डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

29 जानेवारी 1966 या दिवशी पुण्यातील ‘स्त्री’च्या 500 वर्गणीदार भगिनींना निमंत्रणे पाठवून किर्लोस्कर प्रेसमध्ये बोलाविले. परस्पर परिचय, शंकानिरसन, वाचकांच्या सूचना- असा कार्यक्रम होऊन तीळगूळ वाटप झाले आणि दरमहा भेटण्यासाठी ‘स्त्री सखी मंडळ’ निर्माण झाले. वाचकांचे मंडळ असणारे ‘स्त्री’ हे भारतातील पहिले मासिक ठरले.

श्री. शंकरराव किर्लोस्कर यांच्या संपादनाखाली चाललेल्या ज्या ‘स्त्री’ मासिकाच्या संपादकीय क्षेत्रात मला काही काम करण्याची संधी मिळाली त्याची पार्श्वभूमी सुस्थिर होती. किर्लोस्कर मासिक 1920 मध्ये सुरू झाले. ‘मासिक म्हणजे लोकांच्या करमणुकीचे आणि वेळ घालविण्याचे साधन नसून वाचकांच्या जीवनाला प्रगतिपर दिशा देणारे माध्यम आहे’, हे उद्दिष्ट सतत डोळ्यांपुढे ठेवल्यामुळे समाजामध्ये या मासिकाचे 10 वर्षांत एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण झाले होते. कुटुंबामध्ये असो, वा समाजामध्ये- स्त्रियांचे स्थान जबाबदारीचे आणि महत्त्वाचे आहे, याची जाणीव ठेवूनच 1920 पासून किर्लोस्कर मासिकामध्ये दिलेले ‘स्त्रियांचे पान’ हे सदर पाच वर्षे लोकप्रिय झाले होते. जून 29 मध्ये किर्लोस्कर चा ‘महिला विशेषांक’ काढण्यात आला. त्याला स्त्रियांकडून जो उत्साहाचा प्रतिसाद मिळाला त्यामुळे स्त्रियांसाठी स्वतंत्र मासिक काढावे असा विचार लेखक व स्नेही मंडळींना कळविताच मनःपूर्वक पाठिंबा देणारी आश्वासनपत्रे व लेख हाती आले.

किर्लोस्करच्या 1 जुलैच्या अंकात स्त्रीची जाहिरात प्रसिद्ध होताच पंधरा दिवसांत एक हजार मनीऑर्डर्स किर्लोस्करवाडीच्या पोस्टात दाखल झाल्या व तेथे काम करणारांची तारांबळ उडाली, असे पोस्टमास्तरांनी नमूद केले. ‘स्त्री’चा पहिला अंक 15 ऑगस्ट 1930 रोजी प्रकाशित झाला. त्याचसाठी लेखक-मित्रांचे संमेलन बोलावले होते. ‘स्त्री’च्या पहिल्या संपादकीयातच म्हटले आहे की, स्त्रियांची घटकाभर करमणूक करण्यापेक्षा त्यांच्या विचारांना चालना देऊन आपली उन्नती घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला हातभार लावणे या गोष्टीकडेच हे मासिक अधिक लक्ष देईल. हे अभिवचन पहिल्या ‘स्त्री’च्या अंकानेच वाट दाखवून व पुढील 55 वर्षे तेच उद्दिष्ट ठेवून पुरेपूर सिद्ध केले.

सुरुवातीपासून ‘स्त्री’च्या वाचकांपुढे राजकारणातील मणीबेन कारा, कमलादेवी चट्टोपाध्याय, डॉ. मधुमालती गुणे, शिक्षणात ताराबाई मोडक, कलावंतांत हिराबाई बडोदेकर, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अशा थोर स्त्रियांचे व्यक्तिपरिचय सादर केले गेले. ‘स्त्री’ मासिकाच्या पहिल्या दशकात शांताबाई नाशिककर, मालतीबाई दांडेकर, ताराबाई कुलकर्णी, बाळूताई खरे अशा लेखिका व संजीवनी मराठे, पद्या गोळे, इंदिरा संत, अपर्णा देशपांडे या कवयित्रींचे साहाय्य मिळाले. कृष्णाबाई मोटे यांनी ‘दृष्टीआडच्या सृष्टीत’ या लेखमालेतून उपेक्षित स्त्रियांचे प्रश्न समोर मांडले. ते नवी दृष्टी देत असत. ‘स्त्री’ मासिकात ‘माझे वैवाहिक जीवन’ या मथळ्याने अनुभव कथनाचे एक सदर सुरू केले. त्यामध्ये नावे प्रसिद्ध करू नयेत असे सांगून, स्त्रियांनी संकोच सोडून आपले अनुभव मोकळ्या मनाने सांगितले. पुढेही सतत स्त्रियांना त्या काळात जाणवणारे विषय मतप्रदर्शनासाठी मासिकाने पुरविले. विधवांनी कुंकू लावावे काय, घरकामाचा मोबदला, सकच्छ (नऊ वारी) की विकच्छ (पाच वारी), अलंकार ही अडगळ, स्त्रिया श्रेष्ठ की पुरुष श्रेष्ठ, अशा विषयांवर अनेक भगिनींनी आपल्या विचारांना वाट करून दिली आणि ‘स्त्री मासिकाने आम्हांला बोलके केले’, असा त्यांचा प्रतिसादही मिळत गेला.

गृहव्यवस्था. आरोग्यशास्त्र, मुलांचे मानसिक संगोपन या विषयांवर डॉक्टर आणि समाजशास्त्रज्ञ असे पुरुष लेखकही उत्साहाने लेखन करू लागले. भगिनींशी हितगुज व हितकारिणीचे सदरही त्याच्या व्यावहारिक उपयुक्ततेमुळे लोकप्रिय झाले. ‘आई व बाळ फोटोस्पर्धा’ हे वाचकांचे कित्येक वर्षे आकर्षण राहिले. समाजपरिवर्तनाचा पुरस्कार करणारे बुद्धिवादी मोठे लेखक महादेवशास्त्री दिवेकर यांनी हिंदू समाजात स्त्रीचे स्थान, पतिव्रताधर्म म्हणजे काय, या चाली त्वरित दूर करा, असे लोकभ्रम दूर करणारे लेख लिहिले. फ्रेडरिक एंगल्स यांच्या ‘ओरिजिन ऑफ फॅमिली’ या जगविख्यात पुस्तकाचा भावार्थ डॉ. वा. का. किर्लोस्कर यांनी 'स्त्रियांनो चालला आहात कोठे?' या लेखमालेने दिला. 1938 मध्ये ‘स्त्री’चा 100 वा अंक निघाला, त्यामध्ये ‘स्त्री’च्या ज्येष्ठ लेखिका प्रा. सरलाताई नाईक म्हणतात, "ही 'स्त्री' साधी, सरळ, निर्भीड व धीटशी सशक्त 'स्त्री' आहे. स्त्रियांवर होणा-या अत्याचारांना वाचा फोडून धिटाईने बंड करण्यासाठी 'स्त्री'चा जन्म झाला आहे.

समाजाच्या विचारशक्तीची आणि भावनांची दारे रूढीने व परिस्थितीने बंद केली आहेत. ती ठोठावल्याशिवाय कशी उघडणार? ‘स्त्री’ने स्त्रियांना स्वतःमध्ये व गृहव्यवस्थेत बदल करण्याची प्रेरणा दिली. प्रवास करण्याचे धैर्य दिले. समाजातील काही स्त्रियांची ओळख करून दिली. जरा खोलवर विचार करण्यास व विचारांनी आपणांस पटणारे आचार-विचार लोकांपुढे मांडण्यास उद्युक्त केले. आठ वर्षांत ‘स्त्री’ मासिकास 200 लेखिकांचे साहाय्य झाले. हा आकडा नजरेत भरण्याजोगा आहे." 1942 च्या एप्रिलमध्ये एका विलक्षण विषयाकडे ‘स्त्री’ने वाचकांचे लक्ष वेघले. पुण्याच्या दाणे आळीतील मरगी वेश्येच्या घरातून ‘‘आम्हांला सोडवा’’, असे ओरडत 70-75 स्त्रिया बाहेर पडल्या. ही बातमी वाचून आनंदीबाई किर्लोस्कर यांनी पुण्यास येऊन पोलिसांच्या परवानगीने त्या स्त्रियांची भेट घेतली. प्रेमाने व सहानुभूतीने त्यांच्याशी बोलून त्यांची फसवणूक कशी झाली; तेथे अत्याचार कसे चालतात, याची हृदयद्रावक कहाणी समजावून घेतली.

'मरगीच्या मगरमिठीतून सुटका' हा वेश्याव्यवसायावर प्रकाश टाकणारा विदारक लेख पुढच्याच ‘स्त्री’च्या अंकात प्रसिद्ध झाला. त्यामुळे या विषयाला तोंड फुटले व पुढे अनेकांनी तसे प्रकार उघडकीस आणले. लग्न झाल्यानंतर किर्लोस्करवाडीस गेल्यावर 1944 नंतर मासिकाच्या सहसंपादकांशी बोलण्यास मी प्रेसमध्येही जाऊ लागले. लेख, कथा वाचून गप्पा होऊ लागल्या. एखादा नवा विषय किंवा नव्या लेखिकेचे नाव सुचवू लागले, एखाद्या सदराचा मजकूर लिहून देऊ लागले. 1940 ते 50 या काळात गावोगावी महिला मंडळे निघू लागली. त्यांच्या कामाबद्दल माहिती देण्यासाठी 'महिला मंडळाचे संसार' हे सदर ‘स्त्री’ सुरू केले. 1945 मध्ये अखिल भारतीय महिला परिषदेच्या अधिवेशनास इजिप्त, सिरिआ, लेबेनॉन, सिलोन पॅलेस्टीनच्या प्रतिनिधी आल्या. त्यावरचा लेख ‘स्त्री’मध्ये आला. मुंबईतील 5000 प्रतिनिधींची दलित महिला परिषद, मराठा महिला परिषद व धुळे येथे महाराष्ट्र महिला परिषद यांमध्ये किसान कामगार स्त्रिया मोठ्या संख्येने हजर होत्या, याची दाद ‘स्त्री’च्या संपादकीयात घेतली गेली.

कस्तूरबा गांधी यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय पातळीवर निधी जमला व ग्रामीण स्त्रियांसाठी त्याचा विनियोग करायचे ठरले. त्या बाबत काँग्रेसी मंडळींखेरीज इतर विचारवंत स्त्रियांना विचारले गेले नाही. स्त्रियांच्या कल्याणाबद्दल फक्त भूतदयेची दृष्टी ठेवण्याच्या विचारपद्धतीला हरकत घेणारे लेख आणि स्त्रियांची सेवा नव्हे तर त्यांच्यामध्ये जागृती होण्याची गरज दाखविणारे लेख इंदिरा मायदेव, चंद्रकला हाटे, यमुना हिर्लेकर यांनी ‘स्त्री’ मासिकासाठी लिहिले. एखाद्या विशिष्ट विषयावर माहिती व विचार देणारे मासिकाचे अंक काढून स्त्रियांच्या काही संस्थांकडे वाचकांचे लक्ष वेधता आले. मुंबईच्या ‘श्रद्धानंद महिलाश्रमाचा विशेषांक’ निघाल्यावर, सुमतीबाई गोरे यांनी लिहिले- ‘‘संस्थेविषयीये समाजऋण ‘स्त्री’ मासिकाने आम्हां सर्वांच्या वतीने फेडले आहे. संस्थेचे विश्वस्त बॅ. मुकुंदराव जयकर संस्थेस प्रतिसाद मिळाल्यावर म्हणाले, ‘‘ ‘स्त्री’ च्या या अंकाचा वाचकांवर एवढा परिणाम होईल अशी कल्पना नव्हती.’’ 1955 मध्ये ‘स्त्री’ मासिकाला 25 वर्षे झाली. आपले लेखक-वाचक यांच्याशी आपला परिचय होणे हे संपादनाच्या कामात, स्नेहपूर्ण सहकार्यात आवश्यक असते. यासाठी लेखिकांचे एक संमेलन किर्लोस्करवाडी येथे योजिले, त्या वेळी दोन दिवस जणू एका कुटुंबातील मंडळी जमली आहे असे वातावरण राहिले. लेखिका, कवयित्रींना समस्यापूर्तीसाठी ‘संयोग हा बघुनिया मज मोद वाटे’ अशी ओळ दिली असताना अण्णा देशपांडे यांनी ‘केले निमित्त जणू वाढदिशी मुलीच्या, पाचारल्या भगिनी दूर कितीक सा-या  माहेरवास करती जणू भाऊ मोठे संयोग हा बघुनिया मज मोद वाटे’ अशी समर्पक कविता करून दाद मिळविली.

‘स्त्री’ मासिकाचा बडोदा, इंदौर, माळवा विशेषांक बृहन्महाराष्ट्रातील वाचकांना आवडला होता. पुढे भाषावार प्रांतरचनेची चर्चा होऊ लागली तेव्हा संयुक्त महाराष्ट्रात निजामी राजवटीमुळे अलग पडलेल्या मराठवाड्याचा विशेषांक काढण्याच्या तयारीसाठी 1960 मध्ये मी तिकडे गेले. ‘‘या अंकाने मराठवाड्याला आपल्या कुटुंबात आणून सोडले आहे. इतका चांगला अंक काढून तुम्ही महाराष्ट्राची फार मोठी सेवा केली आहे. नव्या महाराष्ट्राच्या निर्मितीत तुमच्या मासिकाचा फार मोठा वाटा आहे.’’ अशा अभिप्रायांमुळे माझा आत्मविश्वास वाढला. ‘स्त्री’ मासिकाचा वाचकवर्ग बहुसंख्य मध्यमवर्गीय होता. श्रमिक व्यवसायातील कोळीण, कोल्हाटीण, वडारीण, कैकाडी, आगरी, लमाणी अशा स्त्रियांच्या जीवनाचा परिचय भानू शिरधनकर, शंकरराव खरात अशा मंडळीनी करून दिला.

‘स्त्री’ मध्येच पसरबागेची निगा चार आठवड्यांचे आहाराच्या पदार्थाचे वेळापत्रक व त्यांची कृती- अशा त्यांच्या गरजेच्या विषयांवरही नियमित लेख असत. मुले व त्यांचा विकास या संबंधात ‘स्त्री’मध्ये अनेक लेखकांनी सहकार्य दिले. मुली वयात येण्याच्या विषयावर पिरोज आनंदकर यांनी लिहिलेली पहिली लेखमाला ‘इंद्रधनूचा पूल’ हे पुस्तक दोन पिढ्यांना मार्गदर्शक झाले. ‘स्त्री’ मासिकाच्या अंकाचे शतक पूर्ण झाले की, लेखिका संमेलन होई. पण 400 व्या अंकाच्या वेळी महाराष्ट्रातीस इतर ठिकाणीही कार्यक्रम झाले. अमरावती येथे ‘समाजकार्य व स्त्रिया’ परिचर्चा, नांदेड येथे ‘स्त्रिया व शिक्षण’ परिसंवाद आणि कोल्हापूर येथे ‘ललित कला क्षेत्रातील स्त्रियांची कामगिरी’ असे पुण्याबाहेर तीन कार्यक्रम आम्ही घेतले. पुण्यामध्ये गर्भपाताला कायद्याने मान्यता मिळण्यासाठी चर्चासभा झाली. तिचे पडसाद वृत्तपत्रांतून महाराष्ट्रातही उमटले. स्वतःचे उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजक स्त्रियांचा पहिला मेळावा पुण्यामध्ये ‘स्त्री’ मासिकाने घेतला. 29 जानेवारी 1966 या दिवशी पुण्यातील ‘स्त्री’च्या 500 वर्गणीदार भगिनींना निमंत्रणे पाठवून किर्लोस्कर प्रेसमध्ये बोलाविले. परस्पर परिचय, शंकानिरसन, वाचकांच्या सूचना- असा कार्यक्रम होऊन तीळगूळ वाटप झाले आणि दरमहा भेटण्यासाठी ‘स्त्री सखी मंडळ’ निर्माण झाले. वाचकांचे मंडळ असणारे ‘स्त्री’ हे भारतातील पहिले मासिक ठरले. पुढे भारतात भाषावार प्रांतरचना झाल्यावर आता राष्ट्रीय एकात्मतेचे काय होईल, अशी शंका प्रकट होऊ लागली.

भारतासारख्या विशाल देशात विविध भाषिक प्रांतही आपल्या विशिष्ट संस्कृतीने संपन्न आहेत. प्रत्येक वर्षात एका प्रांतावर विशेषांक काढून विविधतेतील संपन्नतेची ओळख वावकांना करून द्यावी; म्हणजे अर्धवट माहितीवर आधारलेले गैरसमज दूर होतील आणि भारतीय एकात्मतेची जाणीवही बाढीला लागेल, या उदिष्टाने 1960 ते 69 या काळात दरवर्षी एकेका प्रांतातील 2-3 गावांत जाऊन तेथील स्थानिक संपादक व लेखकांना भेटून समाजातील स्त्रीजीवन, सामाजिक संस्था, संस्कृती-वैशिष्ट्ये यांची माहिती मिळवून हे दहा अंक काढले, त्या प्रांतांतील आमच्या वाचक वर्गणीदारांनी योग्य व्यक्तींची ओळख करून देणे, तेथील साहित्याची मराठी भाषांतरे करणे, यांसाठी खूपच मदत केली.

1944 ते 1985 या माझ्या संपादनाच्या कार्यकालातील अनुभवांनी मला एक व्यापक दृष्टी दिली, आणि समाधानही दिले.
 

Tags: यशस्वी वाटचाल स्त्रीमनाचा आरसा ‘स्त्री’ मासिक journey of success mirror of women's mind 'stree' magazine weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके