डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘खरे तर डॉ. आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष हा एका जातीपुरता, एका जातीसाठी मर्यादित राहणारा पक्ष नव्हता. त्यांना सर्वच जातीधर्मातील गोरगरीब जनतेच्या बाजूने आवाज उठवणारा एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष स्थापन करावयाचा होता.'

प्रबोधनाचा झंझावात हवा

हिंदुत्ववादी शक्तीचे वैचारिक खंडण करण्यासाठी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदुहिताची उपेक्षा करणाऱ्या राजकीय नेत्यांचा उन्माद गाडण्यासाठी, आपण जोपासलेली लोकशाही समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि मानवतावाद ही मूल्ये खुरटून जावू नयेत म्हणून व माझ्या मते ‘साधना’ चे कर्तव्य म्हणून या व परिवर्तनवादी चळवळीतील फार मोठा अडथळा कमी करण्यासाठी भारताच्या सामाजिक विकासक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून साने गुरुजी जन्मशताब्दी कृतिशील विधायक कार्यक्रम देऊन साजरी करण्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्रात अभ्यासू, प्रभावी वक्त्यांची वैचारिक व्याख्याने आयोजित करावी असे माझे प्रामाणिक मत आहे. याची गंभीरता लक्षात घेऊन विनाविलंब निर्णय घ्यावा व साधनेच्या अनेक ध्येयांपैकी एक ध्येय आपण पूर्ण करावे अशी साधनेचा एक हितचिंतक म्हणून माझा आग्रह आहे. यासाठी (संयोजनासाठी) मी वेळ देण्यास तयार असेन. या बाबत आपण विचार करावा ही विनंती.

-प्रताप घाटगे, तासगाव.

----------                                                                  

साधना वाचनीय

डॉ. श्रीराम लागूचे ‘जडण घडण’ हे लेखमालेचं नवं आकर्षण तर जुनी ‘विदेशी गुलबकावली’, निलू गव्हाणकरांचे लेख, राजकीय घडामोडींचा उलगडा, श्री. माधव गडकरींचे लेख, त्यामागचे राजकारण, अंकाचे अंतरंग, बहिरंग, मुखपृष्ठ, साने गुरुजी विशेषांक - पुण्याचे वृत्त - सारंच वाचनीय. दिवाळी अंक इथे आल्यावर मिळाला. अनुवादित कथापंचक, श्री. कुसुमाग्रजांची व इतर कविता, त्यांनी दिलेल्या सन्मानाला डॉ. श्रीराम लागूचे उत्तर - सारंच आवडलं.

-कमलिनी काटदरे, मुंबई.

 ----------                                                     

अंक उत्कृष्ट 

मला 5 डिसेंबर 1998 पासूनचे अंक नियमित मिळत आहेत. पहिल्याच साप्ताहिकाचे संपादकीय ‘निवडणूक निकालांचा अन्वयार्थ’ फार आवडला. इतक्या कमी शब्दांत अचूक अन्वयार्थ वाचून समाधान झाले. आंबेडकरी जनता आणि ऐक्याची गरज हा सुभाष थोरात यांचा लेखही चांगला प्रबोधन करू शकतो. एकंदरीत आपले अंक उत्कृष्ट आहेत. यापुढेही दिवसेंदिवस आपण त्यात प्रगती कराल ही अपेक्षा. 

-सुषमा मुजबैले, वर्धा.

 ----------                                                                       

आंबेडकरी जनता हा शब्दप्रयोग चुकीचा

साधनाच्या 5 डिसेंबर 98 च्या अंकात ‘आंबेडकरी जनता आणि ऐक्याची गरज’ हा सुभाष थोरात यांचा लेख आहे. त्यात ते म्हणतात, ‘खरे तर डॉ. आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष हा एका जातीपुरता, एका जातीसाठी मर्यादित राहणारा पक्ष नव्हता. त्यांना सर्वच जातीधर्मातील गोरगरीब जनतेच्या बाजूने आवाज उठवणारा एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष स्थापन करावयाचा होता.’ आणि पुढे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आशय अखेरीस लोकशाही समाजवादाच्या संकल्पनेशी येऊन भिडतो. त्यांना भांडवलशाहीतील शोषणही नको होते व ते नष्ट करण्यासाठी क्रांतीचा हिंसक मार्गही नको होता. त्यांना घटनात्मक मार्गाने समाजवाद यावा असे वाटत होते. ही दोन्ही निरीक्षणे अचूक व मुद्देसूद आहेत. हा पक्ष उभा राहत नाही याचे कारण तो पक्ष जातीच्या भोवऱ्यातून बाहेर पडून सर्व राष्ट्रीय पक्षाचे भान असणारा पक्ष म्हणून उभा राहत नाही हे आहे. शेवटी संघ परिवाराशी लढाई चालू आहे व त्यात आंबेडकरी जनता प्रमुख भाग घेईल असे म्हटले आहे. आंबेडकरी जनता हा शब्दप्रयोगच आक्षेपार्ह आहे. कारण डॉ. आंबेडकरांनी सांगितलेल्या लोकशाही समाजवादाकरिता राजकीय पक्ष असेल तर तो समाजाच्या एका भागाचा असू शकत नाही. आंबेडकरी विचार असू शकतात. पण आंबेडकरी जनता हा प्रकार नाही.

-द. ना. जोशी, विलेपार्ले.

 ----------                                                                       

भाजपचा पराभव वाजपेयींमुळे

राजस्थानात गेली अनेक वर्षे अपक्ष व विरोधी पक्षातील गटांना हाताशी धरून सत्ता टिकवलेल्या श्री. भैरोसिंह शेखावत यांच्या नेतृत्वाविरुद्ध असंतोष वाढत असल्याचे माहीत असूनही भाजप त्यांच्या जागी मुख्यमंत्रिपदाचा दुसरा उमेदवार जनतेसमोर आणू शकला नाही. राजस्थानात जाट, मीना, माळी आणि मेघवाल हे समाज भाजपच्या विरोधात गेले. मात्र या सर्वापेक्षा भाजपच्या दारुण पराभवास सर्वात जास्त जबाबदार आहे केन्द्रातील वाजपेयी सरकार.

आम्हांला एक वेळ संधी ध्या, अशी विनवणी करीत आणि वाजपेयींच्या नेतृत्वाचे गोडवे गात चाललेल्या भाजप प्रचाराला जनतेचा प्रतिसाद मिळाला आणि केन्द्रात भाजप मित्रपक्षांच्या सहाय्याने सत्तेवर आला. भाजप सरकारबद्दल लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या, प्रत्येक प्रश्नावर सरकारची होत असलेली फजिती, भाजपला वारंवार माघार घ्यावी लागणे, काश्मीरसह भारतात सुरूच राहिलेल्या अतिरेकी कारवाया, महागाईचा उच्चांक आणि सरकारचा चंडपणा, सरकारचा एक आणि भाजपचा दुसरा अशा दोन कार्यक्रमांच्या कात्रीत सापडलेले भाजप नेते आणि पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी यांची झालेली केविलवाणी परिस्थिती पाहिल्यावर जनतेचा अपेक्षाभंग झाला.

पूर्वी एकाच विचारसरणीला चिकटून असलेल्या आणि त्याप्रमाणे ठराविक पक्षाला मत देणाऱ्या मतदारांची संख्या खूप होती. आता ती झपाट्याने कमी होत आहे. मध्यम वर्ग सर्व राजकीय पक्षांपासून दूर आणि स्वतःची कामं करून घेण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांशी सारखेच संबंध ठेवून असतो.

-उदय सामंत, वसई.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके