डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कामगार संघटनेचा एक अभिनव प्रयोग

व्यवस्थापनातील कामगारांच्या भागीदारीचे अनेक प्रयोग आपल्याकडे झाले आहेत व सध्या निरनिराळ्या स्वरूपात चालू आहेत. भागीदारी असली तरी खऱ्या अर्थाने कामगाराचा सहभाग त्यात दिसून येत नाही. तसेच या योजना फारशा यशस्वी झाल्या आहेत असेही नाही. या उलट, प्रत्यक्ष कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन विधायक कामात व्यवस्थापनाबरोबर सिंहाचा वाटा उचल्याचा एक अभिनव प्रयोग गेल्या आठवडयात पाहायला मिळाला.

व्यवस्थापनातील कामगारांच्या भागीदारीचे अनेक प्रयोग आपल्याकडे झाले आहेत व सध्या निरनिराळ्या स्वरूपात चालू आहेत. भागीदारी असली तरी खऱ्या अर्थाने कामगाराचा सहभाग त्यात दिसून येत नाही. तसेच या योजना फारशा यशस्वी झाल्या आहेत असेही नाही. या उलट, प्रत्यक्ष कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन विधायक कामात व्यवस्थापनाबरोबर सिंहाचा वाटा उचल्याचा एक अभिनव प्रयोग गेल्या आठवडयात पाहायला मिळाला. 26 जानेवारी 1986 रोजी मुंबईच्या बी. ई. एस. टी. वर्कर्स यूनियनने सुमारे 3 लाख रुपये खर्च करून सर्व सुखसोयींसह सज्ज अशी एक वास्तु प्रामुख्याने बी. ई. एस. टी. मधील टी. बी. रुग्णांसाठी तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या स्वाधीन केली कामगार संघटनेने इमारत बांधून दिली आणि बेस्ट उपक्रमाने कक्षाच्या आतील खाटा व इतर आवश्यक सामान खरेदी करून दिले. या शिवाय टी. बी. रुग्णांना खास सवलती पुरविण्याचे काम व्यवस्थापनाकडे आहेच. 

अशा रीतीने कामगारांच्या कल्याणासाठी 'बेस्ट वर्क से यूनियन' व 'बेस्ट' प्रशासन यांनी सुरू केलेला हा प्रयोग कामगार चळवळीच्या दृष्टीने आदर्श मानला पाहिजे. व्यवस्थापन आपणहून अशा योजना चालवीत असेल तर प्रश्नच नाही. नाही तर व्यवस्थापनावर दबाव आणून किंवा वाटाघाटी करून कल्याण योजना मिळविणे हा चळवळीचा एक भाग झाला. परंतु व्यवस्थापनाला आर्थिकदृष्टया परवडत नसेल, त्यावेळी स्वत: पुढाकार घेऊन व कामगारांचे पैसे कामगारांसाठीच खर्च करून संयुक्तपणे कल्याणकारी योजना राबविणे हा प्रयोग खरोखरी आदर्श होय. आता तर बेस्ट कामगारांसाठी 250 खाटांच्या हॉस्पिटलची एक संयुक्त योजना आखण्यात आली आहे. ही योजना प्रत्यक्ष अंमलात येण्यापूर्वी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल; पण संबंधितांचे सहकार्य मिळाले तर हाही प्रयोग यशस्वी होईल, असे वाटते.

बी. ई. एस. टी. वर्कर्स यूनियन, ही गेली 38 वर्षे मुंबई शहरातील बस वाहतूक धंद्यातील प्रातिनिधिक व मान्यताप्राप्त संघटना. ' बेस्ट' च्या सुमारे 30 हजार कर्मचाऱ्यांपैकी 20 हजार कर्मचारी तिचे सभासद आहेत. कामगारांना नोकरीची शाश्वती प्राप्त करून देऊन त्यांच्या वेतनात व सेवा-सवलतीत सुधारणा करणे, याबरोबरच बेस्ट कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेनुसार सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचेही महत्वाचे कार्य यूनियनने केले आहे. संघटित शक्तीने आत्मकेंद्रित बनून कामगारांनी केवळ आपल्या पुरतेच न पाहता समाजाच्या तळागाळांतील असंघटित व दुर्बल घटकांबाबतचे आपले उत्तरदायित्व समजून घ्यावे, हा यूनियनचा दृष्टिकोन कौतुकास्पद आहे. कामगारांसाठी विश्रांतीस्थाने शिष्यवृत्या पुस्तकपेढी, वाचनालये आदी कल्याणकारी कामे सतत चालू असतात. कामगार हा केवळ पगा-रजा घेणारा, यंत्रवत् नोकर न राहता तो समाजाचा एक सुसंस्कृत व जबाबदार घटक व्हावा म्हणून 'बेस्ट वर्कर्स यूनियन'चे जनरल सेक्रेटरी श्री. नारायण फेणाणि व इतर नेत्यांच्या प्रयत्नांस सर्व शुभेच्छा.

Tags: कामगाराचा सहभाग र. दा. विघे कामगार संघटनेचा एक अभिनव प्रयोग worker participation r..Da. Vighe #An innovative experiment of trade unions weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके