डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

असे शिक्षक असे विद्यार्थी

दुसऱ्या दिवशी सूचना फलकावर सर्व विद्यार्थ्यांनी विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले होते. आणि त्यांनी त्यांचे काम चांगल्या रीतीने केल्याबद्दल त्यांचे कौतुक आणि अभिनंदनही करण्यात आले होते. सूचना फलकाजवळ विद्यार्थ्यांचा घोळका सूचना वाचत, चर्चा करीत होता..

प्रार्थना संपली, पहिला तास सुरू झाला. मुख्याध्यापक आपल्या खोलीकडे वळले, तोच पाठोपाठ शिक्षक प्रतिनिधी त्यांना भेटण्यासाठी हजर. 'मग, उद्याच्या शाळेचं काय?' त्यांचा प्रश्न. 
'का? शाळेचं काय म्हणजे?' मुख्याध्यापकांचा प्रतिप्रश्न. 
'नाही, म्हणजे उद्या लग्न आहे ना कांबळेचं, सगळ्या शिक्षकांना लग्नाला जायचं आहे म्हणून...'
आपल्या शाळेतल्या शिपायाचे लग्न. त्याने सर्वांनाच रीतसर निमंत्रण केलेले. ज्यांना तास ऑफ असेल. त्यांनी त्या वेळात जाऊन यायला हरकत नाही, आपापसांत एकमेकांच्या सोयीनं तास जरा मागे-पुढे करून गेलात तरी चालेल. विषयाचा सामारोप करीत मुख्याध्यापक म्हणाले.
काही वेळ घुटमळून शिक्षक प्रतिनिधी म्हणाले- 'शाळा दुपारी दीड-दोन वाजता ठेवू या, म्हणजे सर्वांनाच लग्नाला जाता येईल. आणि शाळेतील काही शिक्षकांच्या मुला मुलींच्या लग्नाच्या दिवशी शाळा अशीच दोन-अडीच वाजता भरवल्याची आठवण त्या नव्यानेच मुख्याध्यापक झालेल्या मुख्याध्यापकांना त्यांनी करून दिली.
'शाळा उशिरा ठेवायचं कारण काय सांगायचं?' मुख्याध्यापकांचा प्रश्न. 
'शिक्षक सभा.' प्राथमिक शाळेनं तशीच सूचना लिहिली आहे. 
शिक्षक प्रतिनिधींनी उत्साहाने सुचवलेली सोडवणूक. 
शिक्षक सभा तर महिनाअखेरीला, आणि सकाळी सभा ठेवली तर शिक्षक सभेला येतील ? त्यांना दोन हेलपाटे पडतील ... मुख्याध्यापकांनी चिंता व्यक्त केली.
'म्हणजे सभा घ्यायची नाही, फक्त तशी सूचना काढायची,  शिक्षक प्रतिनिधींनी याही अडचणीवर काढलेली तोड...
'शिक्षकांची सभा न घेताच शिक्षक सभा कारण सांगायचं? मला ते पटत नाही, आणि वीस-पंचवीस शिक्षकांना लग्नाला जायचं म्हणून हजारभर मुलांची शाळा उशिरा ठेवायची?  
काहींचे पालक आईवडील नोकरीला, कामधंद्याला जाणारे, काही जाताना मुलांना शाळेत सोडून जाणारे तर अनेक मुले रिक्षातून, बसने येणारी, त्यांची रिक्षाची वेळ ठरलेली, दुपारच्या वेळी बसही कमी. 
मुख्याध्यापकांच्या बोलण्याचा रोख जाणून त्यांचे बोलणे मध्येच तोडत शिक्षक प्रतिनिधी 'म्हणाले, 'म्हणजे शाळा उशिरा ठेवणार नाही . मग शिक्षकांना रजा घ्यावी लागेल' त्यांच्या आवाजात धमकीवजा इशारा होता. 
'ते रजा घेऊ शकतात'. म्हणून मुख्याध्यापकांनी तो विषय संपवला आणि ते आपल्या कामाला लागले. 
आता अधिक थांबण्यात अर्थ नाही हे जाणवून शिक्षक प्रतिनिधी तरातरा बाहेर पडले. मुख्याध्यापकांचा दहावी व वरती तास. तासाच्या शेवटी दहा मिनिटं, पाठ्यपुस्तक बंद करून विद्यार्थ्यांवर दृष्टिक्षेप टाकत त्यांनी एक आवाहन केले... 
'उद्याला तुम्हां विद्यार्थ्यांची मला जरा मदत हवी आहे, कोण कोण तयार आहे ?'
प्रश्नासरशी अनेक हात वर आले, चेहऱ्यावर, नजरेत औत्सुक्य. 'कशासाठी सर?' काहींचा न राहवून विचारलेला प्रश्न. 
'उद्या तुम्ही काही वर्गाचे तास घ्यायचे, शिक्षकदिनाच्या दिवशी घेता तसे. चालेल ना ?' सर्वांचा सामुदायिक होकार. 
'मग आज मधल्या सुटीपर्यंत तुमची नावे कोणत्या वर्गांना शिकवणार त्या वर्गप्रतिनिधींकडे द्या.'
इयत्ता विषयांसह शाळा सुटेपर्यंत दहावी अ, ब च्या वर्गांतून 30/40 मुलांची नावे आली.

***

शिक्षक खोली.
'फार शहाणे समजतात स्वतःला!' 
'चांगला धडा शिकवला पाहिजे.' 
'विद्यार्थ्यांची काळजी फक्त यांनाच, आम्ही कोणीच नाही.'
'ए. तू घेणार ना रजा?' 
म्हणजे काय घ्यायलाच पाहिजे. आपण सर्वांनी सामुदायिक रजा घ्यायची.' 
'म्हणे ऑफ तासाला जा. आम्हांला नको असली भीक!' 
'आपण 8-10 जण नसलो म्हणजे समजेल. सोपं नाही, मुलं शाळा संभाळण इत्यादी ..इत्यादी...'
शाळा सुटेपर्यंत 10-12 जणांचे अर्ध्या एक दिवसाच्या रजेचे अर्ज कार्यालयात दाखल झाले. 

***

अर्ध्या दिवसाची रजा टाकून गेलेले शिक्षक लग्न-जेवण उरकून शाळेत हजर झाले, हालत , हुकत, पान चघळत, मनात मांडे खात... 
पण...शाळा नेहमीसारखीच चालू होती. वर्ग शांत होते. काही वर्गातून त्यांच्या मते मुख्याध्यापकाना मानणारे त्यांचे बगलबचे शिक्षक आणि काही वर्गातून दहावीचे विद्यार्थी तास घेताना दिसत होते. मात्र त्यांना आरडाओरडा, गडबड, गोंधळ कोठेच दिसत नव्हता. एक-दोन तीन... नित्याप्रमाणे आठ तास होऊन शाळा सुटली. 

***

दुसऱ्या दिवशी सूचना फलकावर सर्व विद्यार्थ्यांनी विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले होते. आणि त्यांनी त्यांचे काम चांगल्या रीतीने केल्याबद्दल त्यांचे कौतुक आणि अभिनंदनही करण्यात आले होते. सूचना फलकाजवळ विद्यार्थ्यांचा घोळका सूचना वाचत, चर्चा करीत होता.. त्यांच्या पाठीवर अशी शाबासकीची थाप मिळाल्यामुळे त्यांचे चेहरे उल्हसित झाले होते, विद्यार्थ्यांतील सुप्त सामर्थ्याच्या या सुखद प्रत्ययाने मुख्याध्यापक सुखावले होते. मात्र काहीतरी अघटित घडेल असा अंदाज बांधणाऱ्यांचे चेहरे अपेक्षाभांगाच्या दुःखाने काळवंडले होते, घडले ते अघटितच पण ते त्यांना अपेक्षित नव्हते.

Tags: पुष्पा लिमये विद्यार्थी शिक्षक शिक्षण education pushpa Limaye relation student teacher weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके