डिजिटल अर्काईव्ह

श्री शंकरराव देव यांचे स्मारक

यादीत पहिलेच नाव श्री विनोबाजींचे होते! मी आनंदाने कळवले, ‘’आजपर्यंत निधीस हजारोंनी देणग्या मिळाल्या, पण या दानाची सर कोणालाच येणार नाही. मी पावन झाले!’’

दिन मौतके हमारे प्यारों, न भूल जाना।
सूनी पडी कबरपर दिया जलाते जाना॥

ता. 30-12-74 रोजी पहाटेपूर्वी श्री शंकरराव देव विदेह झाले! शरीरात शक्ती असेपर्यंत त्यांनी सतत सेवा केली. पुरुषार्थ केला व पिकलेले पान गळून पडले!! 

त्यांच्या स्मारकाची योजना करण्यासाठी सासवड येथील आश्रमात ता. 4 व 5 एप्रिल 1975 रोजी एक मेळावा घेण्यात आला होता. त्यात त्यांचे अनुयायी, चाहते व स्नेही हजर होते. योजना तयार झाली व ती कार्यन्वित करण्यासाठी एक लाख रुपयांचा निधी गोळा करावा असे ठरले. त्याकरता आवाहन पत्रकाचा मसुदाही तयार झाला. पुढील कार्यवाही आश्रमाच्या विश्वासू मंडळींकडे सोपवण्यात आली.

पुढे ता. 2 जुलै 1975 रोजी स्मारकनिधी समितीची बैठक पुण्यात भरली. आदल्या दिवशी खबर मिळाली की विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री देवकीनंदन नारायण यांना जळगाव येथील त्यांच्या घरीच अटक झाली आहे! जमलेल्या मंडळींनी डॉ. श्रीमती चपलाबाई खाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली काम चालवले व आवाहनपत्रके छापणे, पावती पुस्तके छापून घेणे वगैरे कामे आश्रमाचे दुसरे एक विश्वस्त श्री नेने यांनी पुरी केली. निधी गोळा करण्याचे काम जुलैच्या अखेरच्या आठवड्यात सुरु झाले. श्री मृणालिनीबाई देसाई या चिटणीस नेमल्या गेल्या.

देशात आणीबाणीचा अंमल सुरू झाला होता, तिचा परिणाम म्हणा, किंवा परिस्थिती म्हणा, अथवा कार्यकर्त्यांची मानसिक मर्यादा म्हणा, निधी गोळा करण्यास कार्यकर्ते फारसे मिळू शकले नाहीत. फार थोड्या व्यक्तींनाच भार सहन करावा लागला, पण सतत परिश्रम व चिकाटी आणि श्री शंकररावांची तपश्चर्या यांचा परिणाम म्हणून दात्यांची वाण पडली नाही. निधी गोळा होत गेला. ता. 25-5-76 पर्यंत एकूण 77 हजार गोळा झाले होते. हे प्रत्यक्ष हाती आलेले असून आणखी देणग्या यावयाच्या आहेत.

पहिले 164 रुपयांचे दान वाराणसी येथील साधना केंद्राकडून आले. नंतर गेल्या एप्रिल 1976 महिन्यात असम राज्यातील महिला कार्यकर्त्यांनी (ज्यात कस्तुरबा ट्रस्टच्या भगिनी विशेषत: आहेत) 500 रुपये पाठवले. महाराष्ट्राबाहेरून आलेली ही दाने आहेत. दिल्ली, मुंबई व पुणे येथील गांधी स्मारक निधीच्या कार्यालयाकडून प्रत्येकी हजार प्रमाणे देणग्या आल्या. मुंबई व नागपूर ही शहरे सोडल्यास महाराष्ट्राच्या पंचवीस जिल्ह्यांपैकी पुणे, ठाणे, जळगाव, अहमदनगर, रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती व वर्धा– फक्त आठ जिल्ह्यांतून आतापर्यंत पैसे आले आहेत. सोलापूर व नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून आश्वासने आली आहेत.

हे काम पक्षातीत असल्यामुळे सर्वच पक्षांतून देणग्या आल्या आहेत. मुंबई व पुणे शहरातील उद्योगपतींनीही एक ते अडीच हजारांपर्यंतच्या देणग्या दिल्या. श्री वसंतदादा पाटील यांनी मागे 5500 रुपये पाठवले होते. ही हकीकत कळल्यावर नागपूरहून श्री माडखोलकर – संपादक तरण भारत, यांनी लिहिले, ‘’श्री वसंतरावदादा पाटील यांनी अपुऱ्या निधीच्या कार्याला इतकी घसघशीत मदत केल्याचे वाचून आनंद वाटला. एक तरी मंत्री निदान आपल्याला हार्दिक सहकार्य देणारा भेटला, हे खरोखरी सद्य:स्थितीत सुदैव होय.’’

त्यानंतर श्री रत्नाप्पा कुंभार यांनी पाच हजार रुपये पाठवण्याची व्यवस्था केली. मुख्यमंत्र्यांना मी त्यांच्या आग्रहावरून दोनदा भेटले. त्यांनी आपल्या निधीतून पाच हजार रुपये पाठवले. मराठवाड्यातून अद्याप एक पैसाही मिळाला नसल्याचे मी त्यांना म्हटले तेव्हा त्या दृष्टीने आपण व्यवस्था करू असे आश्वासन त्यांनी लगेच दिले व नंतर पत्राद्वारा कळवलेही की, ‘’मराठवाड्यातील माझ्या सहकाऱ्यांना मी निधी गोळा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.’’

अनेक संस्था, डॉक्टर, वकील, व्यापारी, सामान्य नागरिक, सर्वांनी यथाशक्ती हातभार लावला आहे. सासवड व पुरंदर तालुका यावर अध्यक्षांनी पाच हजारांचा कोठा बनवला होता. सासवडातील दहाबारा स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांनी खपून पाच हजारावर रक्कम गोळा केली. खुद्द अध्यक्ष श्री देवकीनंदन नारायण यांनी तुरुंगातून सुटका झाल्यावर, जळगाव जिल्ह्यात फिरून सोळा हजार रुपये गोळा केले! आश्रम विश्वस्तांपैकी एक श्री शरयूताई धोत्रे व कोरगावकर ट्रस्टचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब सहस्रबुद्धे या दोघांनी सेवाग्राम, वर्धा व नागपूर येथे फिरून दोन हजारांवर रुपये गोळा केले. 

पवनारला जाऊन मागण्याची हिंमत कोणी केली नाही तेव्हा मी श्री विनोबाजींना दान देण्याबाबत विनंतिपत्र पाठवले. ते वाचून त्यांचे धाकटे बंधू श्री शिवाजी महाराज भावे यांनी स्वतःचे 11 रुपये पाठवले. त्यानंतर श्री विनोबाजींचे चिटणीस श्री बाळ टेंभेकर यांना मी पत्र पाठवून स्मरण दिले. त्यांनी कळवले, ‘’तुमचे पत्र मिळाले. बाबांनीही वाचले. अन्य संस्थांपेक्षा ब्रह्मविद्यामंदिराचे स्वरूप अगदीच भिन्न आहे हे आपण जाणताच. ब्रह्मविद्यामंदिर श्रमनिष्ठ असून येथे स्वावलंबनाचा प्रयत्न आहे, म्हणून संस्थेतर्फे दान देण्याचा प्रश्न नाही, तरी आपल्या मागणीनुसार मंदिराचे सदस्य सामूहिकरीत्या जे सहज देऊ शकतात (प्रत्येकी एक रुपया) तेवढी रक्कम पंचेचाळीस रुपये मात्र मनिऑर्डरने पाठवीत आहे. सोबत पंचेचाळीस रुपयांची यादी जोडली आहे.’’ यादीत पहिलेच नाव श्री विनोबाजींचे होते! मी आनंदाने कळवले, ‘’आजपर्यंत निधीस हजारोंनी देणग्या मिळाल्या, पण या दानाची सर कोणालाच येणार नाही. मी पावन झाले!’’

ही संताची देणगी मिळाली तेव्हा श्री शंकररावांच्या स्मारकाला शक्ती मिळणार हे निश्चित. त्यांच्या अस्थींवर आश्रमाच्या बागेत बकुलाच्या छायेत छोटासा सुरेख दगडी स्मारकस्तंभ उभारण्यात आला आहे. त्याचे जाहीर अनावरण ता. 21 मार्च 1906 रोजी श्री वसंतदादा पाटील यांचे हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी आणखी पाच हजारांची देणगी पाठवून देण्याचे आश्वासन दिले. आणखीही आश्वासने मिळाली आहेत. पण श्री शंकररावांच्या या स्मारक योजनेस महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून हातभार लावला जावा अशी इच्छा आहे. मी घरोघरी जाऊन एक एक रुपयाही गोळा केला आहे. महत्व रकमेला नाही, भावनेला आहे. ज्या महाराष्ट्राशी श्री शंकरराव एकरूप झाले व त्याच्या एकीकरणासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले त्या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतील लोकांनी त्यांच्या स्मारकास आपुलकीने मदत करावी ही विनंती आहे!

Tags: अण्णासाहेब सहस्रबुद्धे विनोबा भावे प्रेमा कंटक शंकरराव देव वसंतदादा पाटील रत्नाप्पा कुंभार Vasantdada Patil weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी