Diwali_4 ज्ञानपीठ विशेषांकामागील भूमिका
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

ज्ञानपीठ विशेषांकामागील भूमिका

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त सर्व साहित्यिकांची भाषणे वाचली तर लक्षात येते, यातील अनेकांना अखेरच्या काळात म्हणजे त्यांची सर्जनशक्ती क्षीण झाली त्या काळात हा पुरस्कार मिळाल्याने त्या भाषणांत औपचारिकतेचा भाग अधिक आहे; पण तरीही त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांचे व त्यांच्या विचारांच्या गाभ्याचे प्रतिबिंब त्यात स्पष्ट दिसते. या साहित्यिकांना ज्ञानपीठाने दिलेल्या ‘प्रशस्ती’मध्येही अर्धा भाग औपचारिकतेचा असला तरी, त्यात या साहित्यिकांचे नेमके योगदान काय आहे आणि त्यांना पुरस्कार का दिला गेला, हे थोडक्यात पण नेमकेपणाने मांडले आहे.

11 जून हा साने गुरुजींचा स्मृतिदिन आणि 15 ऑगस्ट हा साधना साप्ताहिकाचा वर्धापनदिन. या दोन दिवसांचे औचित्य साधून समाजमनाला भिडणाऱ्या विषयांवरील दोन दर्जेदार विशेषांक प्रकाशित करण्याची परंपरा साधनाने निर्माण केली आहे, वर्धिष्णू ठेवली आहे. या विशेषांकांच्या निमित्ताने, त्या त्या विषयांच्या अनुषंगाने समाजमनात घुसळण व्हावी, चर्चा-मंथन व्हावे अशी आमची अपेक्षा असते आणि विचारांची दिशा निश्चित असेल तर अनेक गोष्टी आपोआप जुळून येतात असा आमचा अनुभव आहे.

साधनाने आपल्या हीरकमहोत्सवाच्या काळातील दोन वर्षांत चार विशेषांक प्रकाशित केले. 2007 मध्ये ‘क्रांतीच्या मार्गावर’ आणि ‘तत्त्वप्रणाली व अंमलबजावणी’ हे दोन विशेषांक प्रकाशित केले. 2008 मध्ये ‘भारतातील प्रादेशिक पक्ष’ आणि ‘भारताचे शेजारी’ हे दोन विशेषांक प्रकाशित केले.

साने गुरुजींनी 1942 च्या चळवळीत भूमिगत असताना ‘क्रांतीच्या मार्गावर’ ही पुस्तिका विद्यार्थी, शेतकरी, कामगार, नोकरदार या वर्गांना चेतविण्यासाठी आणि स्वातंत्र्योत्तर बलशाली भारताचे स्वप्न दाखविण्यासाठी लिहिली होती, ती आम्ही विशेषांकाच्या रूपाने प्रकाशित केली. ‘तत्त्वप्रणाली व अंमलबजावणी’ या विशेषांकात आधुनिक भारत घडविण्याचे ध्येय उराशी बाळगून कार्यरत राहिलेल्या समाजवाद, साम्यवाद, हिंदुत्ववाद, गांधीवाद, फुले-आंबेडकरवाद या विविध विचारप्रणाल्यांचा प्रवास व विकास, कसा व किती झाला याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. भारतातील चार मुख्य राजकीय प्रवाहांशी संबंध नसलेल्या व स्वतंत्रपणे उगम पावलेल्या आणि तरीही राज्याची सत्ता मिळविण्याइतपत प्रभावी ठरलेल्या द्रमुक व अद्रमुक, तेलगु देसम, शिवसेना, बसपा, अकाली दल, झारखंड मुक्ती मोर्चा, आसाम गण परिषद व नॅशनल कॉन्फरन्स या प्रादेशिक पक्षांच्या वाटचालीचा वेध ‘भारतातील प्रादेशिक पक्ष’ या विशेषांकात घेतला. ‘भारताचे शेजारी’ या विशेषांकात अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार श्रीलंका, मालदीव, या शेजारी राष्ट्रांतील अस्वस्थ समाज व अस्थिर राज्यव्यवस्था यांची ओळख करून घेतली.

एका अर्थाने या दोनही वर्षांतील विशेषांक परस्परांना पूरक आणि विचारांची साखळी पुढे घेऊन जाणारे होते; आणि म्हणूनच गेल्या वर्षी आम्ही जाहीर केले होते, ‘1 मे 2009 रोजी महाराष्ट्र राज्य सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्याने, 2009 मधील साधनाचे दोनही विशेषांक महाराष्ट्र राज्याशी संबंधित असतील.’ त्यानुसार आम्ही ‘नागरी महाराष्ट्र’ व ‘ग्रामीण महाराष्ट्र’ असे दोन विषय निश्चित केले होते; पण या विषयांवरील अभ्यासपूर्ण मांडणी करणारे विशेषांक काढण्यासाठी अधिक कालावधी लागेल असे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या समाप्तीच्या वेळी म्हणजे 2010 मध्ये काढण्याचे ठरवले. त्यामुळे 2009 मधील दोन विशेषांक कोणते असावेत याबाबत विचार करत असताना ‘नक्षलवाद’ हा एक विषय निश्चित केला, कारण आज देशातील 650 पैकी जवळपास 150 जिल्ह्यांत नक्षलवादाचे आव्हान कमी-अधिक प्रमाणात उभे ठाकले आहे.

दरम्यान, साधनाशी जोडलेले लेखक चंद्रकांत भोंजाळ हे एक प्रस्ताव घेऊन आले. त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त सर्व साहित्यिकांची पुरस्कार स्वीकारतानाची भाषणे, त्यांना ज्ञानपीठाने दिलेली प्रशस्ती आणि त्यांची ओळख करून देणारे विस्तृत लेख इतका अनुवादित ऐवज समोर ठेवला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ हा ऐवज पुस्तकरूपाने प्रकाशित करणार असले तरी त्याला अवकाश असल्याने, आंतरभारतीशी नाते सांगणारा हा ऐवज साने गुरुजींच्या साधनातून क्रमश: प्रकाशित व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

प्रस्ताव चांगलाच होता, पण तो सर्व ऐवज वर्षभर क्रमश: प्रकाशित करण्यासाठी साधनाच्या प्रत्येक अंकातील सातआठ पाने देता येणे शक्य नव्हते. म्हणून आम्ही एकूण 46 ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिकांपैकी निवडक 14 साहित्यिकांची भाषणे व त्यांचा थोडक्यात परिचय देणारा हा विशेषांक सादर करीत आहोत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने परवानगी दिली आणि आर्थिक मदत केली तर 46 ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिकांविषयीचा तो सर्व ऐवज पुस्तकरूपाने (दोन किंवा तीन खंडात) प्रकाशित करून वाचकांना जास्तीत जास्त सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यास साधना प्रकाशनाला आनंदच वाटेल, कारण ते साने गुरुजींना अभिप्रेत असलेल्या आंतरभारतीचे बहुमूल्य कार्य ठरेल.

ज्ञानपीठ हा भारतीय साहित्यातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार मानला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार मिळायला हवा होता, अशी अनेक नावे सांगता येतील; पण ज्यांना तो मिळाला ते निर्विवाद श्रेष्ठ साहित्यिक आहेत असे आम्हाला वाटते. या साहित्यिकांच्या काही भूमिका, काही विचार सर्वमान्य होणार नाहीत; पण त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले, काही समस्या ऐरणीवर आणल्या किंवा काही प्रश्नांची कोंडी फोडली हे मान्य करावेच लागेल. कोणताही पुरस्कार देण्यामागची मूळ भूमिका हीच असते की त्या साहित्यिकाने मांडलेले विचार व त्याचे कार्य याकडे समाजाचे लक्ष वेधावे, त्यावर चर्चामंथन व्हावे आणि होणाऱ्या घुसळणीतून समाजाचे एक पाऊल पुढे पडावे. त्या दृष्टिकोनातून पाहिले तर ‘राष्ट्रीय गौरव’ अशी ओळख निर्माण व्हावी या हेतूने सुरू केलेला ज्ञानपीठ पुरस्कार आता राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनला आहे. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त सर्व साहित्यिकांची भाषणे वाचली तर लक्षात येते, यातील अनेकांना अखेरच्या काळात म्हणजे त्यांची सर्जनशक्ती क्षीण झाली त्या काळात हा पुरस्कार मिळाल्याने त्या भाषणांत औपचारिकतेचा भाग अधिक आहे; पण तरीही त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांचे व त्यांच्या विचारांच्या गाभ्याचे प्रतिबिंब त्यात स्पष्ट दिसते. या साहित्यिकांना ज्ञानपीठाने दिलेल्या ‘प्रशस्ती’मध्येही अर्धा भाग औपचारिकतेचा असला तरी, त्यात या साहित्यिकांचे नेमके योगदान काय आहे आणि त्यांना पुरस्कार का दिला गेला, हे थोडक्यात पण नेमकेपणाने मांडले आहे.

हा विशेषांक वाचून वाचकांच्या लक्षात येईल भिन्न भाषा, विचार व संस्कृतीतून आलेल्या या सर्व साहित्यिकांचे सामाजिक भान तीव्र होते आणि राष्ट्राच्या एकात्मतेची, सामाजिक न्यायाची व सर्वांगीण विकासाची भूमिका हा त्या सर्वांना जोडणारा धागा आहे. या पार्श्वभूमीवर ‘ज्ञानपीठाचे मानकरी’ हा विशेषांक येत्या 15 ऑगस्टला प्रकाशित होणाऱ्या ‘नक्षलवादाचे आव्हान’ या विषयाला पूरक ठरतोय असे आम्हाला वाटते.

Tags: संपादकीय लेखक साहित्यिक ज्ञानपीठ विशेषांक साने गुरुजी स्मृतिदिन Dhyanpeeth Special Edition 15 August Sadhana anniversary Sane Guriji death anniversary weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात