डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

श्री. पु. ल. देशपांडे हे नाव नाही, ही सांस्कृतिक क्षेत्रातली एक राजमुद्रा आहे. पुलंनी मास्तरांच्या कलेचा जो गौरव आपल्या सुश्राव्य भाषणात केला होता त्याची येथे एक झलक मात्र दिली आहे.

मास्तरांचं गाणं याचा अर्थ मला नेहमी असा वाटत आलेला आहे की, दर वेळी नवीन नवीन अशा प्रकारचं रूप घेणारा असा हा प्रतिभेचा विलास आहे. मास्तरांचं गाणं कधी जुन होऊ शकत नाही, याचं कारण हे आहे की, मास्तर आज असे गायले, उद्या आणखी काही गातील, परवा आणखी काही निराळ गातील. 'नवताम् उपैति' हे प्रतिभेचं लक्षण आहे. हे मास्तरांच्या गाण्यामध्ये तुम्हांला सतत अनुभवाला येतं याचं कारण हे जे प्रतिमेचं अलौकिक अशा प्रकारचं देणं आहे ते मास्तरांना मिळाले… ...मास्तरांनी भास्करबुवांना दैवत मानणं हे अगदी बरोबर आहे. त्यात काही प्रश्नच येत नाही. 

परंतु मास्तरांनी भास्करबुवांना दैवत मानताना या संगीतात पुष्कळ काही करण्यासारखं आहे ही गोष्ट जर विचारात घेतली नसती तर एक विशिष्ट प्रकारचं झापड डोळ्यांवर बांधून ते आयुष्यभर गात राहिले असते. भास्करबुवांबद्दल मला जर संपूर्ण आदर नसता तर संगीताच्या क्षेत्रात उभं राहण्याची माझी छातीच नसती. ज्याची संगीत या विषयावर भक्ती आहे, श्रद्धा आहे, त्याचे भास्करबुवा म्हटल्यानंतर हात जोडले जाणारच. परंतु कोठल्याही माणसानं असं समजण्याचं कारण नाही की, कोठल्याही एका व्यक्तीबरोबर, गाणं काय किंवा कोठलीही कला काय, सुरू झाली आणि त्याच्याबरोबरच ती संपली. हा समुद्र इतका विशाल आहे की, त्याच्या तळाशी जाऊन तुम्ही काढाल तितकी रत्न तुमच्या हाताला लागतील.

मास्तरांनी सगळ्यांत उत्कृष्ट जर कोठली गोष्ट केली असेल तर मला असं वाटतं की, अनेक तऱ्हेच्या सुरांच्या सागरात बुडून त्यांनी रत्नं वर आणली. एकाच जागी जर ते बुडत राहिले असते तर सुरुवातीला एखाददोन रत्नं हातात आली असती, पण नंतर शंखच हाती लागले असते… ... मास्तरांनी प्रेमानं सगळ्यांना गाणं ऐकवलेलं आहे. लहानांना ऐकवलं, मोठयांना ऐकवलं, बायकांना ऐकवलं, पुरुषांना ऐकवलं, जाणत्यांना ऐकवलं, नेणत्यांना ऐकवलं. सगळ्यांना त्यांनी आपले गाणं ऐकवलं. माझं तेच खरं आणि ऐकायचंच असेल तर असंच ऐका, असा त्यांनी आग्रह धरला नाही. मास्तरांनी समाजातील सगळ्यांची 'राखावी बहुतांची अंतरे' असं म्हणून त्यांची अंतरं तृप्त करीत करीत आपल्या कलेची सेवा केली.
'संगीत कलानिधी' असं आपण त्यांना म्हणतो ते काही उगीच नाही ... "

Tags: संगीत  भास्करबुवा पु. ल. देशपांडे Music BHaskarbuaa P.L. Deshapande weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

पु. ल. देशपांडे

 (जन्म : मुंबई, 8 नोव्हेंबर 1919; मृत्यू : पुणे, 12 जून 2000)  मराठी लेखकनाटककारनट, कथाकार व पटकथाकारदिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके