डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

देशाला भगदाड पाडण्यासाठी सरसावलेला त्रिशूल

गुजरातमध्ये हिंदू समाजाला अशा प्रकारचे जे आदेश दिले जात आहेत, त्यांमागील वास्तवतेची जाणीव झालेल्या कोणत्याही धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व जोपासणाऱ्या माणसाचे रक्त सळसळले तर त्यात काही नवल नाही. गुजरातेतील सत्ताधारी पक्षाचे राजकारण हे अराजक आणि यादवी यांचा पुरस्कार करीत आहे. आग लागली की ती कुठेही फैलावते त्याचप्रमाणे धर्मविद्वेषाची गुजरातमध्ये लागलेली ही आग देशभर फैलावत जाईल. न्यायव्यवस्थेने लवकर कारवाई केली नाही तर पुढे त्यांना त्यांचे अधिकार गाजवण्यासाठी अवसरही राहील की नाही, याची शंका आहे. देशाची इमारत उद्ध्वस्त करून टाकण्यासाठी आता त्रिशूल पुढे सरसावला आहे.

प्रधानमंत्री वाजपेयी यांनी गुजरातमध्ये घडलेल्या घटनांविषयी विचार-विनिमय अगर चर्चा करताना विरोधी पक्षीयांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ही अतिसंवेदनाशील अवस्था आहे, असे ते म्हणाले. पण या ठिकाणी प्रश्न हा आहे, की हीच गोष्ट प्रधानमंत्री आपल्या अनुयायांना, विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवारातील इतर सहकाऱ्यांना सांगू शकतील काय? अशा तऱ्हेच्या प्रश्नामागे एक कारणही आहे.

गेल्या काही आठवड्यांत विश्व हिंदू परिषदेतर्फे अहमदाबाद आणि गुजरातेतील इतर काही भागांत हजारो पत्रके वाटली गेली. त्यामधला मजकूर अशा प्रकारचा आहे... 'विश्व हिंदू परिषद, सत्यम् शिवं सुंदरम्, जय श्रीराम! उठो, जागो! सोचो! लागू करो! देशकी रक्षा करो! धर्म की रक्षा करो।'

"आर्थिक बहिष्कार हाच एकमात्र उपाय आहे. हिंदूंकडून मिळविलेल्या धनाचा, संपत्तीचा उपयोग असामाजिक शक्तींकडून आम्हाला नष्ट करण्यासाठी केला जात आहे. या असामाजिक शक्तींचे कंबरडे मोडण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे आर्थिक असहकारता आंदोलन. या, आपण संकल्प करू या. आजपासून आपण कोणत्याही मुसलमान दुकानदाराकडून काहीही खरेदी करणार नाही. दुसरी गोष्ट, आम्ही आमच्या दुकानातून मुसलमानांना कोणतीही वस्तू विकणार नाही. तीन, आम्ही अशा राष्ट्रविरोधी व्यक्तींची हॉटेले किंवा गॅरेजचा उपयोग करणार नाही. आमची वाहने फक्त हिंदूंनी चालवलेल्या गॅरेजेसमध्येच जातील. सुईपासून सोन्याच्या दागिन्यांपर्यंत कोणतीही वस्तू आम्ही मुस्लिमांकडून खरेदी करणार नाही किंवा आमच्या लोकांनी बनवलेली कोणतीही वस्तू त्यांना विकणार नाही. पाचवा संकल्प असा, की ज्या सिनेमात मुस्लिम नायक अगर नायिका/ अभिनेता, अभिनेत्री असतील अशा सिनेमावर आम्ही बहिष्कार घालू. या राष्ट्रद्रोही लोकांच्या फिल्मवर पूर्ण बहिष्कार घालण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत; आणि त्यांच्या फिल्मस् कचऱ्याच्या डब्यात सरळ फेकून द्याव्यात, असे आम्ही लोकांना सुचवीत आहोत. सहावा संकल्प असा करू या, की आम्ही मुसलमानांच्या कार्यालयात यापुढे काम करणार नाही. आणि त्यांना आमच्या कार्यालयात नोकरीला ठेवणार नाही. सात, आम्ही त्यांना आमच्या परिसरात कार्यालय उघडू देणार नाही, इतकेच नाही; तर आमच्या गृहनिर्माण संस्थेमध्ये किंवा वसाहतीमध्ये त्यांना भाड्याने जागा घेऊ देणार नाही. आठ, हिंदू राष्ट्राचे रक्षण करणाऱ्याला निवडणुकीत मी मत देईन. नववा संकल्प असा की आम्ही आमच्या बहिणी व मुली शाळा, कॉलेज आणि कचेऱ्यांमध्ये मुसलमान तरुणांच्या प्रेमजालात सापडणार नाहीत, अशी खबरदारी कटाक्षाने घेऊ. दहा, मी मुस्लिम शिक्षकाच्या हाताखाली कधीही कसलेही शिक्षण अगर प्रशिक्षण घेणार नाही. अशा प्रकारे सर्व बाजूंनी आर्थिक कोंडी करूनच या देशविरोधी आणि हिंदूविरोधी शक्तींना आळा घालणे शक्य होईल असे आम्हाला वाटते. त्यामुळे या शक्तींचे कंबरडे मोडेल. तेव्हाच त्यांना या देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जगणे कठीण होऊन बसेल. मित्रांनो, हा आर्थिक बहिष्कार आजपासूनच सुरू करा. तरच कोणत्याही मुसलमानाला आमच्याकडे मान उंचावून पाहणे शक्य होणार नाही.

आपण हे पत्रक वाचल्यानंतर त्याच्या दहा फोटोप्रती आपल्या मित्रांना पाठवून द्याव्यात. ज्यांना हे करता येणार नाही, आणि जो या पत्रकाच्या प्रती इतरांमध्ये वाटणार नाही, त्याला हनुमान शाप देईल; त्याला श्रीरामचंद्रांचाही शाप लागेल."

पत्रकाच्या खाली ‘एक सच्चा हिंदू राष्ट्रभक्त' एवढीच सही; आणि त्याखाली विशेष सूचनाही आहे ती अशी. "सध्या पतंग उडवायचे दिवस आहेत. जे पतंग आपण उडवतो, ते मुसलमान तयार करतात. फटाकेसुद्धा तेच तयार करतात. म्हणून फटाके व पतंग दोघांवरही आपण बहिष्कार टाकला पाहिजे. जय श्रीराम." कविताप्रेमी असे मानतात की जगात काव्याला अंत नाही. पण ते चूक आहे. वर दिलेल्या पत्रकाचा विचार केला, त्यातील संदेश पाहिला, तर जगात पाशवीपणाचा कुठेच शेवट नाही असे म्हणावे लागेल.

विश्व हिंदू परिषदेने या पत्रकाचा आपल्याशी संबंध नसल्याचे जाहीर केलेले नसल्यामुळे ते त्यांचे अधिकृत पत्रक मानणे भाग आहे. जेव्हा या पत्रकाची आपण दखल घेतो, तेव्हा सत्तर वर्षापाठीमागील जर्मनीतील हिटलर आणि तेथील नाझी हे या पत्रकामुळे खूश झाले असते, असे वाटते. त्यानंतरच्या काळात नाझींच्या राजकारणाने त्यांच्या देशातील जनतेची आणि युरोपमधीलही काही देशांची कशी वाट लावली, ते इतिहासाला ज्ञात आहे. अशा तऱ्हेच्या पत्रकांच्या वितरणानंतर गुजरातेत सुरामारी आणि हत्या यांच्याच बरोबर आणखीही काही पाशवी घटना घडल्या. भय याचेच वाटते की ही फक्त सुरुवात ठरू नये. जर प्रशासन आणि कायद्याचे राज्य सांभाळणारी व्यवस्था यांनी परिणामकारक उपाययोजना केली नाही, तर यापेक्षाही वाईट परिस्थिती निर्माण होईल अशी भीती वाटते. दुर्भाग्य हे, की अशा क्रियाशीलतेचे कोठे लक्षणही दिसत नाही. जेव्हा केंद्र शासनाने देशभर गाजावाजा करीत सीमीवर बंदी आणली; आणि त्याचवेळी विश्व हिंदू परिषद आणि त्यांचे इतर आक्रमक सहकारी यांच्या कारवायांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला, तेव्हाच प्रसिद्ध झालेल्या या आक्रमक पत्रकाने या संघटनांवर बंदी घालण्यास पुरेसे कारण दिलेले आहे. अर्थात् स्पष्टच सांगायचे झाले तर अशा कारवाईची शक्यता आणि आशा अगदीच कमी आहे. कारण गुजरात सरकार किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असलेले केंद्रातील आघाडी सरकार या बाबतीत एकही पाऊल उचलणार नाही. या सरकारमध्ये सामील झालेले छोटे छोटे पक्ष आपल्या क्षुद्र आणि अल्पकालीन स्वार्थासाठी देशाच्या दीर्घकालीन अस्मितेकडे कसे दुर्लक्ष करीत आहेत हे आज सिद्ध झाले आहे.
यासाठीच सरळ सर्वोच्च न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश एस.पी. भरूचा यांच्याकडे याबाबत अर्ज करण्याची जरूर आहे. ते भडोचचे मूळ रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांना गुजराती भाषेतील त्या मूळ पत्रकाचा किमान आशय तरी समजेल.

गुजरातमध्ये हिंदू समाजाला अशा प्रकारचे जे आदेश दिले जात आहेत त्यामागील वास्तवतेची जाणीव झालेल्या कोणत्याही धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व जोपासणाऱ्या माणसाचे रक्त सळसळले तर त्यात काही नवल नाही. गुजरातेतील सत्ताधारी पक्षाचे राजकारण हे अराजक आणि यादवी यांचा पुरस्कार करीत आहे. आग लागली की ती कुठेही फैलावते त्याचप्रमाणे धर्मविद्वेषाची गुजरातमध्ये लागलेली ही आग देशभर फैलावत जाईल. प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयींकडे भारतीय जनता पार्टीमधील स्वैर बनलेल्या शक्तींना काबूत राखण्याची ताकद नाही आणि तशी इच्छाही नाही. संविधानाचे 74 वे कलम राष्ट्रपतींना बंधनकारक असल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संमतीशिवाय तेही काही कारवाई करण्यास असमर्थ आहेत.

अशा परिस्थितीत देशातील बहुसंख्य शांतताप्रिय नागरिक काय करू शकतात? त्यांच्यासमोर एकच मार्ग खुला आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडे जाण्याचा! सर्वोच्च न्यायालयाने याबाबत जलद कारवाई करून विश्व हिंदू परिषदेच्या हिंसक हालचालींना आळा घालण्यास गुजरात सरकारला भाग पाडले पाहिजे. या कारवाईला जेवढा उशीर होईल तेवढा अधिक विनाश होईल यात शंका नाही.

तथापि संबंधित जनतेसमोर आणखीही एक समस्या खड़ी होण्याचा संभव आहे. हे एक कटुसत्य आहे की देशाला बरबाद करू पाहणाऱ्या या कट्टर धर्मवेड्या मंडळींची लोकशाही मूल्यांवर अजिबात श्रद्धा नाही, हे आता सिद्ध झालेच आहे. अधिकाऱ्यांना आपल्या बाजूला ओढण्यात ते यशस्वी झाले आहेत. अनेक गोष्टींचा वापर करून ते प्रशासनावरील आपले नियंत्रण आणि दबाव कायम ठेवू शकतात. गुजरातमध्ये जे काही घडले ते स्थानिक पातळीवर आहे आणि देशाच्या इतर भागातील नागरिकांना त्याची चिंता करण्याचे कारण नाही, असेही ते म्हणू शकतात. काही अन्य लोकांच्या मते विश्व हिंदू परिषदेच्या लोकांमधील उन्माद हा तात्पुरताच आहे; त्याच्याकडे दुर्लक्ष केले, तर तो आपोआपच निवळेल. अशा पद्धतीने विचार करणाऱ्यांसाठी 70 वर्षांपूर्वी जर्मनीच्या मार्टिन निमोलर या कवीने लिहिलेली पुढील कविता आपण वाचायला हवी.

"पहिल्या प्रथम ते यहुदींसाठी आले;
त्यावेळी मी काही बोललो नाही, कारण मी यहुदी नव्हतो.
नंतर ते कम्युनिस्टांसाठी आले; पण मी बोललो नाही,
कारण मी कम्युनिस्ट नव्हतो.
मग ते कामगार कार्यकर्त्यांसाठी आले; पण मी बोललो नाही,
कारण मी कामगार कार्यकर्त्यांपैकी नव्हतो.
त्यानंतर ते कॅबलिकांसाठी आले; पण मी बोललो नाही,
कारण मी कॅथलिकही नव्हतो.
आणि जेव्हा ते माझ्यासाठी आले,
तेव्हा माझ्या बाजूने बोलण्यासाठी कोणी उरलेच नव्हते!"

परिस्थिती अशी झाली आहे की न्यायव्यवस्थेने लवकर कारवाई केली नाही तर पुढे त्यांना त्यांचे अधिकार गाजवण्यासाठी अवसरही राहील की नाही, याची शंका आहे. देशाची इमारत उद्ध्वस्त करून टाकण्यासाठी आता त्रिशूल पुढे सरसावला आहे.

अनुवाद : चित्रांगदा
['अमर उजाला च्या सौजन्याने]

Tags: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद अटल बिहारी वाजपेयी गुजरातमधील धर्मविद्वेष अमर उजाला अनुवाद चित्रांगदा . अशोक मित्रा RSS. Vishva Hindu Parishad Atal Bihari Vajpeyee Anti-semitism in Gujarat Amar ujala Translation Chitrangada Pro. Ashok Mitra weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अशोक मित्रा

अर्थतज्ञ आणि मार्क्सवादी राजकारणी.

भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार, पश्चिम बंगालचे अर्थमंत्री, राज्यसभा खासदार अशी पदे त्यांनी भूषविली. 

जन्म : 10 एप्रिल 1928
मृत्यू :1 मे 2018


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके