डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पुण्याच्या स.प.महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि वारकरी सोनोपंत दांडेकर यांची आठवण आजही वारीच्या निमित्ताने काढली जाते. स्वत:च्या पदाची, ज्ञातीची झूल उतरवून ते वारकऱ्यांच्या मांदियाळीत झोकून देत असत. तेच काय पण त्यांच्यासारखे कितीतरी 'ब्राह्मण' वारीकडे अक्षरश: ओढले जातात, त्यात कसलाही किंतु नसतो. ना उच्चवर्णाचा, ना पदाचा. पंढरपूरच्या विठोबासमोर उपोषण करणारे साने गुरुजी आणि रत्नागिरीत पतित पावन मंदिर स्थापणारे सावरकर याच परंपरेचे पाईक होत.

श्रेयस-प्रेयसाचे महत्त्व वस्तुनिष्ठ भूमिकेतून...

'संतांनी काय शिकवले? आपण काय शिकलो?' हे २८ जून आणि १२ जुलैच्या अंकातील लेख वाचले. आजच्या सामाजिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर संतविचारातील शाश्वततेचे मर्म अभय टिळक यांनी यथार्थपणे विशद केले आहे. हे दोन्ही लेख समाजातील सर्व घटकांच्या विचारांना चालना देणारे आणि त्यांना अंतर्मुख करणारे आहेत. 

निरिश्वरवादी विज्ञाननिष्ठ, व बुद्धिप्रामाण्यवादी वैचारिक भूमिका समाजाच्या दृष्टीने निश्चितपणे उपयुक्त ठरणारी असली तरी तिचे आवाहन जनसामान्यांपर्यंत नीटसे पोहोचत नाही. अशावेळी ज्याची नाळ परंपरेशी विशेषतः संतपरंपरेशी जोडली गेली आहे, अशा समाजाला परंपरेतील श्रेयस-प्रेयसाचे महत्त्व वस्तुनिष्ठ भूमिकेतून समजावून देणे आवश्यक असते. उपरोक्त लेखातून ते आले आहे. याच प्रकारचे समाज प्रबोधन पर विचार संत कबीर (उ.प्रदेश), श्री बसवेश्वर व अक्क महादेवी (कर्नाटक), वेमन्ना (आंध्र प्रदेश) आदी भारतीय पातळीवरील संतांनीही आपल्या काव्यातून व्यक्त केले आहेत. स्वामी विवेकानंदांच्या विचार आणि कृतींमागेही समाजहिताची तळमळ आहे. नजिकच्या भूतकाळात संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांनी केलेल्या सेवाभागी कार्यामागे संतविचारांचीच प्रेरणा आहे. 

१९ आणि २० व्या शतकातील सामाजिक-राजकीय क्षेत्रात क्रियाशील असलेल्या मान्यवरांच्या कार्यामागेही संतविचारांचे अधिष्ठान होते. मात्र या सर्वांच्या भूमिकेचा आणि त्यांच्या कार्याचा कृतिशीलपणे किती पाठपुरावा समाजाने आजवर केला आहे, हा प्रश्न संवेदनशील लोकांना छळणारा आहे. अभय टिळक यांनी सामाजिक-राजकीय जीवनातील विसंगती विरोधाचा निर्देश केला आहे. स्वतंत्रपणे चर्चा करण्याजोगा तो व्यापक विषय आहे. संतांच्या विधायक विचारांपासून दुरावलेल्या, संकुचित परंपरावादी विचारांचा स्वीकार करणाऱ्या आणि चंगळवादी जीवनशैलीचा मोह बाळगणाऱ्या समाजघटकांनी थोडे मागे वळून पाहिले तर समाजहितकर असे बरेच काही हाती लागेल, ही वस्तुस्थिती त्या दोन लेखांतून सूचित होते.
वि. शं. चौगुले, सांताक्रूझ, (पश्चिम) मुंबई ४०००५४
---

'आंतरभारती'चे स्वप्न दूर जात आहे! 

साधनाचा ११ जूनचा 'साने गुरुजी स्मृतिदिन विशेषांक वाचून 'आंतरभारती स्वप्न नजिक येण्याऐवजी कित्येक योजने दूर जात आहे, असे माझ्यासारख्या वाचकाला वाटले तर नवल नाही. स्वातंत्र्योत्तर भारत एकजिनसी होण्याच्या प्रगतीपथावरून भाषा, विकास, स्थानिक व बाहेरचे, आहे रे नाही रे, ज्ञातीची घट्ट वीण, आर्थिक विषमता, शैक्षणिक क्षेत्रातील गैरप्रकार या मुद्यांवरून विभाजनाच्या पुच्छप्रगतीकडे तर वाटचाल करीत नाही ना अशी शंका यावयास लागली आहे. 

प्रत्येक लोकसभा मतदारसंघ हा एक स्वतंत्र परगणा बनत चालला आहे. पक्षोपक्षांची युती किंवा आघाडी सत्तेचे लोणी कसे खाता येईल या एकमेव हेतूने आढळत आहे. इंग्रजांच्या मुत्सद्देगिरी बरोबर सरदार, सुभेदार यांच्यामधील भांडणेही पेशवाई लयाला जाण्याची कारणे होती. सांप्रत विविध गट आपला मुद्दा, मत, विचारधारा सर्व समाजाने स्वीकारावी म्हणून संपूर्ण समाजाला वेठीस धरत चालले आहेत व त्यासाठी मानवी हत्या, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान झाले तरी त्याची खंत नाही. त्यांना याचा बिमोड करण्यासाठी पावले न टाकल्यास आर्थिक, राजकीय, सामाजिक, भाषिक अराजकाला सामोरे जावे लागेल. 

सत्तेच्या अभिलाषेपासून दूर असणाऱ्यांनी (विचारवंतांनी) परिस्थितीचे वर्णन करण्यावर न थांबता निदान व उपाय यासंबंधात नि:पक्षपातीपणाने मते मांडण्याची गरज आहे. ११ जूनच्या अंकातील वर्णनात्मक माहिती परिस्थितीवरचे निदान व उपाय यांवर भाष्य करण्यात अपुरी ठरली असे मला वाटते. आर्थिक विषमता वाढत आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची सत्ता बळकट होत आहे, कायदा मोडण्याकडे प्रवृत्ती बळावत आहे. प्रामाणिकपणे जीवन व्यतीत करणाऱ्यांमध्ये अगतिकता, अनुभवास येत आहे. अशावेळी 'साधना'सारख्या माध्यमांवरची जबाबदारी कसोटीच्या बिंदुवर पोचली आहे. 

तात्यासाहेब केळकरांना लिहिलेल्या एका पत्रात लोकमान्यांनी लिहिले आहे की, 'A Newspaper must be like a good balance- stable and sensitive at the same time.' साधना साप्ताहिकाच्या रचनेवरून व ध्येयवादी दृष्टीवरून समाजाचे योग्य प्रबोधन करण्यात साप्ताहिक कमी पडणार नाही याची खात्री आहे, पण समविचारी मंडळींचे साहाय्य साधनाने मिळवावे असे वाटते.
वि. शं. गोखले, पनवेल ४१०२०६
--
साधनाची पुनर्भेट

गेली दहा-बारा वर्षे हिमाचल प्रदेशच्या गागल जिल्ह्यातल्या खनिज निर्मिती प्रकल्पात मी कार्यरत होतो. दीड महिन्यांपूर्वी बदली होऊन मुंबईत परतलो आणि मला हायसे वाटले. 'साधना'चा मी एक जुना वाचक. परंतु मराठमोळ्या देशापासून शेकडो कोस दूर राहिल्यामुळे माझे मराठी वाचन पूर्णतया खंडित झाले होते. साधनाचे जुने-नवे अंक साधना संकेतस्थळावर सहज वाचायला मिळतात, अशी माहिती मला गडचिरोलीच्या भैरव ताकखाव यांनी दिली होती. परंतु मला त्या संकेत स्थळावर एकदाही साधना अंक पाहता आला नाही. नवे तंत्रज्ञान लीलया आत्मसात करणे 'येरा गबाळ्याचे काम नाही' असा विचार मनात आणून पुढील प्रयत्न करणे मी सोडून दिले. 

मुंबईत परतल्यावर साधना अंकाचे अलीकडचे अंक हाती लागले. अंक चाळताना काही गोष्टी नजरेतून सुटणे शक्य नव्हते. पहिली गोष्ट म्हणजे साधनाने साठ वर्षांची वाटचाल करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. मुखपृष्ठावर कृष्णधवल छायाचित्रांच्या रूपात अवतरलेले लोकजीवन आणि काही अंकांच्या मुखपृष्ठावरील विख्यात चित्रकार पुरंदरेंच्या बहारदार कलाकृती माझ्या नजरेतून सुटल्या नाहीत. साधनाचे नवीन अंतरंग व बाह्यरूप पाहताना माझ्या डोळ्यावर माझा विश्वास बसत नव्हता. साधनाची वाढलेली वार्षिक वर्गणी ही गोष्ट कोणाच्याही नजरेतून सुटण्यासारखी नाही. महागाई वाढली म्हणून ही वर्गणीवाढ समर्थनीय वाटली तरी वाचकांना अंक वेळेवर पोहोचवण्याची जबाबदारी (मुळात सभासद नसलेल्या) टपाल खात्यावर टाकणे समर्थनीय वाटत नाही.

काही कामानिमित्त प्रवास करताना प्रभादेवी ते माहीम दरम्यान, रचना संसद कला संस्थेतील काही विद्यार्थी-विद्यार्थिनी माझ्यासह बसमधून प्रवास करीत होते. सांगण्याची खास गोष्ट म्हणजे त्यांच्या हातात पुरंदरे यांची चित्रे असलेला साधना अंक होता. आणि त्या चित्रांचे रसग्रहण चालू होते. मी हे दृश्य पाहून काहीसा अवाक् झालो. कला, साहित्य यांवर मी काय बोलणार? परंतु नव्या पिढीच्या हाती साधना अंक मी याचि डोळा पहात होतो!

इतर अंक पहात असता मला अनेक दर्जेदार लेखकांची नावे दिसली. डॉ. विठ्ठल प्रभू यांचा लैंगिकतेवरील लेख अत्यंत अभ्यसनीय वाटला. दर पंधरवड्याला लैंगिकतेवर एक पान साधनात असावे मला वाटते. सर्वच लेख दर्जेदार आणि तोलाचे लेखक असतील तर संपादकास तारेवरील कसरत करावी लागते. साधना संपादक महाशयांना ती नक्की करावी लागते हे नि:संशय. परंतु साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधनामध्ये 'बालसाधना' नियमितपणे-अनियमितपणे येते त्याचा आपल्याला खरोखर संतोष आहे का? काही दिवसांपूर्वी यशवंत क्षीरसागर यांच्या पत्ररूपी हृद्य आठवणीने असंख्य वाचकांना भरभरून आले असेल. त्या दृष्टीने साने गुरुजींच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणाऱ्या भाग्यवंतांना गुरुजींच्या आठवणी लिहिण्याचे सुचवले तर ते अबालवृद्धांना वाचनीय वाटेल. 

प्रधानसरांची सिद्धहस्त लेखणी अधूनमधून प्रसिद्ध न होता सातत्याने झाली पाहिजे. अवधूतजींचे लेखन आजही मनात रुंजी घालते. माझ्या मताशी इतर वाचक कदाचित सहमत असतीलही. डॉ. राहुल रेवले यांचे समाजवादावरील सुस्पष्ट विचार साधनाने प्रांजळपणे प्रसिद्ध करून सुदृढ पायंडा पाडला. त्यांच्या लेखावर दादा हासबनीस यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया 'आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी' या प्रकारातील वाटली. 
अंबिकाचरण विरुकोंडा, मुंबई 
--
'वारी'चे वेगळेपण

२८ जूनचा 'साधना' अंक खूपच आवडला. 'वारी' वर आजवर विपुल लेखन झाले आहे, परंतु केवळ छायाचित्रांच्या माध्यमातून घेतलेला वारीचा वेध अवर्णनीयच. संदेश भंडारे यांची 'चालती बोलती' छायाचित्रे तांत्रिकदृष्ट्या अतिशय निर्दोष झाली आहेत. 

त्यांनी स्वत: वारी करून आलेले अनुभव शब्दबद्ध केले आहेत. ते वस्तुनिष्ठ व वास्तववादी चित्रण आहे. त्यात 'म.फुले यांना ब्राह्मण संतांविषयी शंका वाटत होती' असे विधान केले आहे, परंतु याबाबत स्वत: म.फुल्यांच्या एखाद्या अवतरणाचा अथवा विधानाचा संदर्भ मात्र दिलेला नाही. वास्तविक पाहता महाराष्ट्राच्या समाजसुधारणेच्या इतिहासात वारकरी सांप्रदायातील संतांचे सर्वाधिक योगदान आढळते. संस्कृतातील तत्त्वज्ञान प्राकृतात आणण्याचे ज्ञानदेवांचे मूलभूत कार्य असो किंवा समाजव्यवस्थेतील त्रुटींवर कडक शब्दांत प्रहार करून भारुडे, गवळणी इत्यादी लोकभाषेतल्या रचना करणारे एकनाथ असोत. सामाजिक समरसतेची ही अधिष्ठानेच होत. समाजाच्या कर्मठपणाचा जाच 'ब्राह्मण' ज्ञानेश्वरांनीही त्यांच्या बालपणी भोगलेलाच होता. पण पसायदानाची रचना करताना ज्ञानदेवांनी जो जे वांच्छील तो ते लाहो । प्राणिजात! असे म्हटले. 'ब्राह्मणजात' नव्हे. 

पुण्याच्या स.प.महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि वारकरी सोनोपंत दांडेकर यांची आठवण आजही वारीच्या निमित्ताने काढली जाते. स्वत:च्या पदाची, ज्ञातीची झूल उतरवून ते वारकऱ्यांच्या मांदियाळीत झोकून देत असत. तेच काय पण त्यांच्यासारखे कितीतरी 'ब्राह्मण' वारीकडे अक्षरश: ओढले जातात, त्यात कसलाही किंतु नसतो. ना उच्चवर्णाचा, ना पदाचा. पंढरपूरच्या विठोबासमोर उपोषण करणारे साने गुरुजी आणि रत्नागिरीत पतित पावन मंदिर स्थापणारे सावरकर याच परंपरेचे पाईक होत.

संतांनी आपापल्या कुवतीप्रमाणे समाजाला सांगायचा प्रयत्न केला, परंतु समाजाने आपल्यात बदल घडवून नाही आणला तर संतांचे मूल्यमापन करून उपयोग काय? परंतु भूतकाळात काय, किंवा भविष्यकाळात काय ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे ब्राह्मणसहित बहुजन समाजाला 'माऊली' व 'जगद्गुरु असतील यात शंका नाही.
अमेय रानडे, मुंबई .
--
नको : अवास्तव प्रसिद्धी, बौद्धिक पाजणे 

२६ जुलैच्या साधना अंकातील अशोक राजवाडे आणि संतोष खेडलेकर यांचे लेख वाचले. या अंकातील इतर लेख अतिशय अभ्यासनीय आहेत. परंतु वरील लेखकांचे साहित्य दर्जेदार नाही. कुठे तरी लॅटिन अमेरिका व तेथील वाहणारे लिबरेशन थिऑलॉजीचे वारे? साठीच्या दशकात होऊन गेलेल्या व जागतिक इतिहासातील या क्षुल्लक घटनांना अवास्तव प्रसिद्धी राजवाडे कशासाठी देतात?

अमरनाथ यात्रा आणि पंढरपूरची वारी यांची स्वत:ला पटत नसूनही संतोष खेडलेकर यांनी केलेली तुलना म्हणजे प्रवासवर्णनाच्या निमित्ताने बौद्धिक पाजण्याचा प्रयत्न आहे. आज कित्येक वर्षे पंढरपूरची वारी वर्षातून दोन वेळा पार पाडली जाते. खेडलेकर यांनी म्हटल्याप्रमाणे शेतीची नासधूस, गावात घाण झाली असली तर त्याबद्दल कुठेही वाचनात आलेले नाही. असे वाईट प्रकार खेडलेकर यांच्या वारीत घडले असल्यास त्यांनी त्याबद्दल कोणती जबाबदारी उचलली आहे?
विनोद जमदाडे, दादर, (प.) मुंबई २८

तत्परतेने दखल

२१ व २२ जुलै रोजी संपन्न झालेल्या लोकसभेच्या विशेष अधिवशनातील केंद्र सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेला उत्तर देणारे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे श्री.विनोद शिरसाठ यांनी अनुवादित केलेले भाषण साधनाने २ ऑगस्टच्या अंकात छापून तमाम मराठी भाषकांच्या मतांची कदर केली आहे. मुख्य म्हणजे जे कारण दाखवून सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला, त्याबाबत सरकारची बाजू मांडणारे भाषण (विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे) पंतप्रधानांना करता आले नव्हते. शिवाय दुसऱ्या दिवशी मोजक्याच इंग्रजी दैनिकांनी ते छापले. त्यामुळे सामान्यांपासून-असामान्यांपर्यंत सारेच मराठीजन एका महत्त्वपूर्ण आणि देशाच्या एकूण प्रगतीचा आलेख मांडणाऱ्या या भाषणास मुकले होते. आपण तत्परतेने याची दखल घेतली, त्याबद्दल धन्यवाद.
शंभू भाऊ बांदेकर, साळगाव, गोवा.
---------
'व्यासपीठ' व 'तळटीप' आवडते

'साधना' साप्ताहिक सातत्याने संपूर्ण वाचले जाते. प्रतिक्रिया लिहिणे होत नाही हे खरे, पण अंक उत्तम असतात. 'व्यासपीठ'मध्ये आलेले अच्युत गोडबोले व अभिजित वैद्य यांचे लेख फार आवडले. त्यांच्या विचाराला आचाराचे बळ आहे. 'आरोग्य सेना'च्या माध्यमातून ते करीत असलेले कार्य मोलाचे तर आहेच, पण आशा वाटावी असे व्हिजन-स्वप्न त्यांचेकडे आहे. अशी स्वप्ने असलेले तेजाचे ठिपके समाजामध्ये भरपूर आहेत. (उदा. अभय बंग, राणी बंग, श्री व सौ.मंदा आमटे असे कितीतरी...) परंतु हे सर्व ठिपके छान जोडून त्याची रांगोळी होत नाही, ती व्हावी असे वाटते. अभिजित वैद्य यांचे लेख तरुणांपर्यंत पोहोचवायला हवेत. 'साधना' फार मोठे वैचारिक व्यासपीठ आहे, याचा आनंद व अभिमान आहेच. पण आता विचार थेट आचारात परावर्तीत होण्यासाठी काय करता येईल याचाच विचार व्हावा. आसाराम लोमटे 'तळटीप'मध्ये ग्रामीण माणसांची दुःखे, कष्ट, प्रश्न प्रभावी पद्धतीने मांडीत आहेत. त्यांचे लेखन उत्तम व शैलीदार आहे.
लीला दीक्षित, कोथरूड, पुणे २९.
--
पंतप्रधानांचे भाषण

२ ऑगस्टच्या अंकात विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेला उत्तर देणारे पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांचे भाषण संपूर्णपणे वाचकांना सादर केल्याबद्दल धन्यवाद. आमच्या लोकशाहीचे दुर्दैव असे की, देशाच्या सर्वोच्च सभागृहात सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेला उत्तर देणारे देशाच्या पंतप्रधानांचे भाषणच करंट्या व दळभद्री विरोधी पक्षांनी होऊ दिले नाही. दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात त्या भाषणातील त्रोटक भागच देशवासीयांना वाचावयास मिळाला. (काही दैनिकांनी नंतर त्याचा गोषवारा छापला, परंतु सविस्तर नाही). 

पंतप्रधानांनी त्या भाषणात अडवाणी यांनी केलेल्या टीकेला दिलेले उत्तर, तेलाच्या किंमतीत प्रचंड भाववाढ झाल्याने निर्माण झालेली चलनवाढ व महागाईसंदर्भात दिलेले उत्तर, रोजगार कार्यक्रम, सर्वशिक्षा अभियान, पायाभूत सुविधांसाठीचा भारत निर्माण कार्यक्रम या संदर्भातील केलेले विवेचन, उच्च शिक्षणासाठी उभारलेली नवी विद्यापीठे, महाविद्यालये याविषयी दिलेली माहिती, तसेच अणुकरारामुळे देशाच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाला बाधा येणार नाही हे ठाम निवेदन आणि जनतेला माहीतही नसलेले अणुकराराचे फायदे सविस्तरपणे नमूद केले आहेत.

त्यात जगातील विविध देशांबरोबरच्या भारताच्या संबंधाचीही विस्तृतपणे चर्चा केली आहे. डाव्या पक्षांनी कठोर टीका केली तरीही त्यांनी ज्योती बसू व सुरजित यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांच्या भाषणातील शेवटचा परिच्छेद वाचताना हे जाणवते की हे देशाला लाभलेले 'मनमोहक सज्जनसिंग' आहेत. पुनश्च एकदा पंतप्रधानांचे सविस्तर भाषण साधनेत छापल्याबद्दल संपादकांचे अभिनंदन! 
फुलचंद सांकला, कोथरूड, पुणे २९
--
जाहीर वाचन

या वर्षातील साधनाचे अंक (विशेषांकासह) आम्हा भोपाळवासीयांना अत्यंत वाचनीय वाटले. साधनाच्या मुखपृष्ठावरील छायाचित्रे साधनाची शान वाढवतात, परंतु 'साधनात महिला लेखिका दिसत नाहीत' असे आमच्या मंडळातील सभासद शिला मुद्गल यांचे मत आहे. आपल्याला कळविण्यास संतोष वाटतो की डॉ.प्रकाश जोशी यांची 'गणित म्हणजे काय रे काका?' ही बालसाधनातील लेखमाला येथील विद्यार्थ्यांना आवडते. 

दर पंधरवड्यातून एक दिवस, म्हणजे रविवारी आमच्या महाराणा प्रताप चौकात साधना अंकातील साहित्याचे जाहीर वाचन केले जाते. गेल्या महिन्यात झालेल्या साधना वाचन कार्यक्रमात य.ब. क्षीरसागर यांनी साने गुरुजींना लिहिलेले पत्र वाचून दाखवण्यात आले. क्षीरसागर यांचे एक नजिकचे दोस्त भाई देशमाने त्या पत्रवाचनाने खूप भारावले. हेमंत देसाई यांच्या 'सज्जनसिंग' या लेखाचे जाहीर वाचन व्हावे
असे आवाहन साधनात एका पत्रलेखकाने केले आहे. कळविण्यास आनंद वाटतो की 'सज्जनसिंग' हा लेख आमच्या मंडळाच्या सौ.गीता सबरवाल यांनी न अडखळता वाचून दाखवला व श्रोत्यांनी टाळ्यांचा मोठा गरज केला. 
दामोदर भानुशाली, महाराणा प्रताप चौक, भोपाळ ११.
----
विचार करा, उत्तर द्या!

साधना साप्ताहिकाच्या एकंदरीत स्वरूपाबद्दल हे एक पत्र. आपण प्रचलित घटनांचे विश्लेषण करीत असता, परंतु आज धावत्या व वेगाने पळणाऱ्या घडामोडींशी जुळवून घेणे आपल्याला जमतेच असे नाही. त्यात आपण विशेषांक काढता, मग एक आठवडा रजा घेता. याच काळात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना आपल्या अंकातून निसटतात, याचे काय? 

मध्यंतरी ११ जून विशेषांक आला, त्यानंतरचा अंक २८ जूनला मिळाला. त्या विशेषांकाने एक अभ्यास सादर केला. परंतु केतकर यांच्या घरावर नव्हे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर हल्ला ही महत्त्वाची घटना व टीपणी त्यावरील साधनात दिसलीच नाही. आता पुन्हा १५ ऑगस्टचा विशेषांक येत आहे, मग पुन्हा दिवाळी सुट्टी!!!

संपादक महोदय, शिवाय पोस्टाच्या मेहेरबानीमुळे साधना शिळा अंक आम्ही किती दिवस वाचावा? विचार करा आणि उत्तर द्या. 
गजानन साळुंके, गिरगाव, मुंबई ४.
---
पुन्हा एकदा आठवण...

साधना साप्ताहिकाच्या ३२ पानांच्या मर्यादा वाचकांना समजण्यासारख्या आहेत. पण साधना हे केवळ विचारवंत व साहित्यिक वर्गात वाचले जात नसून छोटे व्यावसायिक, शेतकरी, कामगार वर्ग साधनांचे वाचक आहेत. त्यामुळे साधनात प्रसिद्ध होणाऱ्या साहित्याविषयी बोलायचे झाल्यास ते सर्वसामान्यांच्या आवाक्यातील असावे असे वाटते. 

अमेरिका, आखाती देश येथील घडामोडींवर व राजकारणावर साधनातील खूप जागा व्यापली जाते असे वाटते, नव्हे हे सत्य आहे. जागतिक स्तरावरील बातम्या त्रोटकपणे द्याव्यात, कारण या बातम्या वृत्तपत्रातून, नियतकालिकातून वाचकांना वाचायला मिळत असतात. वृत्तपत्रात न आलेले साहित्य व माहिती साधनातून दिली जाते, या साधना संपादकांनी दिलेल्या ग्वाहीची पुन्हा एकदा आठवण करून द्यावीशी वाटते म्हणून हे पत्र.
अर्जुन घोडेस्वार, स्नेहनगर, परळी वैजनाथ १५.
---
तमे केम छो यशवंत!

काही दिवसांपूर्वी मुंबईला गेलो असताना मला यशवंत क्षीरसागर यांनी 'साधना'त साने गुरुजींना लिहिलेले पत्र वाचायला मिळाले. या पत्रामुळे साने गुरुजी यांच्या आठवणी दाटून आल्या आणि आमचा जुना साथी यशवंत याचीही पुनर्भेट झाली. मी सध्या ८३ वर्षीय असून माझे बालपण व तारुण्य मुंबईच्या परळ भागात गेले. यशवंतापेक्षा मी मोठा असलो तरी माझ्यासह इतरांना तो एखाद्या नेत्याप्रमाणे वाटे. वर्णाने सावळा, अंगाने बारीक असा यशवंत कोणतेही काम नाकारत नसे. दर आठवड्याला बुधवारी गुरुवारी तो आम्हाला दिसायचा नाही. तो साधना अंकाच्या घड्या करण्यास सात-रस्त्याला जातो असे नंतर कळले. 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' हे गुरुजींचे गीत जेव्हा यशवंत गात असे, तेव्हा ते ऐकणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रुंची धार लागे. ती आठवण आजही ताजी वाटते.
मोहनदास मेहता, भावनगर, गुजरात
-----
गोरेगावचा लेखक हे कसे विसरतो?

१५ जुलैच्या 'साधना' अंकातील रमेश पाध्ये यांचा 'किरकोळ विक्री'च्या व्यवसायाविषयी लेख वाचला. लेखकाने या व्यवसायात बड्या उद्योगपतींच्या पदार्पणाचे आलेल्या सावटाचे वर्णन केले आहे. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठ ई.चौपाल या पर्यायी व्यवस्थेचा अभ्यास करण्यात आल्याची माहिती देऊन या पद्धतीचे लाभ सांगितले आहेत. मुंबई पुण्यासारख्या वाढत्या लोकसंख्येच्या महानगरात तर मॉल्सचे पेव फुटले आहे. लेखकाने ही सारी परिस्थिती मांडून सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

परंतु या क्षेत्रातील सहकारी संस्थांचे काय? लेखकाने कुठेही त्याचा उल्लेख केला नाही हे खटकले. मुंबईत एके काळी आघाडीवर असलेली 'मुंबई कामगार' ही संस्था आज मात्र डबघाईला आली आहे. त्यांच्या दुकानात गेल्यावर रिकामे रॅक्स आणि ठराविक ब्रॅंड्स पाहून त्यांचे एकेकाळचे दिवस आठवतात. नानासाहेब गोरे-एसेम यांच्या आशीर्वादाने कामगार वस्तीतील काही समाजवादी लोकांनी ही संस्था कष्टाने वाढवली, साठ वर्षे होता होता संस्था थकली! मध्यंतरी तर मुंबई कामगारच्या संचालकांनी त्यांची वाशी व नायगाव येथील जागा विकण्याचा निर्वाणीचा घाट घातला होता. तो जागरूक भागधारकांनी उधळून लावला. 

मॉल्स जे काही उपलब्ध करून देत आहेत, ते अपना बाजारला जमू नये याचे कारण त्यांना नव्या युगाशी, स्पर्धेशी झुंजायची इच्छाच नसावी. किराणा मालापुढे ते जातच नाहीत, असे माझे गेल्या २०/२५ वर्षांचे निरीक्षण आहे. संचालक मंडळे बदलूनही त्यांचे रडगाणे कायम आहे. पण हे सारे रमेश पाध्ये यांना दिसले नाही याचे आश्चर्य वाटते. किरकोळ विक्री व्यवसायावर लिहिताना मुंबईचा गोरेगाव येथे राहणारा लेखक (रमेश पाध्ये) अपना बाजारला कसा काय विसरतो? त्यांनी या संबंधित आपले विचार मांडावे. अपना बाजारवाल्यांना स्पष्ट शब्दांत मार्गदर्शन करावे. आज ती गरज आहे. गेली सात-आठ वर्षे भागधारकांना डिव्हिडंड न देणाऱ्या या सहकारी संस्थेकडे ती समाजवाद्यांनी चालवली म्हणून 'साधना' ने दुर्लक्ष करू नये. साधनात हेही आले पाहिजे.
विनायक देशपांडे, गोरेगाव (पूर्व), मुंबई ६३.
 

Tags: डॉ.मनमोहनसिंग आंतरभारती साने गुरुजी साधना Dr. Manmohan Singhसंत Antarbharati Sane Guruji Sadhana Saint weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके