डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बऱ्याच अशा व्यक्ती आहेत की, ज्यांनी केवळ पैशाच्या बळावर उच्च शिक्षण घेतले (जे असा खर्च करू शकत नाहीत पण त्यांच्यापेक्षा अनेक पटींनी लायक आहेत) परंतु त्यांचा लाभ समाजाला होत नाही अशांचा आढावा घेऊन त्यांच्या पदव्या परत का घेऊ नयेत?

दा. गो. देशपांडे

अलीकडे 'साधना' त श्री. सदानंद वर्दे यांचे जे लेखन झळकत आहे ते वाचनीय आणि असेच ते येत राहावे अशी अपेक्षा वाढवणारे आहे. "मराठवाडा' दिवाळी अंकातही त्यांचा अतिशय लक्षणीय लेख आहे. 22/11/97 च्या अंकात श्री. श्रीनिवास कुलकर्णी यांचा 'लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार हवा' हा लेख आजच्या देशाच्या एकंदर परिस्थितीत अतिशय औचित्यपूर्ण आहे. त्यातील सर्वच मुद्यांशी सहमत होणे कठीण असले तरी अर्थात तो एका वेगळ्या प्रतिक्रियेचा विषय आहे. एक मात्र स्पष्ट करावेसे वाटते की, भाजपला सत्तेवर येऊ देऊ नये या भूमिकेने एकत्र आलेल्या या सरकारने याशिवाय दुसरा कोणता लोकहितार्थ व लोकशाहीस पूरक असा उद्योग कार्यान्वित केला हा एक विचार व खल करण्यासारखा प्रश्न आहे. शिवाय कॉपीयरची बंदी उठवणारे श्री. मुलायमसिंग आणि स्त्रियांना राखीव कोटा देण्याच्या विधेयकाला कडाडून विरोध करणारे शरद यादवांसारखे लोक लोकशाहीस प्रतिष्ठा देणारे कोणते कर्म करत आहेत? 

आंध्रचे सध्याचे मुख्यमंत्री श्री. चंद्राबाबू नायडू काँग्रेसमधून तेलगू देशममध्ये आले आणि के. एन. टी. आर शी दगाबाजी करून सत्ता मिळवून आणि आता द्रमुकसारख्या टोकाच्या अहिन्दी बैठक व आविष्कार यांची पार्श्वभूमी असलेल्या पक्षाला पाठिंबा व्यक करावयास सरसावले आहेत, यात लोकशाहीशी कसली बांधिलकी आहे? अर्थात हे पत्र लिहावयास उद्युक्त झालो ते 'लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार हवा' या आज अत्यंत जरूर असलेल्या प्रस्तावनेमुळे. या संदर्भात मला आणखी असे म्हणावेसे वाटते की, इतर अशा अनेक बाबी आहेत की, त्यांना अनुलक्षून असाच विचार व्हावयास हवा. 

उदाहरणार्थ केवळ धनाची विपुलता असल्याने मेडिकल इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून पदव्या प्राप्त केलेले बरेच प्रदेशात आपली सेवा विकून वंचक अशा समृद्धीच्या मोहात फसून देशाचे नुकसानच करत नाहीत काय? देशाचा पैसा त्यांच्या शिक्षणाकरता कामी आला आणि त्याची परतफेड अशी व्हावी? त्याचप्रमाणे बऱ्याच अशा व्यक्ती आहेत की, ज्यांनी केवळ पैशाच्या बळावर उच्च शिक्षण घेतले (जे असा खर्च करू शकत नाहीत पण त्यांच्यापेक्षा अनेक पटींनी लायक आहेत) परंतु त्यांचा लाभ समाजाला होत नाही अशांचा आढावा घेऊन त्यांच्या पदव्या परत का घेऊ नयेत? ही माणसे बरीच हुशार, समर्थ पण आर्थिक दृष्ट्या दुबळी असल्याने अशांना या लोकांच्यामुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागले यावर आता काही करण्याची आवश्यकता वाटण्यास वाट पाहणे अपरिहार्य आहे काय?

----------

15 नोव्हेंबरचा अंक मिळाला. श्री. लीलाधर हेगडे यांच्या समर्पित जीवनाचे, देशभक्तीचे, कलासक्तीचे व त्यांनी केलेल्या प्रचंड कार्याचे चित्र आपण थोड्या शब्दांत व योग्य प्रकारे रेखाटले आहे. श्री. लीलाधर प्रथमपासूनच आपले निकटवर्तीय आहेत. सेवादलाच्या परिवारातील एक व्यक्ती म्हणून मला (व सर्वच सभासदांना) आपल्या उभयतांच्या कार्याचा अभिमान वाटतो. आपले कार्य तरुण पिढीला प्रेरणादायी ठरावे. डॉ. ना. य. डोळे ह्यांचा 'पावर- शिफ्ट 'वरुन तयार केलेला लेख आवडला. आणखी दोन लेख येणार म्हणजे सर्व पुस्तक वाचल्याचे व समजल्याचेही समाधान मिळणार, छान आहे. आल्विन टॉफलर यांचे 'फ्यूचर शॉक' हे  पुस्तक फार पूर्वी वाचले होते. मानवी विकासाचे तीन टप्पे त्यांनी त्यातही वर्णिले आहेत. 

1. शेती संस्कृती

2. औद्योगिक संस्कृती

3. इलेक्ट्रॉनिक संस्कृती.

पहिली संस्कृती विकसित व्हावयास दहा हजार वर्षे लागली, दुसरी तीन शतकांत विकसित झाली. व तिसरी काही दशकांत विकसित होईल हा त्यांचा अंदाज बरोबर ठरला. ना. य. डोळे यांच्या लेखामुळे अनेक मराठी वाचकांना 'पॉवर शिफ्ट 'बद्दल माहिती मिळेल व बदलत्या परिस्थितीस सामोरे जाण्याची तयारी करता येईल. तसे सर्वच लेख वाचनीय व चिंतनीय आहेत. 'जगावेगळे नाते’ हा लेख मन हेलावून गेला. 'अपंगत्वावर विजय' हे 'समाजप्रबोधन' चे प्रकाशन मागे वाचले होते. त्यापुढील ही हकीकत समजली.

Tags: लीलाधर हेगडे ना.य. डोळे हिंगोली व. व. भाले Liladhar Hegade N.Y. Dole Hingoli V.V. Bhale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके