डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा धुव्वा उडाला म्हणून आनंद मानण्याऐवजी, समतेचा झेंडा खांद्यावर मिरवणाऱ्या मुलायमसिंह यादवांच्या समाजवादी पक्षावर व इतर सर्वच तिसऱ्या आघाडीतील पक्षांवर मतदारांनी झाडू फिरवला हे चिंताजनक आहे. समतेचा खोटा पुळका बाळगणाऱ्या पक्षांचे खरे स्वरूप मतदारांनी ओळखले हेच सत्य आहे
 

प्रा. साळूंखे यांचे स्पष्ट मत मोलाचे

5 डिसेंबरच्या अंकात ‘वाद-विवाद’ या सदरामध्ये प्रा. डॉ. आ. ह. साळुखे यांचा ‘डॉ. आनंद यादवांची विधाने धक्कादायक व निषेदार्ह' हा लेख वाचला. परिवर्तनवादी सुधारणावादी व्यक्तीला जे बोलावे वाटते, ते नेमकेपणाने प्रा. साळुखे यांनी स्पष्टपणे व्यक्त केले आहे. विचारवंत संशोधकाने हा स्पष्टपणा स्वीकारला याला अर्थातच निश्चित असा आशय आहे.

-प्रा. वसंत वाघमारे, पोखरापूर, ता. मोहोळ

----------

समतोल दृष्टी हवी

5 डिसेंबरच्या अंकातील संपादकीय वाचले. साधना साप्ताहिकाच्या संपादक बदलानंतर भाजप विरोध अधिकच टोकदार झाला आहे. त्याचे प्रतिबिंब या संपादकीयात पडणे स्वाभाविकच आहे. साधनेच्या वाचकांना मात्र दृष्टिकोनातदेखील समता अभिप्रेत आहे, याचा आपणास विसर पडलेला दिसतो. हिंदुत्ववादी भाजपला विरोध करीत असतानाच, तथाकथित तिसऱ्या आघाडीतील, लालूप्रसाद यादवांची भलावण करताना आपण त्यांचे सर्व प्रताप दृष्टिआड केलेत की काय ?

चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा धुव्वा उडाला म्हणून आनंद मानण्याऐवजी, समतेचा झेंडा खांद्यावर मिरवणाऱ्या मुलायमसिंह यादवांच्या समाजवादी पक्षावर व इतर सर्वच तिसऱ्या आघाडीतील पक्षांवर मतदारांनी झाडू फिरवला हे चिंताजनक आहे. समतेचा खोटा पुळका बाळगणाऱ्या पक्षांचे खरे स्वरूप मतदारांनी ओळखले हेच सत्य आहे. समतेला खऱ्या अर्थाने स्वीकारणारा पक्ष अजून भारतात जन्म घ्यावयाचा आहे. आज स्वतःच्या व पक्षीय स्वार्थासाठी जसे भाजप हिंदुत्व पत्करतो तसेच तिसऱ्या आघाडीतील पक्ष ‘'समता’ पत्करतात. दोघांच्याही ढोंगात काडीमात्र फरक नाही. एकंदरीत सर्वच ‘एका माळेचे मणी’ तेंव्हा साधनेच्या व्यासपीठावरून कुणा एकाला टोकाचा विरोध करण्याऐवजी सर्वांकडे उघड्या डोळ्यांनी पहावे .

- सतिश कारेकर, चाळीसगाव

----------

चुकीची दुरुस्ती-  नाकारावे ऐवजी करावे

28 नोव्हेंबरचा अंक मिळाला. मुखपूष्ठावर ठळकपणे विचारवेधची व अध्यक्षीय भाषणाची दखल घेतल्याबद्दल आभारी आहे. आपण जागाही पुष्कळ दिली आहे. पण पृष्ठ 10, स्तंभ 2, परिच्छेद 3, ओळ 13 ‘नाकारावे’ च्या ऐवजी ‘करावे' असे हवे होते. मुळातच तो मुद्रणदोष होता, पण दुरुस्त करून वितरण केले होते. आपल्याकडे पाठवलेल्या प्रतीत दुरुस्ती राहून गेली. गंभीर अर्थविपर्यास होत असल्यामुळे येत्या अंकात चौकटीत दुरुस्ती आली असे वाटते त्यानिमित्त तो मुद्दा पुन्हा रेटता येईल हेही आहेच.

 -श्री. भा. ल. भोळे, नागपूर 
(मुद्रण दोषावह्दल क्षमस्व! संपादक)

----------

डॉ. यादवांची भूमिका भोंगळ व भाबडेपणाची 

5 डिसेंबरच्या अंकात 'वाद-विवाद' या सदरामध्ये प्रा. डॉ.आ.ह.साळुंखे यांचा ‘डॉ. आनंद यादवांची विधाने धक्कादायक व निषेदार्ह’ हा लेख वाचला. 8 नोव्हेंबरच्या ‘म. टाईम्स’ च्या अंकात जळगाव येथे झालेल्या पहिल्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांच्या अध्यक्षीय भाषणातील काही विधानांच्या संदर्भात हा लेख आहे. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्याप्रमाणेच मलाही डॉ. आनंद यादव यांचे साहित्यिक कर्तृत्व आदरणीय वाटते. तरीही समरसता मंचाच्या वतीने आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केलेली डॉ. यादव यांची मते मलाही साळुंखे यांच्याप्रमाणेच धक्कादायक व निषेधार्ह वाटतात. समरसता मंच, संस्कारभारती इत्यादी संस्था रा.स्व. संघाच्या छुप्या व उघड आघाड्या असून या संस्थांना वेगळी भूमिका घेता येणे शक्य नाही.

संघाबाहेरच्या उदारमतवाद्यांना घेरण्याचे हे हिंदुत्वनिष्ठांचे सापळे आहेत हे डॉ. यादव यांच्यासारख्या ग्रामीण साहित्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करणाऱ्या ग्रामीण साहित्य चळवळीच्या प्रवर्तकांनी ओळखायला हवे होते. ‘कालबाह्य झालेली धर्मतत्वे’ समरसता मंच कधीही आस्थापूर्वक विसर्जित करू शकणार नाहीत तसा त्यांना आदेश नसणार. या संदर्भात डॉ. यादव यांचा मात्र मुखभंग होईल. कारण डॉ. आंबेडकर, महात्मा फुले आणि संत गाडगेबाबा यांना अपेक्षित असलेली भारतीय नवसमाज निर्मितीची मूल्ये डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांना नक्कीच अभिप्रेत नव्हती. नसणार हे नक्की. डॉ. यादव यांनी घेतलेली भूमिका भोंगळ व भाबडेपणाची आहे, त्यामुळे तिचा निषेधच केला पाहिजे असे मला वाटते.

-अ.श्री. भडकमकर, कऱ्हाड

----------

कार्य देशप्रेमावर आधारित हवे

14 नोव्हेंबरच्या अंकातील श्री नरेन् तांबे यांचे ‘हिंदुत्ववाद्यांचे अमेरिकेत पसरलेले जाळे' हा लेख वाचनात आला. असे जाळे व संघटना राष्ट्र सेवा दल अमेरिकेत का उभारू शकले नाही असा प्रश्न त्यांनी वाचकांपुढे ठेवला आहे. या प्रश्नातच त्याचे अर्धे उत्तर आहे. अजूनही वेळ गेली नाही. संघाचा विराट पसारा कसा झाला याचा काळजीपूर्वक अभ्यास करावा लागेल. व संघद्वेष पायाभूत न मानता देशप्रेमावर आधारित काम केल्यास राष्ट्रप्रेमी तरुणांची आणखी एक संघटना निर्माण होईल.

-डॉ. प्रभाकर नेलेकर, पुणे

----------

गुरुजींचे ऋण व माझा संकल्प

चालू वर्ष हे साने गुरुजींच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. गुरुजींचे ऋण (जे कधीही फिटत नाही पण जे आपणावर सतत राहावे असे वाटते) स्मरून मी ह्या कार्यामध्ये आपणास खालील प्रकारे सहकार्य करू इच्छितो.
1. 24 डिसेंबर रोजी प्रारंभदिनी मुलांची प्रभातफेरी आयोजित करून त्यांची जयंती साजरी करणे.
2. शुक्रवार 25 डिसेंबर पासून दर शुक्रवारी आमच्या येथील दत्तमंदिरात’ भारतीय संस्कृती व गीताहृदय' या दोन ग्रंथांचे वाचन करणे, किमान 30/40 श्रोते तरी असतातच.
3. ‘भारतीय संस्कृती’ आणि ‘श्यामची आई’ या दोन ग्रंथांच्या प्रत्येकी शंभर प्रतींची विक्री वर्षामध्ये घरोघरी जाऊन करणे.
4. वर्षात विविध स्पर्धांचे आयोजन करणे 
5. शिक्षकांसाठी उद्बोधन वर्ग आणि स्त्री पालकांसाठी किमान चार ‘मातृ-प्रबोधन वर्ग/ शिबिर’ 1999 मध्ये घेणार आहोत.

- वि. दि. आपटे, मिरज
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके