डिजिटल अर्काईव्ह

साता-याची पालखी रायगडावर जाते!

विद्यार्थ्यांनी हाती फावडी-खोरी घेतली आणि ते कामाला भिडले. हिरकणी बुरुजाजवळील वाट मोठी करण्याच्या प्रयत्नात भले भले ठेकेदार रामराम करून गेले होते. परंतु प्रा. एम. आर. जाधव, प्रा.यादव यांच्या नेतृत्वाखाली कड्याशी झोम्बाझोम्बी करून जवळ जवळ 4 फर्लांगाची वाट 8 दिवसांत विद्यार्थ्यांनी आकाराला आणली. दुसरीकडे प्रा. मोटे यांच्या नेतृत्वाखाली 20 मुलांचा गट मातीच्या ढिगाऱ्याखाली गुदमरलेल्या छत्रपतींच्या वास्तूंना आईच्या मायेने हाताने गोळा करत होता.

'आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, 
परीसासंगे लोह बिघडले 
लोह परिसची झाले।
चंदनासंगे वृक्ष बिघडले, 
वृक्ष चंदनची झाले॥

...हा अभंग 80 गळयांतून अस्मानाला भिडत होता. गाणारे होते बेलबॉटम मधील तरुण ! कुणाला वाटेल की पंढरपूरची दिंडी आहे. परंतु ही दिंडी होती श्रमकऱ्यांची.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशत संवत्सरी उत्सवाच्या बैठका सचिवलयात होत होत्या. अंदाजपत्रके बाहेर पडत होती. अशा वेळेस सातारच्या स्वामी विवेकानंद संस्थेच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाहूमहाराजांची राजधानी असलेल्या सातारकरांच्या वतीने छत्रपतींच्या राजधानी रायगडला अभिवादन करण्याचा निश्चय केला. दिलीप फडके, अनिल अमणेकर, दिलीप जाधव, नामदेव शिंदे, सदा गोडसे या विद्यार्थ्यांनी आपला फौजफाटा तयार केला व रायगडाकडे कूच केले. 

विद्यार्थ्यांनी रायगडाच्या 10 चौरस मैलांच्या परिसरात परिक्रमा केली. शिवाजीमहाराजांना साथ देणाऱ्या इथल्या मावळयांची स्थिती पूर्वीइतकीच आजही दयनीय आहे! भारत पाक युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या पत्नींना विद्यार्थ्यांनी यावेळी मुजरा केला. 2000 जवान बंधूची पाहणी केली, पहिले महायुद्ध लढलेले काही शेलारमामा भेटले. खेमकरणवर पेंटन टँकचे तुकडे करणारे सूर्याजी- तानाजी भेटले. सेवानिवृत्तीनंतरही हृदयात अभंग आवेश व दंडात विजेची ताकदही आढळली.

ह्या परिक्रमेनंतर विद्यार्थी गडावर पोचले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ गुडघाभर उंचीचे गवत होते. मणेर फुत्कार सोडत होती. विंचू पळत होते. त्रिशत संवत्सरी उत्सवाच्या वर्षीदेखील समाधीची ही अवस्था पाहिल्यावर विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले, मान शरमेने खाली गेली. परंतु श्रमकऱ्यांच्या अंत:करणातल्या रायगडाला जाग आली. हातात खुरपी घेतली व बघता बघता  महाराजांच्या समाधीजवळचा परिसर स्वच्छ झाला. नंतर पहिले काश्मीर युद्ध लढणाऱ्या ब्रिगेडियर निजानंद बाळांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. हिरकणीची कथा महाराष्ट्रातल्या आबालवृद्धांच्या परिचयाची. त्यामुळे उत्सुकतेने लोक हिरकणी बरुजाकडे वळत. पण तेथे जायला वाट नव्हती. निवडुंगाचे बन माजलेले. दगड उचलावा तो दगडाखाली नागराज, खोरे ओढावे तो विंचू नांगी उभारून उभा. परंतु विद्यार्थ्यांनी हाती फावडी-खोरी घेतली आणि ते कामाला भिडले. हिरकणी बुरुजाजवळील वाट मोठी करण्याच्या प्रयत्नात भले भले ठेकेदार रामराम करून गेले होते. परंतु प्रा. एम. आर. जाधव, प्रा.यादव यांच्या नेतृत्वाखाली कड्याशी झोम्बाझोम्बी करून जवळ जवळ 4 फर्लांगाची वाट 8 दिवसांत विद्यार्थ्यांनी आकाराला आणली. दुसरीकडे प्रा. मोटे यांच्या नेतृत्वाखाली 20 मुलांचा गट मातीच्या ढिगाऱ्याखाली गुदमरलेल्या छत्रपतींच्या वास्तूंना आईच्या मायेने हाताने गोळा करत होता. छत्रपतींच्या वास्तूत एक दगडी पणती सापडली. एक दिवस गिरिविहार संस्थेच्या मदतीने गिर्यारोहणाच्या साहसांचा विद्यार्थ्यांना अनुभव दिला. 80 फुटांचा सरळसोट कदा हा हा म्हणता चढून-उतरून जाण्याची स्पर्धाच विद्यार्थ्यांत लागली. 

बघता बघता 10 दिवस संपले. सातारकरांची दिंडी परतीला लागली. टिकाव फावड्यांच्या झांजा घेतलेली ही दिंडी रायगड परिसरातील धारकरी बदामाच्या मेळाव्यासाठी महाडला थांबली. भारतमातेचे सौभाग्य अखंड ठेवण्यासाठी विधवा झालेल्या वीरबाला, पुत्र माता, पाय तुटलेले, डोळे गेलेले जवान- अशांचा हा मेळावा होता! आपली दोन मुले युद्धात गेल्यावर सुनांचे कन्यादान करणारे सुभेदार मोऱ्यांसारखेन शेलारमामा या शिबिरात उपस्थित होते. प्रत्येक जवानाची मान स्वाभिमानाने ताठ होती. होति फक्त परत न लढता येण्याची खंत. प्राचार्य कुऱ्हाडे हे श्रमकरी विद्यार्थी व धारकरी महाडकरांच्या मेळाव्याचे पूरक होते. या शिबिराचे वैशिष्टय म्हणजे ब्रिगेडियर निजानंद बाळांसारखा 63 वर्षाचा वृद्ध तरुण आनंदाची सावली शिबिरावर पांघरून होता. मेजर पाटणकर व ब्रिगेडियर बाळ यांनी आधुनिक युद्धतंत्राची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. चीनचे आव्हान समजावून सांगितले. अरब-इस्त्रायल युद्धाचा आढावा घेतला. भारत-पाक युद्धाचा शोधबोध घेतला. या शिबिरात जनरल बाळांसारखा नावलौकिक पावलेला धारकरी होता. विनोबाजींच्या सावलीत वाढलेला तरे गुरुजींसारखा सर्वोदयीही होता. बाबासाहेब पुरंदरे यांच्या सहवासात शिवप्रेम अंतःकरणात साठवलेला जीवन देणारा मळेकर गुरुजींसारखा शिवभक्त होता. 

शिबिराचे 10 दिवस अखंड उत्साह, हसणे, खिदळणे, रागावणे, रुसणे सर्वच होते. सह्याद्रीचे रौद्र सौंदर्य निसर्गाकडे विद्यार्थ्यांना आकर्षित होते. शिबिराची सांगता प्रकाश मोहाडीकरांच्या डोळयांतून झरलेल्या आनंदाश्रूंनी झाली.शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू भोगीयन यांच्या शाबासकीने विद्यार्थी धन्य झाले. बापूजी साळुंखे यांनी प्रेरणा दिल्यानेच भवानी विद्या मंदिरातून निघालेली दिंडी शिवछत्रपतींना श्रमसंस्काराचा सक्रिय मुजरा करून सातारला कुशल पोचली.

Tags: Babasaheb Purandare Giryarohan Hirkani Buruj Shelarmama Lalbahadur Shatri College Satara Chhatrapati Shivaji Maharaj Pandharpur बाबासाहेब पुरंदरे गिर्यारोहण शेलारमामा हिरकणी बरुज लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातार छत्रपती शिवाजी महाराज पंढरपूर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके