डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एका बाजूला बर्फाचा कडा, दुसऱ्या बाजूला दरी. शेवटी बरंच अंतर पुढं चालून गेल्यावर बसायला जागा मिळाली. पाहिलं तर तिचा ऑक्सिजन संपलेला होता. तिला दुसरा सिलिडर लावला आणि पुन्हा ट्रेक सुरू झाला. ती निडरपणे सलग 52 दिवस चढाई करत राहिली. मोहीम फत्ते व्हायला पंधरा मिनिटांचं अंतर बाकी होतं, नेमक्या त्या वेळी समोर एक मृतदेह दिसला. एवढीशी पोर क्षणभर बिचकली. ‘आपणही इथंच तर मरून पडणार नाही ना... आपण परत जाऊ ना?’ अशी शंका तिच्या मनात आली.

हैदराबादजवळील भोनगीर डोंगराच्या पायथ्याशी उभी राहून तेरा वर्षांची पूर्णा विचारात पडली. साडेसातशे फुटांचा हा खडक कसा चढून जायचा? आयुष्यात पहिल्यांदाच ती रॉक क्लायंबिंग करणार होती. पायथ्याशी क्षणभर घाबरली, पण मग सरसर चढली. तेही दोरखंडाचा आधार न घेताच. त्यानंतर तीन महिन्यांनीच ती माऊंट एव्हरेस्टच्या बेसकॅम्पपर्यंत पोहोचली. जगातील सर्वांत उंच 29,029 फूट उंचीचे पांढरे शुभ्र शिखर तिच्यासमोर उभे होते. ती क्षणभर त्या शिखराकडे पाहत प्रशिक्षकांना उत्साहाने म्हणाली, ’It’s not that tall, we can climb in day- एव्हरेस्ट काही फार उंच वाटत नाहीये, आपण एका दिवसांत चढून जाऊ शकतो.’ छोटासा डोंगर चढायची भीती वाटलेली पूर्णा निरागसतेने एव्हरेस्टच्या उंचीला वाकुल्या दाखवत होती. सरांनी हलकं स्मित केलं.

पूर्णा बिचारी... तिला वाटलं तसं ती काही एका दिवसात एव्हरेस्ट चढली नाही. ते शक्यच नव्हतं. हं, मात्र 52 दिवस सलग चढाई करून शिखराला पायाखाली घेतलेच तिने! दि.25 मे 2014- शिखर सर केलेला दिवस. त्या दिवसानंतर संपूर्ण जग तिला एव्हरेस्ट शिखरावर चढणारी सर्वांत लहान वयाची मुलगी म्हणून ओळखतं. हा जागतिक विक्रम घडला तेव्हा तिचं वय होतं- फक्त 13 वर्षे 11 महिने. खरं तर ती नेपाळच्या ज्या अवघड कठड्यावरून चढत गेली, तिथून चढण्याचे धाडस फार कमी लोक करतात आणि 16 वर्षांखालील मुलांना तर परवानगीच देत नाहीत. पण मुली काहीही करू शकतात, हे पूर्णाने सिद्ध करून दाखवलं.

पूर्णा मलावत, तेलंगणाच्या निझामाबाद जिल्ह्यातील पाकाला तांड्यातली आदिवासी मुलगी. पाकाला हा आधुनिक वस्तीपासून शेकडो मैल लांब निबिड अशा अरण्यात, डोंगराच्या कुशीत वसलेला छोटासा तांडा. अवघी शे-दीडशे झोपडीवजा घरं. रस्ते, वीज, दवाखाना इत्यादी सुविधा तिथं पुरेशा नाहीत. याच तांड्यावरचे देवीदास आणि लक्ष्मी या दांपत्याच्या घरी एका भावाच्या पाठी पूर्णाचा जन्म झाला. चौकोनी कुटुंब, पण खायची ददात. पूर्णाचे आई-वडील दोघंही शेतमजूर. दुसऱ्याच्या शेतात जाऊन राबत आणि त्यातून येणाऱ्या मजुरीवर आपल्या कुटुंबाची गुजराण करत.

पाकाला गावातल्याच शाळेत पूर्णाने पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. घरची आर्थिक परिस्थिती पाहता पाचवीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी तिला घरापासून दूर जाणं भाग होतं. तेलंगणामध्ये एक चांगली सोय आहे. तिथं उपेक्षित, दुर्लक्षित अशा आदिवासी जमातीतल्या मुलांना मोफत शिक्षण आणि उत्तम आहार मिळावा म्हणून शासनाच्या निवासी शाळा (आश्रमशाळा) आहेत. त्याला तेलंगणा सोशल वेल्फेअर रेसिडेन्शियल स्कूल म्हटलं जातं. पूर्णाने अशाच अशाच एका निवासी शाळेत प्रवेश घेतला. अवघ्या दहाव्या वर्षी ती या निवासी शाळेत शिक्षणासाठी आली.

एवढ्या लहान वयात घर सोडून येताना काय काय वाटलं असेल ना तिला! पण शिक्षणसुद्धा महत्त्वाचं आहेच. हळूहळू ती शाळेत रमली. जेवणाची भ्रांत असणाऱ्या पूर्णाला पौष्टिक आहारही मिळू लागला. शाळा तिला आवडू लागली. शाळेत तिचा खेळाकडे चांगला ओढा निर्माण झाला.

खरं तर जंगलात राहणारी आदिवासी मुलं चांगलीच काटक असतात. पूर्णादेखील कबड्डी, व्हॉलीबॉल आणि ॲथलेटिक्स या खेळांमध्ये चमकदार कामगिरी करत होती. खेळातली तिची रुची क्रीडाशिक्षकांच्या लक्षात आली होती. बघता-बघता, सोशल वेल्फेअर शाळेत आलेली पूर्णा नववीत गेली. तिचं शाळा, खेळ, अभ्यास हे रुटीन सुरूच राहिलं.

दरम्यान सोशल वेल्फेअर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ॲडव्हेंचर स्पोटर्‌स आयोजित केले पाहिजेत, असा कल्पक विचार आर.एस. प्रवीणकुमार यांनी मांडला. प्रवीणकुमार हे आयपीएस अधिकारी आहेत.  त्याचबरोबर सोशल वेल्फेअर सोसायटीचे सचिवही. त्यांना नावीन्यतेचा नेहमीच ध्यास. त्यातून ते मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कल्पक उपक्रम राबवतात. ॲडव्हेंचर स्पोटर्‌सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गिर्यारोहणाची संधी देऊन त्यांचा आर्थिक भारही उचलायचा, असा त्यांचा उद्देश होता. क्रीडाशिक्षकांनी पूर्णाला बोलावून घेतले आणि सांगितलं, ‘‘पूर्णा, या उपक्रमासाठी तुझी निवड केली आहे.’’

पूर्णाला आनंद होण्यापेक्षा प्रश्न पडला- ‘गिर्यारोहण’ हे काय बरं असतं? पर्वत चढाई हा काय क्रीडाप्रकार आहे? तोवर तिनं कधी उंच पर्वतरांगा पाहिल्याच नव्हत्या. आता ते सारं तिला माहीत होणार होतं. हैदराबादपासून 43 किमी अंतरावर असणाऱ्या भोनगीर इथं रॉक क्लायंबिंग ट्रेनिंगसाठी ती गेली.

भोनगीरचा मूळ उच्चार भुवनगिरी. पण लोक भोनगीरच म्हणतात. भोनगीरच्या टेकडीवरचा किल्ला पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. भोनगीरच्या दगडी भिंतीवर दोरखंडाच्या मदतीने चढाई केली जाते. रॉक क्लायबिंगमध्ये नैसर्गिक किंवा कृत्रिम दगडी भिंतीच्या बाजूने चढाई केली जाते. काही वेळा दोरखंडाच्या साह्याने सुरक्षेची तजवीज करून चढाई केली जाते, तर काही वेळा दोरखंडाशिवाय. पूर्णा मात्र या डोंगराची 750 फूट उंची पाहून घाबरली. ‘बापरे, किती उंच...! पोटात भीतीचा गोळा आला. कसं होणार? ही दगडी भिंत कशी चढायची?’ इथं तिच्या मदतीला धावून आले शेखरबाबू बचीनेपल्ली. त्यांनी तिला धीर दिला. ‘‘तू करू शकतेस पूर्णा... फार अवघड नाहीये.’’ प्रोत्साहन देतच त्यांनी चढाईसंदर्भातील काही सूचना सांगितल्या.

हे शेखरबाबू स्वत: गिर्यारोहक. त्यांनी स्वत: माऊंट एव्हरेस्टवर चढाई केली आहे. पूर्णाच्या या ट्रेनिंगचे प्रशिक्षक. शेखरबाबूंच्या सूचनांवर विश्वास ठेवत पूर्णाने भोनगीरच्या दगडी भिंतीवर दोरखंडाशिवायच चढाई केली. शेखरबाबू तिची ही कमाल पाहतच राहिले. ‘या मुलीत काही तरी स्पार्क आहे’- त्यांनी मनातल्या मनात तिची नोंद केली. भोनगीर रॉक क्लायंबिंग पूर्ण झाले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आधीची भीती नव्हती, उलट उत्साहच होता. ‘‘मला फार छान वाटतंय. चढण्याआधी पाय लटपटत होते, पण आता पाय लटपटायचे थांबलेत. मला ही चढाई जमली.’’ पूर्णा आनंदाने सर्वांना सांगत राहिली.

पुढं पाच दिवस प्रशिक्षण चाललं. रॉक क्लायंबिंग, रॅपलिंग, बाऊंडरिंग शिकवण्यात आलं. या प्रशिक्षणात ‘ए’ ग्रेड मिळवून ती पहिली आली. तिच्यासोबत 110 विद्यार्थी होते. त्यातील 20 जणांची निवड पुढच्या ट्रेनिंगसाठी झाली. खरं तर रॉक क्लायंबिंग ट्रेनिंगची ही सुरुवात पूर्णाच्या जागतिक विक्रमाची मुहूर्तमेढ आहे, हे शेखरबाबू सोडून कोणालाच ठाऊक नसणार. उत्तम प्रशिक्षकाने आपला उत्तम शिष्य निवडून झाला होता, आता त्याला आकार देण्याचं काम बाकी होतं. पुढचं ट्रेनिंग दार्जिलिंगला होणार होतं. सचिव प्रवीणकुमार आणि शेखरबाबू यांनी पूर्णाच्या कुटुंबीयांना फोन केला. गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणासाठी पूर्णाला दार्जिलिंगला घेऊन जाणार असल्याचे कळवले. आपली मुलगी काही तरी करू पाहतेय, असे म्हणत तिच्या पालकांनी आनंदाने पाठिंबा दिला.

पुढची लहान-मोठी तयारी करून शेखरबाबूंसोबत वीस जणांची टीम दार्जिलिंगला पोहोचली. पूर्णा आयुष्यात पहिल्यांदाच बर्फ पाहत होती. तिने बर्फातून चालून पाहिलं. तिला मज्जा वाटू लागली. पण तिथं ती नुसती मौज करायला गेली नव्हती. तिनं स्थानिक प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेणं गरजेचं होतं. मात्र जेव्हा ती स्थानिक प्रशिक्षकांना भेटली, तेव्हा ते गडबडले. ‘‘अरे, ही लहान मुलं काय करणार आहेत? आम्हाला वाटलं, तुम्ही मोठ्या व्यक्तींना घेऊन येत आहात. ही चिल्लीपिल्ली काय करणार आहेत?’’ पूर्णाला वाटलं, ‘का नाही करू शकणार? जरूर करू शकतो. आता तर उलट करूनच दाखवू.’ तिची जिद्द अधिक वाढली. प्रशिक्षण 20 दिवस चाललं. या प्रशिक्षणाचा भाग म्हणून तिने 17 हजार फूट उंचीचा माऊंट रिनॉकदेखील सर केला. या प्रशिक्षणानंतर अकरा  जणांची गळती झाली आणि फक्त नऊ जणांची पुढच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. त्यात पूर्णाचा समावेश होता.

प्रशिक्षणाचा पुढचा टप्पा तर अधिकच अवघड होता. लडाखमध्ये त्या वेळेस थंडीचे दिवस सुरू होते, उणे 30-35 डिग्री सेल्सिअस तापमान होते. इतकी थंडी असल्याने स्थानिक लोक आपापली गावं सोडून अन्य ठिकाणी जात होते आणि नेमक्या त्याच दिवसांत पूर्णा लडाखला चालली होती. तिथे 15 दिवस प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणात खूप थंडीत, उणे तापमानात कसं तग धरून राहायचं, थंडीशी सामना करण्यासाठी शरीरावर किती स्तरांत कपडे व हातमोजे-पायमोजे घालायचे, ते कसे घालायचे हे शिकवले, टेन्टमध्ये कसं राहायचं या गोष्टींचा अभ्यास केला गेला.

या दोन्ही प्रशिक्षणांनंतर नऊपैकी किती जणांची निवड व्हावी? तर फक्त दोघांची! अकरावीतला आनंद कुमार आणि नववीतली पूर्णा. कुठल्याही साध्यासुध्या नव्हे, तर जगातले सर्वांत उंच शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टच्या चढाईसाठी ही निवड होती. माऊंट एव्हरेस्ट चढायचा असल्याने आणखी एका विशेष प्रशिक्षणाची गरज होती. हे प्रशिक्षण तीन महिने चालणार होतं. शारीरिक तयारीबरोबर मानसिक तयारीही करायची होती.

त्यामुळे तिचा दिवस पहाटेच सुरू व्हायचा. 25 ते 30 किमी धावणे, मग व्यायाम, योगासने, मेडिटेशन आणि उत्तम आहार. या प्रशिक्षणाच्या दिवसांमध्ये तिचा शालेय अभ्यासही सुरूच होता. दरम्यान, एप्रिलमध्ये तिने नववीची अंतिम परीक्षा दिली. परीक्षा झाल्यानंतर शेखरबाबूंनी तिच्या पालकांना बोलावून घेतले. गिर्यारोहणाला जाण्यापूर्वी पालकांची परवानगी घेणं आवश्यक होतं. देवीदास-लक्ष्मी या तिच्या आई-बाबांना समोर बसवून शेखरबाबूंनी माऊंट एव्हरेस्टचे काही फोटो व व्हिडिओ दाखवले. ‘‘या उंच शिखरावर चढण्यासाठी तुमची मुलगी सज्ज आहे. फक्त एकच मुद्दा आहे- ही चढाई अवघड आहे. कदाचित काही अनर्थ घडलाच तर तिथंच मृत्यूसुद्धा येण्याची शक्यता आहे. तिची खरं तर शारीरिक-मानसिक पूर्ण तयारी करून घेतलेली आहे, तरीही तुमची परवानी हवी.’’

शेखरबाबूंचं बोलून होताच देविदास तत्काळ उत्तरले, ‘‘तुम्ही इतके दिवस तिची तयारी करून घेतलीय आणि आता तीसुद्धा एव्हरेस्ट चढाईसाठी सक्षम झाली आहे. शिवाय तुम्हीच तिला घेऊन जाणार आहात. त्यामुळे मला कशाचीही चिंता नाही. माझी मुलगी निश्चितच तुमच्या अपेक्षा पूर्ण करून दाखवेल, यात शंका नाही.’’ वडिलांनी असा विश्वास टाकल्यावर पूर्णाला अधिकच प्रोत्साहन मिळालं. आईला मात्र रडू कोसळलं. पूर्णाने आपल्या आईला विश्वास दिला की, ‘‘तू रडू नकोस मला काही होणार नाही. मी यशस्वी होऊन पुन्हा तुझ्याकडं येणार आहे.’’ शेवटी लेकीच्या जिद्दीपुढं आई विरघळली.

पूर्णाची एव्हरेस्टमोहीम सुरू झाली. माऊंट एव्हरेस्टचे शिखर हिमालयात आहे. एव्हरेस्टच्या एका बाजूने नेपाळ व चीनचा सीमाभागही येतो. एप्रिलच्या 14 तारखेला एव्हरेस्ट बेसकॅम्पवर ती पोहोचली. ती एव्हरेस्टचं शिखर पहिल्यांदाच पाहत होती. पण त्या उंचीने जराही घाबरली नाही. तिथं पाच दिवस टेन्टमध्ये राहून तिने हिमरस्त्यावरून चालण्याचा व्यायाम केला. त्याच दिवसांत बातमी आली- ‘नेपाळच्या बाजूने हिमस्खलन झाल्यामुळे 17 शेरपांचा मृत्यू झाला आहे.’ ही बातमी कळताच प्रवीणकुमार यांनी फोन केला. ‘‘बेटा, तुम्ही परत या. तुमच्या जीवाला धोका आहे.’’ ते म्हणाले.

‘‘सर तुम्हीच म्हणालात ना, आपल्या शाळेतील मुलांसाठी रिव्हर्स गियर नसतो. मृत्यूच्या या बातमीनं मी दु:खी जरूर झाले आहे; मात्र मी माझा आत्मविश्वास, ऊर्जा आणि इच्छाशक्ती गमावू शकत नाही. माझ्यासमोर माझं ध्येय दिसत आहे. आता मी ही चढाई यशस्वी करूनच येणार.’’

या मृत्यूच्या बातमीने तिचं चित्त डगमगलं नाही. गिर्यारोहणाची मोहीम सुरू झाली. जसजसं वर जाता तसतशी ऑक्सिजनची मात्रा कमी होते, त्यामुळे गिर्यारोहकाला ऑक्सिजन सिलिंडरही घेऊन चालावं लागतं. एका सिलिंडरमध्ये चार किलो ऑक्सिजन. असे सहा सिलिंडर व सॅक पाठीवर टाकून पूर्णा एव्हरेस्ट चढू लागली. मात्र त्यातही अनेक अडचणी होत्या. वाटेत दरी लागायची. दरी पार करण्यासाठी शिडी टाकून चालावं लागायचं. त्यांनी पायात घातलेले शूज हे बर्फात चालण्यासाठी अनुकूल असायचे. मात्र या शूजने शिडीवरून चालणं अडचणीचं व्हायचं. पाय सटकला तर थेट दरीतच जाणार.

पण हळूहळू त्यांनी हे आव्हान पार केलं. त्यानंतर ते ॲडव्हान्स बेसकॅम्पवरून कॅम्प एकसाठी निघाले. इथून पुढं हवेतील ऑक्सिजन कमी होतो, सिलिंडर लागतात. ही चढाईदेखील अत्यंत अवघड, कारण यामध्ये तुम्ही उभ्या-सरळ भिंतीसारखं चालत राहता. पूर्णा असं सलग आठ तास चालली. चढत-चढत ती कॅम्प तीनला पोहोचली. त्याला डेथ झोन म्हणतात. कारण इथं सर्वाधिक मृत्यू होतात. कॅम्प तीनवर पोहोचली, तेव्हा तारीख होती 24 मे 2014. त्या रात्रीच 9.30 वाजता ते शेवटच्या चढाईसाठी निघाले. शेवटची रात्र, शेवटचा ट्रेक आणि तोही रात्रीतून. थोडंसं अंतर चालल्यावर पूर्णाला गरगरल्यासारखं झालं. तिने सोबतच्या शेरपांना तसं सांगितलं, पण तिथं बसण्यासाठी कुठलीच सोय नव्हती. एका बाजूला बर्फाचा कडा, दुसऱ्या बाजूला दरी. शेवटी बरंच अंतर पुढं चालून गेल्यावर बसायला जागा मिळाली. पाहिलं तर, तिचा ऑक्सिजन संपलेला होता. तिला दुसरा सिलिंडर लावला आणि पुन्हा ट्रेक सुरू झाला.

ती निडरपणे सलग 52 दिवस चढाई करत राहिली. मोहीम फत्ते व्हायला पंधरा मिनिटांचं अंतर बाकी होतं, नेमक्या त्या वेळी समोर एक मृतदेह दिसला. एवढीशी पोर क्षणभर बिचकली. ‘आपणही इथंच तर मरून पडणार नाही ना... आपण परत जाऊ ना?’ अशी शंका तिच्या मनात आली. पण ते नकारात्मक विचार बाजूला सारत ती पुढे सरसावली.   

...आणि रविवार, 25 मे 2014 च्या सकाळी सहा वाजता ती माऊंट एव्हरेस्टवर पोहोचली. तिने एव्हरेस्टवर झेंडा फडकवला. तिथं उभं राहिल्यावर सगळं जग दिसतंय, असाच भाव तिच्या मनात उमटला. एव्हरेस्टवर चढणं जसं अवघड, तसंच उतरणंही. तीही कामगिरी फत्ते करून पूर्णा बेसकॅम्पमध्ये पोहोचली. तिथून तिनं आपल्या आईला फोन केला, आपल्या मातृभाषेत म्हणाली, ‘‘याडी-बा मं चढगी!’’ (आई-बाबा, मी एव्हरेस्टवर चढले.) तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले.

अभावग्रस्तांच्या वाट्याला आलेलं आयुष्य नववीतल्या या चिमुकल्या पूर्णानं नाकारलं. त्यासाठी कष्ट, जिद्द ठेवली. पूर्णा इथंच थांबली नाही. जगातील सात खंडांतील सात शिखरं जिंकण्याचे ध्येय तिने ठेवले आहे. यातील पाच उंच शिखरे- माऊंट किलिमांजारो (आफ्रिका), माऊंट एलब्रस (युरोप), माऊंट ॲकॉनकाग्वा (दक्षिण अमेरिका), माऊंट कार्टेन्झ पिरामिंड (इंडोनेशिया) आणि अर्थातच माऊंट एव्हरेस्ट तिने पादाक्रांत केले आहेत. उरलेली दोन शिखरंही ती लवकरच गाठणार आहे. या प्रवासात प्रवीणकुमार यांचं मार्गदर्शन आणि शेखरबाबू यांचं प्रशिक्षण कायमच तिच्यासोबत आहे. या दोघांकडून तिला आर्थिक पाठबळही मिळत आहे.

तिच्या या संपूर्ण प्रवासाने थक्क होऊन अभिनेता राहुल बोस याने तिच्यावर ‘पूर्णा’ नावाचा हिंदी व इंग्रजी भाषेतील चित्रपट निर्माण केला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि प्रवीणकुमार यांचं पात्र राहुल बोसनेच केलं आहे. यात पूर्णाची भूमिका आदिती इनामदार या मुलीने केली आहे. संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग पूर्णाच्या मूळ गावी म्हणजे पाकाला इथं झालं. 2017 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला. अनेक समीक्षकांनी चित्रपट नावाजला. इतकंच नव्हे तर, एप्रिल 2019 मध्ये अर्पणा थोटा यांनी तिच्यावर ‘पूर्णा’ हे इंग्रजीतले पुस्तक लिहिले. प्रिझम बुक्स प्रायव्हेट लिमिटेडने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

आता काय- पूर्णा ‘स्टार’ झाली, शिक्षण वगैरे घेत नसणार, असं कोणाला वाटत असेल तर पुढचं ऐका. आज ती अमेरिकेतल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिन्नेसोटा’ इथून इतिहास आणि अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण घेत आहे. बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात आहे. तिला सात शिखरं तर पादाक्रांत करायचीच आहेत, शिवाय सिव्हिल सर्व्हिसेसमध्येही स्थान पटकावयाचे आहे. म्हणजे शिखर गाठलेल्या पूर्णाचे पाय जमिनीवरच आहेत. पूर्णाचे आई-वडील अजूनही शेती करतात. तीदेखील एखाद्या चढाईची तयारी करण्याआधी गावी जाते. शेतात लागेल ते काम करते आणि सहज म्हणते, ‘‘जेव्हा कठीण प्रशिक्षण घ्यायचे असते, तेव्हा माझ्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणे मला आवडते.’’

Tags: Heenakausar Khan Pinjar हिनाकौसर खान पिंजार पूर्णा मलावत purna malvath weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके