डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पत्रास कारण की.. (26 सप्टेंबर 1992)

काल जेव्हा मी साधनेचा ता. 29 ऑगस्ट 1992 चा अंक वाचायला लागलो तेव्हा आपला अग्रलेख 'बोलीचीचच कढी बोलीचाच भात' वाचताना मन प्रसन्न होण्याऐवजी दुःखी बनले. 'कोकणी' जी आम्हा सर्व गोवेकरांची मातृभाषा आहे, जिला आम्ही सर्व गोवेकरांनी अनेक यातना सोसून जोपासली, वाढवली व आज जेव्हा देशाच्या इतर भाषांच्या रांगेत येऊन आसनस्थ झाली तेव्हा आमचे अभिनंदन करणे सोडून आपण दुःख व हेवा लेखाद्वारे का करावा हे समजले नाही. 

21 ऑगस्टच्या साधना साप्ताहिकातील 'अनामिकाची अभंगवाणी' खूपच मार्मिक वाटली. अन् त्यामुळेच आवडली.

श्री. सुमित गुहा यांच्या मूळ लेखाचा प्रा. सदानंद वर्दे यांनी केलेला अनुवाद - 'छोडो भारत' चे खरे विरोधक कोण, हा लेख स्वातंत्र्य चळवळीतील गद्दार कोण, हे सांगून गेला. ही नवी माहिती आपण दिलीत त्याबद्दल धन्यवाद. खरे तर हा लेख सर्व लोकाभिमुख दैनिकांनी प्रसिद्ध करण्याजोगा आहे. म्हणजे सत्य परिस्थिती लोकांपुढे आली असती. 

-कल्याण आतकरे, दारफळ.

-----------

कै. अच्युतराव पटवर्धन यांच्या निधनानंतर लागोलग काढलेला श्रद्धांजली विशेषांक अपूर्व आहे. वसंत बापटांची कविता, खुद्द अच्युतरावांचा लेख यामुळे तो अंक आपल्या संग्रही नेहमी सांभाळावा असे वाटले.

15 ऑगस्टच्या अंकातील 'अलविदा' हा लेखही सुंदर, नादमधुर व अर्थवाही आहे. आज अनेक वर्षे 'साधने'च्या कित्येक अकांनी मन आनंदाने भरून टाकले आहे. अनुभव जुनाच आहे प्रत्येक वेळी व्यक्त करणे जमतही नाही. या महिन्यात मात्र 42-4३ सालचे पुणे, तेथील वातावरण, माझ्यावर 9 ते 10 वर्षांच्या वयात झालेले संस्कार परिणाम तेव्हा पाहिलेले व मनात ठसलेले, अच्युतराव, गोरे, साने गुरुजी, एसेम, फार काय पंडितजी, महात्माजी सुद्धा, सर्वांच्या स्मृती जिवंत झाल्या व धन्यता वाटली.

-सुधा पाटणकर, अंकलेशवर

--------

साधनेचा ऑगस्ट क्रांती सुवर्ण महोत्सव विशेषांक वाचनीय व संग्राह्य असा आहे. जुन्या पिढीने तो नव्या पिढीला वाचण्यासाठी आवर्जुन द्यावा. म्हणजे नव्या पिढीला स्वातंत्र्य लढ्यातील शेवटचे महत्त्वाचे पर्व नीटपणे समजेल. सर्वच लेख चांगले. मधु दंडवते व मधु लिमये यांचे लेख त्या काळचे सत्यदर्शन घडविणारे आहेत. गांधी-जयप्रकाश पयांना मानणाऱ्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी एकदा तरी एकत्र यावे व सद्य स्थितीत राष्ट्राच्या भवितव्याचा नव्याने विचार करावा असे हे वर्ष आहे. 

-मधु नाशिककर, ठाणे

---------

गेल्या तीन अंकातील अभंगवाणी वाचली. आपल्या शब्दसामर्थ्याचे आश्चर्य आहे. 'ग्रिंडल्या, हुंबरी, लंगडी ', असे शब्द कसे काय कागदावर येतात-? आपल्या रचनांवर बेहद खूष!
आपल्या अभंगाची रचना, आशय, त्यातला सल... सर्वच उत्कृष्ट जमलंय. बांगला देशातल्या ग्रामीण बँकेवरचा श्री. पाटील यांचा लेख, सहकारी ग्रामीण सोसायट्यांच्या संघटनेचे पत्र इथल्या एका पत्रात छापतोय, परवानगी असावी.

-वसंत आपटे, किर्लोस्करवाडी 

---------

मी एक गोमंतकीय आहे. साधनेचा वाचक आहे. मी मन लावून वाचतो. वाचकांत सामाजिक जागरूकता निर्माण करणारे साहित्य तर फार चवीने वाचतो. साधना- मराठी भाषिकांचे एक चांगले साप्ताहिक; प्रत्येकाने, ज्याला मराठी भाषा अवगत नाही त्याने सुद्धा वाचण्यासारखे, असा माझा विश्वास आहे.

पण काल जेव्हा मी साधनेचा ता. 29 ऑगस्ट 1992 चा अंक वाचायला लागलो तेव्हा आपला अग्रलेख 'बोलीचीचच कढी बोलीचाच भात' वाचताना मन प्रसन्न होण्याऐवजी दुःखी बनले. 'कोकणी' जी आम्हा सर्व गोवेकरांची मातृभाषा आहे, जिला आम्ही सर्व गोवेकरांनी अनेक यातना सोसून जोपासली, वाढवली व आज जेव्हा देशाच्या इतर भाषांच्या रांगेत येऊन आसनस्थ झाली तेव्हा आमचे अभिनंदन करणे सोडून आपण दुःख व हेवा लेखाद्वारे का करावा हे समजले नाही. 

'कोकणी' ही मराठीची बोली आहे असे तुमचे आग्रही मत तुम्ही लिहीत असता पण तुम्हांस एवढेच सांगू इच्छितो- आम्हा सर्व गोवेकरांना मराठी शिकल्या शिवाय बोलता, वाचता किंवा लिहिता येत नसते. तुम्हा सर्व मराठी भाषिकांना पण कोकणी शिकवल्याशिवाय येत नसते येणार पण नाही, हे ध्यानात असावे. 'मराठी लोक आक्रमक आहेत, ते दुसऱ्यांना गिळंकृत करतात' ही अढी का निर्माण होते हे आपला अग्रलेख वाचल्यानंतर उमगून आले.

- भालचंद्र नेयगी, आंगड-म्हापसा

Tags: कोकणी. गोवा गोमंतक अभंगवाणी मधु लिमये 1942 चळवळ अच्युतराव पटवर्धन साधना पत्र Konkani. Goa Gomantak Abhangwani Madhu Limaye 1942 Movement Achyutrao Patwardhan Sadhana Letters weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके