डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शाहू छत्रपतींची बदनामी वेदोक्त प्रकरणामुळे अधिक करण्याचा विडा उच्चवर्णीयांनी उचलला होता. डॉ. रमेश जाधव यांनी हे तारीखवार सर्व घटनाक्रम दाखवून सिद्ध केले की शाहू छत्रपतींनी जातिधर्म निरपेक्ष समाजरचना अस्तित्वात यावी यासाठी जिवाचे रान केले. सत्यशोधक समाज आर्यसमाज या पुरोगामी चळवळींना आर्थिक व मानसिक पाठबळ दिले. महाराजांचे मित्र भास्करराव जाधव, प्रबोधनकार ठाकरे, दिनकरराव जवळकर, हरी सखाराम तुंगार, दत्तोबा पवार अशा बुलंद कार्यकर्त्यांची फौज शाहू छत्रपतींनी आर्यसमाज व सत्यशोधक समाजाला पुरविली.

'आम्ही सर्व हिंदी आहोत. हिंदी प्रजाजन कोणत्याही वर्णाचे असोत, कोणत्याही धर्माचे असोत, ते सर्व हिंदी आहेत. व्यक्तीच्या दृष्टीने धर्माची बाब महत्त्वाची असेल पण राष्ट्रीय बाबतीत ती केव्हाही आड येता कामा नये.'- छत्रपती शाहू महाराज

वरील वाक्य कोणत्याही गांधीवादी अगर साम्यवादी विचारसरणीने संस्कारित झालेल्या व्यक्तीचे नसून हे वाक्य 1910 सालापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी उच्चारलेले आहे. हे वाक्यच शाहू महाराजांचे आजच्या संदर्भातील द्रष्टेपण दाखविण्यास पुरेसे आहे.

मायावती व काशीराम यांच्या बहुजनसमाज पक्षाने उत्तर प्रदेशात आपल्या सहा महिन्यांच्या काळात दक्षिण महाराष्ट्रातील शाहू छत्रपतींचे नाव जिल्ह्याला देणे, विद्यापीठाला शाहू महाराजांचे नाव देणे या सर्व गोष्टींबद्दल मला औत्सुक्य होते. योगायोगाने डॉ. रमेश जाधव यांचा 'लोकराजा शाहू छत्रपती' हा सुरेश एजन्सीने प्रकाशित केलेला चरित्रग्रंथ हाती आला. धनंजय कीरांचेही शाहू छत्रपतींवरील चरित्र वाचले होते. 

डॉ. रमेश जाधव हे नवीन पिढीतील सत्यशोधकी परंपरेतील तरुण विचारवंत आहेत. डॉ. रमेश जाधव यांनी असंख्य संदर्भग्रंथ, मुळ कागदपत्रे, त्यांचे तारीखवार पुरावे देऊन पूर्ण तपशिलात जाऊन शाहू महाराजांसारख्या लोकोत्तर महापुरुषाचे चरित्र लिहून आजच्या परिस्थितीच्या संदर्भात छत्रपती शाहू महाराजांचे योगदान किती मोलाचे होते, हे दाखवून दिले आहे. 

प्रस्तावनेत डॉ. य. दि. फडके यांनी सांगितल्याप्रमाणे शाहू महाराज केवळ 'मिथ' नाही. छत्रपती शाहूमहाराजांच्या जीवनचरित्राचा अभ्यास, त्यांच्या काळाच्या मर्यादित, ब्रिटिशांचा संस्थानिकांवर असलेला दबाव, ब्रिटिशांनी आखून दिलेल्या चौकटीत काम करणे, समाजहित जोपासणे हे अवघड होते. आपल्या देशात ब्रिटिश मुलखात वाढलेल्या सर्वच लोकांची दृष्टी संस्थानिकांकडे तिरकसपणे पाहण्याची होती व आहे आपण महाराजा सयाजीराव गायकवाड, जिवाजीराव सिंधिया, बाळासाहेब पंतप्रतिनिधी, म्हैसूरचे वाडीयार, त्रावणकोरचे महाराज व शाहू छत्रपती आदींच्या कार्याचे मूल्यांकन करण्यात कमी पडलो असे वाटते. 

1857 नंतरही भारतीय संस्थानिकांवर इंग्रजांचा वरचष्मा होता. संस्थाने खालसा करण्याचीही भीती संस्थानिकांच्या मनात होती. शाहू छत्रपतींच्या पूर्वीच कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज, यांचा ब्रिटिश सरकारकडून छळ झाला. त्या छळाच्या अन्यायाविरुद्ध टिळक-आगरकरांनी आवाज उठविला म्हणून 101 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा त्यांना भोगावी लागली. यावरूनच लक्षात येईल की ब्रिटिश सरकार संस्थानिकांच्यामध्ये कोणतीही स्वातंत्र्याची अस्मिता राहणार नाही व संस्थानिक स्वातंत्र्य चळवळीला मदत करणार नाहीत याची सावधानता बाळगत. 

इंग्रजांनी कैद केलेल्या व छळ केलेल्या चौथ्या शिवाजी महाराजांचे दत्तक पुत्र शाहू महाराज होते. शाहू महाराजांचेच नव्हे तर भारतातील प्रत्येक संस्थानिकाचे शिक्षण इंग्रज शिक्षकांच्या कडक शिस्तीखाली झाले होते. हे इंग्रज शिक्षक संस्थानिकांची मानसिकताच बदलून टाकीत. ही मानसिकता सरंजामदारी वृत्तीची असे. परिणामी शिकार, प्रवास, रेस, बहुविवाह अशा मर्यादित रिंगणातच संस्थानिक वावरतात, असा गैरसमज हा त्यांच्या शिक्षणपद्धतीमुळे जनमानसात दृढमूल होत होता. या विकृत दृष्टीमुळेच लोकराजा शाहू छत्रपतींना इतिहासाचा निःपक्षपाती न्याय पुरोगाम्यांकडून मिळाला नसावा. 

डॉ. रमेश जाधव यांनी शाहू छत्रपतींच्या पुरोगामी सामाजिक कामाची नोंद प्रामुख्याने घेऊन महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील शाहू छत्रपतींची ऐतिहासिक भूमिका विश्लेषित केली आहे. सांप्रदायिक शक्ती छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचे अन्वयार्थ आपल्याला अनुकूल असे लावतात. पुरोगामी चळवळीचे धुरंधर या ऐतिहासिक व्यक्तींच्या विचारांचा वारसा आपल्या वैचारिक वारशासी जुळणारा आहे, हे विसरतात. परिणामी, जात्यंध शक्ती या महापुरुषांना चलनी नाणे म्हणून वापरून मैदानाचा फड मारतात. हे लक्षात घेऊनच डॉ. रमेश जाधव यांनी शाहू छत्रपतींची वेगळी पुरोगामी प्रतिमा साधार पुराव्याने प्रकाशात आणली आहे. 

शाहू छत्रपती यांना 'फ्रेजर' या इंग्रज शिक्षकाचे कुशल मार्गदर्शन मिळाल्यामुळे व त्यांनी पुरा भारत दाखवल्यामुळे शाहू छत्रपती यांना आपल्या प्रजेच्या समस्या समजणे सोपे झाले. शाहू छत्रपतींना ब्राह्मणद्वेष्टे म्हणविणाऱ्यांना हे माहीत नाही की शाहू छत्रपतींना आचार्य कृष्णाजी भिकाजी यांच्यासारखे गुरू मिळाले. शाहू छत्रपतींनी राज्यारोहण समारंभात आपल्या प्रजेला स्वातंत्र्य, समता व न्याय यांची हमी दिली. मिजासखोर इंग्रज अधिकारी, काही वर्ण श्रेष्ठत्वाने ब्राह्मण अधिकारी यांना जनतेशी न्यायाने वागू दिले. 

शाहू छत्रपतींच्या 71 अधिकाऱ्यांत 60 ब्राह्मण होते. खाजगी नोकरीतील 52 पैकी 45 ब्राह्मण होते. त्यांच्या कारकिर्दीत संस्थानात 79.1% ब्राह्मण, 8.6% मराठा, 1.5% कुणबी, 7.5% मुस्लिम, 10.1% जैन लिंगायत शिकलेले होते. जर शाहू छत्रपतींनी ब्राह्मणद्वेष केला असता तर हे प्रमाण विषम झाले असते. त्यांनी कोकणातील भास्करराव जाधव, दाजीराव विचारे आणि रघुनाथ सबनीस हे तीनच अधिकारी नव्याने नेमले. शाहू छत्रपतींनी आपल्या संस्थानच्या उत्पन्नापैकी 4% रक्कम शिक्षणावर खर्च केली. राजाराम कॉलेजमध्ये असलेल्या 61 विद्यार्थ्यांत 55 ब्राह्मण होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक जातीला आपला शैक्षणिक विकास करून घेण्याची संधी मिळावी म्हणून 21 वसतिगृहे सुरू केली. यामध्ये मागासलेल्यांना मदत करण्याचा हेतू होता. बहुजनसमाजात शिक्षणाचे काम करणारे कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बापूजी साळुखे हे दोघे बोर्डिंगमध्ये शिकले, आनंदीबाई जोशींना व डॉ. आंबेडकरांनाही त्यांनी शिष्यवृत्त्या दिल्या. 

बहुजनसमाजाच्या शिक्षणासाठी त्या काळातील जातिव्यवस्थेची चौकट दिली करत वसतिगृहे काढली हा काही ब्राह्मण द्वेष नव्हे, दुबळ्यांना मदत करणे हा गुन्हा नव्हे. त्या काळात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले व त्याचे संचालन र. न. आपटे नावाच्या संचालकांकडे सोपविले. शिक्षणाशिवाय आपल्या प्रजेला पर्याय नाही हे त्यांनी ओळखले. शाहू छत्रपती यांनी वसतिगृहे काढल्यामुळे यशवंतराव चव्हाण, बी. डी. जत्ती, बाळासाहेब देसाई ही बहुजनसमाजातील मंडळी शिक्षित होऊन बहुजनसमाजाचे नेतृत्व करू शकली. 

शाहू छत्रपतींचे सर्वांत मोठे काम अस्पृश्यता निर्मूलनाचे. डॉ. आंबेडकरांना त्यांनी माणगाव येथे 1920 साली अस्पृश्यांची परिषद भरविण्यासाठी मदत केली पंढरपूरच्या देवस्थानच्या नैवेद्याचा खर्च बंद करून ती रक्कम अस्पृश्यांच्या शिक्षणांसाठी खर्च केली. इतकेच नव्हे तर शाहू छत्रपतींनी आपल्या वाड्यातील कुलदेवता भवानी मातेचे मंदिर अस्पृश्यांना खुले केले. इतकेच नव्हे तर संस्थानातील आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. सर्व मुख्याध्यापकांना सक्त ताकीद केली की कोणत्याही अस्पृश्य विद्यार्थ्याचा छळ होता कामा नये. महार-वतन कायद्याने नाहीसे केले. अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद करून संस्थानाच्या नोकरीतील 50% जागा त्यांनी सर्व मागासजातींना खुल्या केल्या. शाहू महाराजांनी 'बोले तैसा चाले' या उक्तीप्रमाणे शिक्षणातील आणि व्यवसायातील सामाजिक विषमता निर्मूलनाचे महान कार्य केले. 

शाहू महाराजांनी वंचितांच्या विकासाबरोबर शेती विकास व दुष्काळी कामालाही प्राधान्य दिले. आपल्या दोन्ही राजपुत्रांना, राजाराम महाराज व शिवाजी महाराज यांना, अलाहाबादच्या शेती विद्यालयात दाखल केले. इंग्लंडमध्ये रॉयल अ‍ॅग्रिकल्चर सोसायटी ऑफ इंग्लंड या ख्यातनाम शेती संशोधन संस्थेने आपले सन्माननीय सभासदत्व शाहू छत्रपतींना अर्पण केले. कर्जवसुलीसाठी सावकाराने शेतकऱ्यांचे उभे पीक जप्त करण्याची दुष्ट पद्धत त्यांनी बंद केली. भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरीचे धरण बांधण्यास प्रारंभ केला. कोल्हापूर जिल्ह्यातील क्रांतीचे जनक शाहू छत्रपती होते, हे अनेक उदाहरणांनी डॉ. रमेश जाधव यांनी या पुस्तकात सिद्ध केले.

छत्रपती शाहू महाराजांनी शेतीमालाची विक्री, उत्तम जनावरांची पैदास, शेती प्रदर्शन अशा योजना आखल्या. जयसिंगपूर व शाहूपुरी या व्यापारी पेठा उभ्या केल्या, यांवरून लक्षात येईल की छत्रपती शाहू महाराजांनी भविष्यकाळाचा वेध घेऊन आपल्या द्रष्टेपणाचा प्रत्यय दिला. शाहू महाराजांबद्दल अपसमज पसरवण्याचे मोठे कारण वेदोक्त प्रकरण आहे. या ठिकाणी वेदांतील मंत्र म्हणून घेण्याच्या आग्रहापेक्षा समानतेचा आग्रह हा महत्त्वाचा आहे. डॉ. आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्यावर सत्याग्रह करताना सांगितले आहे, 'तुमच्या तळ्याचे पाणी पिऊन आमचे पितर स्वर्गात जातील असे नाही, परंतु जे पाणी डुकरांना, कुत्र्यांना पिण्याची परवानगी आहे ते पाणी आम्ही माणूस असून आपण नाकारता. आमच्या माणूसपणाच्या हक्कासाठी आम्ही या पाण्याला स्पर्श करतो.'

शाहू महाराजांच्या दृष्टीने वेदाच्या मंत्रापेक्षा शूद्रांनाही मंत्र म्हणण्याचा माणुसकीचा अधिकार आहे हे महत्त्वाचे होते. मानवी समानतेचा तो हुंकार होता, त्यामागे ब्राह्मणद्वेष नव्हता वर्ण वर्चस्वाविरुद्ध शाहू महाराजांचा लढा होता. शेवटच्या श्वासापर्यंत शाहू महाराजांनी सामाजिक समता आचारणात आणली त्यांनी आपल्या ब्राह्मण अधिकाऱ्यांचा छळ केल्याचे कोणतेही उदाहरण आजही उपलब्ध नाही. नारायणराव राजोपाध्यांनाही अनेक संधी दिल्या होत्या.

शाहू छत्रपतींची बदनामी वेदोक्त प्रकरणामुळे अधिक करण्याचा विडा उच्चवर्णीयांनी उचलला होता. डॉ. रमेश जाधव यांनी हे तारीखवार सर्व घटनाक्रम दाखवून सिद्ध केले की शाहू छत्रपतींनी जातिधर्म निरपेक्ष समाजरचना अस्तित्वात यावी यासाठी जिवाचे रान केले. सत्यशोधक समाज आर्यसमाज या पुरोगामी चळवळींना आर्थिक व मानसिक पाठबळ दिले. महाराजांचे मित्र भास्करराव जाधव, प्रबोधनकार ठाकरे, दिनकरराव जवळकर, हरी सखाराम तुंगार, दत्तोबा पवार अशा बुलंद कार्यकर्त्यांची फौज शाहू छत्रपतींनी आर्यसमाज व सत्यशोधक समाजाला पुरविली. 

डॉ. रमेश जाधव यांच्या एका प्रकरणाबाबत मात्र सर्वांचे मतभेद होतील. शाहू छत्रपतींनी क्षात्रजगद्गुरू निर्माण केले. हे त्यांच्या पुरोहितशाही वर्चस्वाच्या मनोवृत्तीच्या विरुद्ध आहे. शाहू छत्रपतींच्या सहकार्यांना ही कल्पना मान्य नव्हती. डॉ. रमेश जाधव यांचे हे समर्थन लटके आहे. 

लोकमान्य टिळक व शाहू छत्रपती यांतील मतभेद आगरकर व टिळक यांच्या विचारांसारखेच होते. लोकमान्य टिळकांना सामाजिक सुधारणेपेक्षा राजकारणाला व राजकीय स्वातंत्र्याच्या लढाईला महत्त्वाचे स्थान द्यायचे होते. शाहू महाराजांना वेदोक्तप्रकरणामुळे जातीय अहंकाराचे चटके बसले. त्यांनी सामाजिक समतेचा लढा चालवला. लोकमान्यांना त्यांची टोकाची भूमिका मान्य नसावी, परंतु शाहू छत्रपतींनी क्रांतिकारकांना मदत केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीला आपली संपत्ती खुली केली. शाहू छत्रपतींचा काळ हा इंग्रजांच्या कडक प्रशासनाचा काळ होता. ती अव्वल इंग्रजी आमदनी होती. त्यामुळे संस्थानिकांना कोणतेही पाऊल उचलताना आपल्या राज्याची व प्रजेची सुरक्षितता लक्षात घेऊन काळानुरूप वागावे लागत होते. हे आपण लक्षात घ्यायला हवे. 

डॉ. रमेश जाधव यांनी लिहिलेले लोकराजा शाहू छत्रपती हे चरित्र प्रत्येकाने मुळातून वाचावे. शाहू छत्रपतीबद्दलचे पुनर्मूल्यांकन आपण सर्व जण करू शकू. केवळ काशीराम व मायावती यांनी शाहू छत्रपतींना आपले आदर्श मानले म्हणून नव्हे तर मंडल आयोगाच्या समर्थकांनी व विरोधकांनीही लोकराजा शाहू छत्रपती सामाजिक समतेच्या संघर्षातील एक तेजस्वी दुवा होते, याची नोंद ठेवावी.

लोकराजा शाहू छत्रपती
डॉ. रमेश जाधव
सुरेश एजन्सी, पुणे.
मूल्य : रुपये 375/-

Tags: पुरुषोत्तम शेठ सुरेश एजन्सी डॉ. रमेश जाधव छत्रपती शाहू महाराज purushottam sheth suresh agency lokraja shahu Chhatrapati book Ramesh Jadhav Chhatrapati shahu maharaj weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके