लालजींच्या स्वभावाप्रमाणे मधून मधून त्या तरुण मुलाच्या खोलीवर चकरा होत. हळूहळू हे दत्तक वडिलत्व इतक्या जवळ जात असे की प्रेमाची लफडीसुध्दा लालजींना सांगून तरुण मुले मोकळी होत. मग लालजी वरपित्याच्या थाटात मुलीच्या बापाकडे जाऊन समजूत काढीत. बघता बघता लालजी या दत्तक मुलांसाठी मंगल कार्यालये शोधत.
बघता बघता आवाबेन पटकन निघून गेल्या आणि ममतेला ग्रहण लागले. अंबिके निवर्तले आणि शिस्तबध्द जीवन शिकवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा लोप झाला. लालजी कुलकर्णी दीर्घ आजाराने आम्हाला सोडून गेले. तरूण कार्यकर्त्यांचे वात्सल्य-निधानच हरपले. वडिलकीचा दरारा व धाक कोण दाखवणार? सेवा दलाची कर्ती पिढी हळूहळू काळ उचलून नेत आहे हे पाहून काळजात चर्रचर्र व्हायला लागते. लालजींच्या निधनाने तर अनेक तरुणांना पोरके झाल्यासारखे वाटू लागले. काकाकुवा मॅन्शनच्या व्हरांड्यातील लालजींच्या ऑफिसमधला मेळावा आता ओका ओका वाटू लागला. लालजींची जाकिटातील थोराड शरीराची मूर्ती त्या दरबारात आता दिसणार नाही, या भावनेने मन सुन्न होऊन लालजींच्या प्रिय काकाकुवा मॅन्शनकडे जाण्यास पावले ही तयार होत नाहीत!
लालजी एक परिवारिक आधार!
लालजींच्या व्यक्तिमत्त्वात असे काय होते की ज्याची ओढ आम्हा तरुणांना वाटावी? लालजींनी व्यासपीठे गाजवली नाहीत, हशा- टाळ्यांची भाषणे केली नाहीत, सत्तेचे सिंहासन कधीच प्राप्त केले नाही. केली ती अखंड धडपड व सायकल यात्रा! लालजींनी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतही पक्ष कार्यासाठी फार मोठी भ्रमंती केल्याचे मला आठवत नाही. असे असूनही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील समाजवाद्यांना लालजी अगदी घरच्यासारखे वाटत. लालजी आपल्या परिवाराचे सदस्य केव्हा बनून गेले हेसुध्दा कळत नसे इतकी जवळीक लालजींनी महाराष्ट्रातील समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांच्या घरांत निर्माण केली होती.
याचे रहस्य लालजींच्या कौशल्यपूर्ण पक्ष बांधणीत आहे. लालजी आपल्या पक्षाला एक निवडणूक जिंकणारी यंत्रणा, मोर्चे काढणारी चळवळ मानत नव्हते. पक्ष हा भाव- बंधनांनी बांधला जातो, माणूसकीचा परिवारिक भावनेचा धागाच कार्यकर्त्यांना जोडतो हे लालजींना माहित होते. समाजवादी कार्यकर्त्यांची मुले शिकण्यासाठी पुण्याला येत. त्या अफाट शहरात आल्यानंतर बावचळून जात, बिचाऱ्या कार्यकर्त्यांच्या पुण्यात ना ओळखीपाळखी. कुणाकडे जावे या संभ्रमात कार्यकर्ते पडत. मग काकाकुवा मॅन्शनच्या पक्ष कचेरीचा दरवाजा ठोठावत. तेथे त्यांची गाठ लालजींशी पडायची. लालजी या खेड्यापाड्यातून आलेल्या कार्यकर्त्यांना धीर देत म्हणत, "अरे तुझा मुलगा हा माझाच मुलगा आहे. चिंता करू नकोस. आजपासून तुझा मुलगा पुण्यात असेपर्यंत मला त्याचा दत्तक बाप समज." लालजींच्या मग त्या मुलाबरोबर भ्रमंत्या सुरु होत. कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवून देणे, खोली मिळवून देणे, प्रसंगी आर्थिक मदत देणे, नोकरी मिळवून देणे, अशी असंख्य कामे त्या मुलांची लालजी करू लागत.
लालाजींच्या स्वभावाप्रमाणे मधून मधून त्या तरुण मुलाच्या खोलीवर चकरा होत. हळूहळू हे दत्तक वडिलत्व इतक्या जवळ जात असे की प्रेमाची लफडीसुध्दा लालजींना सांगून तरुण मुले मोकळी होत. मग लालजी वरपित्याच्या थाटात मुलीच्या बापाकडे जाऊन समजूत काढीत. बघता बघता लालजी या दत्तक मुलांसाठी मंगल कार्यालये शोधत. 'नांदा सौख्यभरे' असा आशीर्वाद देऊन हळूच पोडश वर्षे पुत्रे मित्रवत् आचरेत् या न्यायाने लालजी पोराला व सुनबाईंना खुशखुशीत भाषेत कुटुंब- नियोजन कसे करावे याचेसुद्धा दिलखुलास भाषण देऊन टाकत! मग हळूहळू त्या मुलाच्या सासुरवाडीची माणसेही लालजींची पाहुणे बनत. लालजी हे दत्तक वडीलपण गाजवत असताना नेहमी राजकीय चर्चा करीत. मुलाला त्याच्या घरातील समाजवादी शीलाची ते जाणीव देत. चुकते पाऊल फिरवून, जाणारा तोलही सावरण्यास मदत करत. कधी त्यांची शब्दांची गोलंदाजी डोक्यात राग आणायची परंतु काही दिवसांनी लालजी पत्र पाठवून चौकशी करत. मग वाटायचे लालजींचे बरोबर होते. आपणच चुकत होतो.
लालजींचं गालातलं हसणं
जेव्हा प्रजा- समाजवादी पक्ष दुभंगला तेव्हा आम्हा तरुण मित्रांची ओढाताण होत असे. पासोड्या विठोबाजवळच्या संयुक्त- समाजवादी पक्षाच्या कचेरीत भाई वैद्यांचे सळसळते चैतन्य असायचे तर काकाकुवा मॅन्शनमध्ये लालजीचं 'भीतियुक्त आदराचं' व्यक्तिमत्त्व असायचं. लालजी भेटल्यावर मी सांगून टाकत असे, "लालजी, भाईला भेटून आलो." लालजी गालात हसत व म्हणत, "हे पहा. भाई तुमच्याइतकाच मलाही जवळचा आहे. राजकीय मतभेद हे स्नेह- बंधनांत अडसर ठरू नयेत." लालजींजवळची ही सहिष्णुता, हे प्रेम त्यांचं सर्वांत मोठं लेणं होतं. लालजींना सत्ता कधी नकोच होती. त्यामुळे सत्तेच्या राजकारणाची अशा प्रसंगी चर्चा टाळून ते म्हणत, "हा आपला समाजवादी परिवार आहे. भाऊ वेगळे झाले तरी आई एकच असते. तसंच समाजवादी विचाराची व्यक्ती कोणत्याही पक्षात असो, ती समाजवादी आहे म्हणून मला जवळजी आहे."
प्रधानांच्या विजयाचे रहस्य
लालजी कार्यकर्तेच खरे. तरुण पिढीशी त्यांचा संबंध होता. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घरातील नवीन पिढी समाजवादी राहावी हा त्यांचा ध्यास होता. या ध्यासापायीच ते दत्तक वडील बनत व त्यामुळेच भावनेच्या ओलाव्याने माणसे बांधली जात. प्राध्यापक ग. प्र. प्रधान यांनी तीन वेळा पदवीधर मतदार संघांतून जो विजय मिळवला त्याचे श्रेय सौजन्यमूर्ती प्राध्यापक प्रधानांच्या ऋजू व्यक्तिमत्वाइतकेच, लालजींनी जे दत्तक वडिलत्व केले त्यालाही जाते. लालजींनी आपली मानलेली मुले पदवीधर मतदार संघाच्या विशाल मतदार संघात कामाला लागत. लालजींचा शब्द पित्याचा शब्द मानत आणि म्हणूनच प्राध्यापक प्रधानांना विजयाची हॅटट्रिक करता आली आणि हा मतदार संघ समाजवाद्यांनी काबीज करून दाखवला.
आता लालजींसारखे दत्तक वडील नाहीत. खेड्यापाड्यांतील निरनिराळ्या जिल्ह्यांतील पुण्यात येणाऱ्या कार्यकर्त्यांचा आधारच कोसळला. दत्तक वडिलत्वच गेले.
बापाला भेटायला भिता का?
लालजींचे आणीबाणीतील कार्य अत्यंत मोलाचे होते. त्यांचे त्यावेळी सर्व धैर्य उफाळून आले होते. दिल्लीला रामलीला मैदानावर झालेल्या जे. पी. च्या भाषणाची ध्वनि-मुद्रित फीत पुण्यात माझ्या परिचयाच्या एका नातेवाईकाजवळ होती. लालजींना मी हे सांगितले. लालजींनी त्वरित त्या नातेवाईकाला आपल्या श्वशुरपदाची रोखठोक जाणीव दिली आणि मग 'अल्बम' या सांकेतिक भाषेने शेकडो ध्वनि-फिती त्यांच्याकडून मुद्रित करून लालजींनी निरनिराळ्या जिल्ह्यात पाठवल्या. आणीबाणीच्या भीतीमुळे काकाकुवा मॅन्शनमध्ये जायला लोक भिऊ लागले. परंतु लालजी मग घरी येत व सांगत "अरे आपले नाते हे कृत्रिमच होते असे मी मानू का? तू मला दत्तक बाप मानतोस ना. बापाला भेटायला भ्यायचे कशाला?" मग भीती दूर होत असे आणि हळूच पाकिटांतून काही नोटा लालजींच्या हातात सरकवल्या जात व ते पैसे आणीबाणीग्रस्त कुटुंबाच्या घरात जात. त्याच वेळेस काकाकुवा मॅन्शनच्या गच्चीवर ध्वजवंदनाचा साप्ताहिक कार्यक्रम ते करत व परगावच्या आपल्या मुलांना पत्रे टाकून काही वेळा बोलावून घेत. हळूहळू आणीबाणीची भीती ते दूर करू लागत.
पोरकेपणाची जाणीव
लालजी जाऊन आता महिना होईल, वर्षे होतील. परंतु आम्हा मुलांना मात्र पुण्यात आल्यावर पोरकेपणाची जाणीव होईल. कुलाबा असो, नाशिक असो, कोल्हापूर असो, उस्मानाबाद असो- सर्व ठिकाणी धडपणाऱ्या मुलांना लालजींच्या मृत्यूनंतर पोरकेपणाची जाणीव निर्माण झाली. तळच्या कार्यकर्त्यांना समजावून घेणारा व बड्या कार्यकर्त्यांशी त्यांचे संबंध जोडून महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांचा संच बनवणारा एक दुवाच नाहीसा झाला आहे.
लालजींचा अधिकार
लालजी व मी अलिबागला गेलो होतो. पुण्याचे माजी महापौर बबनराव परदेशी हे आपल्या व्यापाराच्या निमित्ताने तेथे आले होते. बाजारात गाठ पडली. लालजींना बबनरावांनी विचारले, लालजी पुण्याला केव्हा परतणार? लालजी म्हणाले "उद्या सकाळी." सकाळी 6 वाजता बबनराव परदेशी आपल्या गाडीसहीत हजर! ते म्हणाले, "लालजींची सेवा करण्याची दुसरी कोणती संधी मिळणार? लालजींनी मला सेवा दलात सार्वजनिक जीवनाचे धडे दिले आहेत.” लालजींचा माझ्या घरातील अधिकार एवढा मोठा की माझा भाऊ कृष्णा परदेशीला माझ्याविरुद्ध उभे केले व मातोश्रीला केले प्रचारक!
लालजींचे हे वडिलपण लोकमान्य होते म्हणूनच पोरवाडीचा पारेख, नगरचा विनय प्रधान, औरंगाबादचा राम जाधव, पनवेलचा रमणशेठ, माणिक पाटील यांनी हुंदके दिले. लालजींच्या पितृत्वाला जात- पंथ नव्हते. त्याला होती ती वात्सल्याच्या तुपाची धार!
आजारात शुश्रुषा करावी लालजींनी! मुलं आजारी पडली की लालजी बैचीन होत. सायकल धावे डॉ. वासू देशपांडेकडे! मग अनेक कन्सलटंट! फी- माफी! लालजी ही सर्व कामे चतुराईने करत. मुले बरी झाल्यानंतर वडिलांना कळवीत चिरंजीव दुखण्यातून उठले.
ना खंत ना खेद
शाळेला वक्ता हवा, उद्घाटनला पाहुणा हवा, लायसेन्स पाहिजे, बँकेचे कर्ज हवे, - शेकडो कामे लालजींना करावी लागत, लोक कृतज्ञता ठेवीत नसत! स्वार्थासाठी लालजींचा उपयोग करून घेत. लालजींना हे समोर दिसत असे पण लालजी त्याबद्दल ना खंद, ना खेद या अलिप्त वृत्तीने पहात. त्यांना समाधान मी पितृ कर्तव्य केल्याचे!
लालजींसारखा दत्तक वडील होणे नाही हेच खरे- लालजी वरुनही सांगतील ब्रेव्हो! आगे बढो!
Tags: जयप्रकाश नारायण रामलीला मैदान दिल्ली राष्ट्र सेवा दल ग. प्र. प्रधान Jaiprakash Narayan लालजी कुलकर्णी Ramlila Maidan Delhi Rashtra Seva Dal G. P. Pradhan Lalji Kulkarni weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या