डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विजय तेंडुलकर एक शिवधनुष्य म्हणून उरणार?

केवळ विरंगुळा म्हणून काढलेल्या खेळात, एका निष्पाप जिवाला सहज रक्तबंबाळ करण्याइतके जे अमानुष कौर्य या समाजाच्या ठिकाणी आहे, तेही अगदी अर्थशून्य, हेतुशून्य आहे... त्या कौर्याच्या भयानकतेची जाणीवही त्या समाजाला नाही. केवळ जिवाची घटकाभर करमणूक एवढाच अर्थ त्या अमानुष कौर्याला असला तर आहे आणि ही त्या समाजाची खरी शोकांतिका आहे. 

(पाठराखणीतील (ब्लर्ब) मजकूर, 'शांतता कोर्ट चालू आहे, सहावी आवृत्ती : 2003)
 

विजय तेंडुलकर गेले आणि जाता जाता जातिवंत जागल्याचा समाजाला गेली पन्नास वर्षे खडबडून जागा करणारा आपला प्रातिभिक अफलातून आवाजही घेऊन गेले. रंगमंचही सुनासुना आणि श्रोतेही सुन्न! तेंडुलकरी आवाज होता माणूस नावाच्या बेटाचा, माणूस नावाच्या निबिड करण्याचा, माणूस नावाच्या हिंस्र पशू, माणूस नावाच्या अथांग दर्याचा, माणूस नावाच्या कोसळणाऱ्या नायगाराचा...! माणूस स्त्री आणि पुरुष, त्यांच्या जिण्यातील अनेक भूमिका, खूपशी नाती आणि यांना घेराव घालून बसलेली सर्व प्रकारची प्रस्थापित व्यवस्था; खरे तर अव्यवस्था... तेंडुलकरी आवाज या सर्वांशी अहोरात्र बोलणारा, त्यांना बोलके करणारा...! माणसाच्या व्यामिश्र जिण्याचे व जगाचे अम्लान व अखंड कुतूहल हे तेंडुलकरांचे अभिजात वैशिष्ट्य; खरे तर तो त्यांचा स्वभावधर्मच!... ते दक्ष कुतूहल म्हणजे त्यांची व्हाईस-कॉर्डच! 

खरे तर माणसाला बघण्याची, न्याहाळण्याची एक खास नजर तेंडुलकरांना लाभली होती. माणसावर नितांत प्रेम करणारी, त्याच्या भल्याबुऱ्या आचारविचारांना समजावून घेणारी, समजावून देऊ पाहणारी अशी ती नजर होती. माणसाच्या असण्याचेच फक्त तेंडुलकर समर्थक व पक्षपाती होते; माणसाने कसे असावे हे त्यांना कधीही सांगावयाचे नव्हते. माणूस कसा असतो व तो तसाच का असतो, याचा मागोवा घेत घेत ते शेवटी सर्व प्रकारच्या प्रस्थापित व्यवस्थांपाशी पोहोचत. सर्व प्रकारची प्रस्थापिते! 

कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, समाजसंस्था, आर्थिक-राजकीय-धार्मिक संस्था, रूढी व परंपरा यांच्या व्यवस्था. यांची प्रस्थापिते, स्त्री-पुरुषांचे माणूस म्हणून असणारे व्यक्तिजीवन कितीतरी सत्ता शोषित असतात. राजसत्ता, धर्मसत्ता, धनसत्ता, ज्ञानसत्ता, समाजसत्ता वगैरे. अशी प्रस्थापिते व अशा सत्ता यांच्या तावडीत सापडलेला माणूस हा, खरे तर, जगातील सर्वात मोठा व महत्त्वाचा ज्ञानविषय! अश्वासविषय! तेंडुलकर प्रतिभेच्या पाठशाळेत याच एकमेव विषयाचा अभ्यासक्रम होता. म्हणूनच तेंडुलकर वेळ येते, तेव्हा बाबा आढावांच्या 'एक गाव, एक पाणवठा' या मोहिमेत शरीक होतात. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या उपक्रमात उत्साहाने भाग घेतात. सामाजिक कृतज्ञता निधीच्या प्रकल्पात जबाबदारी स्वीकारतात. ते कधीकाळी पत्रकारिता करीत होते म्हणून नव्हे; तर तेंडुलकर होते म्हणून पत्रकार व म्हणून सामाजिक चळवळीचे सहप्रवासी होते. असा साहित्यिक दुर्मिळच. 

ललित लेखन, कथालेखन, एकांकिका, नाटके, हिंदी-मराठी पटकथा, दूरदर्शन मालिका यांसारख्या सर्व प्रकारच्या प्रभावी आविष्कारांतून माणूस व त्याच्या जिण्याचा अवकाश तेंडुलकरांनी साकार केला, तो मनुष्यविषयक त्यांचे समग्र कुतूहल त्याच्या निष्कर्षासह व रंगरूपासकट प्रकट करण्यासाठी! हे काम सोपे नाही. त्याला प्रबळ आत्मप्रत्ययाची, निर्भयतेची, समाजाचा रोष पत्करण्याची अढळ ताकद हवी. 'गिधाडे', 'सखाराम बाईंडर', 'घाशीराम कोतवाल', 'कन्यादान', 'कमला', 'शांतता कोर्ट चालू आहे' ही नाटके म्हणजे निर्भयतेच्या साहित्यिक कृतीच होत्या. 'अॅक्शन' होतं. या संदर्भातील सगळ्या सामाजिक प्रक्षोभाला हा माणूस पुरून उरला. 

नाट्यमन्वन्तरची चळवळ, वरेकरांची समस्याप्रधान नाटके यांच्यापेक्षा तेंडुलकरी नाटकांचा बाज तर वेगळा होताच पण त्यातील स्फोटकताही वेगळीच होती. इब्सेनची आठवण करून देणारी! तेंडुलकरांचे बहुधा शेवटचे नाटक(?) 'चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी' (1992). हे नाटक नाटक नाहीच, असा मार्मिक अभिप्राय कमलाकर नाडकर्णी यांनी दिला आहे. 'ते नाटक नसून एका विदारक सत्याचा अंतर्मुख करणारा पण संवादरूप पावलेला एक अनुभव आहे', असे नाडकर्णी म्हणतात. हे खरे आहेच; पण हे खरे केवळ 'चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी' या नाटकापुरतेच नव्हे; ते तेंडुलकरांच्या बहुतेक सर्व नाटकांबाबतही खरोखरच खरे आहे. 

'मी नाटक लिहीत नाही, तर ते नाटक स्वत:च स्वत:ला रचत जाते' असे तेंडुलकर म्हणतात. प्रतिभावंतांची 'शाही तटस्थता'- इंपिरिअल अन्कन्सर्न- याहून वेगळी काय असते?

तेंडुलकरांना प्रदीर्घ आयुष्य (ऐंशी वर्षांचे) लाभले. नागमोडी अडी-अडचणींचे अखेरपर्यंतचे त्यांचे जिणे व त्यांची साहित्यनिर्मिती यांचे नाते(?) अभ्यासक पुढेमागे स्पष्ट करतीलच. त्यातील योग्यायोग्य पाहण्याच्या तसदीपासून तेंडुलकरांनी सुटका करून घेतलीच आहे. जवळजवळ साठ वर्षे तेंडुलकर फुलत राहिले, बहरत राहिले. ललित लेखनाचे चार संग्रह, चार कथासंग्रह, दोन संपादने, चार भाषांतरे (फक्त नाटकांचीच), दोन कादंबऱ्या, चार एकांकिका संग्रह, पाचसहा बालनाट्ये, सुमारे वीस मराठी-हिंदी चित्रपटांच्या पटकथा; दोन दूरदर्शन मालिका यांसारखी विपुल साहित्यसंपदा त्यांनी निर्माण केली; वि.वा.शिरवाडकर, वसंत कानेटकर, जयवंत दळवी, पुरुषोत्तम दारव्हेकर यांसारख्या जवळजवळ समवयस्क अशा मातब्बर नाटककारांच्या समवेत त्यांनी नाट्यनिर्मिती केली व स्वत:ची ठसठशीत अशी वेगळी ओळख सिद्ध केली. भारतीय व जागतिक दर्जाचे नाटककार अशी अधिमान्यताही त्यांना लाभली. 1984 साली 'पद्मभूषण' हा सन्मानही त्यांना लाभला.

तसे पाहिले, तर हे सार्थ, सफल असेच जीवन! या सार्थकतेत, साफल्यात तेंडुलकरांच्या व्यक्तिगत प्रतिभागुणांचा व परिश्रमाचा मोठा वाटा आहेच आहे. पण एक मात्र खरे; की काळ आणि प्रतिभावंत यांचा सांधाही जुळावा लागतो; नपेक्षा एखाद्या भवभूतीची खंत वाट्यास येऊ शकते. होय, तेंडुलकर आणि विसाव्या शतकाचा उत्तरार्ध यांचा सांधा चपखलपणे जुळून आला. हा कालखंडच मराठी प्रतिभेच्या नवनवोन्मेषशाली सर्जनाचे अपूर्व उत्थानपर्व होता. नवकथाकार बहरले, नवकाव्य बहरले, नवनाटक बहरले, नवसमीक्षा बहरली, नवे सौंदर्यशास्त्र बहरले. बहरच बहर! जणू वाङ्मयीन वसंत ऋतूच! 

पण या वासंतिक पर्वाची जोपासना करणारे एक चोखंदळ, अभ्यासू, स्वागतशील असे वातावरण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात होते. साहित्यप्रेमी समाजाचाही उत्स्फूर्त प्रतिसाद होता. सत्यकथा मासिकाचा परिवार, 'रंगायन', आविष्कार' यांसारख्या नाट्यसंस्था, विजया मेहता, अरविंद देशपांडे, डॉ.लागू, निळू फुले, लालन सारंग यांसारखी चिकित्सक जाणकार माणसे व अभिनेते, खूप नियतकालिके व त्यांचे हौशी संपादक आणि विविध नाट्यसंस्था इत्यादींच्या सामूहिक साद-प्रतिसाद क्षेत्राने तेंडुलकरांसारख्या मनस्वी प्रतिभावंताला एक प्रेरक पोषक अवकाश उपलब्ध करून दिला.

कदाचित असेही असेल की विसाव्या शतकाचा उत्तरार्ध प्रतिभावंतांची मांदियाळी घेऊनच प्रवेश करता झाला. कालपुरुष प्रतिभावंतांचा जनक नसतो हे खरेच; पण तो त्यांचा प्रतिपालक असू शकतो. तेंडुलकरांनी स्वतःच्या सर्जनशीलतेचे सोने केले आणि त्याबरोबरच आपल्या कालखंडांचेही सोने केले. विसाव्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे मराठी साहित्यसोनियाच्या खाणीच!

एकविसावे शतक येता येता त्या खाणी रित्या होऊ लागल्या आहेत. वासंतिक पर्वाचे शिल्पकार हळूहळू पडद्याआड जात आहेत. आता तेंडुलकरही गेले. त्या युगाचा साक्षीदार असलेल्या माझ्यासारख्या अनेक व्यक्तींना नक्कीच हळहळ वाटणार, हुरहूर वाटणार! एक सुंदर जग अस्ताचली जात आहे... त्या सूर्यास्ताला रोखणार तरी कोण? 

यापुढे विजय तेंडुलकर एक शिवधनुष्य म्हणून उरणार? मराठी नाटक व रंगभूमी यांच्या आज-उद्याच्या धनुर्धरांना आणि समीक्षकांना ते शिवधनुष्य पेलावेच लागेल. पेलतीलही ते...! माझी श्रद्धा आहे. या महान नाटककाराला 'साधना' परिवाराची अंतकरणपूर्वक श्रद्धांजली.

Tags: श्रद्धांजली स्मृतीलेख 'कमला' 'कन्यादान' 'घाशीराम कोतवाल' 'सखाराम बाईंडर' 'गिधाडे' विजय तेंडुलकर 'Kamala' 'Kanyadan' 'Ghashiram Kotwal' 'Sakharam Binder' 'Gidhade' Vijay Tendulkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रा. ग. जाधव

लेखक, समीक्षक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके