डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बीजिंगमधील चिनी क्रीडापुरुषार्थ माझ्यासारख्याला चकित करणारे एक रोमांचक रहस्य वाटते, ते वरील विचारांनीच. शंभर चिनी क्रीडावीर. शंभर प्रकारच्या खेळांतील पदकविजयी गुणवत्ता. कुठून कुठून आले असतील हे चिनी पदकवीर? त्यापैकी कुणी खेड्यातून आला असेल, एखादा शहरातून आला असेल, एखादा शेतकऱ्याचा मुलगा असेल, कुणीएक कामगाराचा पुत्र असेल, कुणी शिक्षित असेल, तर कुणी बेताचा साक्षर असेल. त्या शंभर चिनी क्रीडापटूंचे समाजशास्त्र माहीत नाही; पण नक्कीच वाटते की, ते शतक चीनच्या बहुजिनसी, बहुवर्गीय व बहुधार्मिक समाज एक प्रातिनिधिक शतक असेल. क्रीडानैपुण्य व क्रीडापुरुषार्थ हे कधीही अभिजनांचे खाते नव्हते, ती बहुजनांचीच खेती आहे, होती व असेलही!

बीजिंग ऑलिंपिक क्रीडा सामने...! थोडेसे पाहिले, थोडेफार वाचले, थोड्यांकडून ऐकले आणि तरीही निखालसपणे मन थक्क झाले. पंधरवडाभर कमी-जास्त विद्युतभारित मनोवस्था, इथल्या भारनियमनाला न जुमानणारी. अभिनव बिंद्राचे सुवर्ण म्हणजे क्रीडामूल्याची प्रतिमाच! सोने कधी मला रुचले नाही आयुष्यात; पण बिंद्राचे सोनेच अभिनव. असे सोने कुणाला नाही रुचणार?

'बर्ड्स नेस्ट'- पक्ष्याचे घरटे. किती सुंदर प्रतिमा! जगभरच्या क्रीडापटूंचे, क्रीडारसिकांचे हे घरटे. त्या घरट्याच्या पहिल्या सुगरणी ग्रीक. अभिजात ग्रीक समाज व संस्कृती. ते युरोपचे घरटे एका अशियाई सुगरणीने या एकविसाव्या शतकात पहिल्यांदाच सुरेखपणे बांधले. गाजवलेही. तेही अशा पराक्रमी चोखपणाने की, अवघे जग चकित व्हावे आणि झालेही...!

पक्षी उडून गेले; पण मनाचे स्तिमित भारावलेपण उडून जात नाही, पंखही मिटत नाही. माझे घरटे सोडायला ते तयार नाही. एकदा वाटते, कविता करून मोकळे व्हावे; म्हणजे हलकेही
वाटेल. पण बीजिंग, का कुणास ठाऊक, कवितेचा विषय करण्यास मन तयार होत नाही...! खेळ, क्रीडासामने, असामान्य क्रीडा कौशल्य यांचे देदीप्यमान दर्शन पंधरवडाभर जगाला घडत होते, अंशतः मलाही! पण ते अंशमात्र दर्शन, नाही म्हटले तरी, परोक्षच. अप्रत्यक्षच. परोक्षदर्शनातून कविता उमलत नाही, नसावी. खरे तर, खेळ, क्रीडा या बाबी आमच्या भावजीवनाच्या अंतर्दालनात अजून प्रविष्टच झाल्या नाहीत. आपली घरटी अजून बर्ड्स नेस्ट' झालेली नाहीत. मग कविता येणारच कुठून?

कवितेकडून गद्याकडे वळले की, मग मात्र बीजिंग ऑलिंपिक क्रीडा सामने चिनी यशोगाथेचा एक चकित करणारा अध्यायच सांगत सुटतात. धृतराष्ट्र का संजय कुरुक्षेत्रावरील युद्धपर्व सांगत होता त्याप्रमाणे... मला! चकित करणारा आणि अंतर्मुखही करणारा क्रीडा ध्याय! 

चीनची ऑलिंपिक- कमाई शंभर पदकांची. त्यांतली निम्मी
सोन्याची व बाकी रुप्याची नि बाँझची. पदकांच्या यादीत चीनचा नंबर पहिला. क्रीडा सामन्यांचे सुविहित नियोजन, व्यवस्थापन यांतही नंबर वन. जगभरच्या पाहुण्यांची सरबराई करण्यात, आतिथ्य करण्यातही पहिलाच क्रमांक. बीजिंग ऑलिंपिक ही चीनची जगाला झालेली एक अभूतपूर्व 'डिस्कव्हरी' आहे आणि खुद्द चीनलाही स्वत:च्या क्रीडानैपुण्याची व प्रबळ आत्मविश्वासाची झालेली 'डिस्कव्हरी' आहे, असे म्हणतात. या दोन्ही शोधांचा माझ्यासारख्याला लागलेला शोध हा आणखी एक तिसरा शोध.

एका रोमांचकारक रहस्यमयतेचा माझ्यापुरता असलेला हा शोधबोध होय. जागतिक पातळीवरच्या क्रीडा स्पर्धेत चिनी क्रीडापटूंनी सुवर्णखचित शंभर पदके पटकविणे ही विलक्षण नवलाईची बाब आहे. क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य व उच्चतम गुणवत्ता या गोष्टी पूर्णपणे स्वायत्त आहेत, स्वयंसापेक्ष आहेत. बेरीज वजाबाकीची गणिते मांडून किंवा सांख्यिकीय हेराफेरी करून क्रीडा, क्रीडापटू व क्रीडापदके हासील करता येत नाहीत. क्रीडापुरुष व क्रीडापुरुषार्थ येनकेनप्रकारे घडवता येत नाहीत, 'मॅनिप्युलेट' करता येत नाहीत. हे खरे ना? 

दुसरी गोष्ट म्हणजे, मी मला किंवा माझ्या बांधवांना क्रीडाक्षेत्रातील 'तारे' म्हणून मानले किंवा गौरविले, तरी विशेषतः ऑलिंपिक सारख्या जागतिक स्पर्धेत त्यांनी खरोखरच ताऱ्यांप्रमाणे चमकणे अपेक्षित असते; नपेक्षा 'तारे जमीपर' हे भागधेय टाळता येत नाही. मला व माझ्याच केवळ देशाला नव्हे, तर जगातील कुणालाही व कोणत्याही देशाला.

बीजिंगमधील चिनी क्रीडा पुरुषार्थ माझ्यासारख्याला चकित करणारे रोमांचक रहस्य वाटतो, तो वरील विचारांनीच. शंभर चिनी क्रीडा वीर. शंभर प्रकारच्या खेळात पदक विजयी गुणवत्ता. कुठून कुठून आले असतील हे चिनी पदकवीर? त्यांपैकी कुणी खेड्यातून आला असेल, एखादा शहरातून आला असेल, एखादा शेतकऱ्याला मुलगा असेल, कुणीएक कामगाराचा पुत्र असेल, कुणी शिक्षित असेल, तर कुणी बेताचा साक्षर असेल. शंभर चिनी क्रीडापटूंचे

समाजशास्त्र माहीत नाही; पण नक्कीच वाटते की, ते शतक चीनच्या बहुजिनसी, बहुवर्गीय व बहुधर्मीय समाजाचे एक प्रातिनिधिक शतक असेल. क्रीडा नैपुण्य व क्रीडा पुरुषार्थ हा कधीही अभिजनांचे खाते नव्हते, ती बहुजनांचीच खेती आहे, होती व असेलही!

त्या विविध क्रीडापुरुषार्थीना घडविले कुणी? आणि घडविले कसे? केव्हा? हे नियोजन व व्यवस्थापन कुणी केले? कसे? या प्रश्नांची उत्तरे माझ्यासारख्याला देताच येणार नाहीत. पण ती उत्तरे कुणीतरी माझ्यासारख्यांसाठी दिली पाहिजेत. 'ऑलिपिक क्रीडाविजेत्यांचे शतक' ही सामान्य गोष्ट नाही, हे आपण फार गंभीरतेने समजून घेतले पाहिजे. खरे तर, या मनुष्यसंस्कृतीत खऱ्याखुऱ्या मंगल जागतिकीकरणाचे पहिले बीज ग्रीकांच्या ऑलिंपियाडनेच पहिल्यांदा पेरले. तिथेच. त्या बीजाला चिनी पराक्रमाचे गोमटे फळ एकविसाव्या शतकात यावे, ही विलक्षण थरारक व अर्थपूर्ण बाब आहे. ऑलिंपिक म्हणजे जागतिकीकरण म्हणजे जागतिक सुसंवाद, सुस्पर्धा, सुंदर पुरुषार्थ... आणि चीन त्यात अग्रगामी हे बीजिंग ऑलिंपिक सिद्ध करावे, ही बाब किती किती अर्थपूर्ण, सूचक! चीनचा मला लागलेला तिसरा शोध हा असा. 

एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला माहीत आहे की, चीन ही विद्यमान जगातील एक राजकीय महासत्ता आहे. विद्यमान जगात महासत्ता ठरण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, त्या त्या सर्व गोष्टी चीन जवळ मौजूद आहेत. धनसत्ता, ज्ञानसत्ता, शस्त्रास्त्रसत्ता, आर्थिक सत्ता, मनुष्यबळाची सत्ता, महत्त्वाकांक्षेची युयुत्सू सत्ता, कर्मसत्ता, तंत्रविज्ञानसत्ता. सगळ्या मनुष्याधीन सत्तांचे संकुल म्हणजे चीन. माझ्यासारख्याला हेही माहीत आहे की, चिनी संस्कृती ही भारतीय संस्कृती सारखीच एक फार पुरातन संस्कृती आहे आणि ती खूप विशाल, गुंतागुंतीचीही आहे. तिलाही परंपरेचे जीवघेणे पाश आहेत. सांस्कृतिक अनुशेषांचे प्रचंड ताण आहेत, भारतासारखेच! प्राचीन काळातील भारत-चीन-संबंध हेही सर्वपरिचित आहेत. भारत-चीन सांस्कृतिक आंतरक्रिया हीदेखील खूपशी माहीत आहे. आणि कालचे-आजचे दुखते-खुपते संबंधही ठाऊक आहेत.

मनुष्याधीन असलेली महासत्तेची सर्व रूपे व साधने विद्यमान चीन जवळ आहे. पण चीनची क्रीडा सत्ता यांपैकी कोणतीही सत्ता वा साधन निर्माण करू शकत नाही. यांपैकी कोणतीही सत्ता क्रीडा पुरुषार्थ 'मॅनिप्युलेट' करू शकत नाही. राजकीय चिनी महासत्ता ऑलिंपिक क्रीडापटूंना जन्म देऊ शकत नाही. त्यासाठी क्रीडा खेळांची जन्मदाती कूस आवश्यक असते. पक्षीय हुकूमशाही असलेल्या आणि बहुपक्षीय लोकशाही असलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या देशातून घडलेल्या क्रीडापटूंनी बीजिंग ऑलिंपिक क्रीडासामन्यात पहिले दोन क्रमांक पटकावलेले आहेत. क्रीडा संस्कृतीची जडणघडण ही वेगळ्या रसायनाची प्रक्रिया आहे. 

याचा अर्थ मनात येते, क्रीडासंस्कृती ही अखेर एका विशुद्ध इहवादाचा आविष्कार आहे. माणूस, त्याचे जग, त्याच्या शारीर व मानसिक क्षमता, त्याचे कर्तृत्व हा इहवादाचा गाभा आहे. धर्म, अध्यात्म इत्यादींना त्यात महत्त्व नाही. आपली परंपरा, आपले प्रेम, आपली आवड आजही प्राधान्याने धार्मिक, आध्यात्मिक आहे; ऐहिकतावादी नाही. मला नवल वाटते ते याचे की, आपल्या महान अध्यात्मवादी संस्कृती ग्रीकांप्रमाणे एखादे जागतिक आध्यात्मिक ऑलिंपियाड का बरे सुरू केले नाही? तसे झाले असते, तर आपल्या अध्यात्मज्ञानाची गुणवत्ता कितपत आहे, याचा जागतिक स्पर्धेत निवाडा झाला असता.

अर्थात अध्यात्माची स्पर्धा आणि क्रीडास्पर्धा यांत फरक आहे. अध्यात्म ही व्यक्तिनिष्ठ कोटी आहे, तर क्रीडा ही वस्तुनिष्ठ कोटी आहे. स्पर्धा वस्तुनिष्ठ कोटींतील- गोष्टींबाबत होऊ शकतात; पण व्यक्तिनिष्ठ कोटीतील गोष्टींबाबत होऊ शकत नाहीत. भारतीय सांस्कृतिक कसल्याच स्पर्धेचा अवकाशच उपलब्ध नाही, नव्हता! 

धर्म व अध्यात्म स्पर्धा निरपेक्ष, स्पर्धा शून्य आहे, म्हणून त्यात मानवी क्षमतांची व गुणवत्तेची स्पर्धा होऊच शकत नाही. त्यांचा कसही लागत नाही. पुन्हा धर्म व अध्यात्म म्हणजे श्रद्धाविषय. श्रद्धा ह्या एकूण स्पर्धा नाकारण्याच्या हुकूमशहाच असतात. 

अशी स्पर्धाशून्य परंपरा कवटाळून बसलेल्या आपल्या देशाला ऑलिम्पिक क्रीडा सामन्यातील पदके प्राप्तीची शंभरी केव्हा गाठता येईल? सांगणे कठीण आहे; पण आमचे महान ज्योतिषी या बाबतीतही कुंडली मांडून भविष्यकथन करतीलच. आपली स्पर्धाशीलता ग्रह-ताऱ्यांच्या गतीत गुंतलेली! माणसाच्या गतिमान निपुणतेशी तिचे सोयरसुतक नाही.

प्रश्न भविष्य कथनाचा नाही; तो आहे क्रीडा संस्कृतीच्या संगोपन-संवर्धनाचा! कलावंत जन्मावा लागतो म्हणतात, मग क्रीडावंतांचे काय? वाटते, क्रीडावंतही जन्मावा लागतो व कलावंतांप्रमाणेच घडावाही लागतो. क्रीडावंताचे जन्मणे आणि घडणे यांमध्ये समाज-संस्कृतीचा भक्कम पूल असावा लागतो, उड्डाणपूलच! तो पूल इथे आहे कुठे?
 

Tags: china beijing olympic weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रा. ग. जाधव

लेखक, समीक्षक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके