डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शंकर सारडा साठीच्या उंबरठ्यावर...

स्वतःच्या कौटुंबिक जीवनाबाबत ते क्वचितच बोलतात. परंतु, मित्रांच्या मुलांची प्रगती, त्यांचे व्यवसाय यात ते रस घेतात. त्यांना आईवडिलांच्या धाकापासून मुक्त करून व्यवसायातील धोकेही समजावतात. शंकर सारडांचे स्वतःचे भावजीवन डॉ. निर्मला सारडांमुळे संपन्न झाले.

साधनेचे संस्थापक साने गुरुजी यांच्या हाताचा स्पर्श ज्यांच्या संवेदना जागवून गेला, अशा घडपडणाच्या मुलांतील शंकर सारडा हे एक भाग्यवान. डहाणूला वयाच्या बाराव्या वर्षी गुरुजींच्या शेजारी बसून जेवता-जेवता त्यांचे बालवय संस्कारित झाले. शंकर सारखांचा व साधना परिवाराचा न तुटणारा आठवणींचा धागा आहे. शंकर सारडांना 'अरे शंकर' या नावाने हाक मारू शकणाऱ्या, [एकेरी संबोधनाने त्यांना उललेखणाऱ्या दोनच व्यक्ती आहेत. एक साधनेचे माजी संपादक यदुनाथ थत्ते व दुसरी शंकर सारडांची आई- जिजी.

रावसाहेब पटवर्धन, प्रभाकर पाध्ये, जयप्रकाश नारायण यांचे विचार उतरून घेत असतानाच सारडांच्या मूळच्या चिंतनशील स्वभावाला सामाजिकतेची बैठक मिळाली. माणूस कोणाच्या सहवासात वाढतो. यावरूनही त्याची उंची कळते. शंकर सारडांना प्रभाकर पाध्येसारख्या व्यासंगी, चिकित्सक, व्यक्तिस्वातंत्र्यवादी विचारवंतांचा प्रदीर्घ सहवास मिळाला. त्याचबरोबर द्वा. भ.. कर्णिक, श्री के. क्षीरसागर अशा सार्वजनिक व चिंतनशील साहित्यिकांच्या सहवासात शंकर सारडांचे व्यक्तित्व फुलत गेले आणि ते स्वतंत्रपणे आपले विश्व निर्माण करू लागले. यामागे या व्यक्तींच्या सहवासाबरोबर अखंड वाचन, परिश्रम करण्याची जिद्द, 'दिसामाजी काही वाचीत जावे, काही लिहीत जावे.' हे घेतलेले व्रत यामुळेच शंकर सारडा महाराष्ट्र टाइम्सच्या रविवार पुरवणीचे व साधनेच्या संपादकीय विभागाचे काम करू शकले. 

ऐन पंचविशीत त्यांनी न पुसणारी आपली मुद्रा तेथे उमटवली. त्यांच्या पत्रकारितेला पाश्चात्य जगात फिरल्यामुळे डोळसपणा आला. दिल्लीला महाराष्ट्र टाइम्सचे ते प्रतिनिधी होते. अमेरिकेत हॉर्वर्ड विद्यापीठात वृत्तपत्रीय व्यवसायाची शिष्यवृत्ती घेऊन शिकत असताना शंकर सारडांनी नवे पाश्चात्य जग पाहिले. नकळत त्यांच्या विचारांवर अमेरिकन विचारांचा प्रभाव दिसू लागला. वृत्तपत्र माध्यमाच्या ताकदींची त्यांना कल्पना आली. जगाच्या बदललेल्या संदर्भाचे त्यांना आकलन झाले. मूळची परिणत प्रज्ञा अधिक परिपक्व झाली. बुजुर्गाबरोबर नव्याचे स्वागत करण्याची सहिष्णुता शंकर सारडांजवळ आहे. त्यामुळेच दलित व ग्रामीण लेखकांना त्यांनी कायम प्रोत्साहित केले. 

समाजमनाची बदलती स्पंदने लेखकाने टिपावी हा त्यांचा आग्रह असतो. मधु मंगेश कर्णिक, जयवंत दळवी. विजय तेंडुलकर यांच्या उगवत्या काळापासून ते आजच्या रेखा बैजल, सुझसिनी इर्लेकर, सुधीर रसाळ, आणि जयंत नारळीकरांपर्यंत असंख्य प्रयोग करणाऱ्या विविध लेखकांना त्यांनी समीक्षणाद्वारे प्रकाशात आणले. सारडांच्या घरी केव्हाही जा, दोनचार नवलेखक बसलेले दिसतील. सारडा या नवलेखकांना समजावून घेतात. त्यांना कधी रिकाम्या हाताने परत पाठवीत नाहीत. ते नवलेखक शंकर सारडांकडून जाताना लेखणीची ताकदच घेऊन जातात आणि का लिहितो व कशासाठी लिहितो हे शंकर सारडांच्या सहवासात त्यांना उमजते. म्हणून मराठी साहित्यात गेल्या तीन चार दशकात शंकर सारडा हा लेखकांचा मित्र म्हणून सन्मानित झाला आहे. लेखकांना 'लेखक' करणारा, असा हा बालसन्मित्र बालकांच्या गरजाही ओळखतो. बालसाहित्याची जाणीव असणारे शंकर सारडा बालसाहित्य संमेलनांना वारकऱ्यांसारखे उपस्थित राहतात.

प्राध्यापक मित्र

शंकर सारडांना प्राध्यापक ओळखतात एक समीक्षक म्हणून परंतु प्राध्यापक जेव्हा व्यवस्थापनाच्या दबावाखाली सहासहा महिने वेतन न घेता गुलामासारखे राबत होते, त्यावेळेस ही गुलामगिरी नाकारावी म्हणून ज्यांनी प्रयत्न केले, त्यात शंकर सारडा होते. ते म्हणायचे, समाजाची साकळलेली बुद्धी प्राध्यापकच प्रवाही करू शकतील. विचार देण्याचे सामर्थ्य या व्यवसायात आहेच. त्यांनी प्राध्यापकांत अस्मितेची जाणीव व्हावी म्हणून 'प्राध्यापक विश्व' नावाचे अनियतकालिक काढले. विनामूल्य अंक काढले. पदरमोड केली. स्वतःच पोस्टेज चिकटवले.

मतदानाच्या अधिकाराची जागृती

शंकर सारडा लोकशाही विचारांचे पुरस्कर्ते सुशिक्षितांनी योग्यरित्या मतदान केल्यास अयोग्य उमेदवार निवडून येणार नाहीत हा त्यांचा आग्रह असे. प्राध्यापक ग प्र.प्रधान यांच्या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघाचे हजारो अर्ज ते विनामूल्य छापून देत.

यशस्वी व्यावसायिक मुद्रक

शंकर सारडा मुद्रण-परिषदेचे चळवळे कार्यकर्ते आहेत आपल्या प्रेसमध्ये ते कंपोझिंगपासून बायंडिंगपर्यंत, कचरा काढण्यापासून कॉम्प्यूटर सेटींगचे काम स्वतः करतात. छपाईला ते कला मानतात. कोणाच्याही दाराशी जाऊन धंदा मिळवण्याची लाचारी कधीही करत नाहीत. आपल्याजवळ गुणवत्ता आहे, कामाचा उरक आहे, माफक दर आहे. लोक स्वत: हून येतील. असा त्यांना विश्वास आहे. त्यांचा मुलगा हाताशी येईपर्यंत शंकर सारडांनी कोणालाही टेंडर मंजूर करण्यासाठी छदाम दिला नाही, खोटी बिले केली नाहीत. ते म्हणत 'भ्रष्टाचाराने धंदा मिळविण्यापेक्षा मी प्रेस बंद करणे पसंत करीन.' उधारी- वसुलीसाठीसुद्धा कोणाच्या दारात शंकर सारडांना मी गेलेले पाहिले नाही. स्मरणिकेचे संपादन करावे शंकर सारडांनीच! साताऱ्याच्या साहित्यसंमेलनाची स्मरणिका एकटाकी त्यांनी एकटयानेच संपादित केली.

उत्सवप्रियता 

शंकर सारडांची उत्सवप्रियता मोठी आहे. सभा-संमेलनाची त्यांना दांडगी हौस आहे. मुद्रण-परिषदेचे अधिवेशन असो, प्रकाशकांची परिषद असो, अगर उत्सवी साहित्य संमेलन असो, शंकर सारडा पालखीच्या भोईसारखे हजर! मी तर परिषद-आयोजन कसे करावे हे शंकर सारडांकडून शिकलो. महाबळेश्वरला प्रकाशकांची परिषद घेतली. साहित्य संमेलन घेतले. त्यांचे मत, 'इनमीन तीन माणसे पुरी असतात. उगाच मांडवात मिरवणाच्या करवल्यांपेक्षा चार साथीदार सोबतीला असले तरी प्रचंड कार्य उरकून घेता येते. सातारचे अभयसिंह राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली साहित्यसंमेलनाच्या यशाचे बोलवते धनी शंकर सारडा होते. प्रत्येकाचे मानधन त्याला मिळाले पाहिजे; हिशेब काटेकोर असावा: आर्थिक इमानदारी असावी, या पद्धतीने ते परिषदांचे आयोजन करतात. उगाच येळकोट घालत नाही व परिषद संपल्यानंतर शिमगा होऊ देत नाहीत. लोकांना संमेलन, परिषद आनंदयात्रा वाटावी ज्ञानाचे पाथेय मिळावे असे आयोजन करतात.

कौटुंबिक मित्र

शंकर सारडा हे अनेक व्यवसायांतील लोकांचे मित्र आहेत. वैफल्य आलेल्या मित्रांना मदत करणार कोणाच्या लग्नाला एकवेळ ते जाणार नाहीत. परंतु प्रदीर्घ आजाराने पीडलेल्या मित्राकडे जातील. चार पुस्तके वाचायला देतील. वाचलेल्या पुस्तकांचे आशय सांगतील. हळूहळू हळव्या मनाला, आजाराला तोंड देण्याचे सामर्थ्य देतील. माझ्या माहितीतील वेडाला स्पर्श केलेल्या प्राध्यापक मित्राला सिनेमाला शंकर सारडाच घेऊन जातात. वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झालेल्या मित्राला दिलासा देतात. विक्षिप्त स्वभावाच्या मित्रासाठी हाँगकाँगहून रेनकोट आणून देतात इतकेच नव्हे तर त्या विक्षिप्त मित्रासाठी व इतर मित्रांना त्याला आर्थिक मदत व्हावी म्हणून वेठीस धरतात. 

स्वतःच्या कौटुंबिक जीवनाबाबत ते क्वचितच बोलतात. परंतु, मित्रांच्या मुलांची प्रगती, त्यांचे व्यवसाय यात ते रस घेतात. त्यांना आईवडिलांच्या धाकापासून मुक्त करून व्यवसायातील धोकेही समजावतात. शंकर सारडांचे स्वतःचे भावजीवन डॉ. निर्मला सारडांमुळे संपन्न झाले. निर्मलाला बच्चनसारख्या कवींवर लिहिण्यास त्यांनी प्रोत्साहित केले. अनेक तरुण प्राध्यापकांना पी. एच. डी.च्या शोधनिबंधात त्यांच्या गुरूपेक्षाही त्यांनी अधिक मदत केली आहे. सारडा कामात आनंद मानतात. काम हा व्यवसाय मानला की त्याला साचेबंदपणा येतो. लोक काही म्हणोत, आपण आपल्या आनंदासाठी काम करीत राहावे. टीकेबाबत हळवे राहू नये. 

शंकर सारडांजवळ हा कामातील आनंदाचा गुण असल्यामुळेच तो लखपती वाचक आहे. रसास्वाद घेणारा लेखक आहे. सभासंमेलनाला हजेरी लावणारा यात्रिक आहे, छपाईचे काम तो धर्म म्हणून करतो. कौटुंबिक जीवनातही मित्रांबरोबर गप्पांच्या मैफली रंगवतो. मात्र कोणत्याही बंधनात राहणे. त्याच्या स्वभावाला जमणारे नाही. अशा बंधमुक्त, आनंदयात्री साधना परिवाराच्या प्रेमात पडलेल्या शंकर सारडांना हसत राहण्यासाठी, लिहीत राहण्यासाठी बळ मिळो.

Tags: अमेरिका महाराष्ट्र टाइम्स दिल्ली विजय तेंडुलकर जयवंत दळवी मधु मंगेश कर्णिक ग प्र.प्रधान डॉ. निर्मला सारडा शंकर सारडा पुरुषोत्तम शेठ Maharashtra Times Delhi Vijay Tendulakar Jayawant Dalavi Madhu Mangesh Karnik G.P. Pradhan Nirmala sarda Shankar Sarada Purushottam Seth weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके