डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

3 डिसेंबर 84 रोजी भोपाळ येथील यूनियन कार्बाइड कंपनीमधील अपघातात मेथिल आयासोसायनेट या विषारी रसायनामुळे 2000 माणसे मृत्युमुखी पडली आणि कैक कायमची अपंग झाली. या रसायनाचे घातक परिणाम लक्षात घेऊन पाश्चात्त्य देशांतील आपल्या कारखान्यात युनियन कार्बाइड कंपनी ते छोट्या बाटल्यांत साठवीत असे, उलट भोपाळमध्ये मात्र काही टन क्षमतेच्या टाकीत साठवीत असे. हेही अमेरिकी कंपन्यांचे कौतुक करण्यापूर्वी श्रीमती गव्हाणकर यांनी विचारात घ्यावे.

सलाम बापट

कविवर्य वसंत बापट यांचे साहित्य संमेलनातील समारोपाचे भाषण थोडे ऐकले. संपूर्ण वाचले. बापट यांच्याबद्दल आदर होताच, तो या भाषणाने द्विगुणित झाला. त्यांनी ज्या धाडसाने आणि विचारनिष्ठेने ठाकरे यांना चोख उत्तर दिले त्याबद्दल त्यांना नम्रतापूर्वक सलाम!

रावसाहेब कसबे, संगमनेर

----------

विठ्ठलमुक्तीवर लेखन यावे

फेब्रुवारी 1999 च्या ‘ललित’ मधील प्रा. सदानंद मोरे यांची मुलाखत... (शष्दांकन : मंजिरी नेऊरगावकर) आवश्य वाचावी. यंदाचे वर्ष साने गुरुजी यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून प्रा. सदानंद मोरे म्हणतात त्याप्रमाणे ‘भक्ती’, ‘विठ्ठलमुक्ती’ या संदर्भातला लेख ‘साधना’मध्येही यावा असे वाटते. भारताच्या जडणघडणीतही भक्तीचा मोठा वाटा आहे याची जाणीव पूज्य साने गुरुजींना होती. अशा आशयाचा शास्त्रीय लेख साधनेमध्ये यावा असे वाटते.

तु. द. कुलकर्णी, कोल्हापूर

----------

अमेरिकेचे अंधानुकरण अशक्य कोटीतले

23 जानेवारीच्या अंकात ‘पर्यावरण समतोल’ या लेखात निलु निरंजना गव्हाणकर यांनी पोकळ भाषणे देणाऱ्या पर्यावरणवाद्यांवर टीका करताना पर्यावरणाला धोका पोचणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन ऊर्जेची वाढती भूक शमवली पाहिजे अथवा या भुकेला आळा घातला पाहिजे, असे म्हटले असले तरी त्यांचा एकूण सूर ही वाढती भूक पुरी करण्यावरच भर देणारा आहे. तसेच त्यांना बेक्टेलच्या अणुऊर्जा प्रकल्पात अधिक सुरक्षित वाटेल; अर्थात न्यूक्लिअर वेस्ट कशी हाताळावी हा एक मोठा प्रश्न आहे, असेही त्या म्हणतात. मी भाषणे करणारा पर्यावरणवादी नाही अथवा विकासपद्धतीच्या अनुषंगाने या समस्येचा सक्रिय विचार करणाऱ्या मेधा पाटकरांसारखा कार्यकर्ताही नाही. थोडाफार विचार करणारा एक सामान्य नागरिक या नात्याने मी काही सांगू इच्छितो. 

आपल्या देशासारख्या भ्रष्टाचारी देशात प्रदूषण नियंत्रण नाही हे खरे आहे; परंतु अमेरिकी कंपन्या विकसनशील देशांत हे सर्व नियम धुडकावण्यातच दंग असतात. तारापूर अणुकेंद्राच्या उभारणीत बेक्टेल कंपनीने कसे काम केले याची माहिती श्रीमती गव्हाणकर यांना श्री. जॉर्ज फर्नांडिस किंवा श्री. प्रभाकर मोरे देऊ शकतील. 3 डिसेंबर 84 रोजी भोपाळ येथील यूनियन कार्बाइड कंपनीमधील अपघातात मेथिल आयासोसायनेट या विषारी रसायनामुळे 2000 माणसे मृत्युमुखी पडली आणि कैक कायमची अपंग झाली. या रसायनाचे घातक परिणाम लक्षात घेऊन पाश्चात्त्य देशांतील आपल्या कारखान्यात युनियन कार्बाइड कंपनी ते छोट्या बाटल्यांत साठवीत असे, उलट भोपाळमध्ये मात्र काही टन क्षमतेच्या टाकीत साठवीत असे. हेही अमेरिकी कंपन्यांचे कौतुक करण्यापूर्वी श्रीमती गव्हाणकर यांनी विचारात घ्यावे. तसेच अणुऊर्जाकेंद्रात तयार होणाऱ्या आण्विक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी हा प्रश्न पन्नास वर्षे झाली तरी सुटलेला नाही.

या कारणामुळे व 1986 मध्ये चेर्नोबिल येथे झालेल्या अपघातानंतर पाश्चात्त्य देशांत केवळ फ्रान्समध्येच अणुऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. इतर काही देशांत ग्रीन चळवळीमुळे चालू असलेले प्रकल्पही बंद करण्यावर भर देण्यात येत आहे. आशियायी जनतेच्या सुदैवामुळेच चैर्नोबिलच्या अपघातांतील किरणोत्सर्गी धूळ पाश्चात्त्य देशांत पसरली. ही धूळ पूर्वेकडे आली असती तर आपल्या अभिजन वर्गाने व पाश्चात्त्यांनी या धोक्याचे गांभीर्य लपवण्याचाच प्रयत्न केला असता. श्रीमती गव्हाणकर यांना अमेरिकेत पोकळ भाषणे देणारेच पर्यावरणवादी भेटले. परंतु जर्मनीतील ग्रीन पार्टी सुरुवातीपासून विकसित देशांत शून्य विकास होण्यावर भर देत असून अविकसित जगाला पुरेसा विकास साधता यावा यासाठी विकसित देशांना आपल्या राहणीमानाची पातळी खाली आणावी लागेल असे सांगत आली आहे. तसेच जर्मनीच्या एकीकरणापूर्वी पश्चिम जर्मनीच्या लोकसभेमधील पक्षाच्या चाळीस सभासदांपैकी फक्त दहा जणांची स्वतःची मोटारगाडी होती आणि इतर सभासद दुसऱ्यांच्या मोटारीने किंवा सार्वजनिक बसने जात असत हेही मला माहीत आहे. 

जगाच्या सरासरी वापराच्या शंभरपट ऊर्जा वापरणाऱ्या अमेरिकेचे अंधानुकरण केवळ अशक्य कोटीतील आहे. आज 800 माणसांमागे एक मोटार हे प्रमाण असलेल्या 125 कोटी लोकसंख्येच्या चीनला दोन माणसांमागे एक मोटार या अमेरिकेच्या पातळीवर आणण्याकरिता किती पोलाद व अन्य सामग्री तसेच पेट्रोल वापरावे लागेल? आणि मग हीच पातळी गाठण्याचा प्रयत्न 100 कोटी भारतीयांनी का करू नये? 1995 मध्ये चीनमध्ये साडेचार लाख मोटारी व 78 लाख मोटारसायकलींचे उत्पादन झाले. भारतही या स्पर्धेत मागे नाही. परंतु तज्ज्ञांच्या मते रस्ते, आणि सर्व साधने, पैसा व लोकसंख्या यांचा विचार करता चीनमध्ये हे स्वप्न फार तर 10 ते 20 कोटी, म्हणजेच अभिजन वर्गापुरते साकार होऊ शकेल. चीनमध्ये असलेल्या या निरनिराळ्या प्रकारच्या 50 कोटींहून अधिक मोटारी व तत्सम वाहनांमुळे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणाचा धोकाही विचारात घ्यावा लागेल. सरकारी आकडेवारीप्रमाणे 1993-95 या काळात चीनमधील वीस मोठ्‌या शहरांत ब्रॉन्कायटिसने 30 लाख लोक मृत्यू पावले आणि फुप्फुसाच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 1980 मध्ये 100,000 मध्ये 12 होते, तर 1994 मध्ये ते 58 झाले. हे सर्व लक्षात घेऊन पर्यावरणाचा गांभीर्याने विचार करण्याची आणि जगातील सीमित साधनसामग्री विचारात घेऊन संपूर्ण पृथ्वी एकक (युनिट) धरून विचार करण्याची आज आवश्यकता आहे. यासाठी शास्त्रीय ज्ञानाचा योग्य दिशेने वापर करून सुखी, समृद्ध व समाधानी जीवनपातळीवर सर्व देशांचा विकास साधण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान विकसित करावे लागेल.

भालचंद्र राजे, कल्याण

----------

हक्कांबरोबर कर्तव्यनिष्ठाही हवी

आजच्या ‘साधने’च्या संपादकीयामध्ये शिक्षणाचे माध्यम मराठी होण्याबद्दलच्या अडचणी दाखविल्यात. त्याची कारणे तुमच्या उपसंहारात स्पष्ट होण्याजोगी आहेत. माणुसकी विसरत जाण्याच्या सामाजिक पर्यावरणातून पृथ्वीवर विज्ञानामुळे फक्त रोबो संस्थेची वस्ती होण्याचा संभव आहे. स्वावलंबन, शिस्त, जिज्ञासा ही मूल्ये पालक, शिक्षकांपासून सामाजिक परिसरात कृतिशीलपणे महत्त्वाची मानली पाहिजेत. तेव्हाच हक्कांबरोबर प्रामाणिकपणे कर्तव्यनिष्ठ होण्याचे वातावरण लाभेल. समता व बंधुता या साहजिक होतील. 30 जानेवारीच्या अंकातील ‘गांधीजींचे बलिदान’ हा अनुवाद-लेख फार मार्मिक होता. तर पंचायत राज महिला मेळाव्याचा अहवाल फार आश्वासक वाटला. त्या कामाबद्दल मंडलिक ट्रस्टचे अभिनंदन केले पाहिजे.

शांता किर्लोस्कर, पुणे

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके