डिजिटल अर्काईव्ह

दोन बातम्या आणि अखेर... आपण!

नियमानुसार पैसे मिळतात. पण ते किती, कशासाठी याचाही विवेक, तारतम्य ठेवायला हवं ना? पण आजकाल हे सार फार दुर्मिळ होत चालल आहे. जे मिळेल ते ओरबाडून न्याय्य-अन्याय्य मार्गानी स्वतःच्या पदरात पाडून घेणं हाच आज राजमार्ग होऊ पाहत आहे.

शनिवार दि. 24  मे 1197 च्या सकाळ मध्ये पहिल्या पानावर ठळक मथळ्याची एक बातमी होती, 'तीन चष्म्यांचे बील 37 हजार रुपये!' उच्च न्यायालयाचे कोणी अरुणकुमार दत्त नामक न्यायाधीश स्वत:च्या व कुटुंबीयांच्या तीन चष्म्यांच्या 37 हजार रुपयांच्या बिलासाठी म्हणजे सरकारी खजिन्यातून ते बील  मिळवण्यासाठी अडून, हटून बसल्याची. आणि अशा पहिल्या पानावरील बातमीला खास चौकटी महिरपीची सजावट, म्हणजे ती बातमी विशेष महत्त्वाची, संपादकांना लक्षवेधी, म्हणजे वाचकांचे लक्ष प्रथमदर्शनीच जिने आकृष्ट करावे असे वाटणारी ही बातमी वाचली आणि बहुश्रुत, अनुभवसंपन्न, ज्ञानी संपादक महोदयांना यात एवढं महत्त्वाचं, खास चौकट खर्ची घालण्यासारखं अद्भुत कार्य वाटलं, ते क्षणभर लक्षातच आलं नाही.

अशा बातमीत - आता अशा वरिष्ठ पदावरील माणसाला वैद्यकीय साह्यासाठी मुबलक पैसा मिळण्याची कायदेशीर तरतूद असताना, तो रास्त हक्क कुणी बजावला तर त्यात एवढं नवलाईचं वाटावं असं काय आहे? शेकडो, कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणारी माणसं उजळ माथ्यानं वावरत असतात, वर्तमानपत्रांतून रकानेच्या रकाने भरून विविध क्षेत्रांतील भ्रष्टाचाराच्या आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या बातम्यांचा रोज रतीब  घातला जातो, तिथे ह्या एवढ्याशा - 37 हजार रुपयांच्या रकमेचे काय कौतुक? कदाचित्, आता न्यायाधीशासारख्या माणसाने स्वतःच्या विवेकाला जागावं, अशी संपादक महाशयांची भाबडी अपेक्षा असावी. ज्या देशात हजारो माणसं दारिद्ररेषेखालील आसन्नमरण जीवन जगतात. तेथे केवळ तीन चष्म्यांसाठी 37 हजार रुपये - म्हणजे 4-6 माणसं असलेल्या कितीतरी कुटुंबांच्या वर्षभराच्या कमाईपेक्षाही अधिक रक्कम, आठ तास राबणाच्या खाजगी क्षेत्रांतील असंघटित कामगार वा शेतमजूर यांच्या वार्षिक उत्पन्नाहूनही मोठी रकम! 

राजकारणी, बडे व्यापारी, उद्योगपती, चित्रपट तारे-तारका यांच्या बाबतीत - स्वतःच्या खिशातून 37  हजार रुपयांच्या तीन चष्म्यांची खरेदी- असं काही घडलं तर ते किरकोळच म्हणावं लागेल, पण ज्यांनी सामाजिक न्यायाबद्दल जागरूक असावं अशी अपेक्षा, त्या न्यायाधीशासारख्या माणसानं असं वागावं, वर आणखी, 'एवढ्या (म्हणजे फक्त 37 हजार रुपयांच्या) किरकोळ मुद्यावरून माझी व न्याय व्यवस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे', असा कांगावा करून 'या बिलाचे पैसे मिळाले नाहीत. तर लवकरच आपण न्यायालयात जाऊ' असा दम द्यावा म्हणजे कहरच झाला. चोराच्या उलटया बोंबा असाच काहीसा हा प्रकार हे सारंच फार अनपेक्षित, धक्कादायक असं मान्यवर संपादकांना वाटलं असावं. कायद्याच्या लिखित नियमांहून वरचढ, श्रेष्ठ असं एक स्वतःच्या सदसदविवेकाच भान सर्वानीच - विशेषतः न्यायाधीशांनी तरी बाळगावं हे संपादकांना अभिप्रेत असावं आणि ते खरंही आहे. 

नियमानुसार पैसे मिळतात. पण ते किती, कशासाठी याचाही विवेक, तारतम्य ठेवायला हवं ना? पण आजकाल हे सार फार दुर्मिळ होत चालल आहे. जे मिळेल ते ओरबाडून न्याय्य-अन्याय्य मार्गानी स्वतःच्या पदरात पाडून घेणं हाच आज राजमार्ग होऊ पाहत आहे. रजा हा हक्क नाही, ती सोय-सवलत, पण वर्षअखेरीला सर्व नैमित्तिक रजा संपवल्याच पाहिजेत, हाही याच वृत्तीचा एक लहानसा आविष्कार हे सारं पाहिलं की अंधारून आल्यासारखं वाटू लागतं. अशा वेळी या पार्श्वभूमीवर, "अण्णा हजारे ज्या वेळी साने गुरुजींच्या समर्पण भावनेशी एकरूप होत होते, त्या वेळी मी मात्र काठावर राहूनच काही तरी केले' असे समाधान मानीत होतो, साने गुरुजी आणि अण्णा यांच्या भावनेची उत्कटता माझ्यात आली नाही, अन्यायाविरुद्ध मी प्राणपणाने लढलो नाही, याची तीव्र जाणीव मला पुन्हा झाली आणि माझे मन शरमिंदे झाले", हे चौकटीची वेलबुट्टी नसलेले, कृतिशीलतेचा आधार लाभलेले, पारदर्शी आत्मनिवेदन मन हेलवून टाकतं. 

अण्णांच्या कार्यात सहभागी होऊन, उन्हातान्हाची पर्वा न करता, आहार निद्रेचा विचारही न करता, शरीरकष्टां प्रमाणेच आर्थिक लाभहानी मनातही न आणता, जनजागृतीसाठी, लोकसंघटनासाठी देशाटन करणारा वयाची पंचाहत्तरी ओलांडलेला कोणी वृद्धयुवा असं म्हणतो, तेव्हा या काळोखलेल्या वातावरण भोवतालचा अंधार आपल्या परीने दूर करण्याचा आटापिटा असा एखादा नंदादीप करीत आहे - असे आणखीही काही नंदादीप ठीकठिकाणी तेवत आहेत - ही गोष्टही मनाला काहीसा दिलासा देणारी, मळभळेल्या मनाची कवाडे किलकिली करणारी, आश्वासक वाटू लागते.

Tags: अरुणकुमार दत्त अण्णा हजारे साने गुरुजी पुष्पा लिमये Arunkumar Datta Anna Hajare Sane Guruji Pushpa Limaye weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी