डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मेंदू-धुलाईच्या प्रत्येक तंत्राबद्दल या लेखात माहिती सांगितली आहे. ती सांगताना, ‘‘हा लेख वाचून या तंत्राचा आपल्यावर किंवा आपल्या आप्तेष्टांवर वापर होत आहे हे वाचकाच्या लक्षात यावे, असा उद्देश आहे. ही तंत्रे वापरण्यात वाचक वाकबगार व्हावा किंवा त्याला ही तंत्रे वापरण्याची इच्छा व्हावी, असा उद्देश नाही. किंबहुना, वाचकाला या मेंदू-धुलाई तंत्राबद्दल शिसारी यावी, अशीच आमची इच्छा आहे. आत्ताच्या सोशल मीडियाच्या भाषेत सांगायचं तर हा ‘मेंदू धुलाई’ लेख वाचणाऱ्याला तो आपल्या परिघातील लोकांसोबत share  केल्याशिवाय राहवणार नाही. मला तर हा लेख इतका माईलस्टोन वाटतो की या पुस्तकाचे नावच ‘मेंदू धुलाई आणि इतर लेख’ असे द्यावे की काय असे वाटले होते.

आनंद करंदीकर यांनी 2009 ते 2021 या काळात लिहिलेल्या निवडक लेखांचा हा संग्रह- ‘वैचारिक घुसळण’. (पैकी दोन लेख 1983 आणि 1986 मध्ये लिहिलेले आहेत.) या संग्रहातील एकूण 31 लेखांपैकी 27 लेख लोकसत्ता, सकाळ, साधना साप्ताहिक, पुरुष स्पंदन, पुरुष उवाच, स्त्री, मिळून साऱ्याजणी, परिवर्तनाचा वाटसरू, कर्तव्य साधना इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत. उर्वरित चार लेख अप्रकाशित आहेत.

राजकीय, शिक्षण व रोजगार, स्त्री-पुरुष समानता, धर्म चिकित्सा, चळवळी, विंदा, आणि परिशिष्ट अशा सात विभागांत या 31 लेखांचे वर्गीकरण केलेले आहे.  बहुतांश लेख हे शीर्षकाशी प्रामाणिक आहेत आणि आनंद सरांनी प्रत्येकच लेखात मूळ विषयाचा धागा अजिबात सोडलेला नाही.

स्त्री-पुरुष समानतेविषयी सर्वाधिक म्हणजे आठ लेख आहेत. या लेखांमध्ये पुरुषी अहंकार तर नाहीच, पण स्युडो फेमिनिझमही नाही,  किंबहुना फेमिनिझमच्या पुढे जाऊन तटस्थपणे परंतु जिव्हाळ्याने त्यांनी या विषयाकडे बघितले आहे. मासिक पाळी व सेक्स पॉझिटिव्हसारख्या taboo विषयावर त्यांनी बिनधास्त लिहिलेले आहे. असे विषय लोकांमध्ये चर्चेसाठी आणणाऱ्या काही मोजक्या मराठी लेखकांमध्ये आनंद सरांचा उल्लेख यामुळे करावा लागेल. ‘कामसूत्र ते लिपस्टिक अंडर ...’, ‘सेक्स पॅाझिटिव्ह’चा प्रवास’ या लेखात ते लिहितात, ‘‘परस्पर संमतीने शरीरसंबंध याचा ‘सेक्स पॅाझिटिव्ह’मधील अर्थ संभोगाच्या प्रत्येक वेळी संभोगात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो अनुभव हवासा वाटणे असा आहे. ‘लग्न केले आहे तेव्हा संमती गृहीतच आहे’, ‘दुसऱ्यासाठी सोसायची तयारी पाहिजेच’, ‘ओठांवर नाही असले तरी मनात हो आहे’ वगैरे; नसलेल्या संमतीला संमती म्हणणे ‘सेक्स पॅाझिटिव्ह’ चळवळीला मान्य नाही.’’   

सामाजिक चळवळीची दशा आणि दिशा, चळवळी यशस्वी का होतात, का फसतात हे ‘चळवळी’ विभागातील तीन लेख (एखाद्या चळवळीकडे भाबडेपणाने वा हिणकसपणाने अशा) दोन्ही टोकांच्या दृष्टिकोनातून बघणाऱ्या सामान्य जनतेला विचार करायला लावणारे आणि कार्यकर्त्यांना चिंतन करायला लावणारे आहेत. उदा. चळवळीची परीक्षा करण्यासाठी लेखामध्ये पाच निकष स्पष्टीकरणासह सांगितले आहेत. ते पाच निकष म्हणजे- मूल्याधार, ज्ञानाधार, कार्याधार, जनाधार आणि कालाधार.

धर्मचिकित्सेमधील त्यांचे पाचही लेख परखड आहेतच, पण त्यामध्ये द्वेषभावना नाही, टिंगलीचा स्वर नाही. ते लिखाण अभ्यासपूर्ण आहे, त्यामुळे वाचकांतील  कोणत्याही ‘वादी’ला ते दुर्लक्षित करता येणार नाही. ‘हो, मी हिंदू आहे’ या लेखात ते त्यांच्यापुरती स्वतःच्या हिंदू म्हणून असणाऱ्या ओळखीची व्याख्या करतात. ती व्याख्या एकदम वाचणाऱ्याला vague वाटू शकते. पण मला तरी ती हिंदू धर्मासारखीच वाटली. Variety पुरवणारी आणि Open for interpretation - आपल्याला आपली निराळी व्याख्या करायला मदत करणारी. 

शिक्षण आणि रोजगार हे विषय सामाजिक, आर्थिक इत्यादी स्तरांवर महत्त्वाचे, पण अभ्यास आणि भाष्य करायला कठीण. ‘वैचारिक घुसळण’मधील ते चारही लेख वाचकाला या क्षेत्रातील अगदी साध्या-सोप्या पण अलक्षित गोष्टी लक्षात आणून देणारे आहेत. या लेखात आनंदसरांनी काढलेले साधे-सोपे तर्क वाचून वाटतं, अरे! आपण हा विचार का केला नाही?

स्वतःच्या वडिलांविषयी म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी विंदा करंदीकर यांच्याविषयी चार लेख लिहिलेले आहेत. त्या लेखांतून विंदांच्या कौटुंबिक आठवणी वाचताना विंदांशी माणूस म्हणून आणखी थोडा परिचय झाल्यासारखे आणि विंदांच्या अजून थोडे जवळ गेल्यासारखे वाटले. ‘बेडेकर सदन नं. 7 खोली नं 9’ या लेखात ते लिहितात, ‘‘परिसरात ए.पी.सी.च्या गोळ्या वाटण्याचा निश्चय भाऊंनी केला होता. मग भाऊ फक्त बेडेकर सदन, वृंदावन, कृष्णकमलवर गोळ्या वाटून थांबले नाहीत. गजाने मला एका कोपऱ्यात गाठून अगदी हळू आवाजात सांगितले, ‘‘भाऊ, गोळ्या घेऊन मोगल लेन परिसरातील गुंड नारायणदादाच्या अड्ड्यावर गेले होते. नारायणदादांनी त्यांना वाकून नमस्कार करताना मी पहिले. खरे-खोटे देवास ठाऊक. मी भाऊंना कधी विचारले नाही.’’  त्याचबरोबर विंदांच्या काव्याविषयी हे लेख वाचून विंदा पुन्हा वाचावेत, नव्याने त्यांच्या कवितांचे अर्थ लावावेत असेही वाटू लागले. विंदांच्या कवितेतील ‘त्रिपदी संगम’ या लेखात ते म्हणतात, ‘‘सगळे मिळून सगळ्यांसाठी जगण्यामध्ये ‘ब्रह्मानंद’ अशी अद्वैती परंपरेशी नाते सांगणारी काव्यपंक्ती विंदा करंदीकरांसारख्या  भौतिकवादी, मार्क्सवादी कवीलासुद्धा लिहाविशी वाटते...’’

पुस्तकात दोन लेख मुद्दामहून परिशिष्टामध्ये टाकले आहेत. त्यातील एक लेख आहे  गांधींच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक ज्ञान आणि विचारासंबंधी आणि दुसरा लेख आहे सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेविषयी. हे दोन्ही लेख या दोन्ही विषयांवरच्या पॉप्युलर ओपिनिअनला तडे देणारे आहेत. गांधींविषयी लेखाचा समारोप करताना ते लिहितात की, वैज्ञानिक पद्धतीचा समर्थक आणि लोकाभिमुख तंत्रविज्ञान वापराबद्दल आग्रही प्रयोगशील सत्याग्रही हीच विज्ञान आणि तंत्रविज्ञान यांच्या संदर्भात गांधीजींची खरी ओळख आहे. आणि आपल्या या निष्कर्षाचे त्यांनी लेखातून अनेक संदर्भ देऊन समर्थन केले आहे.

सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेविषयी लेखाचा शेवट ते असा करतात की, नीती-अनीतीचा विचार, व्यापक मानवतावादी दृष्टी ही सावरकरांना बहुधा दुबळे करणारी, युद्धात अर्जुनासारखे साशंक करणारी वाटत असावी. पण उलट नीती, विवेक हा आपल्या प्रेरणांना बलवानच करत असतो; मात्र ही नीतिमूल्ये विज्ञानाशी सुसंगत हवीतच. पण विज्ञाननिष्ठेचा उद्घोष करून न-नैतिक शक्तिसंपादनाचे समर्थन करता येत नाही. त्यातून स्वीकारल्या जाणाऱ्या भाबड्या, एकांगी आणि आक्रमक विज्ञाननिष्ठेचे पर्यवसान ‘फॅसिझम’मध्ये होण्याचा मोठा धोका असतो. सावरकरांच्या काळात सावरकरांच्या बाबतीत हा धोका महत्त्वाचा ठरला नाही. कारण राज्य इंग्रजांचे होते. आज मात्र अशा प्रवृत्तीच्या शक्ती-सत्ता संपादन करण्याचा धोका दुर्लक्षिता येण्यासारखा नाही. या लेखात त्यांनी विज्ञाननिष्ठा कशाला म्हणता येईल आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये का व कशी विज्ञाननिष्ठा असली पाहिजे हे सोप्या आणि मुद्देसूद भाषेत सांगितले आहे.

‘लास्ट बट नॉट द लीस्ट’ असे राजकीय विभागातील पाच लेख आहेत. खरे तर पुस्तकाचा पहिला विभाग राजकीय विषयावरील लेखांचा आहे. पण सिनेमातील मुख्य कलाकाराचे नाव शेवटी द्यावे तसे मी त्याविषयी शेवटी लिहीत आहे. यातील चार लेख साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध झालेत. असहिष्णू शासन, माध्यमे, नोटाबंदी, लोकशाही आचार-विचार आणि मेंदू धुलाई या विषयांवर हे पाच लेख आहेत. त्यातील मेंदू धुलाई हा पहिला लेख विशेष महत्त्वाचा आहे. मे 2015 च्या साधनेच्या ‘तिपाई विशेषांका’मध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे. सोप्या भाषेत लिहिणे अवघड असते म्हणतात. मेंदू धुलाईची सोपी, धाडसी आणि अभ्यासपूर्ण भाषा आहे. ब्रेन वॉशिंगची दहा तंत्रे त्यांनी या लेखात सांगितली आहेत. ती म्हणजे, 1. शस्त्रशिक्षण 2. कवायत 3. न्यूनगंड निर्मिती 4. आपपर भाव 5. पुनरावृत्ती 6. विचारबंदी 7. हिंसावृत्ती-संवर्धन 8. ग्रंथप्रामाण्य 9. आजन्म नेतृत्वापुढे शरणागती 10. कुजबुज प्रचार. ते पुढे लिहितात की, काही कुटिल संघटना यांतील दोन-तीनच तंत्रे वापरतात. काही संघटना यांतील बहुतेक सर्वच तंत्रे वापरतात. मेंदू धुलाईच्या प्रत्येक तंत्राबद्दल या लेखात माहिती सांगितली आहे. ती सांगताना, हा लेख वाचून या तंत्राचा आपल्यावर किंवा आपल्या आप्तेष्टांवर वापर होत आहे हे वाचकाच्या लक्षात यावे, असा उद्देश आहे. ही तंत्रे वापरण्यात वाचक वाकबगार व्हावा किंवा त्याला ही तंत्रे वापरण्याची इच्छा व्हावी, असा उद्देश नाही. किंबहुना, वाचकाला या मेंदू धुलाई तंत्राबद्दल शिसारी यावी, अशीच आमची इच्छा आहे. आत्ताच्या सोशल मेडियाच्या भाषेत सांगायचं तर हा ‘मेंदू धुलाई’ लेख वाचणाऱ्याला तो आपल्या परिघातील लोकांसोबत ीहरीश केल्याशिवाय राहवणार नाही. मला तर हा लेख इतका माइलस्टोन वाटतो की या पुस्तकाचे नावच ‘मेंदू धुलाई आणि इतर लेख’ असे द्यावे की काय असे वाटले होते.

एकूणात चिकित्सेचा सूर असूनही आनंद सरांच्या लेखांमध्ये एक सकारात्मकता आहे, लेखांतील संदर्भ आणि आकडेवारीमुळे लेख जड न होता उलट समजायला सोपे झाले आहेत. लेखांचा आशय खोल आणि भाषा सोपी आहे. मेंदू धुलाई, बेरोजगारी, स्त्री-पुरुष समानता मापक निर्देशांक, हिंदू स्त्रियांसाठी सुधारित नागरी कायदा, वर्णधर्मी वाद - विवाद नीती, भगवद्गीतेचा सामाजिक आशय असे किचकट विषय असूनही लेखातील  स्पष्ट, प्रामाणिक आणि मुद्देसूद भाषा शैलीमुळे वाचकाला ते सहज ‘अपीलिंग’ वाटतील.

माझ्या आकलनानुसार कुठल्याही वैचारिक ‘इझम’मध्ये या पुस्तकातील लेख अडकणार नाहीत. ‘वैचारिक घुसळण’मधील लिखाण वास्तवाशी प्रामाणिक आहे. भाबडे नाही, कट्टर नाही, द्वेषाने भरलेले नाही. समजूतदार, अभ्यासू, स्पष्ट, धाडसी आहे. लेखक प्रत्यक्ष आपल्याशी बोलतो आहे, गप्पा मारतो असा भास व्हावा इतके ते सोपे-सहज आहे.

विषय, मुद्दा, अभ्यास, दृष्टिकोन, मांडणी, तर्क, तात्पर्य  या क्रमाने पुस्तकातील सगळेच लेख सहज जातात. फक्त यामध्ये सोल्युशन आणि त्या सोल्युशनची अंमलबजावणी करण्याचा मार्ग यांना तुलनेने कमी जागा मिळाली आहे असे मला वाटले. पण आनंद सरांनी हाताळलेले विषयच इतके गुंतागुंतीचे आहेत की त्यावर ठळक वा ठोस सोल्युशन सांगणं कठीण आहे. परंतु विचार आकाराला येण्यासाठी उपयोगी ठरणारे हे पुस्तक आहे हे नक्की. मग तोडगा आणि त्याचे आचरण स्वाभाविकपणे येत जाईल अशी आशा ठेवायला हरकत नाही. माणसाच्या समस्यांवर, मर्यादांवर बोट ठेवून चिकित्सक, विश्लेषणात्मक लेखन करणाऱ्या लेखकाला आपले लेख लवकरात लवकर irrelevant  ठरावेत असंच वाटत असणार. स्त्री-पुरुष विषमता, वर्णभेद, बेरोजगारी इत्यादी विषय कधीतरी मागे पडतील अशी आशा आपणां सर्वांना आहेच, पण मुळात एखाद्या विषयाकडे/समस्येकडेच पाहायचं कसं? हा दृष्टिकोन हे पुस्तक नक्की देत राहील असं वाटतं.

आनंद करंदीकर यांनी माझ्यासारख्या अननुभवी व्यक्तीला धाडसाने आणि मोठ्या मनाने आपल्या पहिल्या पुस्तकाची प्रस्तावना लिहायला सांगितले असेच म्हणावे लागेल. आनंद सर आणि विनोद सर यांनी दाखवलेल्या विश्वासाला मी किती खरी उतरले कल्पना नाही; परंतु एक वाचक म्हणून मी माझे या पुस्तकाचे आकलन लिहिण्याचा हा प्रयत्न केलेला आहे.

(आनंद करंदीकर यांचे ‘वैचारिक घुसळण’ हे पुस्तक या आठवड्यात साधना प्रकाशनाकडून येत आहे.  त्या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना संक्षिप्त रूपात इथे प्रसिद्ध करीत आहोत.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मृद्‌गंधा दीक्षित
mudra6292@gmail.com

सब एडिटर - कर्तव्य साधना 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके