डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘शरीरसंबंध’ हे पाप आहे असे आपल्या देशातील बहुतेक माणसे मानतात. शरीराच्या नादी लागले की माणूस वाया जातो असे त्यांना वाटते. या विधानातील तुच्छतादर्शक सूर आक्षेपार्ह आहे. वरील मताचा गंभीरपणे विचार आणि पुरस्कार जगभर आणि पुरातन काळापासून झाला आहे. गांधीजींसारख्या काही मंडळींनी तर या भूमिकेचा प्रयोगशील विचार केला आहे.

फायर! विपर्यस्त विधाने

श्री निळू दामले यांचा ‘फायर’ वरील लेख वाचला. त्यातील कित्येक विधाने विपर्यस्त दिसतात . मूळ वृत्तपत्रात असे लिखाण खपून गेले असावे. ‘साधना’ सारख्या साप्ताहिकात ते आल्यावर त्याची वाचकांच्या दृष्टीने विश्वासार्हता वाढते. अशा प्रकारच्या लेखनामुळे लैंगिक जीवनाबद्दलचे प्रचंड गैरसमज सामान्य माणसांच्या मनात निर्माण होतात. ‘साधना’ ही लैंगिक जीवनासंबंधी शास्त्रीय माहिती देण्याच्या पवित्र्यात नसावी. त्यामुळे फार खोलात न जाता मला या लेखात जी विपर्यस्त विधाने आढळली त्याकडे वाचकांचे लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

विधान- ‘त्या दोघी आपली शारीरिक गरज समलिंगी संबंध ठेवून भागवतात.’ सामान्य माणसे शारीरिक भूक समलिंगी संबंधातून भागवू शकत नाहीत. काही माणसांचा लैंगिक विकास-त्यातील शारीरिक-रासायनिक विकास वेगळ्या पद्धतीने झालेला असतो, त्यांच्यासाठी समलिंगी संबंध स्वाभाविक असतो. सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत तो विकृतच मानला जातो. (संदर्भ: विठ्ठल प्रभु) ‘फायर’ मधील ‘दोघी’ लैंगिक विकासाच्या बाबतीत सामान्य आहेत. तेव्हा त्यांच्या वर्तनाला विकृती म्हणायला हवे. ही विकृती त्यांच्यात ज्यामुळे निर्माण झाली त्या परिस्थितीबद्दल चीड निर्माण व्हायची असेल तर प्रथम या संबंधांची भलामण न करता विकृती म्हणून नोंद केली पाहिजे.

विधान : ‘शरीरसंबंध’ हे पाप आहे असे आपल्या देशातील बहुतेक माणसे मानतात. शरीराच्या नादी लागले की माणूस वाया जातो असे त्यांना वाटते. या विधानातील तुच्छतादर्शक सूर आक्षेपार्ह आहे. वरील मताचा गंभीरपणे विचार आणि पुरस्कार जगभर आणि पुरातन काळापासून झाला आहे. गांधीजींसारख्या काही मंडळींनी तर या भूमिकेचा प्रयोगशील विचार केला आहे. उथळपणे अधिक्षेप करण्यासारखा हा विचार नव्हे. बहुसंख्य माणसांनी अगदी भारतातही हा विचार ग्राह्य मानला आहे असे म्हणता येणार नाही. खरे तर गांधीजींसारख्या विचाराच्या बरोबर विरोधी विचार आणि तोही तशाच गंभीर प्रयोगशीलतेने आपल्याच देशात पूर्वापार आला आहे.

शाक्तपंथ, सहजिया पंथ, इत्यादींची साधना अभ्यासकांना परिचित आहे. आजकालच्या काळातही दत्ता बाळ, रजनीश, यांचे विचार व साधना या विरोधी मताचा पुरस्कार करतात. माझ्या मते हा विचार पूर्णपणे समजून न घेता, पण त्याच विचाराच्या सावटाखाली…

सेक्स ही माणसाची मूळ गरज आहे.... मुलांना जन्म देणे हा त्याचा आनुषंगिक भाग झाला... मूळ सेक्समधला शारीरिक मानसिक आनंदाचा भाग ग्रेट असल्याने माणसाला तो आवडतो. हे विधान जन्मले आहे. या स्वरूपात या विचाराची मांडणी केल्याने त्याची परिणती वासनाकांड, लैंगिक विकृती, स्वैराचाराच्या समर्थनात होताना मला आढळते. लेखाची भाषा वृत्तपत्रीय- म्हणजेच नेमकेपणा नसलेली आहे. आनंद या शब्दाची यथायोग्य व्याख्या लेखकाच्या मनात नसावी. हे धोकादायक आहे. चंगळवादी, त्यात कामसुखाची चंगळ म्हणून स्त्री-पुरुषांनी एकमेकांची शरीरे वापरणारे कित्येकदा स्वतःला ‘आनंद यात्री’ म्हणवताना आढळतात. पण सत् चित्-आनंद या शब्दप्रयोगातील आनंद हा तर या ‘आनंद यात्री’ पासून अनेक योजने दूर आहे.

सेक्स चे स्वरूप त्याच्या मर्यादा इत्यादीबद्दल श्री. दामले यांची विधाने सौम्य शब्दात सांगायचे तर अज्ञानमूलक आहेत. पण त्याबद्दल अधिक खोलात जाण्याची या संदर्भात मला जरुरी वाटत नाही . कामजीवन हे संपूर्ण जीवनाचे एक महत्वाचे शिवाय अभिन्न अंग आहे. त्यामुळे त्याबद्दलची टिपणी करताना काही समाजशास्त्रीय विधाने दामले यांनी करणे स्वाभाविकच आहे.

विधान : ‘सेक्स हे सत्तेचे रूप असल्याने त्यातला स्वाभाविक आनंद न घेता ही सत्तेतील मंडळी भलत्याच रीतीने सेक्सकडे पाहतात.’ (कामव्यवहारातील इंद्रियसुख हे प्रमुख आणि आपल्या बीजाच्या बालकाचा जन्म हा बायप्रॉडक्ट. असे मांडणारा श्री.दामल्यांचा दृष्टिकोणही भलत्याच रीतीने पाहण्याचाच होय.) भलत्याच रीतीने म्हणजे कसे? लैंगिक अत्याचाराने किंबहुना नुसत्या संबंधाने स्त्री नामोहरम, पराभूत होते आणि ज्या गटातील ती स्त्री असते त्या गटालाही पराभूत केल्याचा आनंद अत्याचाराला मिळतो, या गोष्टीचा श्री दामले

उल्लेख करीत असावेत. असे असेल तर या म्हणण्यात जरूर तथ्य आहे. पण ही ‘सत्तेतील’ मंडळी याबाबतीत वेगळी काढण्याचा प्रयत्न मात्र योग्य नाही. प्रत्येक स्त्री-पुरुषाला आपापल्या हितरक्षणासाठी सत्ताकांक्षा असते. दुसऱ्याला अंकित करण्याची प्रेरणा स्त्री व पुरुष दोघांच्या कामव्यवहारात दिसते.

विधान : त्या (सत्तेमधील मंडळी)चे काहीतरी करायला पाहिजे म्हणून या धर्मवादाचा लोकांनी काम ही विकृती, काम म्हणजे वासना, काम म्हणजे शत्रू असे ठरवून टाकले.... सत्ताधारी लोकांसाठी ते सर्वांसाठी.... मानल्याने घोटाळा झाला.

सत्ताधारी व सामान्य यांच्यामध्ये कामप्रेरणेचे स्वरूप आणि प्रबळता या दृष्टीने गुणात्मक फरक नाही. या प्रबळतेमुळे तिला वासना हेच नाव योग्य ठरते. चूक ‘धर्मवाल्या’ ची अशी होते की वासनेचे नियंत्रण करण्याचा एकमेव मार्ग त्यांना दिसतो तो म्हणजे तिला ‘निखालसपणे दडपणे’. कामप्रेरणा मूलभूत महत्त्वाची प्रेरणा असल्याने मुळातच तिचा जोर अधिक असतो. भौतिक परिस्थितीमुळे आणि नीतिनियमांमुळे ती दडपली गेली की ती बेफाम होते. ‘धर्मवाले’ समाजनियंत्रणाची जबाबदारी स्वतःकडे घेतात. बेफाम कामवासना समाज आणि व्यक्ती यांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने मोठी समस्या बनण्याचा धोका लक्षात घेऊन ‘धर्मवाले’  युद्धपातळीवर तिचा मुकाबला करतात. आणि कामप्रेरणा अधिकच विकृत रूपे धारण करू लागते.

मानसशास्त्राने त्यावर जो तोडगा सांगितला आहे तो ‘दडपणे’ टाळण्याचा. मनुष्याने काम प्रेरणांसहित आपल्या सर्वच स्वाभाविक प्रबळ प्रेरणांचा, वासनांचा, भावनांचा यथायोग्य आणि विधायक उपयोग करण्यासाठी त्यांचे व्यवस्थापन करायला शिकावे. निर्दालन करण्याचा प्रयत्न करू नये. कामवासनेचा किंबहुना कोणत्याच वासनेचा- प्रेरणाचा मुक्त आविष्कार होऊ शकत नाही. एकाच वेळी एकाच माणसाला अनेक उद्देश साध्य करायचे असतात... स्वतंत्र माणूस ‘स्व’ तंत्राने वागतो, कोणत्या तरी एका प्रेरणेच्या तंत्राने नव्हे.

फायरच्या निमित्ताने समलिंगी संबंधाची व एकंदरच कामव्यवहाराची शास्त्रशुद्ध माहिती लेखक, वाचक आणि कार्यकर्त्यांनी करून घ्यावी असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.

प्रभा श्रीनिवास, मुंबई

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके