डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

1954-55 च्या सामुदायिक सत्याग्रहात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या सुमारे दहा हजार सत्याग्रहींनी भाग घेतला होता. त्यापैकी अनेकांना पोर्तुगीजांनी गोळ्या घालून ठार मारले. अनेक जण जखमी झाले आणि अनेकांनी लाठीमार खाल्ला. विशेष म्हणजे हे सत्याग्रही देशाच्या सर्व राज्यांतून आले होते. जात-पात, पंथ, पक्ष आणि धर्म बाजूला ठेवून त्यांनी या सत्याग्रहात भाग घेऊन भारताच्या एकात्मतेचे अभूतपूर्व दर्शन घडविले, त्यांना अजूनपर्यंत केंद्राची मान्यता मिळालेली नाही. श्री. रामभाऊ तुपे यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय गोवा स्वातंत्र्यसंग्राम सैनिक संघ ही संघटना गेली दहा वर्षे केंद्राची मान्यता मिळावी म्हणून धडपड करीत आहे.

दादरा-नगर हवेली मुक्तिसंग्रामाची कथा

दि. 10 डिसेंबर रोजी पुणे येथील ‘दादरा-नगर हवेली मुक्तिसंग्राम समिती’तर्फे या संग्रामात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना केंद्र सरकारतर्फे अधिकृत मान्यता देऊन गौरवपत्रे देण्याचा समारंभ झाला. या समारंभास केंद्रीय गृहमंत्री श्री. लालकृष्ण अडवाणी आणि पेट्रोलियम मंत्री श्री. राम नाईक उपस्थित होते. दादरा-नगर हवेलीच्या मुक्तिसंग्रामात भाग घेतलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना केंद्रीय पेन्शन व अन्य सवलती देण्याचा निर्णय सध्याच्या आघाडी सरकारने 7/8 महिन्यांपूर्वीच घेतला होता. त्याची अंमलबजावणी जुलै 2000 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे या समारंभात श्री. अडवाणी व श्री. राम नाईक 15 ऑगस्ट 1955 व्या सामुदायिक सत्याग्रहात भाग घेऊन लाठीमार आणि गोळ्या खाल्लेल्या सत्याग्रहींसंबंधी काहीतरी घोषणा करतील, असे मला वाटले होते. म्हणून या समारंभात सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी उपस्थित राहिलो. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते. तेही या मुक्तिसंग्रामात भाग घेतलेले एक स्वातंत्र्यसैनिक. हा समारंभ सुरू होऊन एक-एक भाषण होऊ लागल्यानंतर माझ्या लक्षात आले, की हा समारंभ फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या स्वातंत्र्यसैनिकांपुरता मर्यादित आहे. क्रांतिवीर मोहन रानडे- ज्यांनी दादरा-नगर हवेलीच्या मुक्तिसंग्रामात भाग घेतलेला होता, ते पुण्यात असूनदेखील त्यांना या समारंभाचे साधे निमंत्रणही नव्हते! बाकीच्या स्वातंत्र्यसैनिकांची गोष्टच सोडा! वास्तविक या दादरा-नगर हवेलीच्या मुक्तिसंग्रामात आझाद गोमंतक दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि युनायटेड फ्रंट ऑफ गोअन्स इत्यादी लढाऊ संघटनांनी भाग घेतला होता. त्या वेळचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांना गोव्यातील संघटनांचे प्रतिनिधी भेटले होते आणि मोरारजीभाईंनी दादरा-नगर हवेलीच्या संपूर्ण सीमेला हत्यारबंद पोलिसांचा वेढा घालून मुक्तिसंग्रामात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना संरक्षण देण्याची हमी घेतली होती. परंतु यांपैकी कुठल्याही संघटनेचा किंवा व्यक्तीचा नामोल्लेख या समारंभात करण्यात आला नाही. हा मुक्तिसंग्राम एकट्या संघाच्या कार्यकर्त्यांनी मोठा पराक्रम गाजवून यशस्वी केला. मात्र गेल्या 50 वर्षांत केंद्रात आलेल्या एकाही सरकारने या वीरांची दखल घेतली नाही, अशा प्रकारचे चित्र या समारंभास उपस्थित असलेल्या शेकडो श्रोत्यांसमोर उभे करण्यात आले! 

1954-55 च्या सामुदायिक सत्याग्रहात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या सुमारे दहा हजार सत्याग्रहींनी भाग घेतला होता. त्यापैकी अनेकांना पोर्तुगीजांनी गोळ्या घालून ठार मारले. अनेक जण जखमी झाले आणि अनेकांनी लाठीमार खाल्ला. विशेष म्हणजे हे सत्याग्रही देशाच्या सर्व राज्यांतून आले होते. जात-पात, पंथ, पक्ष आणि धर्म बाजूला ठेवून त्यांनी या सत्याग्रहात भाग घेऊन भारताच्या एकात्मतेचे अभूतपूर्व दर्शन घडविले, त्यांना अजूनपर्यंत केंद्राची मान्यता मिळालेली नाही. श्री. रामभाऊ तुपे यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय गोवा स्वातंत्र्यसंग्राम सैनिक संघ ही संघटना गेली दहा वर्षे केंद्राची मान्यता मिळावी म्हणून धडपड करीत आहे. सध्याचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि पेट्रोलियममंत्री श्री. राम नाईक यांना हा सर्व इतिहास माहीत असताना त्यांनी फक्त दादरा-नगर हवेलीच्या मुक्तिसंग्रामात भाग घेतलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनाच केंद्रीय पेन्शन मंजूर करून अन्य शेकडो गोवामुक्ती सत्याग्रहातील सत्याग्रहींवर अन्याय केला नाही का? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही ऐतिहासिक प्रसंगाचे, घटनेचे वर्णन हे सत्यावर आणि वस्तुस्थितीवर आधारित असायला हवे. या समारंभातील भाषणे या कसोटीवर उतरणारी नव्हती. दादरा-नगर हवेली मुक्तिसंग्रामातील विजय म्हणजे संघ स्वयंसेवकांनी मिळविलेला अपूर्व असा ऐतिहासिक विजय होता, अशी या संग्रामाची एकतर्फी बाजू श्रोत्यांसमोर उभी करण्यात आली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी तर सर्व भाषणांवर कडी करणारे वक्तव्य केले ते म्हणाले, “1857 नंतर प्रथमच एवढा मोठा सशस्त्र, यशस्वी संग्राम आम्ही केला! त्याबद्दल धन्यता वाटते !" 

1857 चा संग्राम हा देशव्यापी होता. त्याची पार्श्वभूमी आणि स्वरूप दादरा-नगर हवेलीच्या संग्रामापेक्षा वेगळे होते, याचे भान बाबासाहेब पुरंदरेंसारख्या इतिहासकाराला या वेळी राहिले नाही. पोर्तुगीजांच्या अमलाखाली असलेल्या गोवा, दीव, दमण आणि दादरा-नगर हवेली, मुक्तिसंग्रामाच्या संदर्भात कुणीही काहीही बोलावे किंवा लिहावे, अशी परिस्थिती आज राहिलेली नाही. गोवा सरकारने या मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाचे प्रकाशित केलेले दोन खंड, श्री. वामन राधाकृष्ण यांचे या संग्रामावरील पुस्तक आणि सुप्रसिद्ध हिंदी पत्रकार गणेश मंत्री यांचे हिंदीमधील पुस्तक- अशी गोव्याच्या मुक्तिलढ्यावरील अधिकृत अशी ऐतिहासिक पुस्तके आज उपलब्ध आहेत. ऐतिहासिक सामग्री आणि या मुक्तिलढ्यात भाग घेतलेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन लिहिलेला इतिहास उपलब्ध असताना वरील समारंभात जी वक्तव्ये करण्यात आली, ती अत्यंत एकतर्फी, पंथनिष्ठ आणि वस्तुस्थितीवर आधारित नसल्याने त्यांचा समाचार घेऊन वस्तुस्थिती वाचकांसमोर ठेवणे भाग पडले.
 

माधव पंडित, मडगाव.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके