डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अंधारयात्री आणि आऊटसायडर

मराठीत ‘अंधारयात्री’ कविलेखक यापूर्वीही झाले आहेत. डहाके 1960 नंतरच्या कालावकाशातील एक अंधारयात्री आहेत. खरी रसिकता त्यांच्या काव्यातील अंधारघटकांचा, त्यांच्या आकृतिबंधाचा, त्यांच्या आशयाचा व कवीच्या त्यामागील उत्कट संवेदनशील सर्जनशीलतेचा वेध घेते. अनावश्यक व अप्रस्तुत मुद्दे उपस्थित करीत नाही. खरे तर स्वत:च्या माणूस असण्याशीच डहाके यांच्यातील कवीचा विसंवाद आहे, विग्रह आहे. त्यांचे समग्र व सूक्ष्म चरित्र आपणास माहीत नाही. त्यांच्या बालपणीच्या व पुढील आयुष्यातील अनुभवांची माहिती नाही. त्यामुळे त्यांची वाङ्‌मयीन अंधारयात्रा नेमकी कशी व केव्हा सुरू झाली, हे समजत नाही. त्याविषयी निष्कारण तर्क-कुतर्क करण्यातही अर्थ नाही. पण हे नक्की की, त्यांच्या अंधारयात्रेची बीजे त्यांच्या चरित्रात आहेत. काळात आहेत, त्यांच्या वर्तमानात आहे आणि मुख्यत: त्यांच्या सर्जनशील संवेदनक्षमतेत आहेत. 

‘इतक्या वर्षांनंतर, काळाची एवढी माती पडून गेल्यानंतर मला आठवतो आमच्या शेताच्या वाटेवर बसलेला बैल. तो होता जखमी आणि त्याच्या जखमेत अळ्या झाल्या होत्या...खोल कालवल्यासारखं व्हायचं आणि शेतात गेल्यावर नुकत्याच जन्मलेल्या वासराचं हुंदडणं निरर्थक वाटायचं...’ (‘चित्रलिपी’ ‘हाक’, पृष्ठ 86-87) 

कविता व समीक्षा या क्षेत्रांत प्रामुख्याने गेले अर्धशतकभर कार्यरत असलेले साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांची चंद्रपूरच्या 85व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बहुमताने निवड झाली, याबद्दल साधना ट्रस्ट, साधना साप्ताहिक व एकूणच साधना परिवार यांच्यातर्फे मन:पूर्वक अभिनंदन! 

प्राध्यापक, चित्रकार, विविध मंडळांतील तज्ज्ञ सल्लागार, चर्चासत्रांतील सहभागीदार, विविध वाङ्‌मयीन प्रकल्पांतील सक्रिय सदस्य अशा विविध नात्यांनी डहाके साहित्यक्षेत्रात परिचित आहेत. त्यांच्या ‘चित्रलिपी’ या काव्यसंग्रहास 2010 साली साहित्य अकादमीचा पुरस्कारही लाभला आहे. इतरही काही पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. चंद्रपूरचाच सुपुत्र साहित्यिक चंद्रपूरच्याच साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हावा हा मोठा वैशिष्ट्यपूर्ण योग म्हणता येईल. 

1960 नंतरच्या मनुष्यसंस्कृतीचे एक सर्जनशील भाष्यकार अशीच डहाके यांची सर्व निर्मिती आहे. त्यामुळे योग्यसमयी योग्य प्रकृतीचा संमेलनाध्यक्ष मराठीला लाभला असेच म्हटले पाहिजे. डहाके यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा येथे 30 मार्च 1942 रोजी झाला. चंद्रपुरातून ते बी.ए. व नागपूरला एम.ए. झाले. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात त्यांनी 1971 ते 2002 पर्यंत अध्यापन केले. याशिवाय स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स, मुंबई, तसेच मुंबई विद्यापीठ, पुण्याची यशदा संस्था यांतही त्यांनी अध्यापन केले.

त्यांची ‘योगभ्रष्ट’ ही दीर्घ कविता ‘सत्यकथा’ मासिकाच्या मे 1966 च्या अंकात आली व गाजली. 1960 नंतर लघुनियतकालिकांच्या बहरकाळात डहाके सहभागी होते. ‘योगभ्रष्ट’ (1972), ‘शुभवर्तमान’ (1987), ‘शुन:शेप’ (1996), ‘चित्रलिपी’ (2006) हे त्यांचे काव्यसंग्रह. डहाके यांनी ‘अधोलोक’ (1975) व ‘प्रतिबद्ध आणि मर्त्य’ या दोन कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. समीक्षा क्षेत्रातील त्यांची पुस्तके अशी : ‘समकालीन साहित्य’ (1992), ‘कवितेविषयी’ (1999), ‘मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती’ (2005) व ‘मराठी समीक्षेची सद्य:स्थिती’ (2011). डहाके यांचे कायमचे संदर्भमुल्य असलेले कार्य म्हणजे ‘कोशरचना’. (सहकाऱ्यांसह). संक्षिप्त मराठी वाङ्‌य-कोश (खंड 1 ते 3 : 1998-2004) तसेच ‘वाङ्‌मयीन संज्ञा- संकल्पना कोश’ (2001) हे कोशग्रंथ, खरे तर, प्रत्येक मराठी अध्यापक व विद्यापीठीय विद्यार्थी यांच्या टेबलावर असले पाहिजेत. ‘डॉ.आंबेडकर : एक फोटोबायोग्राफी’ या नावाचे एक वेधक चित्रमय चरित्र त्यांनी सिद्ध केले आहे (2007), पण डहाके यांचे लेखन अजून थांबलेले नाही. 

अनेक नियतकालिके, वृत्तपत्रे, लघुनियतकालिके यांतून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मराठी वाङ्‌मयाचा इतिहास- खंड 7 : 1950-2000 यासाठी त्यांनी ‘सांस्कृतिक पार्श्वभूमी’ हा विचारप्रवर्तक लेख लिहिला आहे. लेखनाबाबत दिलेला शब्द पाळणे हे त्यांचे वैशिष्ट्य. मराठी वाङ्‌मयाच्या प्रेमापोटीच त्यांची ही बांधिलकी निर्माण झाली आहे. 

साधनातर्फे प्रतिवर्षी होणाऱ्या एकाच वाङ्‌मयप्रकारातील ‘काव्य’ यावरील संमेलनाचे बीजभाषण (पणजी, गोवा, 2009) डहाके यांनीच केले होते. साहित्याची हाक कोठूनही आली, तरी डहाके यांची ‘ओ’ ठरलेलीच! साहित्य क्षेत्रातील प्रस्थापित व नवोदित त्यांना दोन्हीही सारखेच. नव्वदोत्तरी कवी व कविता, लघुनियतकालिके यांच्याशी सक्रिय जिव्हाळ्याचे व रसिकतेचे नाते राखणारा डहाके यांच्याव्यतिरिक्त दुसरा ज्येष्ठ समीक्षक नाही, असे म्हणता येईल. या उंच शेलाट्या कवीचा पेहराव कायम एकच : नेहरू शर्ट किंवा झब्बा- पायजमा, केस बहुधा कंगव्यासाठी आसुसलेले! मी कधी त्यांना शर्ट-पँट घातलेले पाहिले नाही; बहुधा कोणीच पाहिले नसेल. मितभाषी स्वभाव, अघळपघळपणा नाही, बोलताना किंवा भाषणात काटेकोर विधाने, आलंकारिकता मुळीच नाही. परंपरागत स्वरूपाचे दिसणे, असणे, आलंकालिकता वापरणे हे डहाके यांना वर्ज्य- ते जेव्हा कधी हसतात, तेव्हा छान दिसतात. शालीनता, ऋजुता, स्वागतशील सहिष्णुता असे दुर्मिळ गुण लाभलेला हा कवी आहे. 

खरे तर तो हाडाचा संवेदनशील कवी आहे, म्हणूनच खरे तर, या गुणांचा धनी ठरला आहे. आता अध्यक्षीय कारकिर्दीत त्यांच्यावर शालींचा वर्षाव होईल; म्हणजे त्यांच्या शालीनतेला आभाळभर पैस लाभणार! प्रभा गणोरकर या त्यांच्या सहधर्मचारिणी. त्याही कवयित्री, समीक्षक, प्राध्यापक! पण दोघांनी आपल्या संसाराचे काव्य करण्यापेक्षा अवघ्या जनलोक-संसाराला काव्य केले. दुर्मिळच हे!

‘योगभ्रष्ट’ ही दीर्घ कविता डहाके यांनी 1966 मध्ये प्रसिद्ध केली. त्या वेळी ते ऐन पंचविशीत होते. 1960 च्या मराठीत परात्म जाणिवेचा व अस्तित्ववादी प्रणालीचा तरुण लेखक-कवींवर प्रभाव होता. त्याचप्रमाणे प्रस्थापितविरोध हीही एक धारणा प्रबल होती. (डहाक्यांचा गद्यप्राय मुक्तच्छंद हा प्रस्थापित-विरोधाचाच द्योतक आहे काय?)  त्यामुळे समाज व सर्व सामाजिकता यांच्यापासून एक प्रकारचा तुटलेपणा, तुसडेपणा या लेखक-कवींना जाणवत होता. ‘योगभ्रष्ट’ हा भगवद्‌गीतेतला शब्द! आध्यात्मिक तप:साधना खंडित होते तेव्हा योगभ्रष्टता घडते. 

डहाके हे मनुष्यसंस्कृतीच्या विद्यमान युगापासूनच च्युत झाले. योगभ्रष्टता युगभ्रष्टतेत, युगच्युतीत रूपांतर होऊन पसरत गेली. म्हणून ते वर्तमानाला ‘चित्रलिपी’ मानतात. सगळेच विसंगत, निरर्थक, दिशाहीन! व्यक्ती, समाज, जग सगळेच! ते लिहितात... 

‘‘किती कठीण झालेलं आहे आता 
शब्दापुढे शब्द मांडून 
जुळवलेलं एखादं वाक्य वाचणं!’’ 
वर्तमानाशी जोडणारा सूर हरवलेला आहे. 

परात्मतेच्या या दाहक अंत:कलहातून आजपर्यंत तरी डहाके धगधगत आहेत. डहाक्यांची कविता एका परीने अस्तित्ववादी खरीच; पण अस्तित्ववादाचे व्यक्तिकेंद्री असलेले जाणिवेचे स्वरूप त्यांच्या तपशीलवजा काव्याने समष्टिकेंद्री केले, हे त्यांचे वैशिष्ट्य! आजकालची प्रत्येक व्यक्ती परात्मभावनेने मूळ माणूसपणापासून तोडली गेली आहे हे या कवीचे युगभाष्य आहे. पुष्कळदा वाटते, माणूस व त्याच्यातील कवी यांचे संबंध नेमके कसे असतात? 

एक माणूस म्हणून डहाके चारचौघांसारखेच आहेत, तसेच ते दिसतातही. पण चारचौघांसारखे मी, तू, ती, तो, समाज, काळ, अवकाश, युग हे सर्व वाचणे त्यांना आवडत नाही. त्यांची एक स्वत:ची अंत:सृष्टी आहे; तीच त्यांना वाचता येते. 

ही अंत:सृष्टी म्हणजे एक स्वसंवेद्य अवकाश. प्रत्येक कवी भोवतालच्या कालावकाशातूनच इष्ट ती स्वसंवेद्य सृष्टी निर्माण करत असतो. त्या सृष्टीचा विधाता व वाचक तोच असतो. वर्तमान वास्तवाशी त्या सृष्टीची तुलना करताना फक्त वास्तवातील तिच्यातील सुसंवादी  घटक लक्षात घ्यायचे असतात. इतर विधायक वास्तवाचे मुद्दे इथे गैरलागू ठरतात. 

मराठीत ‘अंधारयात्री’ कविलेखक यापूर्वीही झाले आहेत. डहाके 1960 नंतरच्या कालावकाशातील एक अंधारयात्री आहेत. खरी रसिकता त्यांच्या काव्यातील अंधारघटकांचा, त्यांच्या आकृतिबंधाचा, त्यांच्या आशयाचा व कवीच्या त्यामागील उत्कट संवेदनशील सर्जनशीलतेचा वेध घेते. अनावश्यक व अप्रस्तुत मुद्दे उपस्थित करीत नाही. खरे तर स्वत:च्या माणूस असण्याशीच डहाके यांच्यातील कवीचा विसंवाद आहे, विग्रह आहे. त्यांचे समग्र व सूक्ष्म चरित्र आपणास माहीत नाही. 

त्यांच्या बालपणीच्या व पुढील आयुष्यातील अनुभवांची माहिती नाही. त्यामुळे त्यांची वाङ्‌मयीन अंधारयात्रा नेमकी कशी व केव्हा सुरू झाली, हे समजत नाही. त्याविषयी निष्कारण तर्क-कुतर्क करण्यातही अर्थ नाही. पण हे नक्की की, त्यांच्या अंधारयात्रेची बीजे त्यांच्या चरित्रात आहेत. काळात आहेत, त्यांच्या वर्तमानात आहे आणि मुख्यत: त्यांच्या सर्जनशील संवेदनक्षमतेत आहेत. 

2011 साली त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह ‘अस्वस्थ शतकाची कविता’ श्री.अभिजित देशपांडे यांनी संपादित करून प्रसिद्ध केलेला आहे. हे ‘अस्वस्थ शतक’ म्हणजे 1996 ते 2011 केवळ नव्हे, तर ते पुढेही चालू राहील. खरे तर स्वत: डहाके हेच मुळी एक अस्वस्थ शतक आहेत, आत्मा आहेत, एक हाडाचा ‘आऊटसायडर’ आहेत. अस्तित्ववादाची एवढी विविध, मूर्त व उत्कट कविता फक्त अरुण कोलटकर व दिलीप पु. चित्रे यांनीच लिहिली. या तीनही कवींनी मर्ढेकरांचे अध्यात्म पूर्णपणे नाकारले आहे. ‘मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती’ (2005, 2008) हा डहाक्यांचा अभ्यासग्रंथ त्यांच्या सूक्ष्म व चिकित्सक साहित्याभ्यासाचा एक नमुना आहे. आद्य मराठी संशोधक, संपादक व चित्रकार ‘म्हाइंभट’ यांना तो अर्पण केला आहे. 

डहाके यांच्या कविता व समीक्षा या दोहोंतही एक प्रकारचा अस्सल मराठीपणा आहे व हा मराठीपणा, संस्कृत व इंग्लिश साहित्य यांचाही चिकित्सकपणे स्वीकार करणारा मोठा सहिष्णु आहे. त्यांच्या त्रैभाषिक व्यासंगाचा परीघ किती मोठा व व्यापक आहे हे या ग्रंथाला जोडलेल्या ‘संदर्भसाहित्या’वरून लक्षात येईल. या ग्रंथात इतिहास, संस्कृती, विचारप्रणाली व साहित्य यांच्या संदर्भातील वेगवेगळे विचारव्यूह चर्चिले आहेत. 

साहित्यकृतीची समीक्षा संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यातच केली पाहिजे, असा काहीसा या चर्चेचा निष्कर्ष आहे. समीक्षा ही लोकसमूहाच्या आकलनाचे एक साधन असते, हेही त्यांनी सांगितले आहे. या विषयावरील हा बहुधा पहिलाच बृहद्‌ग्रंथ आहे. डहाके यांचा कल डावीकडे आहे हे सहजच लक्षात येते. हा कल म्हणजे चंद्रपूरच्या मातीचा तर नाही ना?  असा हा विचारवंत, व्यासंगी साहित्यिक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून कोणते विचार मांडणार, याची अनेकांना हुरहुरी जिज्ञासा वाटणे स्वाभाविक आहे. यासाठी एक गुरुकिल्ली माझ्या लक्षात आली आहे. ती म्हणजे, त्यांचे मतदारांना पाठविलेले पत्र. 

या पत्रात ते लिहितात... ‘आज आपण सगळेच पूर्वी न अनुभवलेल्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहोत. सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रांमध्ये उत्पन्न झालेल्या विविध संभ्रमांच्या मुद्रा पाहत आहोत. गावं, शहरं बदलत आहेत. पुष्कळदा असं वाटतं की, आपण एका अवाढव्य अशा बाजारपेठेतून हिंडतो आहोत. आजच्या या स्थितीत संस्कृती, भाषा, साहित्य यांचे भवितव्य काय, या प्रश्नानं आपण स्वस्थ होत आहोत... अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे आपल्या सांस्कृतिक, वाङ्‌मयीन व भाषिक प्रश्नांचा विचार करण्यासाठी उपलब्ध असलेले व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरून आपला एक प्रतिनिधी म्हणून या प्रश्नांचा ऊहापोह करावा, असा माझा मनोदय आहे.’

डहाके यांच्या अध्यक्षीय भाषणाचा सूर कोणता असेल, हे वरील निवेदनावरून लक्षात येईल. याशिवाय संमेलनाचे जत्रेचे स्वरूप कमी करून त्याला गंभीर साहित्यचर्चेचे वळण देणे, साने गुरुजींच्या स्मारकाचे काम मार्गी लावणे यांसारख्या गोष्टीही करण्याचा मनोदय यांनी जाहीर केला आहे. त्यांचे हे सर्व मनोदय सफल होवोत व अध्यक्षीय कारकीर्द संस्मरणीय ठरो, अशी शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. 

Tags: काव्यसंग्रह शुन:शेप शुभवर्तमान योगभ्रष्ट वसंत आबाजी डहाके poetry shunah shep shubhavartamana yogabhrashat vasant abaji dahake weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रा. ग. जाधव

लेखक, समीक्षक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके