डिजिटल अर्काईव्ह

जे अनैतिक आहे ते कायदेशीर होऊ शकत नाही. कुटुंब आणि विवाहसंस्थेला कायदेशीर मान्यता असेल तर विवाहबाह्य संबंधांना कायद्याचे संरक्षण अप्रस्तुत ठरेल. नैतिकतेचा प्रश्न तर दूरच. मानवतेवर प्राणी आणि माणूस ह्यांच्या मैथुन ह्या प्रवृत्तीमध्ये फरक आहे. मानवेतर प्राण्यांमध्ये काही नैसर्गिक मर्यादा आहेत. परंतु माणसाच्या बाबतीत तसे निर्बंध नाहीत. म्हणूनच आज अबाधित लोकसंख्येचा प्रश्न उद्भवला आहे. आजच्या प्रसारमाध्यमांनी आणि शृंगारिक साहित्याने भोगवादी प्रवृत्तींना उत्तेजनच दिले आहे. वेश्या व्यवसाय हा एक त्यातला भाग आहे. आजच्या उच्चभ्रू समाजात स्वेच्छेने वेश्या व्यवसाय करण्यास मान्यता असेल तर कायद्याचा प्रश्नच येत नाही. खरा प्रश्न आहे पददलित, अजाण स्त्रिया आणि तरुण मुलींचा की ज्यांना बळजबरीने ह्या व्यवसायात गुंतवले जाते. हा प्रश्न पिढीजात दारिद्र्य, कंगाल जीवन आणि असुरक्षिततेत वावरणाऱ्या समाजाचा आहे. त्यामुळे वेश्या व्यवसायावर बंदी आणून हा प्रश्न सहजासहजी सुटणार नाही. शिवाय कायदा असणे निराळे आणि त्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होत आहे की नाही, हे पाहणे निराळे.

युवक संपादकांना अशीच संधी दया
14 ऑगस्टचा 'साधना' युवा अभिव्यक्ती विशेषांक मिळाला. मुखपृष्ठाबरोबर आतील लेखही चांगले आहेत. युवक विविधांगी विधायक विचार करू शकतात, याचे प्रत्यंतर देणारा अंक होता. अतिथी संपादकांना शाबासकी. श्री. राजेंद्र बहाळकर यांच्या लेखाबद्दल प्रतिक्रिया... लेख चांगला पण स्वरूप फार मर्यादित. 1. खरे पाहता सर्व समाजालाच चळवळींची ॲलर्जी आली आहे. चळवळी आहेत, पण प्रमाण अत्यल्प. राजकीय, सामाजिक चळवळी, निषेध, निदर्शने यांचे प्रमाण कमी. 2. इंजिनिअरिंग, मेडिकल, उच्च शिक्षण हे महाग आहेच; शिक्षणापेक्षा रोजगार नसल्याने तरुण वैफल्यग्रस्त असे मला वाटते. 3. युवकांचा सार्वजनिक जीवनात वावर आहे, पण विधायक वळण फार कमी ठिकाणी लागलेले दिसते. एकत्र येणे, मौजमजा यांचे प्रमाण जास्त. संघटना, पक्ष, सार्वजनिक संस्था यांमधून युवकांची वाढती संख्या दिसत नाही.

सहभागी युवकांचे नोकरीनंतर योगदान किती हाही अभ्यासाचा विषय ठरावा. 4. पुरोगामी चळवळीत युवकांचा सहभाग कमीच जाणवतो. मध्यमवयीनांचा सहभाग जास्त, पुरोगामी चळवळींचे कार्य समाजापुढे विशेषत्वाने येत नाही. पुरोगामी चळवळीत युवकांचा सहभाग कमी: कारण कमी वेतन, सामाजिक समस्यांचे भान नाही, चंगळवाद, आपण समाजाचे देशाचे देणे लागतो या जाणिवेचा अभाव, बेफिकिरी, शहरीकरण यांचे तोटे. युवक संपादकांना अशीच संधी मिळत जावी, हे लिहिणारा एक ज्येष्ठच आहे.
- श्री. भा. काकडे
------------------------------------------------------------------------

दारिद्र्य निवारण व वेश्यांचे पुनर्वसन
जे अनैतिक आहे ते कायदेशीर होऊ शकत नाही. कुटुंब आणि विवाहसंस्थेला कायदेशीर मान्यता असेल तर विवाहबाह्य संबंधांना कायद्याचे संरक्षण अप्रस्तुत ठरेल. नैतिकतेचा प्रश्न तर दूरच. मानवतेवर प्राणी आणि माणूस ह्यांच्या मैथुन ह्या प्रवृत्तीमध्ये फरक आहे. मानवेतर प्राण्यांमध्ये काही नैसर्गिक मर्यादा आहेत. परंतु माणसाच्या बाबतीत तसे निर्बंध नाहीत. म्हणूनच आज अबाधित लोकसंख्येचा प्रश्न उद्भवला आहे. आजच्या प्रसारमाध्यमांनी आणि शृंगारिक साहित्याने भोगवादी प्रवृत्तींना उत्तेजनच दिले आहे. वेश्या व्यवसाय हा एक त्यातला भाग आहे. आजच्या उच्चभ्रू समाजात स्वेच्छेने वेश्या व्यवसाय करण्यास मान्यता असेल तर कायद्याचा प्रश्नच येत नाही. खरा प्रश्न आहे पददलित, अजाण स्त्रिया आणि तरुण मुलींचा की ज्यांना बळजबरीने ह्या व्यवसायात गुंतवले जाते.

हा प्रश्न पिढीजात दारिद्र्य, कंगाल जीवन आणि असुरक्षिततेत वावरणाऱ्या समाजाचा आहे. त्यामुळे वेश्या व्यवसायावर बंदी आणून हा प्रश्न सहजासहजी सुटणार नाही. शिवाय कायदा असणे निराळे आणि त्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होत आहे की नाही, हे पाहणे निराळे. त्यामुळे दूरवरचा उपाय म्हणजे दारिद्र्य निवारण की ज्याच्यामुळे वेश्या व्यवसायाला आळा बसू शकेल. तत्कालीन उपाय म्हणजे ह्या धंद्याशी निगडीत असलेले समाजकंटक धनदांडगे आणि भटक्यांवर जालीम उपाय, त्याचबरोबर इतर सार्वजनिक संस्थांद्वारे ह्या धंद्यांत अनिच्छेने खितपत पडलेल्या वेश्यांचे पुनर्वसन. 
- श्रीधर बुर्डे

-----------------------------------------------------------------------------------

सत्तेच्या राजकारणात सुजाण नागरिकत्वाचा बळी 
31 जुलैच्या 'साधना' अंकामध्ये प्रसिद्ध झालेल्या 'पुरोगामी चळवळ कार्यपद्धतीवर एक दृष्टिक्षेप' ह्या लेखावर आपण वाचकांची मते अपेक्षित केली आहेत, मी माझे विचार मांडत आहे. आपल्या लेखातील प्रत्येक मुद्दा आणि वाक्य विचार करण्याजोगेच आहे. परंतु ही गोष्ट पुरोगामी चळवळीतच आहे असे नाही: जगातील सर्वच चळवळीत कमी-अधिक प्रमाणात हेच घडत असते. अगदी स्वातंत्र्यचळवळ जरी घेतली तरी तेथेदेखील ती बहुनायकी स्वरूपातच होती. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती, ह्या बुद्धीनुसार ह्या चळवळीत आपापले आचार-विचार घेऊन पण अंतिम ध्येय एकच ठेवून वेगवेगळे व्यक्तिसमूह प्रवाहात येत राहतात. शिक्षण, आरोग्य, अर्थ आणि इतर विषयांत आणि प्रांतांत ज्या चळवळी उभ्या राहतात त्यांचेही स्वरूप तुम्ही मांडलेल्या विचारांसारखेच असते. एकंदर विषयाचा आवाका. क्षेत्रफळ आणि मानवी स्वभाव लक्षात घेता ह्यात बदल हवासा वाटला, तरी तो प्रत्यक्षात आणणे कठीण आहे. एखाद्या समस्येला तिथल्या तिथे त्वरीत निर्णय घेऊन उपाय करण्याच्या दृष्टीने असे छोटे गटही उपयुक्त ठरतात. 

केंद्रीय पद्धतीने निर्णय पद्धतीत काही वेळा प्राधान्यक्रम लावण्यात व प्रत्यक्ष कृती करण्यास कालापव्यय होतो. तुम्ही म्हणता ते खरे आहे. ह्या अशा प्रयत्नांत ऊर्जा विभागली जाते, साधन सामुग्रीवर नाहक वेगवेगळा खर्च होतो. काही वेळेला एकाच चळवळीतील दोन गट परस्पर विरोधी उभे राहतात. परंतु त्यामुळेच सर्वच गट आणि प्रवाह नेहमी सतर्क, क्रियाशील राहतात. नाहीतर वरचा आदेश किंवा मार्गदर्शन मिळेपर्यंत कार्यकर्ते शिथिल राहतात: फक्त 'इन्स्टुमेंट' म्हणून स्वतःला समजतात. 'पुरोगामी' म्हणजेच सामाजिक चळवळ करणाऱ्या खऱ्या खुऱ्या स्वयंसेवकांसमोरची अडचण माझ्या मते वेगळीच आहे.

त्याच्यावर झालेला अन्याय, त्याच्या समस्या त्याची दुःखे इतरांनी समजून घेऊन, त्याच्यापर्यंत पोहोचून घरबसल्या सोडवून दिली पाहिजेत, त्यात स्वतःचा सहभाग असलाच पाहिजे असे नाही. मी नुकताच सेवानिवृत्त झालो आणि सामाजिक कामाच्या शोधात आहे, म्हटल्यावर माझ्याकडे एक गृहस्थ एका एनजीओ (नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन) चे चक्क प्रपोजल घेऊन आले. त्यात आपला कसा आर्थिक फायदा होईल, याचे त्यांनी माझे सविस्तर प्रबोधन केले. मला असल्या गोष्टीत रस नसल्याने मी विषय आवरता घेतला. ही गोष्ट वेगळी. संस्कृती, पिढयांपिढयांचे संस्कार, प्रसारमाध्यमांचा प्रभाव, नवीन आर्थिक समीकरणे, वेगाने होणारे शहरीकरण, दर पाच वर्षांनी होणारे सत्तेचे राजकारण ह्या गोष्टी पाहिल्या की लोकशाही भारत देशात कोठलीही चळवळ कळूही न येणाऱ्या वेगाने तसूभरही पुढे जात राहील, असे वाटते. त्याला पुरोगामी चळवळही अपवाद नाही. विषयांतर झाले आहे ह्याची जाणीव आहे, परंतु मुळात सामाजिक चळवळींची अवस्था आणि कार्यक्षेत्र कसे आहे ह्याबद्दलही ऊहापोह व्हावा ह्या दृष्टीने माझे विचार मांडले आहेत.
- मो. स. गद्रे
------------------------------------------------------------------

'एक तरी वारी' लेख आवडला 
24 जूनच्या 'साधना' अंकातील विनय सावंत यांचा पंढरपूरच्या वारीवरील लेख वाचला. सेवादलाच्या कार्यकर्त्याने अशा एका सामाजिक व उत्स्फूर्त उपक्रमाबद्दल लिहावे हे खरोखरच अभिमानास्पद आहे. हा लेख वाचून मलाही एकदा तरी हा अनुभव घ्यावा असे वाटू लागले. मी 77 वर्षांचा आहे, त्यामुळे हे पार पडेल की नाही सांगता येत नाही, मन कितीही तरुण वाटले तरी शरीर साथ देणार नाही अशी भीती वाटते. या वार्षिक दिंडीची माओच्या लाँगमार्चशी तुलना करणे उद्बोधक वाटले. जाती-धर्मनिरपेक्ष असा हा मेळावा सर्वांना उत्साह देणारा आहे. मी 1949 पासून महाराष्ट्राबाहेरच आहे व गेली बत्तीस वर्षे ऑस्ट्रेलियात राहतो. एक समाजसेवा म्हणून पौरोहित्यही करतो, परंतु व्यवसायाने मी ग्रंथपाल होतो व साहजिकच वाचनाची आवड आहे व महाराष्ट्राशी संपर्क राहावा म्हणून साधना, लोकप्रभा, इंडिया टुडे यांचा वर्गणीदार आहे. या लेखाचा येथील भारतीय वाचकांसाठी म्हणून इंग्रजीमध्ये सारांश रूपाने अनुवाद छापण्याचे एका मित्राने सुचवले आहे. तुमची त्याला अनुमती मिळावी अशी प्रार्थना. 
- चिंतामण दातार
-------------------------------------------------------------------------------------

प्रा. पुजारींच्या व्याख्यानाने धन्य क्षण अनुभवले
'साधना' साप्ताहिकाच्या 57व्या वर्धापन दिनानिमित्त आपण श्री. निखिल वागळे यांचे भाषण आणि नंतर 14 ते 16 ऑगस्ट 2004 रोजी सोलापूर येथील श्रीराम पुजारी यांचे 'भारतीय संगीत' या विषयावर व्याख्यान ठेवले होते. या दोन्ही कार्यक्रमांना मी उपस्थित होतो. श्री. निखिल वागळे यांना केवळ अल्फा वाहिनीवर पाहिले होते आणि त्यावेळीच ठरवले होती की, या व्यक्तीला आपण भेटावयाचे. परंतु नेहमीच्या कार्यक्रमाच्या गर्दीत त्यांना भेटता आले नाही, तो योग आपण जुळवून आणला. त्यांची प्रत्यक्ष गाठ पडली त्याबद्दल आपला अत्यंत आभारी आहे. त्यांच्या बोलण्यातील स्पष्टपणा व निर्भीडपणा खरोखरीच कौतुकास्पद तर आहेच परंतु त्यांचा हजरजबाबीपणा यांमुळे त्यांचे बोलणे अंतरामध्ये ठसते. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

या भाषणानंतरचा जो दुग्धशर्करा योग, तो म्हणजे श्रीराम पुजारी यांचे संगीत या विषयावरचे भाषण. खरोखरच इतकी वर्षे गाणे ऐकूनही ज्या गोष्टी मला कळालेल्या नव्हत्या, त्या त्यांच्या भाषणामुळे कळल्या. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, ख्याल गायकी, ठुमरी दादरा, गझल, टप्पा, भावगीत, भक्तिगीत, भजन नाना प्रकारच्या संगीत साधनांची भरपूर माहिती श्री. पुजारी यांच्यामुळे मिळाली व आपणास असलेली माहिती किती अपूर्ण किंवा तोकडी होती याची जाणीव झाली. किराणा घराणे, जयपूर अत्रौली घराणे, भेंडी बाजारवाले घराणे, मेवाडी घराणे, ग्वाल्हेर घराणे, पतियाळा घराणे या घराण्यांची वैशिष्ट्ये सांगितली नाहीत तर प्रत्येकाच्या गायकाचा बाज कसा आहे, ते सादरीकरण करून त्यांनी मैफल फारच रंगविलेली होती, याबद्दल शंका नाही. 

कोणते घराणे केवळ एक राग गाते, तर दुसरे एखादे घराणे दोन दोन राग गाऊन आपली वैशिष्ट्ये कशी जपते वगैरे. माहिती त्यांनी फार सुंदर दिलेली आहे. जयपूर घराण्यातील अल्लादियाँ खां पासून ते किराणा घराण्याचे खाँ साहेब अब्दुल करीम खाँ यांच्या घराण्याचा राग आणि गायकी यांची सादयंत माहिती प्रथमच ऐकावयास मिळाल्याने आमचे कान अगदी तृप्त झाले आहेत. कोणत्या गायकाने काय चूक केली, ताना कशा मारावयास नको होत्या, कोण तानांचा बळी कसा गेला हे ऐकताना त्यांच्या स्मरणशक्तीची तर कमाल वाटली. श्रीमती हिराबाई बडोदेकर असोत किंवा गंगूबाई हनगल असोत, मोगुबाई कुर्डीकर असोत, किंवा बेगम अख्तर असोत, प्रत्येकांचा बाज आणि गाणे कोणत्या अंगाने गात होत्या, हे त्यांच्या लक्षात कसे काय आहे याचे नवल वाटते.

पं. भीमसेन जोशी यांना तर त्यांनी भीमाण्णा म्हणून आम्हा रसिकांच्या इतके जवळ आणले की, आपणही एक त्यांच्यापैकीच आहोत, याची अनुभूती आल्याचा प्रत्यय आला. बाई सुंदराबाई या बाईंच्याबद्दल तर ते जे भरभरून बोलले. ते ऐकून त्यांचे गाणे किती सुंदर असेल याची कल्पना आलीच, परंतु मेनकाबाई शिरोडकर यांनी अदा कशी आणि किती प्रकारे करून दाखविली त्यांची तर त्यांनी रंगीत तालीमच दाखविली आहे. ठुमरी हा गाण्यातील प्रकार श्रीमती शोभा गुर्टू यांनी लोकप्रिय केला पण तितक्याच तन्मयतेने त्यांनी गायलेली जी बैठकीची लावणी आहे. 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा' ही त्यांनी तितकीच लोकप्रिय करून दाखविली आहे. याचे उदाहरण पाहून थक्क झालो.

पुजारींनी जो भाग सांगितला त्यामध्ये त्यांनी आम्हांला पहिल्या दोन दिवसांमध्ये त्यातल्या गंमती-जमती आणि स्वभाव यांच्या वैशिष्ट्यांमुळे लक्षात राहिल्याच, परंतु तिसऱ्या दिवशी त्यांनी ज्या गोष्टी आणि घटना सांगितल्या त्यामुळे मात्र मन थोडे व्यथित झाल्याशिवाय राहिले नाही.

श्रीमती पद्मावती शाळिग्राम यांना जेवढी प्रसिद्धी मिळावयास हवी होती तेवढी मिळाली नाही, तर अख्तर फैजाबादी या उत्तम गाणाऱ्या गायिकेचे कलेवर 48 तास पडून राहिले ते नेण्यासाठी नीट व्यवस्था झाली नाही: श्रीमती बाई सुंदराबाई यांचाही शेवट अत्यंत करुण कसा झाला हे त्यांनी सांगितले, त्यापेक्षाही त्यांची जी फसवणूक झाली त्याचे फार वाईट वाटते. तीन दिवस त्यांनी जो संगीत प्रवासाचा जलसा भरविला होता, तो खरोखर अविस्मरणीय असाच होता. माझी 'साधना'च्या विश्वस्तांना एकच विनंती आहे, की सात स्वर आहेत, प्रत्येक स्वरासाठी एक दिवस असे सात दिवस जर अशी व्याख्यानमाला भरविली तर फारच उपकार होतील. या मैफलीसाठी जे काही शारीरिक श्रम असतील ते करण्यास मी तयार आहे. सात दिवस सात स्वरांची मैफल साधनेने आयोजित करावी अशी विनंती आहे.
- जयंत रंगनाथ साबणे
----------------------------------------------------------------------------
आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण घ्यावे 
श्री. नारायण देवरे, कोपरगाव यांचे 24 जुलै अंकातील 'वास्तवातील वारी' या शीर्षकाखाली निवृत्तीनंतर वारीतील अनुभव सांगितलेत. त्यात वारीतील वारकऱ्याच्या मृत्यूबाबत वारकरी लोकांचे सहकार्य नसते, असा उल्लेख केला आहे. या बाबतीत दिंडीतील वारकरी लोकांना भावना नसतात असे मुळीच नाही. दिंडी कमिटीकडे ह्याबाबत काही निर्णय असतीलही; ती व्यवस्था तेवढ्या जबाबदारीने करतील देखील. परंतु मी एक आरोग्य सैनिक या नात्याने आपणास कळवू इच्छिते, प्रत्येक व्यक्तीला अशा आपत्कालीन संकटाचे ज्ञान असायला हवे.

पुण्यात अशा तऱ्हेचे मोफत शिक्षण देणारी देशातील एकमेव संघटना गेली कित्येक वर्षे काम करीत आहे. त्याचे प्रमुख डॉ. अभिजित वैद्य आहेत. सर्व क्षेत्रातील आपल्या सहकाऱ्यांसमवेत ते हे आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे प्रशिक्षण, स्लाईड शो सहित देतात. संपूर्ण महाराष्ट्रभर ही संघटना काम करते. आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी किमान 50 जणांचा गट करून (शाखा) जर शिक्षण घ्यायची तयारी केली, तर आपण आरोग्यसैनिक म्हणून कोणत्याही क्षणी मदतीला तयार व्हाल. या प्रशिक्षणाचा उपयोग कोणत्याही आपत्कालीन संकटाच्या वेळी होतो. 15 दिवसांची पंढरपूरची वारी यशस्वी होण्यासाठी सर्वच दिंडीप्रमुख तयारी ठेवतात, परंतु दिंडी प्रमुखांनी जर हे प्रशिक्षण घेतले तर प्रत्येक वारकरी आपण काय करू शकतो, याचा विचार संकटाच्या वेळी नक्कीच करेल. आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधल्यास, आपणास आरोग्य सेनेचे माहितीपत्रक मिळू शकेल.

Tags: Aarogya Sena Dr. Abhiji Vaidya Vari Shri. Narayan Devare Jilhadhyaksh Aarogya Sena Varsha Gupte Khan Saheb Abdul Karim Khan Alladiya Khan Shriram Pujari Shri. Nikhil Vagale Sadhana  Jayant Rangnath Sabane आरोग्य सेना  डॉ. अभिजित वैद्य वारी श्री. नारायण देवरे जिल्हाध्यक्ष आरोग्य सेना वर्षा गुप्ते खाँ साहेब अब्दुल करीम खाँ अल्लादियाँ खां श्रीराम पुजारी निखिल वागळे  साधना जयंत रंगनाथ साबणे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक ( 1325 लेख )

साधना साप्ताहिकाचे वाचक 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी