डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'साने गुरुजी कालबाह्य झाले आहेत,’ असे म्हणणाऱ्यांनी ही छोटी पुस्तिका वाचावी. गुरुजींचे समग्र जीवन चिरंतन संस्कार करणारे आहे याची प्रचिती ही पुस्तिका वाचल्यावर येते.

यशपाल यांच्या लेखाच्या निमित्ताने

'साधना' वाढावं या बाबत वैयक्तिक प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्र सेवा दलाचं काम करताना ते करता येतं. ‘साधना' 27 फेब्रुवारी 1999 अंक फार आवडला, कारण प्रो. यशपाल यांचा अनुवादित लेख. मला वाटतं, यश पालांसारखे जेवढे असतील नसतील अशांचं एक संमेलन साधेपणानं घ्यावं. त्यात आम्हां कार्यकर्त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, त्याचा उपयोग या बाबतचे प्रश्न विचारू द्यावे. एक प्रकारे कार्यकर्त्यांच्या शंकेचं समाधान झालं की, पुढचा प्रश्न तयार होतोच हे सातत्यही राखलं जावं. हे का सांगतोय कारण, यशपालजी पंजाबमधील शेतकऱ्यांची गोष्ट लेखात सांगतात. त्याप्रमाणे बरेच शेतकरी, कामकरी, कामगार, विखुरलेले असतील त्यांच्यापर्यंत कसं जाता येईल, याची जाण कार्यकर्त्यांना येईल. कॉलेजातले विद्यार्थी काही घरीच करामती करतात. भंगार जमवतात, त्यातून काहीतरी बनवण्याची त्यांची जिज्ञासा असते. ती ही 'चूप बसा' संस्कृती गाडून टाकते.

शाळा-कॉलेजमध्ये अपवाद सोडला तर बाकी ठिकाणी प्रोत्साहन मिळत नाही. हे सर्वांना पटेल असं वाटतंय. तसंच घरातही आढळतं. ‘साधना’चं आणखी कौतुक करण्यासारखं आहे की, लेखकांचे पत्ते टाकायला आता साधनाला संकोच वाटत नाही. हे फार चांगलं आहे. कारण लेखकाला शंका विचारता येतात. नाहीतर धार्मिक मासिकांत पत्ते पहायला मिळतात अगदी भरमसाट. यशपालांचा लेख किती सोपा, सुटसुटीत, खूपच छान. अगदी सेवा दलाच्या शाखेवरील सैनिकाससुद्धा समजतो. छोटी-छोटी वाक्ये, सोपी शब्दरचना. यातूनच भावार्थ पोचवणे हेच तर गुरुजींची ‘साधना’ करायची. आता पुन्हा तसं अजून जास्त व्हावं.

अगदी मार्क्सवादी, समाजवादी, गांधीवादी यांच्यामध्ये एक दुवा सारखाच आढळतो. नेहमीच्या वापरातले शब्द वापरायचे नाही. म्हणजे ज्यांच्यासाठी परिवर्तनाचा लढा त्यांनाच जर भाषा समजत नसेल तर मग काय करणार, असं साने गुरुजीसुद्धा म्हणाले असते. अपवाद, सोपं लिखाण सांगणारे आहेतही. पण कमीच. साधनेने शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी मासिकाचा विचार करावा. आम्ही कार्यकर्ते त्या त्या पातळीवर खपवू. गुरुजींची ‘साधना’ मुलांसाठीही असावी.

श्याम सोनार, चाळीसगाव.

----------

धडपडणाऱ्या मुलांचे साने गुरुजी

साने गुरुजी जन्मशताब्दीनिमित्त 'साधना प्रकाशना’ने नवसाक्षर आणि मुले यांच्यासाठी प्रसिद्ध केलेली 'धडपडणाऱ्या मुलांचे साने गुरुजी' ही गुरुजींची जीवनकथा फारच सरस वठली आहे. लेखक वसंत बापट यांनी सोप्या सहजसुंदर भाषेत साने गुरुजींचा जीवनपट उलगडून दाखवला आहे. नव्या पिढीला साने गुरुजींच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाची ओळख नाही. 'साने गुरुजी कालबाह्य झाले आहेत,’ असे म्हणणाऱ्यांनी ही छोटी पुस्तिका वाचावी. गुरुजींचे समग्र जीवन चिरंतन संस्कार करणारे आहे याची प्रचिती ही पुस्तिका वाचल्यावर येते. मुलांनी आणि शिक्षकांनी 'धडपडणाऱ्या मुलांचे साने गुरुजी' हे पुस्तक विकत घेऊन वाचायला हवे. साधना प्रकाशनाने केवळ दहा रुपयांत हे पुस्तक वाचकांना उपलब्ध करून दिले, याबद्दल साधना प्रकाशनाला शाबासकी.

सदानंद श्रीरंग वाडदेकर, मुंबई.

----------

तुकारामास वेठीस धरले!

20 मार्चचा 'साधना' वाचला. पृष्ठ 19 वरील 'तुकोबांचे विमान अजूनही येते आहे ! ही टिपणी वाचली. तुकोबांचे विमान केव्हाही येवो, पण माधवरावांचे विमान फारच उंचावर गेले आहे. आणि त्या विमानापहरण नाट्यामध्ये न्या. म. गो. रानडे आणि आचार्य अत्रे यांना निष्कारण ओलीस ठेवले आहे. रानडे, अत्रे यांनी संपूर्ण तुकाराम मनापासून वाचला होता. त्यावर त्यांची नितांत श्रद्धा, निष्ठा होती. ज्ञान होते पण अहंकार नव्हता. आपले पुरोगामित्व दाखवण्यापुरता तुकाराम ते वापरत नव्हते. पण माधवरावांनी ठाकऱ्यांचा ब्राह्मणावरील राग सांगण्यासाठी तुकारामास वेठीला धरले आहे. अशा ज्ञानी लोकांसाठी तुकारामच सांगतात :

वेदपरायण पंडित वाचक।

न मिळती एक एका मधी।।

पाहो गेलो भाव कैसी आत्मनिष्ठा। 

तेथे देखे चेष्टा विपरीत।। 

आपुलिया नाही निवाले जे अंगे। 

करती रागे गुरुगुरु।।

तुका म्हणजे मज कोणाचा पांगिला। 

नको बा विठ्ठला करूं आता।।

श्रीधर वि. सहस्रबुद्धे, पुणे.

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके