डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अंकातील लेखाचे स्वरूप सतत बदलणारे आहे. त्यामुळे लेखनकौशल्याचा सुरेख पुरावा म्हणून 'साधना’ कडे पहावे लागेल. कुणाचे नाव घ्यावे हा प्रश्न पडतो. कुणाच्या लेखाला नावाजावे हाही प्रश्न पडतो. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रांवर डोळस नजर 'साधना'ची पडते.

प्रा. दंडवते यांस अखेरचा सलाम!

प्रा.मधु दंडवते यांच्या मृत्यूची बातमी चटका लावून गेली. सेवादलाच्या हीरक महोत्सवी सोहळ्याला राष्ट्रपती श्री.नारायणन आणि प्रा.मधु दंडवते दोघे आले होते. आणि दुर्दैवी योगायोग असा की दोघांचाही मृत्यू जवळपास एकाच वेळी झाला. नारायणन् यांच्या जाण्याने एक विचारी, संयमी, नीतिमान माणूस गेल्याचे दुःख झाले, पण दंडवते यांच्या जाण्याने घरचा माणूस गेल्याचे जाणवून मन सुन्न झाले. आमच्याकडे व्याख्यानमालेसाठी त्यांना बोलावले होते. व्याख्यानमालेत त्यांनी संसदेतील अनेक किस्से आपल्या खुमासदार शैलीत सांगितले होते. सेवादलातील अनेक कार्यक्रमांतही ते दिसायचे आणि आदर वाटायचा. रेल्वेमंत्री म्हणून कोकणवासीयांना तर ते दैवतच वाटत असतील, पण राजकारणाच्या या एकूण अंधारलेल्या वातावरणात आयुष्यभर नीतिमान राहिलेल्या या माणसाकडे बघून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या लहान-थोरांना ते मोठा आधार होते, तो आधार तुटल्यासारखा झाला.

'साधना’ने त्यांच्याविषयीच्या लेखांत त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. विशेषतः स्वतःचे भाषण स्वतःच तयार करण्याच्या त्यांच्या आठवणीने त्यांच्या कुशाग्रबुद्धीचे दर्शन होते. त्यांच्या बहिणीने सांगितलेल्या त्यांच्या आठवणीही मनाला चटका लावून जातात. मृत्यू अटळ आहे, पण आम्ही ज्यांना आदर्श मानले, त्यांतील एकेकाचे जाणे एक पोकळी निर्माण करणारे आहे. नाथ पै यांचा वारसा सांगत त्यांच्या पद्धतीने राजकारण करीत सहा महिन्यांनी मतदारसंघात जाऊन आपण केलेल्या कामाचा अहवाल देणे.... असे राजकारणी आता किती आहेत? दररोज आमदार-खासदारांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या प्रसिद्ध होत असताना दीपस्तंभासारख्या उभ्या असलेल्या दंडवते यांचे जाणे अस्वस्थ करते, पण त्यातही उभे राहून आपणास जमेल तेवढा खारीचा वाटा या सामाजिक कार्यात उचलणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली.

प्रा. निशिकांत देशपांडे, अहमदपूर

----------

अंक व अंकातील साहित्य दर्जेदार 

17 डिसेंबरचा 'साधना’चा अंक वाचला. अंकावरील कृष्णधवल छायाचित्र फारच चांगले वाटले. छायाचित्रकार शेखर गोडबोले यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. अंकातील साहित्य नेहमीप्रमाणे दर्जेदार.

'साधना' अंकाच्या संपादकांचे आणि अतिथी संपादकांचे नावसुद्धा छापता पण ‘संस्थापक साने गुरुजी' एवढा मजकूर का वगळला जावा?

वसंत जोशी, कर्जत, जि.रायगड 

0 संस्थापक- साने गुरुजी, असा मजकूर मुखपृष्ठावर छापलेला असतो!

संपादक

----------

दीपावली अंक आवडला

'साधना'चा दिवाळी अंक आवडला. नंदिनी आत्मसिद्ध यांनी ‘महाश्वेतादेवी’ यांची मुलाखत घेऊन त्यांच्या जीवनाचे पैलू उलगडून दाखवले, त्यांच्या साहित्याचा, त्यांच्या चळवळीचा व एक माणूस म्हणून महाश्वेतादेवींचा जो परिचय करून दिला ते वाचून मन समृद्ध झाले. त्याचप्रमाणे राजन खान यांची 'नातीखेळ' ही काहीशी वेगळ्या वळणाची, मनाच्या खेळाची दीर्घकथा वाचून मन खरोखरच संभ्रमात पडले.

पुढे काय होणार याची उत्सुकता, कथेचे अतिशय संयत, मनाचे पापुद्रे उलगडून दाखवणारे दोन्ही नायक व नायिका, त्यांच्या भावविश्वाचे यथार्थ चित्रण अन् काहीसा अविश्वसनीय पण परिस्थितीला अनुसरून असलेला शेवट. श्रीकांत बोजेवार यांची 'पावणेदोन पायाचा माणूस' ही ग्रामीण जीवनातील कादंबरी मनस्पर्शी आहे. पितांबरच्या जीवनकहाणीत होणारे बदल, त्याची बदललेली सूत्रे, मांजरांच्या संवादाने एक वेगळे परिमाण लाभलेले कथानक, राजकारण, यातून एका उंचीवर चढलेल्या एका माणसाची ही कहाणी मांजराच्या, माणसाच्या जीवननिष्ठा आणि परमशक्तीपुढे मानवाच्या हतबलतेची कबुली आणि ते स्वीकारणे हे विशेष आवडले. त्याचप्रमाणे या कादंबरीतील 'संयत भाषा' कादंबरीला पूरकच आहे. बोजेवारांच्या सूक्ष्म निरीक्षणाला सलाम!

दीपावली अंक खूपच आवडला.

ज्योती कपिले, बांद्रा, (प), मुंबई

----------

संस्काराचे व्यासपीठ म्हणजेच 'साधना' साप्ताहिक

17 डिसे. व 24 डिसेंबरचा 'साधना' अंक दर्जेदार वाटतो. साने गुरुजींचे - मुखपृष्ठ व त्यांचा संस्कारक्षम विचार आपण अंकात छापला त्याबद्दल आभार मानतो. साने गुरुजींचे छायाचित्र डाव्या कोपऱ्यात कायम असावं. साधना परिवारानं त्याचा विचार करावा. त्याच्यामुळे 'साधना चे बळ वाढत आहे. एकापेक्षा एक असे दर्जेदार अंक व कमीत-कमी पानांत संस्काराचे व्यासपीठ निर्माण करणारे मराठीतील 'साधना' हे पहिलेच साप्ताहिक असेल.

अंकातील लेखाचे स्वरूप सतत बदलणारे आहे. त्यामुळे लेखनकौशल्याचा सुरेख पुरावा म्हणून 'साधना’ कडे पहावे लागेल. कुणाचे नाव घ्यावे हा प्रश्न पडतो. कुणाच्या लेखाला नावाजावे हाही प्रश्न पडतो. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रांवर डोळस नजर 'साधना'ची पडते. 24 डिसेंबरचा अंक सरस आहे. सगुण सावंतांचे कौतुक करावे लागेल. केवढे यश त्यांना मिळाले!

अशी माणसे ‘साधना’ कडे आहेत हे मोठे भाग्य आहे. आपण ‘साहित्यविषयक सकस जाणिवा’ हा अंक बनवताय यात एक चांगली कविता, संत साहित्याचा जीणोद्धार, एका साहित्यिकाची ओळख, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य असावे. 2006 या वर्षात आपल्याला चांगले वाचावयास मिळेल ही आशा बाळगतो. 'साधना’चे सतत बदलते रूप साहित्यचळवळ बदलू शकेल.

संतोष देसाई, काळगाव

----------

'साधना' स सूर गवसलाय!

वर्तमान राजकारण, समाजव्यवस्था, साहित्य इत्यादी विषयांवर साधक-बाधक चर्चा घडवून आणणारे व्यासपीठ कोणते? या प्रश्नास फक्त 'साधना' साप्ताहिक असे उत्तर द्यावे लागेल. गेल्या काही महिन्यांत प्रसिद्ध झालेल्या 'साधना 'वर नजर टाकल्यास साहित्य, राजकारण, चित्रपट यांवर नवोदित लेखकांनी दर्जेदार योगदान दिलेले आहे, याबद्दलच शंकाच नाही. चंद्रकांत भोंजाळ यांचे 'आख्यान' हे सदर याच श्रेयनामावलीत यावे. 'साधना' वर्षारंभाच्या अंकातील 'काय कमावलं काय गमावलं अंतर्गत घेण्यात आलेला आढावा बड्या उद्योगसमूहाचा पाठिंबा असलेल्या नियतकालिकांनासुद्धा इतका चांगला घेता आला नसता. इतक्या गंभीर विषयांना पेलणारी 'बालसाधना तितकीच वाचनीय असते. साधना पू.साने गुरुजींचा वसा पुढे चालवत आहे असे वाटते.

लाजवाब असलेली 'साधना' मुखपृष्ठचित्रे शीर्षकाशिवाय अधुरी वाटतात. कोईमतुर व थेट जैसलमेर अशा दूर प्रांतांतून 'साधना'स मिळत असलेला प्रतिसाद पाहून मन भरून येते. देशाच्या व जगाच्या कानाकोपऱ्यातून साधनास मिळत असलेला निकोप प्रतिसाद साधनाच्या ठणठणीत तब्येतीची ग्वाही देतो यात शंका नाही. असा प्रतिसाद पाहून साधनास खरा सूर गवसला, असे म्हणण्यावाचून राहवत नाही. दूरस्थ व प्ररप्रांतातील 'साधना’ वाचक व मुंबईतील वाचक यांमध्ये सौ.शोभना शिलोत्री सेतूची भूमिका निभावतात हे समजून समाधान वाटले. कोईमतुर वाचकांना संक्रांतीसाठी पाच किलो तिळगुळाचा हलवा सौ.शोभनामार्फत देण्याचा विचार पक्का केलाय. 'साधना'स नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा! 

साधना वासूदेव मुळगुंद, मुंबई

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके