डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साधनेने काही विशेषांक, काही संग्राह्य दर्जाचे आणि विविध परिवर्तनवादी चळवळींचे प्रतिबिंब असलेले अंक अधिक चांगल्या प्रकारे प्रकाशित करावेत. गेल्या पन्नास वर्षांतील साधनेमध्ये वेळोवेळी प्रकाशित झालेल्यापैकी स्वार्थांधतेचा, हिंसकतेचा व अविवेकाचा समाचार घेणारे, परिवर्तनवादी चळवळी व त्यांच्या कार्याचा वेध घेणारे, आंतरभारतीचा विचार मांडणारे आणि विवेक जागरणद्वारा कृतिशीलतेसाठी प्रेरित करणारे, अशा लेखनाचे सोयीने साधनेमधून पुनर्मुद्रण व्हावे.

गुरुजींच्या शताब्दीवर्षात साधनेचे दहा हजार वर्गणीदार व्हावेत

साने गुरुजी जन्मशताब्दीनिमित्त उभ्या महाराष्ट्रात गाव, शहर, महानगर अशा सर्व ठिकाणी विविध सामाजिक संघटना आणि शाळा-कॉलेज यांच्याद्वारा अनेक कार्यक्रम व उपक्रम, छोटे-मोठे प्रकल्प कार्यवाहीत येत आहेत. त्याचा लाभ घेऊन या महोत्सवी वर्षाअखेर साधनेचे किमान 10,000 (दहा हजार) वर्गणीदार व्हावेत. साने गुरुजींविषयी आदर, प्रेम व त्यांच्या विचारकार्यावर श्रद्धा असणाऱ्या सर्व साने गुरुजीप्रेमींनी स्वतः वर्गणीदार व्हावे व आपल्या आप्त/मित्र/सहकारी परिवारातील प्रत्येकाने आणखी किमान एक वर्गणीदार मिळवून द्यावा. या जन्मशताब्दी वर्षात विविध कार्यक्रम हाती घेणाऱ्या सर्व संस्थांनी (शाळा-कॉलेजस्सह) साधनाचे वर्गणीदार व्हावे.

शिक्षक, प्राध्यापक व हितचिंतक यांनी परिवर्तनाचा व विवेकाचा विचार देणाऱ्या साधना साप्ताहिकाचे आवर्जून व्यक्तिगत वर्गणीवार व्हावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी काही जाहिराती व देणगीदारही मिळवून द्यावेत. त्यामुळे साधना अधिक समर्थ होईल. साधनेचे स्वरूप बदलत आहे. ती कसदार बनत आहे. सामान्यांच्या व प्रत्येक माणसाच्या विवेकाला साद घालत आहे. तरीही ती अधिक कसदार, दर्जेदार, सर्वस्पर्शी आणि सामर्थ्यसंपन्न व्हावी. साधनेची पाने (36) अधिक व्हावीत. ती वैविध्यपूर्ण व्हावी.

साधनेने काही विशेषांक, काही संग्राह्य दर्जाचे आणि विविध परिवर्तनवादी चळवळींचे प्रतिबिंब असलेले अंक अधिक चांगल्या प्रकारे प्रकाशित करावेत. गेल्या पन्नास वर्षांतील साधनेमध्ये वेळोवेळी प्रकाशित झालेल्यापैकी स्वार्थांधतेचा, हिंसकतेचा व अविवेकाचा समाचार घेणारे, परिवर्तनवादी चळवळी व त्यांच्या कार्याचा वेध घेणारे, आंतरभारतीचा विचार मांडणारे आणि विवेक जागरणद्वारा कृतिशीलतेसाठी प्रेरित करणारे, अशा लेखनाचे सोयीने साधनेमधून पुनर्मुद्रण व्हावे. आजच्या प्रदूषित सामाजिक पर्यावरणाच्या बदलांसाठी तर त्याची अधिक गरज आहे. साधनेकडून या अपेक्षा आहेत. असे होण्यासाठी अनेकांच्या सहकार्याची, उत्स्फूर्त सहाय्याची व स्वयंप्रेरणेची गरज आहे. या अशा सक्रिय सहकार्यातूनच साधनेस अपेक्षापूर्ती करता येईल. मी व्यक्तिशः किमान शंभर वर्गणीदार आणि जाहिराती व देणगीदारांद्वारा किमान रु. 10,000 चे आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचा मनोमन संकल्प केला आहे. समाजात साधना लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे. त्या कामी चाहते, हितचिंतक व कार्यकर्ते कमी पडतात. अनुभव असा आहे की आपणांस अपेक्षेपेक्षा जास्तीतजास्त लाभ घेऊन, सक्रिय होऊन साधनेला समर्थ-संपन्न करण्याचा सर्व साने गुरुजीप्रेमीनी संकल्प करावा.

प्रा. व्ही. एस. चव्हाण, नाशिक

----------

भ्रष्टाचारी कारभार

19 डिसेंबर 1998 च्या साधनाच्या अंकात डॉ. विजय साठे यांचा ‘आमचे महसूल खाते, पैसेवाल्यापुढे दुबळे, गरिबांचे कर्दनकाळ’ यांना वठणीवर आणणार कसे? हा लेख वाचला. महाराष्ट्र शासनाच्या सर्व खाते ऊर्फ विभागांचा कारभार ज्या प्रकारे चालतो तो प्रकार म्हणजे कारभार कसा न चालावा याची उदाहरणे असतात. त्यातल्या त्यात महसूल विभाग हा अर्क. मी 1957 साली तत्कालीन सौराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात शेमुंजी पाटबंधारे प्रकल्पावर काम करीत असताना माझ्याकडे एक ग्रामस्थ अर्ज देण्यासाठी आला व त्याने त्या अर्जावर पाच रुपयांची नोट ठेवली. मी त्याला ती नोट ठेवण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘‘साहेय रेव्हिन्यु खात्यात अर्जावर पाच रुपये ठेवल्याशिवाय अर्जाला हात लावत नाहीत म्हणून मी ही नोट ठेवली.’’ मी त्याला ती नोट परत घ्यायला लावली व आमच्याकडे या कार्यालयात तशी पद्धत नसल्याचे सांगून त्या अर्जाबद्दल स्वतः दुसऱ्या दिवशी चौकशी करून त्याचे गा-हाणे दूर केले. मी स्वतः नाशिकमध्ये महसूल विभागात खात्यात शिधावाटप दुकान बदलण्यासाठी अर्ज दिला पण पैसे दिले नाही म्हणून मला चार वेळा हेलपाटे घालावयास लावले. यावरून महसूल खाते पैसे देणाऱ्यांचीच कामे करते, असा निष्कर्ष मी काढला . डॉ. विजय साठे यांच्याशी मी सहमत आहे.

पुंडलीक मोरजे, नाशिक

----------

‘साधना’ वाचनीय

साधनेचा अंक दिवसेंदिवस वाचनीय होत आहे, याचा आनंद वाटतो. बरीच नवीन प्रबोधनकारी माहिती साधनेतून मिळू लागली आहे. 26 जानेवारी 99 च्या अंकातील संपादकीय, साने गुरुजी कथामाला, साने गुरुजी जिवंत, चैतन्यमयी स्मारक, पर्यावरण आणि गणपती विसर्जन, आरोग्य व्यवस्थेचे अर्थकारण हा डॉ. अरुण बाळ यांचा सेट आणि ‘धर्माची नजर’ हा नंदिनी आत्मसिद्ध यांचा लेख हे विचाराला चालना देणारे आहेत.

मधु नाशिककर, ठाणे

----------

6 फेब्रुवारी साधना अंकात प्रा. तुळशीराम जाधव या थोर समाजसेवकाला अपघात झाल्याचे वृत्त वाचून मन दुःखित झाले. आपण केलेल्या आवाहनानुसार सोबत धनादेश क्र. 728004 बँक ऑफ महाराष्ट्र रु.1001/- पाठवीत आहे. या अल्पशा रकमेचा स्वीकार व्हावा ही नम्र विनंती. ही मदत वैद्यकीय उपचाराकरिता म्हणून केली आहे 

पां. ना. फुटाणे, मुंबई

Tags: reader’s review weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके