डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दरवर्षी सोमनाथ येथे श्रमसंस्कार शिबीर खास तरुणांसाठी आयोजित केले जाते आणि शेकडो तरुण आवर्जून या शिबिराला हजेरी लावतात. ‘वेदनेशी नाते जोडून संवेदनशील व्हा आणि देशाचा कणा ताठ ठेवा' असा संदेश देणाऱ्या शिबिराचा हा वृत्तांत.
 

युवक-युवतींनी स्वतःवर श्रमाचे संस्कार करून घेतले पाहिजेत, श्रमाचे महत्त्व जाणले पाहिजे, याकरिता सोमनाथला श्रमसंस्काराचा प्रकल्प राबविण्यात येतो. त्या शिबिरात श्रमसंस्कारांचा अनोखा आनंद आम्हांला अनुभवायला मिळाला. सोमनाथला जाण्यापूर्वी आम्ही आनंदवनला गेलो. आनंदवनात जाताच डॉ. भारती आमटे यांनी आमचे स्वागत केले व सर्वांशी परिचय करून घेतला. संपूर्ण आनंदवनाची माहिती दिली. 

आनंदवनमध्ये एकूण साडेपाचशे एकर शेतजमीन आहे. बहुतेक शेतजमीन ठेक्याने दिली आहे. शेतकरी सगळे आनंदवनवासीच. रोगमुक्त झालेले, स्वतःचा घरसंसार थाटलेले कुष्ठरोगी, जमिनीचे छोटे छोटे तुकडे ठेक्याने घेऊन शेती करतात. मोठमोठ्या वसाहती, शेती, वर्कशॉप, शाळा, बैंका इत्यादींनी सुसज्ज असलेलं हे आनंदवन. प्रत्येक विभागाला आनंदवनात नावे होती. उदा. उत्तरायण, मुक्तांगण, संधिनिकेतन. 

संधिनिकेतनमध्ये संवाद साधत असताना कुष्ठरोगी हे आम्हांला जवळून विचारपूस करायचे. ‘बाबांनी आमच्यासाठी काय नाही केलं? घरच्या मुलांनी, पोरींनी सोडले आणि आम्हांला या बाबानं आसरा दिला.' हे ऐकत असताना मनाला एक विचार चाटून गेला, “अरे आनंदवन म्हणजे प्रेमाचं राज्य. चार संशोधकांनी, चार बुद्धिवाद्यांनी उभारलेली ही चकाचक संस्था नव्हे. सरकारी ग्रँट मिळणारी सत्ताधीशांची प्रॉपर्टी नव्हे. हे तर प्रेमाखातर, मायेखातर एकत्र आलेल्या लोकांनी बांधलेले घर ! समाजानं वाळीत टाकलेल्या लोकांच्या स्वप्नाचं गाव."

एकंदरीत फक्त मीठ आणि रॉकेल सोडलं तर सगळ्या बाबतीत आनंदवन स्वयंपूर्ण आहे. आनंदवनामधील प्रत्येक गोष्टीवर ‘मेड इन आनंदवन' असा शिक्का पाहायला मिळतो. आनंदवनमध्ये त्यांनीच बांधलेल्या अंध-अपंग विद्यार्थ्यांसाठीसुद्धा शाळा आहेत. सुट्टीत या विद्यार्थ्यांना येथेच व्यवसाय-शिक्षण दिलं जातं. आनंदवनचं पहिल्यापासून एक तत्त्व आहे. इथे लोकांना बाहेर जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. इथे माणसांना बांधून ठेवले जात नाही; त्यांना उडण्याचं बळ दिलं जातं. आत्मसन्मान दिला जातो. आज बरे झालेले अनेक कुष्ठरोगी आपापल्या गावांमधून आपला व्यवसाय चालवीत आहेत. ही माणसंच आनंदवनची खरी कमाई ! 

आनंदवन ते सोमनाथ हा दोन अडीच तासांचा प्रवास. सोमनाथ प्रकल्प एकंदरीतच अवाढव्य ! सोमनाथमध्ये एकूण तेराशे एकर जमीन आहे. प्रकल्प सुरू झाला तेव्हा 85 कुष्ठरोग्यांचं पुनर्वसन येथे करण्यात आले. आज एक मोठी वसाहत त्यांची तिथे आहे. 

अडीच हजार शिबिरार्थीच्या जेवण-खाणं, आंघोळी, अशा गरजा भागवल्या जातील, एवढ्या प्रचंड प्रमाणात सोयी तिथं आहेत. तीस वर्षांच्या अनुभवानं एक प्रचंड पण कार्यक्षम यंत्रणाच येथे उभी राहिली आहे. या शिबिरात महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून 600 युवक युवतींचा समूह शिबिरासाठी आला होता. 

‘घनश्याम सुंदरा...' या मंगल भूपाळीने दिवसारंभ व्हायचा. मग लगेच शिबिराचे संयोजक श्री. माधव बावगे सर ‘जोडो भारत' गीत घेत व नंतर श्रमसंस्कारांसाठी काही सूचना देत. श्रमसंस्कार प्रचंड उत्साहात व्हायचे. दुपारच्या बौद्धिक सत्राच्या अगोदर गटचर्चा व्हायची. फलज्योतिष शिक्षणात असावं की नसावं ? स्त्री-पुरुष समानता, युवकांपुढील आव्हाने, एन्रॉन, तंत्रज्ञानाचा उपयोग हे किंवा अशासारखे विषय असत. या गटचर्चेचं संपूर्ण संयोजकाचं काम डॉ. सुनीती धारवाडकर यांनी पाहिलं. 

बौद्धिक सत्रात विविध विषयांवर व्याख्यानं व्हायची. त्यामध्ये नलिनीताई पंडित यांचे जागतिकीकरण, महाराष्ट्र ‘अंनिस'चे कार्यकर्ते व शिबिराचे संयोजक प्रा. माधव बावगे यांचे ‘अंधश्रद्धे’वर प्रयोग, प्रा. चंद्रकांत देऊळगावकर यांचे ‘साहित्यातून समाजप्रबोधन', डॉ. नंदकिशोर भार्गव यांचे ‘प्राथमिक शिक्षणाची दुरवस्था' या अशा अनेक मोठ्या व्यक्तींची व्याख्यानं आम्हांला ऐकायला मिळाली. 

सुब्बारावजींचे भाषण म्हणजे एक नितांत सुंदर अनुभव होता. सुब्बारावजींची प्रसन्न आणि शांत मूर्ती दिसताच सगळे शिबिरार्थी उत्स्फूर्तपणे उठून उभे राहिले. सुब्बारावजींनी आम्हांला सर्वधर्मप्रार्थना शिकवली. प्रार्थनेआधी सुब्बारावजींनी केलेले विवेचनही सुरेख होतं. ते म्हणाले, “सुमारे शंभर वर्षांपूर्वी विवेकानंदांनी सर्वधर्मसमभावाची कल्पना मांडली. आज शंभर वर्षांनी आपल्याला याच्याही पुढं एक पायरी जायला हवं. सर्वधर्मसमभावाचं तत्त्व आपण अंगीकारायला हवं. आज सर्व धर्म समान आहेत, एवढंच म्हणून भागणार नाही तर सर्व धर्म माझे आहेत, असा दृष्टिकोन बाळगायला हवा. मीच हिंदू, मीच शीख, मीच ख्रिश्चन आणि मीच मुस्लिम.

परमेश्वरापर्यंत जाणाऱ्या साऱ्याच वाटा माझ्या. केवळ एकाच वाटेचं बंधन आता नको. विज्ञान-तंत्रज्ञानात जसे आपण प्रगती करत आहोत, तशीच धर्मक्षेत्रातही आपण प्रगती करायला हवी. आपण पूर्वजांच्या एक पाऊल पुढे जायला हवं. आपल्या विचारांची कक्षा वाढायला हवी.' सुब्बारावजींनी सर्वधर्मप्रार्थना म्हणून दाखवली. सर्व धर्मांच्या प्रार्थनेचा प्रमुख भाग एकत्र करून ही प्रार्थना तयार केली आहे. संध्याकाळच्या त्या शांत वातावरणात सुब्बारावीच्या धीरगंभीर आवाजातील प्रार्थनेचा प्रभाव काही वेगळाच होता. प्रार्थना संपल्यानंतर सगळे जण शांत होते. कुणालाच बोलावंसं वाटत नव्हतं. त्या प्रार्थनेमुळे संपूर्ण शिबिराचं रूपच पालटून गेलं. हा परिणाम सुब्बारावजींच्या व्यक्तिमत्त्वाचा, प्रार्थनेचा की एकूणच निर्माण झालेल्या, भारलेल्या वातावरणाचा ते आम्हांला कळलं नाही. पण ती संध्याकाळ सगळ्यांसाठीच वेगळी होती हे मात्र खरं ! 

रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आमच्या औरंगाबाद ग्रुपने ‘बापू, तुमच्या देशात...' ही छोटीशी नाटिका मूकअभिनयाद्वारे सर्वधर्मसमभावावर आधारित सादर केली. टाळ्यांच्या कडकडाटात या आमच्या अभिनयाचं कौतुक प्रेक्षकांनी केलं. 

डॉ. विकास आमटे यांनी दिलेल्या भाषणात ते म्हणाले, “प्लास्टिक हानिकारक आहे, पण जाळले तरीही प्रदूषण होते. म्हणून प्रदूषण वाढविणाऱ्या प्लास्टिकचा पुनर्वापर केला तर टाकाऊ प्लास्टिकमधून आरामदायक गाद्या, उशा, लोड, लेटरपॅड, हातपंखे, विटा तसेच इतरही विविध प्रकारच्या सुंदर वस्तू आनंदवनात तयार केल्या जातात. प्लास्टिक, गाजरगवत व महारोग निर्मूलन हे आनंदवनाने हाती घेतलेले तीन महत्त्वाचे प्रकल्प असून ज्यांना हे कार्य करायचे आहे, त्यांच्याकरिता पथदर्शक प्रात्यक्षिक व सहकार्य देण्याची आनंदवनाची तयारी आहे.' 

शिबिराच्या समारोपप्रसंगी आदरणीय बाबांनी युवकांना आशीर्वादपर संदेश दिला, “माझ्या युवक मित्रांनो, माझे आज वय 87 वर्ष आहे. या जगाचा निरोप घेण्यापूर्वी माझी व्यथा तुमच्यापुढे मांडायची आहे. जगात कुठेही, कुणाही राष्ट्राची मान व पाठीचा कणा ताठ ठेवण्याची किमया तरुण युवाशक्तीच्या श्वसनक्रियेत असते. या जगातल्या युवकांचा आजार जर कोणता असेल तर ती संवेदना हरवून बसण्याचा आहे. संवेदना हरवून बसलेला समाज हीच खरी समस्या आहे. येथे शरीराची संवेदना हरवलेले येतात तर युवक संवेदनशील मन हरवून बसले आहेत. तुम्हांला येथे प्रत्यक्ष वेदनेच्या शेजारी बसून वेदना ही साधना कशी होऊ शकते, याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले. तेव्हा तुम्ही वेदनेशी नातं जोडा. जो वेदनेशी नातं जोडतो तो संवेदनशील होतो." 

बाबांनी शिबिराचं नावही श्रमसंस्कार शिबिर ठेवलं, श्रमदान नव्हे. दान हा शब्द बाबांना आवडत नाही. दान नादान करतं, असं बाबा म्हणतात. 

बाबांनी हा दाखवलेला मार्ग अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आहे. म्हणजेच तिमिरातुनी.... तेजाकडे !
 

Tags: सुब्बारावजी नंदकिशोर भार्गव चंद्रकांत देऊळगावकर माधव बावगे भारती आमटे आनंदवन सोमनाथ Subbaraoji Nandkishor Bhargav Chandrakant Deulgaonkar Madhav Bavage Bharati Amte Anandvan Somnath weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके