डिजिटल अर्काईव्ह

गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ग्रामीण विकास व मानवी विकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात मी कार्यरत आहे. मी आय.सी.ए., आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने दोन महिन्यांचे प्रशिक्षण केलेले आहे. प्रकल्प अधिकारी पदावर महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्य केले आहे, प्रशिक्षक म्हणून विविध प्रकारचे प्रशिक्षण दिलेले आहे; त्यात प्रामुख्याने व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण युवकांना, महिलांना, संस्थेच्या कार्यकर्त्यांना आणि शिक्षकांना नेतृत्व विकास प्रशिक्षण दिलेले आहे. ग्रामीण भागाचा विकास करण्यासासाठी स्थानिक लोकसहभाग फार गरजेचा आहे. याकरिता गावाची ग्रामसभा घेऊन गावातील विविध स्तरांतील लोकांना आमंत्रित करून व गावस्तरावरील सरकारी यंत्रणा यांच्या सहभागाने दोन दिवसीय ग्रामसभा घेण्यात येते. या ग्रामसभेत भविष्यातील पाच वर्षांची योजना तयार करणे, दृष्टिकोन काय आहे; योजना करण्यात कोणकोणते अडथळे आहेत, त्यासाठी प्रस्ताव तयार करून अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत व इतर गावकरी यांच्या पुढाकाराने गावाच्या समस्या दूर करून आपल्या गावाचा विकास आपण करू शकतो.

मराठीचे भवितव्य व साधना व्यासपीठ 
काही वर्षांपूर्वी मराठी आय.टी. (इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी)चा पर्याय या विषयावर मराठी भाषा प्रेमिकांनी जनजागृती केली. परंतु मराठी भाषेच्या सदोष वापरावर, मराठी प्रकाशनाची लोकप्रियता कशी वाढेल यावर मात्र ही मंडळी काहीच करताना आढळत नाहीत. परवा केंद्रीय संचार व सूचना मंत्रालयाने विंडोज प्रणालीशी ताळमेळ ठेवून चालणाऱ्या हिंदी भाषा संगणकीय प्रणालीचे प्रकाशन केले. आतापर्यंत तमिळ, मल्याळी, गुजराती भाषांतील प्रणालींचे प्रकाशन यापूर्वी या मंत्रालयाने केले आहे. असे असताना मराठी भाषेतील मुळाक्षरे वापरून ई-मेल करता येण्यासारखी प्रणाली का बनवली नाही याचा खरा शोध महाराष्ट्रातून दिल्लीस गेलेल्या लोकप्रतिनिधींनी व मराठी प्रेमींनी घेतला पाहिजे. एखाद्या क्षेत्रात कामगिरी करून भवितव्य घडविण्यासाठी मराठी भाषाप्रयोग हवा तो प्रभाव पाडत नाही, त्यामुळे मराठीची व्यावहारिक उपयुक्तता कमी होत आहे असे मत प्रख्यात लेखक विजय तेंडुलकर यांनी 22 जूनच्या बाँबे टाईम्स मधील मुलाखतीत म्हटले आहे. शिवाय गेल्या काही वर्षांत सुरू झालेल्या नव्या उद्योगांनी (कॉलसेंटर्स, मॉल, बी.ओ.पी. इत्यादी) इंग्रजी भाषा ज्ञान अनिवार्य केल्याने पालक वर्गाचा कल साहजिकपणे आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवण्याकडे असतो. 

या वस्तुस्थितीशी तेंडुलकर यांच्याप्रमाणे पालकवर्ग सहमत असावा. इंग्रजीकडे जाणारा ओघ कायम राहणार नाही असे तेंडुलकर म्हणत असले तरी इंग्रजी शाळेत जाण्याने विद्यार्थ्यांच्या मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषा कच्च्या राहतात, या तेंडुलकरांच्या मतप्रदर्शनावर गंभीरतेने विचार झाला पाहिजे. 'साधना' साप्ताहिक हे खरेखुरे मराठी साप्ताहिक लवकरच हीरकमहोत्सव वर्षात पदार्पण करील, विश्लेषक विचारांचे लेखक व वाचक 'साधना'स लाभले असून धगधगत्या सामाजिक, राजकीय व सर्व महत्त्वाच्या व कळकळीच्या विषयांवर साधनामधून मराठीतून सातत्याने सकस विचारप्रदर्शन झाले आहे व होत आहे; होणार आहे, हे आग्रहाने सांगण्याची आवश्यकता वाटते. साधनाचे ऑस्ट्रेलियासह भारतातील कानाकोपऱ्यांतील वाचक व लेखक याचा प्रत्यय वारंवार देत असतात, हे 'साधना' वाचताना स्पष्ट होत नाही का? आजच्या बहुतांश वर्तमानपत्रांचे स्वरूप केवळ 'प्रातःकालीन कामाचे' असे आहे. असे असताना मराठी भाषेच्या उपयुक्ततेबद्दल, तिच्या भवितव्याबद्दल सकारात्मक चर्चेसाठी 'साधना शिवाय अन्य कोणतेही माध्यम व्यासपीठ देईल असे वाटत नाही. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या 'साधना'सारख्या खुल्या विद्यापीठाने जनजागृतीची मशाल हाती घेऊन मराठी भाषेची सद्यःस्थिती, तिचे भवितव्य यांची साधकबाधक खुली चर्चा घडवून आणावी. असा उपक्रम साधनेच्या मस्तकावरील शिरपेच ठरेल यात तिळमात्र शंका नाही. 
- डॉ. श्रीकांत परळकर, दादर, मुंबई 28. 
-----------------------------------------------------------------------

सामाजिक कार्यकर्ता अनुभव गाथा 
गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ग्रामीण विकास व मानवी विकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात मी कार्यरत आहे. मी आय.सी.ए., आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने दोन महिन्यांचे प्रशिक्षण केलेले आहे. प्रकल्प अधिकारी पदावर महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्य केले आहे, प्रशिक्षक म्हणून विविध प्रकारचे प्रशिक्षण दिलेले आहे; त्यात प्रामुख्याने व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण युवकांना, महिलांना, संस्थेच्या कार्यकर्त्यांना आणि शिक्षकांना नेतृत्व विकास प्रशिक्षण दिलेले आहे. ग्रामीण भागाचा विकास करण्यासासाठी स्थानिक लोकसहभाग फार गरजेचा आहे. याकरिता गावाची ग्रामसभा घेऊन गावातील विविध स्तरांतील लोकांना आमंत्रित करून व गावस्तरावरील सरकारी यंत्रणा यांच्या सहभागाने दोन दिवसीय ग्रामसभा घेण्यात येते. या ग्रामसभेत भविष्यातील पाच वर्षांची योजना तयार करणे, दृष्टिकोन काय आहे; योजना करण्यात कोणकोणते अडथळे आहेत, त्यासाठी प्रस्ताव तयार करून अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत व इतर गावकरी यांच्या पुढाकाराने गावाच्या समस्या दूर करून आपल्या गावाचा विकास आपण करू शकतो. ही आमची योजना आम्ही तयार केलेली आहे. यामुळे लोकसहभाग मिळण्यास मदत होते. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात ही नवीन दोन दिवसीय ग्रामसभा आयोजित करून या पद्धतीचा उपयोग करावा. माझी विनंती आहे की ज्या ग्रामपंचायतीत सरपंच, सचिव यांना ग्रामसभा घ्यावयाची आहे, त्यांनी कृपया संपर्क करावा. 
- अर्जुन अलगमकर (सा. कार्यकर्ता)

------------------------------------------------------------------------ 

वंचितांचे शिक्षण विशेषांक अप्रतिम! 
या वर्षी आतापर्यंत वाचलेल्या साधना साप्ताहिकात 'वंचितांचे शिक्षण' विशेषांक, जैसलमेर 'साधना' मित्र मंडळात पसंतीची ठळक मोहर उठविणारा ठरला. 'साधना' परिवारास व विशेषतः नव्या जोमाच्या लेखकांना याबद्दल धन्यवाद. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतात वंचितांसाठी राबवलेल्या योजना, नियोजनशून्यतेमुळे फोल ठरल्या. त्या इतक्या, की मुळात त्या नसल्याप्रमाणे ठरल्या. या गंभीर प्रश्नाचे विवेचन करताना शिक्षणाच्या नावाखाली चाललेल्या बाजारूपणावर या विशेषांकात नेमके बोट ठेवले, हे योग्य झाले. याप्रसंगी मुंबईहून येथे आलेल्या श्रीयुत दादा हिसबनीस, संचालक भारत जागृतीपीठ, यांनी शिक्षणसम्राट शिक्षणाची विटंबना करून स्वतः संपत्तीसम्राट झाले, याचा व्यापक आढावा घेतला. मुंबईत 465 बालकामगारांची शोषणापासून मुक्तता करताना शोषणास जबाबदार असलेल्या 60 कारखाना मालकांना जेरबंद केले गेले. याबद्दल वरील विशेषांकात वाचायला मिळाले असते तर बरे होते.

उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे नानासाहेब गोरे यांना समर्पित केलेला विशेषांक सर्वांना भावला. त्यांच्या आठवणीने उपस्थित साधना मित्र मंडळींना भरून आले. तो प्रसंग सर्व उपस्थितांच्या मनाला चाटून गेल्याची जाणीव झाली. पुण्यात ज्याप्रमाणे नानासाहेबांवर व्याख्याने झाली, तशी इतरत्र व्हावीत, असे मनोमन वाटते. समाजवादाचा खरा मंत्र देशाच्या कानाकोपऱ्यात जाणे ही आजची गरज आहे. जैसलमेरमध्ये हवामान व निसर्ग बऱ्याच प्रमाणात प्रतिकूल आहेत हे खरे. परंतु येथे बालशिक्षण, वंचितांचे शिक्षण हे प्रश्न तितके गंभीर नाहीत. किशोर उजगरे, संगीता दडेकर, शोभा मुलमुले आदी तरुण कार्यकर्ते स्थानिक भाषेत जमेल त्यावेळी बालवर्गात मदत करतात. यामिनी मंगेशकर यांनी एप्रिल-मे मध्ये (बाहेर वैशाख वणवा भाजून काढत असताना) स्थानिक महिला वर्गासाठी छोट्या घरगुती व्यवसायसुट्टीच्या दिवशी सकाळी जैसलमेर किल्ला परिसरात चित्रकलेचे उन्हाळी वर्ग घेतले व त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. 
- अक्षय वाटे, जैसलमेर 
-----------------------------------------------------------------------------

वंचितांसाठी आणखी बरेच काही 
'साधना'ने 'वंचितांचे शिक्षण' हा विशेषांक काढल्याबद्दल व अतिथी संपादकत्व श्री.हेरंब कुलकर्णी यांच्याकडे सोपवल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. या अंकामुळे निर्माण झालेले विचार मांडत आहे. 1. वंचित मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी फक्त शासनाचीच नाही; तर समाज व स्वयंसेवी संस्थांचीही आहे. 2. केरळमध्ये पालकांमध्ये शिक्षणाबाबत जागृती कशी झाली, याचा शोध घेऊन महाराष्ट्रात त्याचे अनुकरण करता येईल का? विचार व्हावा. 3. वंचितांनी शिक्षण घेणे, मिळवणे ही त्यांचीसुद्धा जबाबदारी व कर्तव्यच आहे. मूकनायकमध्ये डॉ. आंबेडकर म्हणतात, "दुसरा आपल्या उद्धारार्थ येईल ही फारशी आशा बाळगू नका; आपण नेहमी इतरांच्या मदतीवर अवलंबून राहिलो, तर आपणच आपला घात करून घेऊ. यासाठी आपला विचार आपण करावा. 'विचार तरावया पार भवसिंधू' या साधूक्तीप्रमाणे आपणच आपल्या उद्धारार्थ झटायला हवे." याचाही विचार व्हावा. 4. समाजव्यवस्था बदलणे ही दीर्घकालीन प्रक्रिया असते ती बदलणे सोपे नसते. 5. जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण हे अपरिहार्य. त्यांतील चांगले स्वीकारणे, त्यांतील त्याज्य गोष्टींना विरोध कसा करायचा याची माहिती लोकांपुढे येणे गरजेचे आहे. 6. काही ठिकाणी वंचितांसाठी बोलीभाषेत सातवीपर्यंत पुस्तकांचा प्रयोग झाला. तो आठवीपासून सुरू झाला का? झाला नसल्यास का? या प्रयोगाला मर्यादितच यश. 

वंचित आदिवासींना केव्हा तरी प्रमाणभाषा स्वीकारावीच लागणार आहे. हा विचार लक्षात घ्यावा.  7. जे वंचित शिकले सवरले ते स्वतः प्रत्यक्ष वंचितांना, स्वयंसेवी संस्थेस किती काय मदत करतात? बहुसंख्य अशी मदत करत नाहीत, मग वंचितांमधून कार्यकर्त्यांची फळी कशी निर्माण होणार? वंचितांमध्ये ही जाणीव निर्माण होणे आवश्यक. 8. सरकारी अभ्यासक्रम संदर्भ म्हणून केवळ किती काळ ठेवता येईल? केव्हा ना केव्हा सरकारी अभ्यासक्रम मूळ प्रवाहात येण्यासाठी वापरावा लागणार आहे. त्यावेळी ट्रॅक बदलणे, बदलताना त्रास होणे, पहिलीच गोष्ट चांगली वाटणे हे अपरिहार्य आहे. 9. साखरशाळांबाबत अनेक स्वयंसेवी संस्थांनी काम केले आहे, अभ्यासक्रम तयार केला आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण केले आहे, अशा स्वयंसेवी संस्थांचे आदान-प्रदान होणे गरजेचे आहे. 10. वंचितांसाठीच्या प्रयोगशील 11. शाळांची संख्या कमी आहे, त्यात वाढ होणे वंचित, समाज व शासन यांच्या हिताचे आहे. शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चात सरकार दिवसेंदिवस कपात करत आहे.

शिक्षण पैसे देऊनच घ्यावे लागते अशी स्थिती. मग गरीब, मध्यमवर्गीय, बहुजन समाजाच्या मुलांच्या शिक्षणाचे भवितव्य काय? कारण संज्ञेनुसार ते वंचित नाहीत. अशा वंचित असणाऱ्या व पुढे वंचित ठरणाऱ्या गरीब, बहुजन, मध्यमवर्गासाठी नेमके काय करता येईल? वंचित या शब्दाची व्याख्या आपल्याला आणखीच विस्तारावी लागेल आणि ज्यांना जात, धर्म, अज्ञान, दारिद्य, अंधश्रद्धा या कारणांनी शिक्षणाची संधी मिळू शकत नाही, विकासाची संधी मिळत नाहे, ते सर्व वंचित आणि त्यांना तशी संधी कशी मिळवून देता येईल याचा विचार व्हावा, असे मला वाटते. अर्थात अंकात वंचितांची हीच व्याख्या गृहित धरली असणार. 
- श्री. भा. काकडे, लक्ष्मीनगर, पुणे 9. 

Tags: अक्षय वाटे प्रतिसाद वाचकपत्रे श्रीकांत परळकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक ( 1326 लेख )

साधना साप्ताहिकाचे वाचक 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी