डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रेगे सर : श्रद्धांजलिपर संस्मरण

इस्लामी राज्य ही मुस्लीम धार्मिक परंपरेतील एक मूलभूत संकल्पना आहे आणि इहवादी राज्याच्या कल्पनेशी विसंगत आहे. हिंदूंना ही अडचण नाही. कारण धर्मशास्त्रावर आधारलेल्या राज्याचे प्रजाजन म्हणून राहण्याचा ऐतिहासिक अनुभव हिंदू जमातीला नाही. पाकिस्तान व बांगलादेश स्वतःला इस्लामी राज्ये म्हणून ओळखतात व तसे जाहीर करतात; पण ज्याच्यात हिंदू बहुसंख्य आहे तो भारत इहवादी राज्य चालवतो; हा फरक का पडतो याच्याकडे मुस्लीम विचारवंतांनी लक्ष दिले पाहिजे." रेगे लगेच पुढे लिहितात : "या समग्र सांस्कृतिक, सामाजिक राजकीय परिस्थितीत प्रामाणिकपणे आणि जोमदारपणे जगायचे असेल तर इस्लामच्या चिरंतन संदेशाचा एक नवीन अर्थ लावणे अनिवार्य झाले आहे.

‘‘समाजातील विचारक्षम अशा अल्पसंख्य गटाचे अस्तित्व व महत्त्व वंदनीय रेगे सरांसारख्या डोळस, चैतन्यदायी विचारवंतामुळेच शक्य व समर्थनीय ठरत असते-’’ असे रेगे सर परवा 28 डिसेंबर रोजी अनपेक्षितपणे निघून गेले. त्यांच्या जन्मजात भिडस्त, संकोची स्वभावधर्माचे परिपालन करण्यासाठीच जणू एका उष:काली अगदी गुपचूपपणे त्यांनी अखेरचा निरोप घेतला. पार्थिवतः रेगेनामक एक ऐहिक येणे-जाणे घडून गेले व हे दुःखदायक आहेच. तथापि रेगेनामक ऊर्जास्रोत तर पार्थिवतेच्या पलीकडला; त्याला आटणे नाही. तो तर शाश्वतच! या विसाव्या शतकातील उत्तरार्धात मराठी विचारक्षेत्रात उत्तरोत्तर प्रभावी ठरत गेलेला रेगेप्रभाव किती मोलाचा आहे, हे लक्षात येण्यासाठीही आपणांस आणखी एक अर्धशतकभर दुसऱ्या एका रेग्यांची व त्यांच्या मीमांसेची वाट बहुधा पाहावी लागेल. रेगे सरांना ग्रंथरूप अशी सामाजिक प्रतिमा नाही, याची खंत म्हटली तर खरी व म्हटली तर फारशी खरी नसलेली- अशी आहे. ग्रंथरूप प्रतिमा हे साहित्यसंस्कृतीचे ओळखपत्र असते आणि रेगे सर या संस्कृतीचे वारकरी नव्हते. 

ते तत्त्वचिंतन-संस्कृतीचे उपासक व प्रवक्ते होते. या दृष्टीनेच त्यांनी खूप लेखन केले व गेल्या अर्धशतकातील मराठी विचारक्षेत्राच्या मोक्याच्या वळणांवरची व समस्यांवरची चर्चासत्रे, परिसंवाद आपल्या भाषण-लेखनाने गाजविली. ग्रंथप्रकाशनात त्यांना स्वारस्य नव्हते आणि याचा प्रत्यक्ष अनुभव मला व्यक्तिशः निदान दोन वेळा तरी आलेला आहे. पण या बाबीला मराठीतील ग्रंथप्रकाशन-व्यवहाराचीही एक शिथिल उपक्रमशीलता काहीशी कारणीभूत आहेच. रोग्यांसारख्या आत्ममग्न तत्त्वचिंतकाच्या ग्रंथरूप प्रतिमेचा पाठपुरावा करणारी घरातील, दारातील वा समाजातील निरलस खटपटी प्रभावळ गरजेची होती. रेग्यांच्या नैसर्गिक अशा औदासीन्याला जिंकणारी अशी प्रभावळ दुर्दैवाने त्यांना लाभली नाही. खरे तर रेग्यांसारख्या संस्कृतिदक्ष लिहित्या-बोलत्या विचारवंताची योग्य ती सामाजिक प्रतिमा प्रभावीपणे व्यापक समाजापुढे साकार होऊ नये, हा खरा चिंतेचा प्रश्न आहे.

रेग्यांनी तर तत्त्वचिंतकाच्या सामाजिक भूमिकेचे एक लक्षणीय प्रतिमान आपल्या व्रतस्थ लेखनभाषणांतून उभे करण्याचा प्रयत्न केला. या प्रतिमानाचा सखोल अभ्यास आपल्या वैचारिक संस्कृतीच्या अर्धशतकीय वाटचालीवर चांगला प्रकाश पाडू शकेल, रेग्यांच्या विचारव्यूहाची मातृभाषा निखळ मराठी आहे. आधुनिक मराठी भाषेच्या सूक्ष्म तात्त्विक विश्लेषणक्षमतेचा शैलीवैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी तर रेग्यांच्या लेखनशैलीचा वेध घेणे नितांत उद्बोधक ठरणारे आहे. विश्लेषक मराठीचे एक विराट सौंदर्यविधान म्हणजे रेग्यांचे लेखन! विचारसौंदर्याचा तो चित्तथरारक, बुद्धिरोमांचक असा अजोड नमुना आहे. वाचकाला शारीरिक दृष्टीनेही थरारून सोडणारी ती अप्रतिम अभिव्यक्ती आहे. मराठी भाषा केवळ ज्ञानवाहक भाषा ठरू नये; तर ती ज्ञाननिर्मितीची भाषा ठरावी, हाच रेग्यांचा खराखुरा निदिध्यास होता. त्यांना मराठी माणसांसाठीच लिहावयाचे होते, बोलावयाचे होते आणि या मराठी माणसांतूनच रसेल, कांट, बिट्गिनस्टाइन निर्माण व्हावेत म्हणून त्यांचा अट्टाहास होता. ‘आधी केले व मग सांगितले,’ असा हा रामदासी नमुन्याचा रेगे-बाणा होता. याची स्वच्छ जाण मराठी समाजाने करून घ्यावयास हवी, हे म्हटलेच पाहिजे. रेग्यांच्या लेखनात अनुवादाचा वरचश्मा आहे. इंग्रजी व संस्कृत यांतून त्यांनी तत्त्वचिंतनाचे, धर्मविचारांचे मौलिक विचारधन मराठीत अखंडपणे आणण्याचे जणू व्रतच घेतले होते. विशेषतः नवभारताच्या अंकांतून व इतरत्रही ते येत राहिले. आज-उद्याच्या भारतीय विज्ञानयुगाला योग्य त्या ज्ञानयुगाची बैठक लाभावी, भारतीय परंपरेतील हिंदू-बौद्ध तत्त्वचिंतन व पश्चिमी परंपरेतील इहवादी चिंतनपरंपरा यांचा मेळ घालणारे एक समतोल आधुनिक अधिष्ठान निर्माण व्हावे, या दृष्टीनेच रेग्यांचे सर्व स्वतंत्र व अनुवादित लेखन होत राहिले. रसेल, मॅकिनटायर यांच्या अनुवादग्रंथांच्या त्यांच्या प्रस्तावना, बौद्ध धर्मविचारांचे अनुवाद, तर्कतीर्थ जोशी व म. अ. मेहेंदळे यांच्या ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावना- हे सर्व त्याचेच निदर्शक आहे. थोर भाष्यकारांचे भाष्यकार म्हणूनही रेग्यांकडे या संदर्भात पाहता येईल. मराठी भाषा, मराठी समाज व त्यांना ज्ञानसंपन्न करण्याची कळकळ हेच रेग्यांच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाचे प्रेरक तत्त्व होते, यात शंका नाही.

 रेग्यांचे आत्मीय क्षेत्र तत्त्व-नीती-मीमांसेचे. या क्षेत्रात स्वतंत्र नवनिर्मितीची स्वतंत्रता व नवीनता या खूपच सापेक्ष असतात. शिवाय यासाठी दिवा घेऊनच जन्माला यावे लागते. रेगे हे जाणून होतेच; पण त्यांच्या अभ्यासकांनीही हे जाणून घेणे इष्ट ठरेल. या शतकाच्या उत्तरार्धास प्रारंभ झाला व मराठीत सौंदर्यशास्त्राचे एक नवे चैतन्यपर्व जोमात सुरू झाले. या पर्वाचे रेगे एक श्रेष्ठ शिल्पकार आहेत. मकर, पाध्ये, पाटणकर यांच्या सौंदर्यमीमांसेची सम्यक दखल घेणारे व त्या मीमांसेचीही मार्मिक मीमांसा करणारे रेगे समोर होते. म्हणूनच या पर्वाला एक मोठे समर्थनही प्राप्त झाले. बहुधा हे सर्व सौंदर्यमीमांसक कळत-नकळतपणे रेग्यांना डोळ्यांसमोर ठेवून व त्यांचे समाधान व्हावे म्हणूनच लेखन करीत राहिले, असे आता व योड्याशा अतिशयोक्तीने म्हणता येईल. 

सौंदर्यमीमांसा असो वा विचारमीमांसा. या प्रत्येक क्षेत्रात जाज्ज्वल्य असा रेगेनिकष प्रतिष्ठित झाला, हे मान्य होण्यास हरकत असू नये. रेगे-वाङ्मयाचे परिशीलन करणे म्हणजे गेल्या अर्धशतकातील मराठी विचारक्षेत्राचा इतिहास व परंपरा समजून घेणे! मराठी विचारक्षेत्राची समकालीन जीवनसन्मुखता, त्या क्षेत्राने ओळखलेली वैचारिक विषयांची व समस्यांची रंगरूपे, त्यांना गवसणी घालताना दाखवलेली कसदार गुणवत्ता, वैचारिक अभिज्ञतेची मराठी विचारवंतांची कुवत- यांसारख्या मौलिक अंगांचे शलाकादर्शन रेंगे वाङ्मयातून निर्विवादपणे घडते. म्हणून तात्त्विक वैचारिक सांस्कृतिक दृष्टीने रेगे-वाङ्मय व विचारव्यूह यांना फार मोठे ऐतिहासिक मूल्यही आहे. योगायोगाची एक चांगली गोष्ट म्हणजे रेग्यांच्या समकालीनांत व निकटच्या संपर्कक्षेत्रात त्यांच्यासारखीच काही दिग्गज माणसेही होती. अ. भि. शहा, गोवर्धन पारीख, तर्कतीर्थ जोशी इत्यादी. रेग्यांच्या व्रतस्थ व्यासंगाला, लेखन-विश्लेषणाला व्यक्तिमत्त्वाला पोषक असा हा समकालीनांचा ज्ञानोपासक सहवास होता व ही कालपुरुषाची कृपाच म्हटली पाहिजे. तत्त्वविचारांच्या क्षेत्रातील नैतिक विशुद्धता व गुणोत्कर्ष सांभाळणे व संवर्धित करणे, हेच रेग्यांच्या लेखणीचे उद्दिष्ट होते; हे लक्षात घेतले तर त्यांचे टीकाविषय झालेले विचारवंत फारसे नाराज होणार नाहीत, याची खात्री वाटते. रेगे हे सम्यक परिवर्तनाचे पुरस्कर्ते होते. मात्र परिवर्तनाच्या वैचारिक गाभ्याची शुद्धता राखण्यावर त्यांचा भर होता. ते अलीकडे स्थितिवादी झाले की काय, अशी शंका काहींना वाटत असावी; पण ती अनाठायी आहे असे वाटते. खरी गोष्ट अशी आहे, की गेल्या अर्धशतकात उत्तरोत्तर परिवर्तनवादी आशय हाच अधिकाधिक संभ्रमित, दिशाहीन व मूल्यहीन होत गेला. एका अर्थाने तो चैतन्यच हरवून बसला. दुसऱ्या विशिष्ट दृष्टीने परिवर्तनवाद हाच मुळी काहीसा स्थितिजड झाला. याची नेमकी दखल रेग्यांनी घेतली व प्रसंगोपात्त या स्थितिजड प्रवृत्तींची कठोरपणाने चिकित्सा केली, असे म्हणता येईल. विसंगती रेग्यांच्या विचारव्यूहात नाही; ती परिवर्तनवादी विचारव्यूहात आहे, असे वाटते.

रेगे सरांना श्रद्धांजली वाहताना मनात आलेले हे विचार! केवळ एक सामान्य विचारक्षम व्यक्ती एवढ्याच भूमिकेतून ते व्यक्त केले आहेत. रेगे-विचारव्यूहावर लिहिण्याची माझी पात्रता नाही. मात्र रेग्यांसारखा व्यासंग असावा, विचारांचे विश्लेषण त्यांच्यासारखे करता यावे, समाजाशी वैचारिक पातळीवर तरी त्यांच्यासारखे बांधिलकीचे नाते बांधता यावे, असे मला गेली तीस वर्षे तरी वाटत आले आहे. लिहिताना व बोलताना माझ्या मनासमोर रेंगे सर असतात, असे मी परवाच जाहीरपणे एका व्याख्यानात सांगितले होते. प्रत्यक्षात आता रेगे कधीच भेटणार नाहीत, ही चिरवेदना मात्र सहन केलीच पाहिजे. रेगे सरांना ही श्रद्धांजली अर्पून यांबतो. ‘‘श्रेय तुम्ही अकारण स्वतःकडे का घेता?" असे खास रेगे शैलीचे उत्तर एका वाक्यात देऊन तो विषय तेथेच संपवला होता. डाव्या गटाची मंडळी अलीकडे रेगे यांच्याकडे 'नवहिंदुत्ववादी' म्हणून काहीशा संशयाने पहात असावीत असे मला थाटते. असा काही निर्देश नरेंद्रच्या एका वृत्तपत्रातील प्रतिक्रियेतही मला वाचावयास मिळाला. नरेंद्रच्या मनात रेगेंविषयी असलेल्या निरतिशय आदराची भावना मला माहीत आहे. परंतु ती वस्तुस्थिती होती. रेगेंना याची चिंता नव्हती. आपली मते मांडताना त्यांनी अशा प्रतिक्रियांची कधी पर्वा केली नाही. परंतु हे विचार आपण पुरोगामी लोकांपर्यंत पोचवू शकत नाही याचे त्यांना मनातून दुःख होत असावे असे मला वाटते. काल 'नवभारत'चे जुने अंक चाळताना आकस्मिकपणे रेगेंनीच एक दशकापूर्वीच या त्यांच्या पुढील समस्येवर काही प्रकाश टाकलेला मला आढळला. फेब्रुवारी 1988 च्या ‘नवभारत’च्या अंकातील त्यांच्या ‘पुरोगामी-प्रतिगामी’ या संपादकीयाचे शेवटचे दोन परिच्छेद या दृष्टीने बोलके आहेत. ते लिहितात :

"हा गोंधळवून टाकणारा विचार आहे. पुरोगामी-प्रतिगामी या भेदांत तो चपखलपणे बसत नाही. या आपत्तीतून काढता येण्याजोगा एक मार्ग असा, की हा सारा विचार मूलतः प्रतिगामी आहे असे ठरवून तो बाजूला सारणे, म्हणजे त्याच्यात काही पुरोगामी अंश आहेत हे मान्य करूनही त्याची एकंदर पठडीच प्रतिगामी आहे हे स्पष्ट करणे. ही पठडी प्रतिगामी आहे. कारण ती आध्यात्मिक-धार्मिक आहे आणि आध्यात्मिकता पुरोगामित्वाशी सुखाने नांदू शकत नाही."दुसरा मार्ग असा, की पुरोगामी-प्रतिगामी हा भेद परत तपासून पाहणे. अनेकांना वाटतात तितक्या या कल्पना स्पष्ट आहेत का? निसर्ग, मानवी ज्ञान, मानवी प्रकृती यांविषयीचे एक सबंध तत्त्वज्ञान या संकल्पनांत आहे आणि ते आधुनिक काळातील सर्वांत प्रभावी तत्त्वज्ञान आहे. ते प्रभावी आहे म्हणूनच ते परत परत तपासून पाहणे आवश्यक आहे."

‘ते प्रभावी आहे म्हणूनच ते परत परत तपासून पाहणे आवश्यक आहे,’ हे रेगे यांच्या विचारयात्रेचे सूत्र आहे. सर्वांची, किंबहुना, सहका-यांचीही मने सांभाळून ही यात्रा करता येत नाही. हे विचारवंत या संज्ञेच्या पलीकडचे, ज्याला मी ‘विचारशील’ म्हणतो त्यानेच पेलावयाचे सतीचे वाण आहे. एक असिधाराव्रत आहे. ते रेगे यांनी आमरण सांभाळले. हे लोकविलक्षण आहे. अभिनिवेशी विचारवंताला याचे आकलन होणे कठीण आहे. अभिनिवेशी कार्यकर्त्याला तर असे काही असू शकते, याचे भानही आणून देणे अशक्य आहे. आणि रेगे यांच्या लेखनात या स्वरूपाची आणखीही अनेक उदाहरणे सापडतील. ज्यामुळे त्यांच्या निकटच्या स्नेह्यांनाही ते दुरावत व रेग्यांविषयी आणखी गैरसमज निर्माण होत. रेगे ते सर्व शांतपणे सहन करीत. एक उदाहरण देतो ; जाने.-फेब्रु. 1997 च्या ‘नवभारत’च्या अंकात त्यांनी ‘आशय आणि शैली : श्री. बाळासाहेब ठाकरे यांची भाषा’ अशा शीर्षकाचे संपादकीय लिहिले आहे. त्यातील शेवटच्या ओळी खालीलप्रमाणे आहेत.

"...पण ठाकरे यांच्यावर रास्तपणे टीका करणारे संपादक इंदिरा गांधींच्या कर्तबगारीची जोमदारपणे भलावण करताना आढळतात. ठाकरे लोकशाहीच्या मार्गाने हुकूमशाही आणू पाहतात, असा आरोप आहे. पण संसदीय राजकारणात भाग घेणाऱ्या मार्क्सवादी पक्षाचे हे अधिकृत तत्त्वज्ञान आहे. श्रमजीवी वर्गाची हुकूमशाही स्थापन करून क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट आणि ते साधण्यासाठी श्रमजीवी वर्गावर कम्युनिस्ट पक्षाची एकाधिकारशाही ही कार्यपद्धती त्यांनी सोडून दिली आहे काय? तसेच लोकशाहीवादी म्हणवणा-या (व असणान्य) समाजवाद्यांचे काय? त्यांना ठाकरे यांची शैली आणि कार्यपद्धती पसंत नाही. लालूप्रसाद यांच्यावर सी.बी.आय.ने भ्रष्टाचाराचे आरोप केल्यावर आपले निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी जनता रस्त्यावर आणली. शिवाय शिक्षा झाली तरी आपण मुख्यमंत्री म्हणून काम करीत राहू, असे जनतेला आश्वासन दिले. हे सर्व जनतेच्या म्हणजे मागासवर्गाच्या नावाने होत असल्यामुळे समाजवाद्यांना ते खपवून घ्यावे लागते. पण त्यामुळे ठाकरे किंवा शिवसेना यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार ते गमावून बसतात. त्यांची टीका पक्षीय राजकारणाचे एक साधन बनते. लोकांना हे सर्व दिसत असल्यामुळे कितीही आवेशाने धारदार शब्दांत केलेली टीका बोथट बनते. तिच्यामुळे लोकशिक्षणाचे कार्य साधत नाही."

वस्तुस्थितीचे निदर्शन करणारे परंतु सर्वांनाच बोचणारे हे विधान केल्यानंतर रेगे यांचा आशावाद पुन्हा प्रकट होतो. कारण यानंतरच्या लगेचच्याच शेवटच्या परिच्छेदात ते लिहितात : "सुदैवाने, आपण राज्यघटनेचाच भंग केला तर राजकीय पक्ष म्हणून आपले प्रामाण्यच संपुष्टात येईल आणि आपण केवळ गुंड म्हणून ठरू हे जाणण्याइतके व्यावहारिक शहाणपण सर्व पक्षांनी दाखवले आहे. राज्यघटना शाबूत आहे तोपर्यंत लोकशिक्षण करून लोकशाही सकस करायला वाव आहे." रसेल एकदा हटवादी आशावादाने म्हणाला होता; 'Beyond all reason, am I firmly convinced that humanity will survive (माझा विवेक मला वेगळंच सांगतो परंतु माझी श्रद्धा व मानवता यांतून तरून जाईल असं मला सांगते.)’’ रेगे यांचीही आंतरिक श्रद्धा याच स्वरूपाची होती असे मला वाटते. त्या श्रद्धेच्या प्रकाशात त्यांची कृतिशील वाटचालही चालू होती. दलित पँथर्सपासून सर्व डाव्या गटांशी त्यांचा संपर्क होता व त्या सर्वांना रेगेंविषयी प्रेमादर होता, हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. प्रा. गं. बा. सरदार यांच्याखेरीज अन्य कोणाला महाराष्ट्रात हे भाग्य लाभले नाही. 1970 च्या आसपास वरळी येथे झालेल्या दलित आणि दलितेतर यांच्या दंग्याच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नेमलेल्या तिघा जणांच्या एका खाजगी समितीचे ते प्रमुख होते. नलिनी पंडित आणि मी त्यांचे सहकारी होतो. हमीद दलवाई यांचेही ते निकटचे सहकारी आणि मित्र होते. हमीदच्या निधनानंतरही मुस्लीम सत्यशोधक समाजाला त्यांचा मोठा आधार होता. या संदर्भातही रेगे यांची भूमिका स्पष्ट आणि लक्षणीय आहे. ते लिहितात : "इहवादी राज्यात न्यायाची मूलभूत तत्त्वे समाजाची सामायिक साध्ये कोणत्याही विशिष्ट घर्मश्रद्धेवर अवलंबून नसतात... श्रद्धाळू मुसलमानांना ही गोष्ट मान्य करण्यात विशेष अडचण आहे यात शंका नाही.

कारण इस्लामी राज्य ही मुस्लीम धार्मिक परंपरेतील एक मूलभूत संकल्पना आहे आणि इहवादी राज्याच्या कल्पनेशी विसंगत आहे. हिंदूंना ही अडचण नाही. कारण धर्मशास्त्रावर आधारलेल्या राज्याचे प्रजाजन म्हणून राहण्याचा ऐतिहासिक अनुभव हिंदू जमातीला नाही. पाकिस्तान व बांगलादेश स्वतःला इस्लामी राज्ये म्हणून ओळखतात व तसे जाहीर करतात; पण ज्याच्यात हिंदू बहुसंख्य आहे तो भारत इहवादी राज्य चालवतो; हा फरक का पडतो याच्याकडे मुस्लीम विचारवंतांनी लक्ष दिले पाहिजे." रेगे लगेच पुढे लिहितात : "या समग्र सांस्कृतिक, सामाजिक राजकीय परिस्थितीत प्रामाणिकपणे आणि जोमदारपणे जगायचे असेल तर इस्लामच्या चिरंतन संदेशाचा एक नवीन अर्थ लावणे अनिवार्य झाले आहे. भारतापुरती ही जबाबदारी भारतीय मुस्लीम विचारवंतांची आहे. ती पार पाडायला, प्रसंगी लोकांची अप्रीती सोसूनही त्यांनी पुढे यावे, असे हमीद दलवाई यांचे आवाहन होते. आपले मुसलमानीपण त्यांनी कधी नाकारले नाही किंवा दडवून ठेवले नाही. पण आज मुसलमान असण्यात काय सामावते आणि काय सामावत नाही, याचा शोध ते घेत होते."

रेगे यांच्या विचारधनाचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न नाही; मूल्यमापनाचा तर नाहीच नाही. तो माझा अधिकारही नाही हे मी विनयाचा कोणताही आभास निर्माण न करता यथार्थपणे म्हणू इच्छितो. या काही उदाहरणांवरूनही त्यांच्या विधानाविषयी, भूमिकेविषयी प्रामाणिक वाद निर्माण होऊ शकतात. रेगेंनाही याचे भान होते; ते मान्य होते. अनेकदा त्यांच्या भूमिकेविषयी काही संशयात्म लेखन मी केले आहे. मी असे वरचेवर लिहिले तर माझा तुमच्याविषयी काही व्यक्तिगत वाद आहे, अशी वाचकांना शंका येईल अशी एक भीतीही मी एकदा त्यांच्याकडे प्रकट केली होती. रेगेंच्या मनात माझ्याविषयीच काय परंतु कोणाच्याहीविषयी अशी शंका निर्माण होत नसे. हे वाद मोकळेपणाने अवश्य झाले पाहिजेत, असेच त्यांचे मत होते. हेही मला माहीत होते; कारण अशा काही वादांचे प्रस्ताव मी अधूनमधून मांडत असे. रेगे त्याला तयार असत. परंतु प्रतिस्पर्धी हे टाळत, असाच अनुभव येत असे. यातील काही ‘नवभारत’ च्या काही अंकातून नोंदवलेलेही आहे. रेगे यांचा अभ्यास गाढा असे, विवेकशक्ती सूक्ष्म व धारदार असे व त्यांच्या मांडणीत साक्षेप असे. ज्ञानाच्या क्षेत्रात भोंगळपणा त्यांना मान्य नव्हता. वाद घालू इच्छिणाऱ्या विरोधकाकडूनही त्यांची तशीच अपेक्षा असे. या संदर्भातही रेगे लिहितात - "समाजापुढे जे प्रश्न उपस्थित होत जातील त्यावर आपली विचारपूर्वक बनविलेली मते मांडणे ही विचारवंतांची एक सामाजिक जबाबदारी आहे, या अपेक्षेने समाज विचारवंतांकडे पाहतो; तेव्हा विचारवंताला अनेक भिन्न विषयांवर लिहावे-बोलावे लागते. आता माझा मुद्दा असा आहे की, ह्यांतील निदान एका विषयात विचारवंताचे पक्के ठाण असले पाहिजे. त्यातील अभिजात ग्रंथांचे सूक्ष्मपणे अध्ययन करून, त्यांचे मनन करून आपली स्वतःची मते त्याने बनविलेली असली पाहिजेत. एका विषयात अधिकारी असण्याचा अनुभव ज्याने कमावलेला आहे त्याला, तो इतर विषयांची माहिती करून घेऊन त्यांच्याविषयी बोलत असताना आपल्या अधिकाराच्या मर्यादा काय आहेत याचे भान असते. यामुळे त्याच्या कोणत्याही लिखाणात प्रांजळपणा असतो आणि अनाठायी आक्रमक पवित्रा नसतो. विचारवंत म्हणून जबाबदारी सांभाळण्यासाठी ही जी पूर्वतयारी आवश्यक आहे. ती जर केलेली नसेल तर सर्वच भुसभुशीत राहते." (नवभारत, मे-जून 97) याच पृष्ठावर अन्य एका संदर्भात रेगे लिहितात :

 ‘‘मुसलमान लोक स्वतःच्या परंपरेकडे चिकित्सकपणे पाहू शकत नाहीत, असे रेग्यांनी म्हटले आहे.’’ असे विधान मी केले आहे असा एक आक्षेप आहे. हे मी म्हटले असेल तर तीही माझी चूक आहे. हे मी कुठे म्हटले आहे तेही त्यांनी मला दाखवून यावे म्हणजे ती चूकही मला सुधारता येईल." ही रेग्यांची स्वाभाविक मनोवृत्ती आहे. तिच्यात आत्मविश्वास आहे तसाच विनयही आहे. मनोज्ञ असे हे दर्शन आहे. महाराष्ट्रातील विचारवंतांत रेगे यांचे एक अनन्यसाधारण स्थान होते. महाराष्ट्र फौंडेशनचे पारितोषिक हा केवळ एक उपचार होता. ‘नक्षत्र तारा ग्रह संकुलापि ज्योतिष्मती चन्द्रमसैव राजिः।’ ही उक्ती त्यांचे साजेसे वर्णन करतेच; परंतु Wandering companionless, among stars that have a different birth  - हे त्यांचे अधिक यथार्थ वर्णन होऊ शकेल असे वाटते. रेगेंच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक अबोल भावबंध होता. तो त्यांना माहीत होता; मला माहीत होता. मरणोत्तर अस्तित्वावर त्यांचा विश्वास होता की नाही, मला माहीत नाही. माझा स्वतःचा आहे की नाही, हेही मला अवगत नाही. परंतु तसे अस्तित्व असेल आणि अध्यात्माच्या इंटरनेटवर माझे हे विचार त्यांच्यापर्यंत पोचत असतील तर ते त्यांच्या शैलीत म्हणतील, " तुम्ही काय बोलता याचे तुमचे तुम्हांला तरी आकलन होते आहे का?" मला खरोखरच आकलन होत नाही.

Tags: संस्मरण मे.पु. रेगे रा. ग. जाधव वैचारिक memorable mp rege rg jadhav ideogenical weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रा. ग. जाधव

लेखक, समीक्षक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके