारण चीनची प्रचंड लोकसंख्या, माओंच्या विचाराखाली वाढलेली जनता व पुढारी यामुळे त्यांना संमिश्र यश आले. 2016 पासून त्यांनी ज्या हिरारीने सर्व क्षेत्रात प्रगती करण्याचा जोरदार प्रयत्न केला, त्यास बऱ्याच प्रमाणात यश आले. या सर्व गोष्टींचे विवेचन खूपच चांगल्या पद्धतीने केलेले आहे.

आपणासाठी भविष्यात काय वाढून ठेवले आहे, भारताने काय करावयास हवे याचे खूप छान विवेचन त्या लेखात केले आहे. सन 1949 पासून ते आजपर्यंत जी अनेक मंडळी सत्तेवर आली व त्यांनी ज्या सुधारणा करण्याचा प्रयत्न केला त्यात अंशत: पूर्वीच्या राज्यकर्त्यांना यश आले. आज असे दिसते क्षी जिनपिंग यांची चीनला जागतिक महासत्ता बनण्याची मोठी महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी लागेल ती किंमत देण्याची त्यांची तयारी आहे. लेखात असे दिसते की अतिशय निर्दयीपणे सुधारणा राबवण्यात आल्या, त्यासाठी लक्षावधी लोकांचा बळी घेण्यात आला. चीनमधील कम्युनिस्ट पक्ष हा एक प्रकारे आयर्न कर्टन आहे. त्यामुळे अंतर्गत काय घडामोडी होतात हे बाहेरच्या जगाला नीट कळत नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे करोनाचा उदय व त्याचा झपाट्याने झालेला जागतिक प्रवास.

लेखकाच्या मते जगामध्ये चीनबद्दल नकारात्मक मत असल्याने अनेक छोटी राष्ट्रे गप्प बसणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर भविष्यात असलेले भारताचे स्थान हा एक आशेचा किरण आहे, त्यासाठी आपणास खूप मेहनत, कष्ट घ्यावे लागतील. स्थानिक अस्मिता सोडून राष्ट्रीय अस्मिता जोपासावी लागेल. चीनचे वाढत जाणारे लष्करी सामर्थ्य, जागतिक व्यापारातील त्याचे स्थान, लहान राष्ट्रांना कर्ज देऊन मिंधे करणे हे सर्व चालू राहणारच आहे. एके काळी अमेरिकेने केलेली सर्व मदत चीनचे राज्यकर्ते सोईस्करपणे विसरलेले आहेत, त्यांना सत्तेची चटक लागलेली आहे. हे लेखकाने खूप छान पणे बिंबवले आहे. चीनमधील अंतर्गत वाद, पाश्चात्त्य लेखकांनी केलेली टिपणी व लेखकाने घेतलेले श्रम त्यामुळे हा लेख वाचनीय झाला आहे.
चंद्रकांत गवांदे, पुणे

बेरोजगारी कमी करण्याचा एकच मार्ग
11 सप्टेंबरच्या अंकातील डॉ. अभय बंग यांचा ‘जीवनासाठी शिक्षण कसे निर्माण करावे?’ हा लेख वाचला. लेख खूपच विचारप्रवर्तक आहे. एकीकडे क्लासच्या जाहिराती आणि दुसरीकडे बेरोजगार तरुणांच्या झुंडी हे चित्र नक्कीच विचार करण्यासारखे आहे. दिवसेंदिवस शिक्षणाचा स्तर खालावत चालला आहे. सध्याच्या शिक्षणपद्धतीतील त्रुटी हे बेरोजगारीचे प्रमुख कारण आहे. विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळाले तरच ते आपली प्रगती करू शकतील. महात्मा गांधी यांनी सांगितलेली ‘नयी तालीम’ ही पद्धती कितीही योग्य असली तरी सध्याच्या गुणांवर आधारित व तीव्र स्पर्धेच्या युगात लोकांच्या पचनी पडणे कठीण आहे.

यावर एक पर्याय असा आहे की, मुलांना प्राथमिक वर्गापासूनच व्यवसाय प्रशिक्षण दिले तर ते पुढील आयुष्यात त्यांना उपयोगी पडेल. आमच्या वेळेस शाळेत आम्हांला शिवणकाम, बागकाम असे विषय अभ्यासक्रमात होते. असे विषय शाळेत शिकविले तर पुढे त्याचा उपयोग नक्कीच होईल. तसेच प्रत्येक अभ्यासक्रमात प्रत्यक्ष अनुभवावर प्रशिक्षण घेणे अनिवार्य केल्यास विद्यार्थ्यांना नोकरी किंवा व्यवसाय करण्याचा दृष्टीने त्याचा फायदा होईल.

शिक्षणसंस्था व औद्योगिक व्यवस्थापन यांचे सहकार्य दोघांच्या दृष्टीने लाभदायक ठरेल. विद्यार्थी प्रशिक्षणासाठी कारखान्यात जाऊ शकतील व कारखाने त्यांचे संशोधन प्रकल्प शिक्षण संस्थांमध्ये करू शकतील. बेरोजगारी कमी करण्याचा हाच एक मार्ग सध्या तरी दिसतो आहे.
प्रदीप चंद्रचूड, पुणे

मुद्दा आहे मुक्तीचा विचार प्रगल्भ होण्याचा...
दि.25 सप्टेंबरच्या अंकातील माझ्या लेखावर शबाना वारणे यांचा आलेला प्रतिसाद वाचला. आवडत्या फेमिनिस्ट बैठकीतून बाहेर येण्याची गरज असून माझी बैठक 80-90 च्या दशकातील आहे, असा त्यांचा निष्कर्ष आहे. मुळात माझा लेख हा मित्र विलास सोनावणे यांच्या मृत्यूच्या निमित्ताने त्याच्याशी सतत झालेल्या संवादाची उजळणी आहे. त्यात जात आणि लिंगभावाच्या संदर्भातील विलासच्या मांडणीतील बलस्थाने आणि मर्यादा मला ज्या जाणवल्या त्यांचा उल्लेख आहे. शबाना वारणे यांचा लेखातील उल्लेख हा तपशिलाचा भाग म्हणून आहे. त्यातील त्यांना खटकू शकणारे ‘हिंदू मुलाशी लग्न’ आणि ‘संसारात रमणे’ हे उल्लेख मी समजू शकते. परंतु माझे ते गाभ्याचे म्हणणे नाही. त्यातील तपशील चुकीचे ठरल्याने मला दुखः होण्याचेही कारण नाही. उलट काही नवी स्त्रीवादी समज घेऊन सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान होत असेल तर ती माझ्यासाठी आनंदाचीच बाब असेल. लेखातील माझा मुख्य मुद्दा हा होता की, जातीच्या प्रश्नावर अतिशय प्रवाही आकलन असणाऱ्या मित्र विलास सोनावणे यांच्या लिंगभावाच्या संदर्भातील आकलनास मर्यादा होत्या आणि त्याचा परिणाम म्हणून स्त्रीवादी राजकारण आणि नेतृत्वे युवा भारतच्या प्रयोगात उभे राहिलेले दिसत नाही. त्यांनी अलीकडेच लिहिलेले ‘बहुजन स्त्रीवाद’ हे पुस्तक यासंदर्भात लिखित संहिता म्हणून चिकित्सेसाठी उपलब्ध आहे. व्यक्तिगत पातळीवर विलास सोनावणे यांच्याशीचे नाते किती जवळचे होते हा मुद्दा महत्त्वाचा नाही, तर मुद्दा मुक्तीचा, विचार वाढण्याचा, विस्तारण्याचा आणि प्रगल्भ होण्याचा आहे. त्यामुळेच गुरु-शिष्य, स्त्री-पुरुष अशा उतरंडीच्या, विषमतेच्या नात्यापेक्षा मित्र म्हणून संवादात राहणे मला महत्त्वाचे वाटते. त्यामुळे माझ्या लेखातील काही तपशिलांच्या उल्लेखाने शबाना दुखावली असेल तर तो तपशिलांचा दोष म्हणून मी स्वीकारते. तसेच आवडत्या फेमिनिस्ट बैठकीतून बाहेर येण्याच्या संदर्भातही त्यांनी काही नवी मांडणी केली तर तिचे मी मनापासून स्वागतच करेन..
विद्युत भागवत,  पुणे

धर्म ‘विफल’ होतो तेव्हा साहित्य बाजी मारते...
ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्याशी अतुल देऊळगावकरांनी साधलेला संवाद म्हणजे ‘बोलिले जे...’ या नव्या पुस्तकाविषयी अजिंक्य कुलकर्णी यांनी दि.25 सप्टेंबर 2021 च्या अंकामध्ये मांडणी केली आहे, ती समर्पक व एलकुंचवार यांच्या लेखनाच्या मान्यतेची अभिव्यक्ती व्यक्त करणारी आहे. लेखक होऊ घातलेल्या नव्या पिढीला बोलिले जे... हे पुस्तक समजून घेता आले पाहिजे. लेखकांसाठी लेखनासंदर्भात एलकुंचवार यांचे मत महत्त्वाचे आहे. ते व्यक्त करतात की लेखकाला ‘स्वतःकडे, स्वतःच्या अंतरंगाकडे, स्वतःचे अंतरंग स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेकडे अधिक जाणीवपूर्वक पाहता यायला हवे. साहित्यकृतीला किंवा लेखकाला भाषा, प्रांत, धर्म, जाती, संप्रदाय किंवा राष्ट्राच्या सीमा बांधू शकत नाहीत.’ यामध्ये सन 1970 पासूनची सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व कौटुंबिक इत्यादींच्या बदलत्या परिस्थितीचे चित्रण व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत साहित्य व साहित्यकार धर्म व समाज व्यवस्थेला मार्ग दाखवू शकतो.

हिंदी भाषेतील एक म्हण आहे- ‘जहां धर्म विफल होता है वहां साहित्य बाजी मारता है.’ हिंदी भाषेतील साहित्यिक गजानन माधव मुक्तिबोध यांच्या ‘एक साहित्यिक की डायरी’ या पुस्तकाचे व ‘बोलिले जे’ या पुस्तकात अतुल देऊळगावकर यांनी साधलेली अभिव्यक्ती एकमेकांशी साधर्म्य दाखवणारी आहे. साहित्यिकाला आपले भावविश्व माहीत असतात. महेश एलकुंचवार यांची पुस्तके लेखकांना आत्मपरीक्षण करायला शिकवितात. त्यामुळे भारतीय समाजातील लेखकांचे महत्त्व नगण्यच म्हणावे लागेल. त्यासाठी बदलत्या काळानुसार लेखकाला निर्मळ व समाजसंस्काराच्या उद्देशाने लेखन करावे लागेल. अशा प्रकारचे निरीक्षण आणि मांडणी अजिंक्य कुलकर्णी यांनी केलेली आहे.
प्रा.डॉ.विश्वनाथ भालेराव, उदगीर, जि. लातूर

धर्माचा स्वीकार श्रद्धेने व संस्काराने होत असतो
28 ऑगस्ट 2021 च्या साधनामध्ये दहा जणांनी ‘धर्माने मला काय दिले?’ या विषयावर लेख लिहिलेले आहेत. हे दहाही लेखक असामान्य आणि अलौकिक आहेत. त्यामुळे असेही विधान करता येईल की, या असामान्य व्यक्तींनी आपल्या आत्मबळाच्या जोरावर धर्मातील फक्त चांगल्याच गोष्टी उचलल्या व वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम होऊ दिला नाही. पण पूर्ण समाजावर धर्माचा काय परिणाम होतो हे ठरवण्यासाठी, सामान्य लोकांवर धर्माचा काय परिणाम होतो हेच पाहिले पाहिजे. पण हा परिणाम ठरवण्यासाठी सामान्य धार्मिक लोकांनी लेख लिहून फायदा होणार नाही. कारण सामान्य धार्मिक लोक धर्माचा आपल्यावर काही वाईट परिणाम झाला हे जाणू शकणार नाहीत आणि जाणवले तरी मान्य करणार नाहीत. कारण धर्माचा स्वीकार श्रद्धेनेच केलेला असतो. तो स्वीकार काही विचारपूर्वक केलेला नसतो. कितीही विरोधी पुरावा मिळाला तरीही जो विश्वास ढळत नाही त्यालाच श्रद्धा म्हणतात. माणसावर धर्म हा बहुतेक वेळा जन्माने आणि लहानपणी केलेल्या संस्कारांनी लादलेला असतो, धर्माचे बाळकडूच त्याला मिळालेले असते. त्यामुळे धर्माचा सामान्य माणसावर व समाजावर काय परिणाम होतो हे निधर्मी माणसाने धार्मिक माणसांच्या व समाजांच्या केलेल्या निरीक्षणाद्वारेच ठरवणे शक्य आहे. तसेच वेगवेगळ्या धार्मिक समाजांच्या इतिहासाच्या तुलनात्मक अभ्यासानेच शक्य आहे.
सुभाष आठल्ये,  कोल्हापूर

त्यांच्या लेखाचा परिणाम दीर्घकाळ राहतो...
दि. 11 सप्टेंबरचा अंक नेहमीप्रमाणेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. संपादकीयामध्ये दोन उद्योजक व एक इतिहासकार व डॉ. अभय बंग यांची मुखपृष्ठकथा हे या अंकाचे वैशिष्ट्य तर आहेच, पण शिक्षक म्हणूनसुध्दा चिंतन करायला लावणारे आहे. अंक वाचताना डॉ. बंग यांच्या लेखाचा दीर्घकाळ परिणाम राहतो. कोविडमुळे दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. ऑलाईन शिक्षण सुरू आहे, पण हे प्रमाण 30 टक्के आसपास आहे. अशा वेळी केवळ साधने उपलब्ध नाहीत म्हणून फार मोठा वर्ग शिक्षणाच्या परिघाबाहेर असलेला दिसून येतो. 
अजय काळे, सांगली

छोटी पण महत्त्वाची दुरुस्ती
 दि. 31 जुलैच्या वसंत बापट विशेषांकात मी लिहिलेल्या लेखात एक तपशिलाची चूक झाली आहे. ‘एक तास - एक तास द्या देशाला एक तास’  हे गीत बापटांचे आहे असे मी लिहिले आहे. पण ते त्यांचे नसून श्री.भोसेकर यांचे आहे. माझ्या स्मरणातील गफलतीमुळे असे झाले, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. ही चूक माझ्या निदर्शनास सुहासिनी हेगडे यांनी आणून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. साने गुरुजींच्या स्मरणार्थ सेवा पथकाचे काम सुरू झाले, त्या वेळी हे गीत श्री. भोसेकर यांनी लिहिले आणि आम्ही ते नेहमी म्हणत असू.
श्यामला वनारसे, पुणे
 

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतीनिमित्त काढलेला ‘धर्माने मला काय दिले’ या विशेषांकावर आणि  दि. 11 सप्टेंबरच्या अंकातील डॉ.अभय बंग यांच्या शिक्षणविषयक लेखावरही बऱ्याच प्रतिक्रिया आल्या.  त्या दोन्हींच्या संदर्भातील प्रतिक्रियांना जास्तीत जास्त जागा प्रतिसादमध्ये मागील काही अंकांमध्ये दिली आहे. मात्र आता त्या दोन्ही विषयांवरील प्रतिसाद प्रसिद्ध करणे जागेअभावी थांबवत आहोत.

– संपादक

Tags: वाचक पत्रे प्रतिसाद weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके