दहशतवादी संघटना स्वातंत्र्याचा, नि जाती-धर्माचा चकचकीत आरसा समोर धरतात. तरुण त्याकडे आकर्षित होतात. त्यातून मिळणारा तात्पुरता आधार देश, संस्था, समाज व माणुसकीला काळिमा फासतो. माणसामाणसांत सौहार्द व मैत्रभाव नेहमीच विकासाला कारणीभूत ठरतो. हुकूमशाही प्रवृत्ती अहंकाराला जोपासत 'सत्ते' वर लक्ष ठेवते. त्यासाठी समर्थ माणसाला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जातो. त्याची आधारशक्ती एकदा नेस्तनाबूत केली की एकाकी पडलेल्या माणसाला सहज संपवता येते. आज देशात आणि विविध क्षेत्रांत याच 'दुर्योधनी' प्रवृत्तीचा दहशतवाद सुरू आहे. तो प्रगतीला अडसर आहे. अशा प्रवृत्तीला खतपाणी घालणे, दुर्लक्ष करणे अथवा जोपासणे शेवटी नाशाला कारणीभूत ठरते. त्यासाठी ही दहशतवादी वृत्ती वाढणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे
दहशतवादविरोधी जागर
साधना साप्ताहिकाच्या 22 जुलैच्या अंकातील मदतकार्याचे चित्र हृदय हेलावून टाकणारे आहे. आपण एकजुटीसाठी केलेली प्रार्थना यथोचित आहे. संपादकीय लेखात दहशत फोफावण्याच्या मूळ प्रश्नाचा वेध घेतलात तद्वतच 'माझा राघू स्फोटानं नेला' ही उत्तम कांबळे यांची रचनाही समर्पक आहे. अवधूत परळकरांचा 'आपल्या दुटप्पीपणाला तोड नाही' हा लेख आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. हृदयातील सिंहासनावर बसवणारे ऊर फोडून बाहेर निघतील तेव्हा संधिसाधू राज्यकर्ते दहशतवादाचे भांडवल करून धार्मिक संवेदना प्रक्षुब्ध करतील. हिंदु- मुस्लिमांत बेबनाव निर्माण करतील. भांडवलदारांच्या लोकशाहीचा मलिदा करणाऱ्या अमेरिकेला इस्रायल, लेबनॉनसारखे दहशतवादाचे पीक वाढवण्याचा हंगाम सुरू करायला हे राज्यकर्ते मागे-पुढे पाहणार नाहीत. कारण आपण दहशतवाद्यांपैकी काहींना सत्तेच्या उच्चासनावर बसवून लोकशाहीला भांडवलदारांची बटीक बनवलं आहे 'साधना'ने जो दहशतवादविरोधी वैचारिक जागर चालवला आहे. त्या जागराची ज्योत (ठिणगी) होण्याचं जरी भाग्य लाभले तरी धन्य आहे. पुन्हा एकदा 'साधना'च्या भूमिकेबद्दल, मुक्तपणे विचार मांडले म्हणून आभारी आहे.
- सुरेश शिंदे, नांदेड
---------------------------------------------------------------------------------------
टिळक-आगरकर विशेषांक आवडला
मी नुकताच 'साधना'चा वार्षिक वर्गणीदार झालो आहे. जुलै महिन्याचे चारही अंक व्यवस्थित व चांगल्या स्वरूपात मिळाले. टिळक आणि आगरकर विशेषांक अतिशय आवडला.
- धनंजय सप्रे, कोथरूड, पुणे
-------------------------------------------------------------------------------
प्रधान सरांचे लेख अप्रतिम
'साधना'च्या 15 जुलैच्या अंकातील श्री.ग.प्र.प्रधान यांचे लोकमान्य टिळक व आगरकरांसंबंधीचे लेख अतिशय आवडले. लो. टिळकांच्या नावांबरोबर त्यांनी इंग्रज सरकारला ऐकवलेली 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच' ही खणखणीत इशारेवजा गर्जना व त्यांनी भोगलेला तुरुंगवास यांची प्रकर्षाने आठवण होते. 'ओरायन' व 'गीतारहस्य' या विद्वत्तापूर्ण ग्रंथांची आठवण त्यानंतर होते. त्यांच्या काहीशा उग्र व कठोर प्रतिमेमुळे त्यांची ज्ञानलालसा व देश परिस्थितीमुळे त्यांना राजकारणात घ्यावा लागलेला भाग, यामुळे त्यांच्या मनात निर्माण होणारे द्वंद्व सामान्यपणे लक्षात येत नाही. त्यामुळे श्री. प्रधानसरांनी एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातून लिहिलेला लेख खूप ताजा वाटला. समाजसुधारक आगरकरांचे निबंध वाचल्याला बरीच वर्षे झाली.त्यांच्या विचारांमागच्या त्यांनी केलेल्या सखोल तत्त्वचिंतनाचे दर्शन श्री.प्रधान सरांनी आपल्या विस्तृत लेखात (आगरकर लेखसंग्रहाची प्रस्तावना) फार उत्तम तऱ्हेने घडवले आहे. तसेच त्यांच्या स्वभावातील काही छटांकडेही वाचकांचे लक्ष वेधले आहे. या लेखामुळे पुन्हा एकदा आगरकरांचे निबंध वाचण्याची प्रेरणा मिळाली.
- सुजला नित्सुरे, पुणे
-------------------------------------------------------------------------------------
दहशतवाद - माणुसकीचा अडसर
'काटेरी दहशतवाद:व्यापक भान हवे' (साधना : 22 जुलै) हे संपादकीय वाचले. मुंबईत 11 जुलै रोजी झालेले बाँबस्फोट आणि त्या निमित्ताने आपण याविषयी केलेले व्यापक चिंतन महत्त्वाचे आहे. 'मुंबईत एक कोटी तीस लाख लोकसंख्येपैकी 60% लोक झोपडपट्टीत वा रस्त्यांवर राहतात', 'मुंबईत दुःख कुरवाळत बसण्याची 'चैन' परवडत नाही' असे संदर्भ मुंबईच्या जीवनमानाचे निदर्शक आहेत. यानिमित्ताने लेखामध्ये 'अक्षरधाम', 'अयोध्या', 'नागपूर' यांचे दिलेले संदर्भ, हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेषाचे बीजारोपण करण्याचे कारस्थान यांवर प्रभावी प्रकाशझोत टाकला आहे. राजकीय उदासीनता आणि मुंबईकरांची अगतिकता यावरही या लेखात प्रभावी भाष्य आहे. त्यातून भविष्यासाठी व्यापक भान आपण सुचविले, ते लक्षात येणे अत्यंत गरजेचे आहे.
आज अनेक क्षेत्रात अशा दहशतवादी प्रवृत्तीला उधाण आले आहे. कोणताही दहशतवाद अखेर प्रगतीला आणि माणुसकीला अडसर ठरतो. माणसा- माणसांतील अविश्वास भयस्थिती निर्माण करतो. कोणतेही काम निर्भय आणि तणावमुक्त वातावरणात चांगले होते. हुकूमशाही प्रवृत्ती प्रारंभी आकर्षक दिसते. त्यातला भौतिक सुधारणावाद आणि तात्कालिक फायदे भल्याभल्यांना आकर्षित करतात. त्यांचे तत्त्वज्ञान अनेकांच्या गळी उतरविण्यात अशी प्रवृत्ती यशस्वी ठरते. त्यातूनच माणूस साधनांकडे दुर्लक्ष करतो व साध्याची प्रतिमा पाहतो. पण महात्मा गांधी यांनी साध्य व साधनाचे शुचित्व पटवून दिलेले आहे.
दहशतवादी संघटना स्वातंत्र्याचा, नि जाती-धर्माचा चकचकीत आरसा समोर धरतात. तरुण त्याकडे आकर्षित होतात. त्यातून मिळणारा तात्पुरता आधार देश, संस्था, समाज व माणुसकीला काळिमा फासतो. माणसामाणसांत सौहार्द व मैत्रभाव नेहमीच विकासाला कारणीभूत ठरतो. हुकूमशाही प्रवृत्ती अहंकाराला जोपासत 'सत्ते' वर लक्ष ठेवते. त्यासाठी समर्थ माणसाला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जातो. त्याची आधारशक्ती एकदा नेस्तनाबूत केली की एकाकी पडलेल्या माणसाला सहज संपवता येते. आज देशात आणि विविध क्षेत्रांत याच 'दुर्योधनी' प्रवृत्तीचा दहशतवाद सुरू आहे. तो प्रगतीला अडसर आहे. अशा प्रवृत्तीला खतपाणी घालणे, दुर्लक्ष करणे अथवा जोपासणे शेवटी नाशाला कारणीभूत ठरते. त्यासाठी ही दहशतवादी वृत्ती वाढणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे
- प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये श्रीरामपूर
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या